अंगठीची परंपरा
आईला, तेजोमयीच्या आजिने लग्नात दिलेली अंगठी,परवा कुठे तरी हरवली.आजीला फारशी न घाबरणारी आई,अंगठी हरवल्याने चांगलीच घाबरुन गेली.तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायला लागली.अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना बरोबर ओळखता येत असल्याने,त्याने आईकडे दोन तिनदा काय झालं? काळजी करु नकोस, असं काहीसं त्याच्या पध्दतिने सांगण्याचा प्रयत्न केला,पण एरव्ही अशा वेळी त्याला एकतर रागावणारी किंवा ठोंब्या म्हणून त्याच्याकडे कौतुकाने बघणाऱ्या आईने त्याच्याकडे बघितले नाही.आईचं काहीतरी बिनसलय हे तेजोमयी आणि बाबांच्याही लक्षात आलच होतं.पण आता तिला विचारायचं कसं?हा प्रश्न तेजोमयीला पडला.
तू विचारणार नसशील तर मी विचारतो.बाबा म्हणाले.
ते दोघे स्वयंपाक खोलित गेले.आई आपल्या हाताकडे बघत होती.ते दोघेही आल्याचे तिच्या लक्षात आलं नाही.
अगं,तू कशात इतकी हरवून बसली आहेस? तेजोमयीनं विचारलं
काय झालं ते तर सांगशील ना..सकाळपासून तुझं चित्त थाऱ्यावरच दिसत नाही.बाबा म्हणाले.
काही नाही हो..विशेष असं.आई खाली मान घालून म्हणाली.
अगं आई, विशेष असं काही नसतं तर तू इतकी अस्वस्थ झाली नसतीस ना,तेजोमयी म्हणाली.
अगं, पण मी कुठे अस्वस्थ आहे.
तुझा चेहरा बोलतो की..
चल, आता फार काही लपवू नकोस.सांगून टाक काय झालं ते..बाबा म्हणाले.आईकडे बघत अलेक्झांडरने शेपूट आणि मान हलवली. त्याचा अर्थ होता,सांगून टाक गं आई काय घडलं ते..
आई अलेक्झांडरडला जवळ घेत म्हणाली, अरे माझ्या बोटातली अंगठी हरवलीय. सकाळ पासून दिसत नाहीय..
काय म्हणालीस अंगठी हरवली..बाबा जोरात म्हणाले..अरे बापरे..
अरे बापरे, म्हणण्याइतपत त्या अंगठीचं महत्व होतं का?तेजोमयीनं आईला विचारलं.
अगं ही अंगठी मला तुझ्या आजीनं लग्नात दिली.तुझ्या आजीला तुझ्या बाबांच्या आजिनं तिच्या लग्नाच्या वेळेस दिली. परंपरेने एका सुनेपासून दुसऱ्या सुनिपर्यंत ही अंगठी किमांन शंभर-दोनशे वर्षापासून येत आहे..आता आजी काय म्हणेल,किती रागावेल , मला तर काहीच सुचत नाही.आई रडवलेल्या सुरात म्हणाली.
म्हणून बाबा, अरे बापरे म्हणाले की काय?तेजोमयी बाबांकडे बघत म्हणाली.
आता आई किती त्रागा करेल,किती आणि काय बोलेल काहीच कळत नाही..बाबा काळजीच्या सुरात म्हणाले.
पण बाबा, असं घाबरण्याच्या ऐवजी आपण आजीलाच काय घडलं ते स्पष्ट स्पष्ट सांगू याना..म्हणजे एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागून जायचा..तेजोमयी म्हणाली. अखेर हो नाही करत आजीला अंगठी हरवल्याचं सांगण्याचं ठरलं.ही जबाबदारी तेजोमयीनं उचलली.
आजी त्यावेळी नेमकी घरी नव्हती.ती बाजूच्या काकुंकडे गेली होती.काही वेळाने आजी घरी परतली.घरात एकमदच शांतता बघून आजिला आश्चर्य वाटलं.घरात काहीतरी वेगळं घडलय हे तिच्या लक्षात आलं.
सोफ्यावर बसल्याबरोबर तिने तेजोमयीस थेट विचारलं. तू रागवणार नसशील तर मी सांगते, तेजोमयी तिच्या गळयात पडून म्हणाली.
अगं पण, सोने मी तुला कशाला रागवेल उगाचच.
ती तिला नव्हे तर तिच्या आईला रागावण्याबद्दल म्हणत होती आई..बाबा हळू आवाजात म्हणाले.
यावर आजी काहीच बोलली नाही.ती हसली.अलेक्झांडरने तिच्याकडे चमकून बघितलं.आजी कशासाठी हसली असेल असे भाव त्याच्या डोळयात उमटले.
ते बघून आजीने त्याला जवळ बोलावलं आणि आईला घेऊन यायाला सांगितलं.आज्ञाधारकपणे अलेक्झांडरने आईला स्वयंपाकखोलितून बाहेर आणलं.
आजीला बघताच आईला रडूच कोसळलं..
अगं झालं तरी काय इतकं रडण्यासारखं..आजिने आईला जवळ बसवलं.
अगं,तू तिला दिलेली अंगठी हरवली.आता तू काय बोलणार याची तिला भीती वाटतेय तिला..तेजोमयी बोलून गेली.
हात्तिच्या एवढच..मला वाटलं आभाळ कोसळलं की काय..आजी हसत म्हणाली..
या हसण्याने वातावरणातला गंभिरपणा कमी झाला.आईच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जरा कमी झाली.अलेक्झांडरने आजीजवळ फतकल मारली.बाबांच्या डोळयात आश्चर्याचे भाव उमटले. आजी, आरडाओरड सुरु करुन आईला चांगलीच खडसावेल असं तेजोमयीस वाटलं होतं.पण तसं काही घडलं नाही.त्यामुळे तिच्या डोळयात अविश्वासाचे भाव निर्माण झाले.तिने स्वत:ला चिमटा घेतला.आजीलाही हळूवार चिमटा घेतला.
अगं सोने काय करतेस तू..आजी म्हणाली.
अगं, तू खरोखरच माझी आजी आहेस ना याची खात्री करत होते..
म्हणजे,अगं अंगठी हरवल्याचं कळल्यावर तू आकाश-पाताळ एक करशील असं वाटलं होतं …
अगं पण मी कशासाठी करु आकाशपाताळ एक. आता अंगठी काय जाणूनबुजून थोडीच हरवलीय ना आईनं तुझ्या.
पण आई, ही अंगठी आपल्या घरातल्या पंरपरेन आली होती ना..आता त्याचं काय?
अरे कसली परंपरा नि कसलं काय..मला माझ्या सासुबाईंनी दिली.तेव्हा त्यांनी मला या परंपरेविषयी सांगितलं.त्यांच्या सासुबाईनं त्यांना सांगितलं.या सासूकडे त्या सासूकडून ही अंगठी येत राहिली.पण ही अंगठी कां घालायची.असं कुणी विचारलं नाही.तुझ्या बायकोनेही विचारलं नाही.खरं तर मला ही अंगठी अजिबातच आवडली नव्हती.शिवाय माझ्या बोटातही नीट बसत नव्हती.किती त्रास होता ही काय सांगू.केव्हा एकदा सून येते आणि तिला देते असं मला सारखं वाटायचं.त्यामुळे तुझ्या बायकोला लगेच देऊन टाकली.परंपरेच्या नावाखाली तिनेही घातली.तिला आवडली, नाही आवडली हे काही तिने सांगितलं नाही..
मी सांगितलं असतं तर ..तुम्ही रागावल्या असत्याना आई..तेजोमयीची आई आजिला म्हणाली.
अगं रागावले असतेही पण तुझ्या बोलण्याचा विचारही केला असताना.एखादी गोष्ट आपल्यास आवडत नसेल, त्याचा त्रास होत असेल तर पंरपरा परंपरा म्हणून किती मिरवत बसायच ना..आजी म्हणाली.
बाबा थक्क होऊन आजीकडे बघतच राहिले.आईला गहिवरुन आले.आपली आजी किती सुज्ञ आणि आई किती अडाणी असं तेजोमयीला वाटलं.या चौघांचं चाललय तरी काय हे अलेक्झांडरने न कळल्याने बिचारा आळीपाळीने चौघांकडेही मान वळवळून बघू लागला.
सुरेश वांदिले
