करोना विषाणुवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरु शकतात की नाही या बाबत साशंकता असली पर्यायी उपचार पध्दती म्हणून त्याचा विचार सुरु झाला आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर मात्र उपयुक्त ठरु शकतो, हे या काळात सर्वमान्य झाले. आयुष मंत्रालयाने सुध्दा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करण्याची सूचना केली. शरीरातील विविध आजार किंवा व्याधी आयुर्वेदातील तंत्र- कौशल्य-उपचार पध्दती-औषधी मूल्य असलेल्या वनस्पतींचा वापर करुन दूर करता येणे शक्य असल्याची खात्री अनेकांना पटू लागली आहे. त्यामुळे यापुढील काळात आयुर्वेदाचे महत्व देश आणि विदेश पातळीवरही मोठे वाढेल.
महाराष्ट्रात एमबीबीएसच्या समकक्ष दर्जा बीएएमएस पदवीस देण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये दोन्ही पदव्यांचा समानतेने विचार केला जातो. आयुर्वेद डॉक्टरांना यापुढे कॉर्पोरेट रुग्णालये, हेल्थ स्पा, मेडिकल टुरिझम (वैद्यकीय पर्यटन) च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली केंद्रे, याठिकाणीही करिअर संधी मिळू शकतात. या विद्यार्थ्यांना आयुर्वेद उपचार पध्दतीसोबत काही प्रमाणात ॲलोपथी उपचार पध्दतीचे ज्ञान प्रदान करण्यात येत असल्याने, ग्रामीण आणि निमशहरी भागातही स्वत:चा व्यवसाय करणे शक्य आहे. पुढील काळात आरोग्य व्यवस्थेच्या सुदृढीकरणावर केंद्र आणि राज्य सरकारे प्राधान्याने लक्ष केंद्रित करतील, त्यामध्ये मनुष्यबळाची भरती हा मोठा भाग असेल. एमबीबीएस डॉक्टरांची संख्या पुरेशी राहणार नाही, तेव्हा बीएएमस डॉक्टरांनांही संधी मिळेल. आयुर्वेदामध्ये आता एम.डी/ एम.एस अभ्यासक्रम करता येत असल्याने, विशेषज्ञ म्हणूनही या डॉक्टरांच्या सेवांना अधिक मूल्य प्राप्त होणार आहे. संशोधनाचा मार्ग स्वीकारल्यास उच्च प्रतिच्या संधी आयुर्वेदिक औषधी आणि विविध उत्पादनांची निर्मिती करणारे उद्योग, प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणी संधी मिळू शकतात.ही बाब लक्षात घेऊन एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी बीएएमएस या पर्यायला प्रथम स्थान द्यायला हवे.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्था
राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (नॅशनल इंस्टिट्यूट ऑ आयुर्वेद). भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. आयुर्वेदातील उच्च शिक्षणाचा दर्जा उन्नत करण्यासाठी या संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात. आयुर्वेदातील विविध पैलू आणि घटक यावर आधारित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएचडी अभ्यासक्रमाची रुपरेषा ठरवणे व असे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट संस्थेसाठी निर्धारित करण्यात आले आहे. रुग्णांच्या देखभालीमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या शास्त्रीय पध्दतीचा वापर करुन या उपचार पध्दतीची ग्राह्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, अखिल मानव जातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध संशोधनात्मक कार्यक्रम राबवणे, आयुर्वेदात रस दाखवणाऱ्या जगातील इतर देशांना सर्व प्रकारचे सहाय्य करणे, यासाठीही संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात. या संस्थेला डीम्ड टु बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे.
अभ्यासक्रम
(१) बीएएमएस- बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन ॲण्ड सर्जरी, (२) एम.डी- आयुर्वेद वाचस्पती/ एम.एस- आयुर्वेद धन्वंतरी. कालावधी – ३ वर्षे. तो पुढील १४ विषयांमध्ये करता येतो – (१) अगड तंत्र-मेडिकल ज्युरिसप्र्युडन्स ॲण्ड टॉक्सिकॉलॉजी, (२) बाल रोग, (३) द्रव्य गुण-मटेरिआ मेडिका ॲण्ड फॉर्माकॉलॉजी, (४) काय चिकित्सा-इंटरनल मेडिसीन, (५) मौलिक सिध्दांत -फंडामेंटल प्रिसिंपल्स, (६) पंचकर्म- पेंटा बायो प्युरिफिकेशन मेथड्स, (७) प्रसुती स्त्री रोग-गायनॉकॉलॉजी ॲण्ड ऑबस्टेट्रिक्स, (८) रोग आणि विकृत विज्ञान/ शास्त्र-क्लिनिकल मेडिसीन ॲण्ड पॅथॉलॉजी, (९) रसशास्त्र आणि भैशाज्ज कल्पना- लॅट्रो-केमिस्ट्री, (१०) शरीर रचना-ॲनॉटॉमी, (११) शरीर क्रिया-फिजिऑलॉजी, (१२) शल्य तंत्र-सर्जरी, (१३) शालक्य तंत्र-इएनटी ॲण्ड आय, (१४) स्वस्थ वृत्त-प्रिव्हेंटिव्ह ॲण्ड सोशल मेडिसीन, (क) पीएचडी-आयुर्वेद विद्यावरिधी- कालावधी दोन वर्षे. पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस- अभ्यासक्रमांसाठी असलेल्या विषयांमध्ये पीएचडी करता येते.), (ड) डिल्पोमा कोर्स इन आयुष नर्सिंग आणि फार्मसी- कालावधी- अडीच वर्षे, यामध्ये सहा महिन्यांच्या इंटर्नशीपचा समावेश. अर्हता- १२ वी उत्तीर्ण.
कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम
(१) पंचकर्म टेक्निशिअन कोर्स, कालावधी एक वर्षं. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण. शरीरातील विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात अत्यंत खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. सध्याच्या काळात अत्यंत धावपळीमध्ये विविध ताण तणाव आणि जीवनशैलिशी निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितले जाते. ही बाब लक्षात आल्याने देश विदेशात पंचकर्म प्रकिया करण्यासाठी ओढा वाढत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे (हेल्थ रिसॉर्ट), वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.
(२) सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद, अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. कालावधी – १० दिवस. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील तंत्राचा वापर करण्याचे ज्ञान प्रदान केले जाते. उदा- सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक जीवन शैली, आहार आणि पोषण मूल्यांचे ज्ञान, विविध मुख लेप (फेस पॅक) निर्मितीचे तंत्र, मुखअभ्यंग (फेस मसाज) आणि मुखलेपनम (फेस लेप), आयुर्वेदपध्दतीने दंत- डोळे- ओठांची काळजी, हस्तपादप्रसाधनम (आयुर्वेदिक मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर), केशआयुर्वेदाची संकल्पना- केसांचे प्रकार, वाढ आणि आरोग्यदायी केसांसाठी आहार, केशप्रकाशलनविधी- आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन केस धुण्याचे तंत्र, केसगळती थांबवण्याचे आयुर्वेदिक तंत्र आणि व्यवस्थापन, आयुर्वेदिक हेअर स्पा, आयुर्वेदिक हेअर डाय, हेअर पॅक, शिरोलेपम, शिरोअभ्यंगम, इत्यादी. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी मध्ये शिकवला जातो.
(३) सर्टिफिकेट कोर्स ऑन स्टँडर्डायझेशन ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लँट मटेरिअल-आयुर्वेद औषधींसाठी उपयोगात येणाऱ्या औषधीजन्य वनस्पती आणि त्याच्या गुणवत्ता नियंत्रणाचे या अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाते. औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींच्या शोधाचे तंत्र आणि त्यासाठीची आयुधे, जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशा निर्देशानुसार आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे विशेषीकरण/ मानकीकरणाच्या (स्टँडर्डायझेशन) कार्यपध्दती, गुणवत्तेची हमी, प्रयोगशाळेतील अहवाल नियंत्रण, विश्लोषणात्मक आकडेमोड, मानकीकरणासाठीचे परीक्षण इत्यादी.
आयुर्वेद औषधी निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्याक्रम उपयुक्त ठरु शकतो. कालावधी- एक महिना. अर्हता-बी.एस्सी, बी.फार्म, डी.फार्म, बीएएमएस.
संपर्क – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरवार सिंग गेट, अमर रोड जयपूर -३०२००२, दूरध्वनी – ०१४१- २६३५८१६, संकेतस्थळ-nia.in, ईमेल- nic.innia_rj@nic.in
महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालये
महाराष्ट्रात आयुष संचालनालयामार्फत राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांचे संनियंत्रण केले जाते. महाराष्ट्रात ७० च्या आसपास आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यामध्ये नागपूर, मुंबई, नांदेड आणि उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालये आहेत. इतर ठिकाणी असणारी महाविद्यालये ही अनुदानित आणि विनाअनुदानित स्वरुपाची आहेत. महाराष्ट्रातील शासकीय आयुर्वेद महाविद्यांना किमान ४० ते ५० वर्षांचा अनुभव आहे. ही सर्व महाविद्यालये चांगल्या पध्दतीने प्रस्थापित झाली आहेत. या महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण दाखल होतात. त्यामुळे अभ्यास/ प्रात्यक्षिकांची मोठी संधी इथे उपलब्ध होते. अध्यापक हे उच्च प्रशिक्षित असतात. उत्तम प्रयोगशाळा , समृध्द ग्रंथालये आहेत.
शासकीय महाविद्यालये
(१) आर.ए.पोतदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय- मुंबई – या संस्थेत बीएएमएस, एमडी/एमएस-आयुर्वेद वाचस्पती आणि पीएचडी हे अभ्यासक्रम करता येतात. संपर्क- डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई- ४०००१८, दूरध्वनी- ०२२-२४९३४२१४, संकेतस्थळ- ayurvedinstitute.com, ईमेल-deanrampmc@gmail.com, (२) शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर – या महाविद्यालयात बीएएमएस, एम.डी/एम.एस अभ्यासक्रम करता येतात. संपर्क- राजे रघुजी नगर सक्करदरा चौक, नागपूर, दूरध्वनी- ०७१२-२७४९१९८, संकेतस्थळ- gacnagpur.org.in, ईमेल-govtayurcollegenagpur@gmail.com
(३) शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे बीएएमएमएस आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतात. संपर्क- वजिराबाद नांदेड, दूरध्वनी- ०२४६२-२३४०२६, संकेतस्थळ- gacnanded.com, ईमेल-gac.nanded@gmail. (४) शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद, येथे बीएएमएमएस आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतात. संपर्क- तुळजापूर रोड, उस्मानाबाद- ४१३५०१, ईमेल- gacosbd@gmail.com, संकेतस्थळ- www.gacosbd.com
०००