तेजोमयीच्या वर्गात सरांनी, तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले.सर्वांच्या आदर्शात नेहमीची थोर मंडळी होती. मात्र, तेजोमयीने आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर विचारात पडले. कारण त्यांच्या कानावरुन ते गेलं नव्हतं.
सरांच्या पुढे पेच पडला. या निबंधाला किती आणि कशाच्या आधारावर गुण द्यायचे? त्यांना या विचाराने ताण आला. त्यामुळे त्यांनी तेजोमयीचा निबंध तपासला नाही. दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा होता. सर्वमुले सरांची उत्सुकतेने वाट बघत होते. वर्गात आल्या आल्या सरांनी, निकाल घोषित करणं शक्य नसल्याचं सांगितलं.
“कां पण सर?”विवेकने विचारलं.
“मला तेजोमयीचा निबंध तपासताच आला नाही.”
“कां सर?” तेजोमीयने विचारलं.
“तेजो, तू ज्या गर्विता गुलाटीचा आदर्श ठेवते, म्हणतेस, ही मुलगी खरी आहे की खोटी, हे मला माहीत नाही. जी व्यक्ती मला माहीत नाही, त्या व्यक्तिवरचा निबंध तपासणार कसा? कोण ही गर्विता आणि काय म्हणून तिचा आदर्श ठेवायचा? सरांनी विचारलं.”
“अहो सर, ही जी गर्विता आहे, ती लोकांनी पाण्याची बचत करण्यासाठी, तिच्या पध्दतीने सातत्याने प्रयत्न करतेय. आपण हॉटेलमध्ये जातो, तेव्हा अनेकदा ग्लासातलं पूर्ण पाणी पीत नाही. ते अर्धच पितो. अर्ध ठेऊन देतो. हे पाणी फेकून दिल्या जातं. ही बाब गर्विताच्या लक्षात आली. मग, ती तिच्या गावातल्या हॉटेल मालकांना भेटली. त्यांना सांगितलं की, तुम्ही अर्धा ग्लासच पाणी ग्राहकांना द्या. ज्यांना अधिक पाणी लागेल ते मागतील. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. पाण्याची बचत होईल. ग्लासातले अर्धे पाणी वाचवण्याचे लहान फलक तयार करुन ग्राहकांच्या टेबलवर ठेवण्यासाठी, तिने हॉटेल मालकांना दिले. बऱ्याच हॉटेल मालकांना तिचं म्हणण पटलं. तिच्या सांगण्याप्रमाणेच ते वागू लागले.”
“यात कोणता पराक्रम तिने गाजवला बाँ? फालतुगिरी आहे ही.” विनयने प्रतिक्रिया दिली
“अरे, यात कसली आलीय फालतूगिरी. आपल्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या गर्वितास जे सुचलं ते आपल्यापैकी एकाला तरी सुचलं का? एकिकडे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, दुसरीकडे पाण्याची नासाडी होतेय हे काय आपणास दिसत नव्हत का? पण नाही दिसलं. गर्विताला ते दिसलं, म्हणून तिचं मोठेपण मला भावलं. तिने तिच्या बाबांच्या मदतीने, आपण दररोज किती पाणी वापरतो याची नोंद घेण्यासाठी व्हाय वेस्ट, नावाचं ॲप सुध्दा तयार केलं. म्हणून मला तिचा आदर्श ठेवून तिच्यासारखं काम करावं असं वाटतंय. सोपं काम असलं तरी, त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी मोठा हातभार लागू शकतोना त्यामुळे.” तेजोमयीने आपला मुद्दा सविस्तर मांडला.
यावर, सरांनी टाळ्या वाजवल्या. एक दोन मुलं सोडली तर इतर मुलांनीही टाळ्या वाजवल्या.
“सर, असा वेगळा विचार करणाऱ्या तेजोमयीचा निबंध पहिल्या क्रमाकांचा ठरला पाहिजे,” कल्याणी ठासून म्हणाली.
“हो हो हो..”एक दोन मुलं सोडली तर सर्वांनीच कल्याणीस पाठिंबा दिला.
या पाठिब्यांने सरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांचा ताण क्षणार्धात नाहिसा झाला. तेजोमयीच्या निबंधाला त्यांनी पहिला क्रमांक घोषित केला.
सुरेश वांदिले