(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना १९९५ साली झाली. गेल्या २९ वर्षात ही संस्था हस्तकला कौशल्याचं शिक्षण देणारी देशातील आघाडीची संस्था ठरली आहे. कलाकौशल्य आणि या क्षेत्रातील उद्योजकतेवर या संस्थेने लक्ष केंद्रित केलं आहे. ही संस्था राजस्थानातील विश्वकर्मा कौशल्य विकास विद्यापीठाशी संलग्नित आहे.

हस्तकलेची मुळं भारतीय संस्कृतीत खोलवर रुजली आहेत. पारंपरिक हस्तकौशल्याला समकालीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हा व्यवसाय अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली.

या संस्थेने नॅशनल ‍स्किल्स फ्रेमवर्क क्वालि‍फिकेशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदवी स्तरीय अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. विशिष्ट पध्दतीचं कौशल्य हस्तगत केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षानंतर प्रगत पदविका, तीन वर्षानंतर बॅचलर ऑफ व्होकेशन ही पदवी आणि चार वर्षानंतर बॅचलर ऑफ डिझाइन पदवी अशा क्रमाने प्रदान केली जाते.

अभ्यासक्रम

(१) बॅचलर ऑफ डिझाइन इन क्रॉफ्ट डिझाइन,

या अभ्यासक्रमात (१) कला आणि अभिकल्प, (२) कौशल्य आणि उपयोजन, (३) हस्तकलेचा इतिहास, (४) हस्तकलेसाठी आवश्यक असणारे साहित्य, (५) साधने, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया , (६) डिझाइन पध्दती आणि प्रकिया, (७) ग्राहक आणि बाजारा(मार्केट)च्या गरजा, अशा सारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केलं जातं.

या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवार.

    पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

    (१) हस्तकला क्षेत्रातील अधिक प्रगत अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मास्टर ऑफ डिझाइन इन क्रॉफ्ट्स डिझाइन हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जातो.

अर्हता– बॅचरल ऑफ डिझाइन किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बीए-डिझाइन किंवा बीएस्सी -डिझाइन किंवा बॅचलर ऑफ व्होकेशन इन डिझाइन

(२) मास्टर ऑफ व्होकेशन

हा अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी असलेल्या सर्व स्पेशलायझेशनमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा  असून यातील पहिले वर्ष हे फाऊंडेशन अभ्यासक्रमाचे आहे.

स्पेशलायझेशन

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं- (१) सॉफ्ट मटेरिअल ॲप्लिकेशन-  (२) हार्ड मटेरिअल ॲप्लिकेशन (३) फायर मटेरिअल ॲप्लिकेशन, (४) या संस्थेने फॅशन क्लॉथिंग डिझाइन हे नवे स्पेशलायझेशनही सुरु केलं आहे. फॅशन डिझायनिंगचं आधुनिक तंत्रज्ञान, साहित्य आणि पारंपरिक हस्तकला यांचा मेळ या स्पेशलाझेशनमध्ये घातला जातो. (५) पारंपरिक हस्तकला, आधुनिकता आणि आंतरराष्ट्रीय प्रवाह लक्षात घेऊन ज्वेलरी डिझाइन या विषयातही स्पेशलायझेशन करता येतं. 

    प्लेसमेंट

हे अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना पुढील कंपन्या आणि संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळालं आहे-(१) रिलायंस रिटेल, (२) ब्रिटिश काउंसिल, (३) टाटा ट्रस्ट, (३) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, (४) संदीप युनिव्हर्सिटी, (५) इंडस्ट्री, (६) खादी इंडिया, (७) फॅब इंडिया, (८) टीसीएस, (९) सोमा, (१०) पेरा, (११) निला, (१२) रतन टेक्सटाइल, (१३) सिल्कवेव्ह, (१४) दस्तकार, (१५) जयपूर रग्ज, (१६) प्रिसेंस दियाकुमारी फाउंडेशन, (१७) स्टुडिओ क्लालिटी, (१८) जे के लक्ष्मीपती युनिव्हर्सिटी.

हे अभ्यासक्रम केलेले ६० टक्के विद्यार्थी हे वेगवेगळया कंपन्यांमध्ये निवडले जातात तर ३० टक्के विद्यार्थी स्वंयरोजगार/उद्योजकतेकडे वळतात. १० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळत असल्याचं दिसून आलंय.

पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना ३ वर्षं पूर्ण केल्यावर आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना एक वर्ष पूर्ण केल्यावर आठ आठवड्याच्या इंटर्नशीपची सुविधा वेगवेगळया प्रथितयश आणि नामवंत कंपन्या आणि उद्योगांमध्ये उपलब्ध करुन दिली जाते.

क्रॉफ्ट कम्युनिकेशन

या संस्थेने नव्याने, क्रॉफ्ट कम्युनिकेशन हे स्पेशलायझेशन सुरु केले आहे. हे स्पेशलाशन पदवी, पदव्युत्तर पदवी आणि मास्टर ऑफ व्होकेशन या तिनही स्तरावर करता येतं.

 संवादसंप्रेषण (कम्युनिकेशन) आणि हस्तकला यांचा हाताने तयार केलल्या कलाकृतींएवढाच सखोल संबंध असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं सांगणं आहे. कोणत्याही आकार आणि प्रकारातील हस्तकलेव्दारे निर्मित वस्तू कोणती ना कोणती भावना व्यक्त करते. काही वस्तु थेट व्यक्त होतात तर काही सूक्ष्मपातळीवर व्यक्त होतात.

कम्युनिकेशन डिझाइनच्याव्दारे हस्तकलेचं  विश्लेषण करता येतं. ही प्रकिया डिझाइन थिकिंगमध्ये अंतर्भूत होते. हस्तकलेच्या अनुषंगानं कथन ही प्रक्रिया पब्लिकेशन डिझाइनमध्ये, विक्री प्रकिया सोशल मीडिया आणि ई कॉमर्समध्ये, प्रोत्साहन प्रकिया ब्रँडिगमध्ये, संरक्षण प्रकिया पॅकेज डिझाइनमध्ये तर डॉक्युमेंट प्रकिया पॅकेज डिझाइनमध्ये समाविष्ट होते. हस्तकलेच्या क्षेत्रात अभिकल्प आणि तंत्रज्ञान आणण्याचं कौशल्य या स्पेशलायझेशनमध्ये शिकवलं जातं. डिझाइन विद्यार्थी आणि हस्तकारागिर यांच्यातील दुवा साधण्याचं कौशल्य प्रदान केलं जातं. हस्तकलेसाठी लागणाऱ्या साहित्याची संस्कृती, प्रथा, परंपरा, कथाकथन, पौराणिक कथा या अनुषंगाने संवाद साधणं सुलभ जातं. या विद्यार्थ्यांना  संवादसंप्रेषण अभिकल्पातील प्रमुख कौशल्याचं तंत्र ठळकपणे शिकवलं जातं. दृष्यात्मक संवादसंप्रेषण (व्हिज्युअल कम्युनिकेशन)व्दारे विविध माध्यमांसाठी उपयुक्त ठरणारे अत्यंत प्रभावी व आकर्षक तंत्रकौशल्य प्रदान केलं जातं. या क्षेत्रात कार्यरत विविध पार्श्वभूमिच्या हस्तकलाकारांसोबत सुलभतेनं कार्य करता येणं शक्य होण्यासाठीचं मानवीय कौशल्य प्रदान केलं जातं. हस्तकला वस्तुनिर्मितीसाठी उपयोगात आणल्या गेलेल्या, आता उपयोग आणल्या जात असलेल्या आणि भविष्यात उपयोगात आणल्या जाऊ शकणाऱ्या वस्तूं किंवा साहित्याचं महत्व जाणून घेण्याचं कौशल्य प्रदान केलं जातं.

हे स्पेशलायझेशन केलेले विद्यार्थी (१) संशोधन, (२) विपणन, (३) प्रभाव आणि नावीन्यता/इनोव्हेशन, (४) दस्तावैजीकरण, (५) सक्षमीकरण, (६) समानुभूती(इम्पॅथी) आदी क्षेत्रात कार्य करु शकतात.

प्रवेश प्रक्रिया

    या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर ऑनलाइन क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२४ आहे. चाळणी परीक्षेची नमूना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

    या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी वेटेज किंवा गुणांकन पुढीलप्रमाणे विभाजित करण्यात आलं आहे – (१) जनरल अवेअरनेस, क्रिएटिव्हीटी आणि पर्सेप्शन टेस्टसाठी ३५ टक्के, (२) मटेरिअल, कलर आणि कन्स्पेच्युअल टेस्ट ४५ टक्के, (३) मुलाखत-२० टक्के.

    या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड, मुलाखती नंतर केली जाते. या मुलाखती जयपूर येथे घेण्यात येतात. प्रवेश अर्ज सादर करतानाच स्पेशलायझेशनचा विषय नमूद करावा लागतो. विद्यार्थ्यांचा कल, जाणीव आणि चाळणी परीक्षेतील गुण लक्षात घेऊन  त्याला स्पेशलायझेशनचा विषय दिला जातो.

संपर्क- इंडियन इन्स्टिट्यूट  ऑफ क्रॉफ्ट आणि डिझाइन, जे-८, झालना इन्स्टिटयुशनल एरिया, जयपूर ३०२००४, राजस्थान, दूरध्वनी -०१४१-२७०१२०३, फॅक्स- २७००१६०, ई-मेल-info@iicd.ac.in आणि admissions@iicd.ac.in, संकेतस्थळ -www.iicd.ac.in.

००००

पॅकेजिंगमधलं करिअर

आकर्षक पॅकेजिंग हे सध्याच्या काळात ग्राहकाला पटकन आकर्षित करण्यासाठी, उपयुक्त ठरतं. त्यामुळे पॅकेजिंगचं कौशल्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. या अनुषंगाने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.

  पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग

गेल्या २५ वर्षांपासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी मे किंवा जून महिन्यात चाळणी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकता आणि अमहदाबाद कॅम्पसमध्ये करता येतो. हा अभ्यासक्रम चार सत्रांचा आहे. यापैकी तीन सत्रांचा अभ्यासक्रम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. चौथ्या सत्रामध्ये वेगवेगळया पॅकेजिंग उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम करावे लागते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पॅकेजिंग उद्योगात गुणवत्ता परीक्षण आणि मूल्यमापन, निर्मिती, विक्री आणि विपणन, डिझायनिंग अशा क्षेत्रात करिअरच्या संधी मिळतात.

संपर्क-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट इ –, रस्ता क्रमांक ८, एमआयडीसी एरिआ,पोस्ट बॉक्स- ९४३२,अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३, दूरध्वनी- ०२२- २८२१९८०३, ईमेल –  iip@iip-in.com

 संकेतस्थळ- http://www.iip-in.com