(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गुणधर्म

नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या सापांकडे गेले. त्यांना बघताच मोठ्या सापाने त्यांना दंडवत घातला. एका लहान सापानेही तीच कृती केली तर दुसऱ्या लहान सापाने त्यांच्यावर फणा उगारला.

मूर्खा, तू हे काय करतोस? ते ब्रम्हर्षी नारद आहेत. त्यांना वंदन करायचे सोडून तू त्याच्यांवर फणा उगारतोस?

हे बघ आई, आपला जो गुणधर्म आहे, तसंच आपण वागलं पाहिजे. दुसरा लहान साप म्हणाला. मोठा साप त्या दोघांची आई असल्याची नारदेश्वरांना खात्री पटली.

सर्पेश्वरी, अहो रागावू नका त्याला. तो लहान आहे. नारदेश्वर सापांच्या आईकडे वळून म्हणाले.

नाही कसं नादेश्वरा, हा याचाच भाऊ ना, याला कुठे रागावले मी. तुम्हाला मी वंदन केले. त्यानेही केले. पण या गधड्याला तेव्हढी अक्कल नाही . सर्पेश्वरी रागाने म्हणाल्या.

अच्छा, मघा तुम्ही यालाच रागावत होता तर, नारदेश्वर म्हणाले.

मघा म्हणजे…

अहो, मी या पायवाटेवरुन जात असताना तुमच्या रागावण्याचा आवाज मी ऐकला, नि माझी पावलं इकडे वळली. नारदेश्वर म्हणाले.

बरोबर आहे नारदश्वरा तुमचं म्हणणं, हा माझा गधडा गंपू आणि हा शहाणा शंपू! दोघं दोन टोकाचे आहेत बघा.

कां काय झालं? नारदेश्वरांनी उत्सुकतेनं विचारलं.

नारदेश्वरा, या गंपूस मी यासाठी रागावत होते की, उगाच कुणावरही फुत्कारत जाऊ नकोस. आपल्या लवलवत्या जिभेची भीती सर्वांनाच फार वाटते. गर्भगळीत होऊन जातात बिचारे. हा गधड्या गंपू मात्र ऐकायला तयारच नाही. शंपू, मात्र मी जसं सांगते अगदी तसच वागतो. सर्पेश्वरी म्हणाल्या.

हं असं आहे तर…नारदेश्वरांनी प्रतिक्रिया दिली.

अहो मुनीमहाराज, हे असं काही जे तुम्हाला वाटतं, ते चूक आहे …गंपू आपली जीभ बाहेर काढत म्हणाला.

गधड्या, जरा आदराने बोल यांच्याशी…सर्पेश्वरी गंपूला पुन्हा रागावली. खाली मान घातलेल्या शंपूने मान डोलावली. शंपू आणि गंपू‍ हे दोघं परस्पर विरुध्द टोक असल्याचं नारदांच्या लक्षात आलं. त्यांना गंपूच्या बोलण्याचा राग आला होता. पण तो असं कां वागतो? हे सुध्दा समजून घ्यायला हवं असं त्यांना वाटलं.

काय रे गंपू, तू मघा म्हणालास, तुम्हाला जे वाटतं ते चूक आहे, हे असं का म्हणालास बाँ?

सांगतो की मुनीमहाराज, पण आधी लक्षात की मी गंपू आहे तो माझ्या आईसाठी. इतरांसाठी गंपूश्वर.

गधड्या…सर्पेश्वरी त्याच्या अंगावर धावून गेली. नारदेश्वर मध्ये पडले म्हणून गंपू वाचला.

हे बघा सर्पेश्वरी, माझच चुकलं. गंपूश्वरास तुम्ही रागावू नका.

हं! गंपू फुत्कारला.

गंपूश्वर यापुढे मी तुम्हास याच नावाने संबोधेन. आता चूक करणार नाही. मग सांगा मला जे वाटतं, त्यात काय चूक आहे.

मुनीमहाराज, अहो, आमचा गुणधर्म आहे, फुत्कारण्याचा. ते सोडून आम्ही मान खाली घालून बसलो तर आम्हाला लोक जिवंत ठेवणार नाहीत. फुत्कारणं म्हणजे लोकांना त्रास देणं नव्हे. पण आईस हे मान्यच नाही. तिला मी दुष्ट आणि हा शंपू शहाणा नि प्रेमळ वाटतो.

माझं काही चुकतय का ब्रम्हर्षी, सर्पेश्वरी नारदेश्वरांकडे बघत म्हणाली.

गंपूच्या बोलण्याने नारदेश्वरांना विचारात टाकलं. तो लहान असला तरी त्याला जगरीतीची जाणीव झाल्याची खात्री देणारं  त्याचं बोलणं होतं. एकीकडे सर्पेश्वरीचं म्हणणं त्यांना बरोबर वाटत होतं. दुसरीकडे गंपूचं म्हणणंही बरोबर वाटत होतं. ते काही क्षण विचारात मग्न झाले.

अचानक त्यांना त्यांच्या गुरुने शिकवलेला, “निर्विषेणी सर्पेण, कर्तव्या महती फणा//विषमस्तू न चाप्यस्तू, फटाटोपो भयंकर://” हा श्लोक आठवला. याचा अर्थ असा की विषारी नसलेल्या सापानेसुध्दा फणा काढून फुत्कारलं पाहिजे. तरच त्याचा टिकाव लागू शकतो.

नारदेश्वर विचारात गढून गेल्याचं बघून सर्पेश्वरीस भीती वाटू लागली. गंपूच्या मुर्खासारख्या वागण्यामुळे नारदेश्वर त्याला किंवा आपल्याला शाप देतील असं तिला वाटू लागलं. काही वेळाने नारदेश्वरांनी डोळे उघडले. सर्पेश्वरीने त्यांच्या पायावर लोळण घेतली. पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा मागू लागली.

नारदेश्वरांनी,असं काही करु नका आणि क्षमाही मागू नका असं सांगितलं.

म्हणजे तुम्ही रागावला नाहीत ना नारदश्वेर, सर्पेश्वरीने डोळ्यात अश्रू आणत विचारलं.

अहो, मी कां रागावणार? गंपूश्वराच्या बोलण्याने मला विचारात पाडलं.

म्हणजे महाराज? सर्पेश्वरीने घाबरुन विचारलं.

सांगतो सारं काही,आधी तुम्ही माझ्यासोबत चला बघू.

नारदेश्वरांनी त्या तिघांनाही वननगरीतल्या महादेवाच्या पिंडीजवळ नेलं. शंपूला पिंडीच्या एका बाजूला जाण्यास  सांगितलं. गंपूला दुसऱ्या बाजूस जाण्यास सांगितलं. त्‍यांनी मग सर्पेश्वरीला बाजूच्या झाडीत लपायला सांगितलं. ते स्वत:ही त्या झाडीत गेले. दोघेही‍ जण बारकाईनं बघू लागले.

शंपू एका बाजूस जाऊन स्वत:ची मुटकुळी करुन बसला. तर दुसऱ्या बाजूला गेलेला शंपू मात्र इकडे तिकडे वळवळू लागला. मध्येच फणा काढू लागला.

काही वेळाने तिथे काही लोक आले. त्यांनी महादेवाच्या पिंडीला नमस्कार केला. काहीचं लक्ष आधी मुटकुळी करुन आणि मान खाली घालून बसलेल्या शंपूकडे गेलं. काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काहीजण त्याला हाटहूट करु लागले. तरी शंपू काहीच हालचाल करेना. एकाने त्याच्यावर दगड भिरकावला, हे बघून दुसऱ्यानेही दगड भिरकावला. ते बघून सर्पेश्वरीच्या काळजांचं पाणी पाणी झालं. ती लगेच शंपूकडे जायला निघाली पण नारदेश्वरांनी तिला थांबवलं.

तर काही जणांचं लक्ष पिंडीच्या दुसऱ्या बाजूला वळवळ करत असलेल्या नि मध्येच फणा काढून फुत्कारणाऱ्या गंपूकडे गेलं. काहींना त्याची भीती वाटली. काहींनी त्याला दुरुन नमस्‍कार केला. काहींच्या डोळ्यात त्याच्याबद्दल भक्तीभाव दिसून आला. या सापाच्या रुपात महादेवांनी आपल्याला दर्शन दिलं असं काही जणांना वाटलं. हा वळवळणारा साप विषारी असल्याचं वाटून काही जणांनी त्‍याच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न केला तर गंपूने फणा काढून आपली लवलवती जीभ बाहेर काढली. त्यामुळे लोक घाबरुन पळून गेले. हे बघून सर्पेश्वरीला आश्चर्य वाटले नि गंपूचा अभिमानही वाटू लागला.

काही वेळाने सर्पेश्वरी आणि नारदेश्वर बाहेर आले. सर्पेश्वरी आधी शंपूकडे धावली. दगडांच्या माऱ्यामुळे शंपू जखमी होऊन निपचित पडला होता. ते बघून सर्पेश्वरी रडायला लागली. नारदांनी सर्पेश्वरीस शांत केले. शंपूस आपल्या हातात घेतले. त्याच्या मस्तकावरुन हात फिरवला. डोळे मिटून एक मंत्र पुटपुटला. चमत्कार घडला. निपचित पडलेला शंपू पुन्हा पूर्ववत झाला. आईला बघताच तो तिच्याकडे झेपावला. एव्हाना दुसऱ्या बाजूकडून गंपूही तिथे आला होता.

बघितलंस आई, आपण जेव्हा आपल्या गुणधर्माच्या विरुध्द वागतो तेव्हा लोक आपल्यालाच त्रास देतात. हा गरीब बिचारा पडून होता. कुणालाही त्रास देत नव्हता. पण तरीही लोकांनी या निरुपद्रवी शंपूवर दगड भिरकावले आणि माझ्याकडे बघ…

नारदेश्वरांनी गंपूच्या बोलण्याला सहमती दर्शवली. त्याचं कौतुक केलं. आपण उगाचच कुणाला त्रास देऊ नये, पण आपला धाक मात्र वाटला पाहिजे. गंपूश्वरला ते चांगलं कळलय. शंपूला ते कळलं नाही. त्यामुळे त्याची ही अवस्था झाली. नारद सर्पेश्वरीस म्हणाले.

सर्पेश्वरीस त्‍यांचं म्हणनं पटलं. यापुढे उगाच नम्र होण्याचा नि गरीब बणून राहण्याचा सल्ला शंपूला देणार नाही असं त्यांनी नादेश्वरास सांगितलं.

काय मग मुनीमहाराज, मी म्हणत होतं ते बरोबर होतं ना…गंपू नारदेश्वरांवर फणा काढत म्हणाला. त्याच्या फुत्कारण्यानं आधी नारदेश्वर घाबरले नि दचकले. मग लगेच सावध होऊन हसू लागले. सर्पेश्वरीलाही हसू आले.

सुरेश वांदिले