ते वर्षं होतं २०२४. महिना फेब्रुवारी. भारताच्या महिला बॅडमिंटन चमूने पहिल्यांदा आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून विक्रमाची नोंद केली. यासाठी सर्वाधिक महत्वाची कामगिरी ‘तिने’ बजावली.
साखळी फेरितील अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तिने चिनच्या वु लूओ यूचा परावभ केला. तेव्हा वू ची जागतिक क्रमवारी १४९ होती तर तिची ४७२! या विजयाने भारत उपांत्य फेरित पोहचला. तिथे तिची गाठ पडली जागतिक क्रमवारीतील २९ व्या स्थानावर असणा-या जपानच्या नाटसुकी निदैरा हिच्याशी. तिने नाटसुकीला या सामन्यात चांगलेच झुंजवले नि हा सामना जिंकला. भारताने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. एका विक्रमाच्या जवळ भारत पहिल्यांदाच पोहचला होता.
इतर खेळाडू उत्तम कामिगिरी करतच होते. पण आता सगळयांचे लक्ष तिच्याकडे लागले. अंतिम सामन्यात तिची गाठ पडली जागतिक क्रमवारीतील ४२व्या स्थानावर असणाऱ्या थायलंडच्या पॉरपिचा चौइकीवाँग हिच्याशी. पॉरपिचा, जागतिक पातळीवर अनेक सामने खेळली होती. जिंकली होती. तिच्या तुलनेत ही फारच नवखी. त्यामुळे सर्वांच्या मनात धाकधूक. पण तिने पॉरपिचाचा सामना आक्रमकपणे केला. आपण नवखे असल्याचं कुणालाच जाणवू दिले नाही. तिने हा अटीतटीचा सामना जिंकून भारतीय महिला संघाला चॅम्पियन बनवलं. बॅडमिंटनच्या नभांगणात एका तेजस्वी ताऱ्याचं आगमन झाल्याची ही नांदी होती.
तिच्या घरी मोठा भाऊ बॅडमिंटन खेळायचा. त्याच्याकडे बघून हिला बालपणातच बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. इतकी की ती भावासोबतच नियमितपणे बॅडमिंटन खेळायला जावू लागली. पुढे तिच्या भावाने बॅडमिंटन की अभ्यास या व्दंदात अभ्यासाला प्राधान्य दिलं नि बॅडमिंटनला रामराम ठोकला. पण हिने तसं केलं नाही, उलट ती अधिक जोमाने बॅडमिंटनचा सराव करु लागली.
हरयाणातील फरिदाबाद हे तिचं मूळ गाव. पण तिथे बॅडमिंटन प्रशिक्षणाची विशेष सोय नसल्याने ती नॉयडाला राहायला गेली. दिवस रात्र बॅडमिंटनचाच ध्यास तिने घेतला. कठोर सरावाचा कंटाळा केला नाही. त्याचं फळ तिला मिळालं. वयाच्या १२व्या वर्षी १७ वर्षाखालील ऑल इंडिया रँकिंग स्पर्धा तिने २०१९ साली जिंकली. याच वर्षी तिने वरिष्ट गटात उपांत्यसामन्यापर्यंत मजल मारुन सगळ्या बॅडमिंटनप्रेमिंचे लक्ष वेधून घेतले. डिसेंबर २०२३ मध्ये गौहाटी येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तिने देशातील अनेक नामवंत खेळाडूंना पराभूत करुन ही स्पर्धा जिंकली. त्यावेळी तिचं वय होतं अवघं सोळा वर्षे. २०२४ साली तिने बेल्जियम इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली. हा तिचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिला विजय. त्यानंतर लगेच तिने पोलिश इंटरनॅशनल स्पर्धेतही विजयाची घोडदौड कायम राखली. एका महिन्यात सलग दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिने अनोखा विक्रम स्थापित केला. २०२५ मध्ये कॅमेरुन इंटरनॅशनल स्पर्धेत ती उपविजेती ठरली. तिच्या पराक्रमाची नोंद घेऊन तिला २०२४ साली नक्षत्र सन्मान (रिमार्केबल ॲचिव्हमेंट्स इन स्पोर्ट्स), फिकी अर्वाड-इमर्जिंग स्पोर्ट्सपर्सन फिमेल, २०२५ साली टाइम्स ऑफ इंडिया स्पोट्स ॲवार्ड- बॅडमिंटन प्लेअर ऑफ द इअर -फिमेल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
तर अशी ही अनमोल खर्ब. वय वर्षे १८. हल्ली मुक्काम नॉयडा.
सुरेश वांदिले