
अग्नीपरीक्षा
आपल्या देशातील अमर्याद लोकसंख्या, वाढते शहरीकरण, गगनचुंबी इमारतीच्या बांधकामात सातत्याने होत असलेली वाढ, औद्योगिक घटकांची वाढ, या बाबींमुळे आग लागण्याच्या किंवा इतर अनेक धोकादायक घटना घडण्याच्या संख्येत मोठीच वाढ झाल्याचे दिसून येते. सुरक्षितेतेचे किमान तत्वे किंवा नियम पाळण्याची खबरदारी घेतली जात नाही. पुढचेपुढे बघून घेऊ, अशी बेदरकार वृत्ती दिसते. अशाप्रसंगी अग्नीशमन आणि आपत्कालीन सेवेतील प्रशिक्षित मनुष्यबळाला आपले सारे, तंत्रकौशल्य पणाला लावावे लागते. अशा मनुष्यबळाची बरीच कमतरता दिसून येते.
या क्षेत्रातील प्रतिभावंत आणि निर्भय मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी, केंद्रिय गृहमंत्रालायच्या अंतर्गत कार्यरत असणारी, नागपूर येथील, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, ही संस्था, गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन प्रसंगांसाठी, अत्यावश्यक सेवेचे उच्चस्तरीय प्रशिक्षण देणारी ही, इंस्टिट्यूटशन ऑफ एक्सलन्स, गटात मोडणारी संस्था आहे.
फायर इंजिनीअरिंग
या संस्थेत, बीटेक इन फायर इंजिनीअरिंग, हा अभ्यासक्रम चालवला जातो. अशा प्रकारचा, हा देशातील एकमेव अभ्यासक्रम. तो वेगळया प्रकारचे कौशल्य प्रदान करणारा असल्याने, विद्यार्थ्यांना, औद्योगिक सुरक्षा, औद्यौगिक अभिकल्प, राज्य अग्निशमन सेवा, आपतकालीन व्यवस्थापन अशा क्षेत्रात, भारत आणि इतर देशात करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
या अभ्यासक्रमाव्दारे, अग्निशमन, आपत्तीतून सुटका, जीववाचवण्याचे कौशल्य प्रदान केले जाते. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या अनुषंगाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन कार्यास प्रोत्साहन दिले जाते. यासाठी संस्थेकडे अत्याधुनिक साहित्य आणि उपकरणांनी सुसज्ज अशा १४ प्रयोगशाळा आहेत. अग्नीप्रलयाशी सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण संसाधने, तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या साहित्याचा विकासासाठी प्रोत्साहित केले जाते.
प्रवेश प्रकिया
बीटेक अभ्यासक्रमासाठी, जॉईट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ-मेन) चे गुण ग्राह्य धरले जातात. साठ विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय पातळीवरील, केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे प्रवेश दिला जातो. यासाठी, देशातील प्रमुख दैनिकांमध्ये जाहिरात दिली जाते. त्याव्दारे, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले जाते. अर्ज प्रकिया संपूर्णपणे ऑनलाइन आहे.
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची जेइइ-मेन आणि १२ वीतील गुणांच्या आधारे, गुणवत्ता यादी तयार केली जाते. प्रवेशासाठी असलेल्या जागांच्या विशिष्ट प्रमाणात पुढील टप्प्यांसाठी विद्यार्थ्याची निवड केली जाते. ही यादी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते. या यादितील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाळणीसाठी नागपूर येथे उपस्थित राहावे लागते.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. शासनाच्या निर्णयानुसार वेगवेगळ्या सवंर्गांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत (इकॉनॉमिकली विकर सेक्शन) घटकासाठी सहा अतिरिक्त जागा राखीव ठेवण्यात यतात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे.
मुलामुलींसाठी वैद्यकीय तंदुरुस्तीची, पुढील माणके निर्धारित करण्यात आली आहेत- (१) मुले- उंची किमान १६५ सेमी, वजन किमान ५० किलो, छाती न फुगवता- किमान ८१ सेमी, फुगवून ८६ सेमी. (२) मुली- उंची किमान १५७ सेमी, वजन किमान ४७ किलो. रातआंधळेपणा नको. मानसिक आणि शारीरिकदृष्ट सक्षम असणे गरजेचे. कोणतेही शारीरिक व्यंग नको.
या अभ्यासक्रमात तीव्र स्वरुपाच्या शारीरिक क्षमता चाचणीचा आणि व्यायामाचा समावेश असतो. ही बाब ध्यानात घेऊन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विचार करण्याची सूचना, संस्थेने केली आहे.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात- (१) फायर सेफ्टी इंजिनीअर, (२) इंडस्ट्रिअल सेफ्टी ऑफिसर, (३) रिस्क असेसमेंट कंसलटंट, (४) सेफ्टी ऑडिटर, (५) हेल्थ ॲण्ड सेफ्टी मॅनेजर, (६) इमर्जन्सी मॅनेजमेंट प्रॅक्टिशनर, (७) एन्हव्हॉयरमेंटल सेफ्टी इंजिनीअर, (८) इमर्जन्सी रिस्पाँस मॅनेजर, (९) फायर प्रोटेक्शन सिस्टिम्स डिझायनर, (१०) सेफ्टी कंसलटंट
संपर्क- नॅशनल फायर सर्विस कॉलेज, गृह मंत्रालय, राजनगर नागपूर, दूरध्वनी- ०७१२-२९८२२२५ संकेतस्थळ-nfscnagpur.nic.in, ईमेल- nfscnagpur-mha@nic.in
०००
अग्नी प्रतिबंधक अधिकारी
महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमीने, उपस्थानक अधिकारी आणि अग्नी प्रतिबंधक अधिकारी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा पूर्णपणे निवासी अभ्यासक्रम आहे. कालावधी -एक वर्षं. कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह, पदवी परीक्षा उतीर्ण झालेल्या, पुरुष विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास संवर्ग- ४५ टक्के) वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासाठी वयोमर्यादेत ५ वर्षाची आणि इतर मागास संवर्गाला ३ वर्षाची सुट दिली जाते. शारीरिक पात्रता- उंची- किमान १६५ सेमी, वजन किमान ५० किलो, छाती न फुगवता- किमान ८१ सेमी, फुगवून ८६ सेमी.
संपर्क- महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालनालय, विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रुझ(पूर्व) मुंबई- ४०००९८, दूरध्वनी -०२२-२६६७७५५५, संकेतस्थळ- http://www.mahafireservice.gov.in, ईमेल-info@ mahafireservice.gov.in
००००००
पॉवर प्लँट इंजिनीअरिंग
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाने, या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या, तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी, नॅशनल पॉवर ट्रेनिंग (एनपीटीआय) इंस्टिट्यूटची स्थापना केली आहे. या संस्थेचे नागपूर, दुर्गापूर, फरिदाबाद, नेव्हेली, शिवपूरी, अलापुज्जा (केरळ) येथे कॅम्पस आहेत.
या संस्थेचे अभ्यासक्रम-
(१) एक वर्षं कालावधीचा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॉवर प्लँट इंजिनीअरिंग. अर्हता- मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनीअरींग अशासारख्या विषयांमध्ये ६० टक्के गुणांसह बीटेक/बीई. राखीव संवर्गातील उमेदवारांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, बीई/बीटेकमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हायड्रो पॉवर प्लँट इंजिनीअरिंग- या अभ्यासक्रमाचा कालावधी ९ महिने. हा अभ्यासक्रम नांगल कॅम्पसमध्ये करता येतो.
हे अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना- बजाज एनर्जी, एबीबी, ॲबेलान क्लिन एनर्जी, अभिजित पॉवर, अदाणी, मर्क्याडॉस, क्रिसिल, डिलॉइट, जीएमआर, एचसीएल, एस्सार पॉवर, इंडिया बूल्स, सुझलॉन, टाटा पॉवर, केपीएमजी, जिंदाल पॉवर आदी संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.
एमबीए इन पॉवर मॅनेजमेंट
या संस्थेने उर्जाक्षेत्रातील व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळू शकणाऱ्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी, एमबीए इन पॉवर मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. (खुला संवर्ग ६० टक्के आणि राखीव संवर्ग ५५ टक्के गुण). अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅट, मॅट, झॅट, जी-मॅट, सी-मॅट, सीयुइटी-पीजी या परीक्षांमधील गुण प्राथमिक चाळणीसाठी ग्राह्य धरले जातात. यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना, एनपीटीआय ॲडमिशन टेस्ट, द्यावी लागते. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे. प्रत्येकी एक गुणांचे ९० प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न संख्यात्मक कल (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिटयूड), तार्किकता (लॉजिकल रिझनिंग), माहिती विश्लेषण (डाटा इंटरप्रिटेशन) या घटकांवर आधारित असतात. उत्तर चुकल्यास गुण कपात केली जात नाही. या अभ्यासक्रमात उर्जाक्षेत्रातील विविध समस्या, शाश्वतता, डाटा ॲनॅलॅटिक्स, डाटा सायंस, सायबर सेक्युरिटी, क्लाऊड मॅनेजमेंट या विषयटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. व्यवस्थापकीय सिध्दांत, संकल्पना आणि तांत्रिक ज्ञानाचा प्रभावी वापर करुन, समस्या निर्धारणासाठीचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त करुन दिले जाते.
काय शिकाल?
दोन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमात, पहिल्या वर्षी पुढील विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे- मनुष्यबळ संसाधने, वित्त आणि लेखा, विपणन, माहिती तंत्रज्ञान, उर्जा क्षेत्राचे प्रमुख विषय. दुसऱ्या वर्षात मुख्य विषयांसोबत शास्वतता, डाटा सायंस, डाटा ॲनॅलिटिक्स, सायबर सेक्युरिटी, क्लाऊड हे घटकही अभ्यासता येतो. विद्यार्थ्यांना सहा ते आठ आठवड्यांची इंटर्नशीप करावी लागते. सध्याच्या औद्योगिक आस्थापनांच्या गरजेनुसार एखाद्या प्रकल्पावरही काम करावे लागते.
हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. प्लेसमेंटसाठी पुढील संस्था येतात- एचसीएल, लँको, क्रिसिल, बीएसइएस, जीएमआर, टाटा पॉवर, पीडब्ल्यूसी, रिलायंस पॉवर, टॉरेंट पॉवर, हिंदुस्थान पॉवर, सुझलॉन, हिंदुस्थान पॉवर, रिन्यू पॉवर, इंफोसिस, केपीएमजी इत्यादी.
संपर्क- डायरेक्टर ट्रेनिंग, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इंस्टिट्यूट, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सेक्टर ३३, फरिदाबाद १२१००३, संकेतस्थळ- https://npti.gov.in ईमेल-nptipgadmission@gmail.com आणि ईमेल- mbapm@npti.ac.in
सुरेश वांदिले