(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना मोठी मागणी होती. कोरोनोत्तर काळातही ही मागणी अशीच राहील,असे सध्याचे चित्र आहे. देशातील अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढत असून कोरोनोत्तर काळात ही वाढ अधिक गतिने होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 गेल्या काही वर्षात सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलाचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या वाढीसाठी झालेला दिसतो. क्रयशक्ती वाढल्याने नागरिकांच्या आणि विशेषत: तरुणांच्या खाण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला.

 अन्नप्रक्रिया उद्योगाची वार्षिक वाढ ही 11 टक्के आहे. देशातील औद्योगिक वाढीचा दर चार टक्क्याच्या आसपास असल्याचे लक्षात घेतले, तर अन्नप्रकिया उद्योगाचा वाढीची प्रगती सहज लक्षात येते. या क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय चलन  आकर्षित झाले आहे. इंस्टिट्यूट ऑफ ॲप्लाइड मॅनपॉवर रिसर्च, या संस्थेच्या अभ्यासानुसार या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाचा तुटवडा 35 दशलक्ष पर्यंत पोहचला आहे.  त्यामुळे या क्षेत्रात पुढील काही वर्षांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विपुल संधी निर्माण होऊ शकतात.

खाद्यनिर्मिती आणि कृषिक्षेत्राला समर्थरीत्या जोडणारा महत्वाचा दुवा अन्नप्रक्रिया उद्योग ठरत आहे.सिंचनाखाली असलेल्या जमिनीमध्ये आपल्या देशाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरात वाढ होत असल्याने कृषी उत्पादनात  वाढ झाली आहे. दूध, केळी, पेरु, आंबा, दाळी या कृषीउत्पादनात देशाचा जगात पहिला क्रमांक आहे. देशात विपुल प्रमाणात कृषिस्त्रोत असून प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढती आहे. याबाबी लक्षात घेता खाद्यप्रक्रिया निर्मितीमध्ये आघाडीचा देश होण्याची भारताची क्षमता आहे.

मोठी परंपरा

अन्न व खाद्यपदार्थ विक्री व्यवहारामध्ये देशाचा जगात सहावा क्रमांक लागतो. अन्नप्रक्रिया उद्योगाची देशाला मोठी परंपरा आहे. साध्या घरगुती पध्दती व प्रकियांनी तयार केलेले मसाल्याचे पदार्थ, विविध लोणची, पापड, चटण्या यांनी प्राचिन काळापासून जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे.

अर्थव्यवस्थेत भर

मेक इन इंडिया आणि सध्याच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे या क्षेत्राच्या विकासाला नवी उर्जा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादन आणि निर्मिती घटकांमध्ये 37 हजारा वरुन 39 हजार घटकांपर्यंत वाढ झाली आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील निर्यातीपैकी 13 टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन परदेशी कंपन्या व उद्योगसमूह अन्न प्रकिया उद्योगांमध्ये गुंतवणूक व व्यावसायिक सहकार्य करु लागले आहेत. करारपध्दतीची शेती, कच्चा मालाचा पुरवठा इत्यादीबाबींमध्ये ही गुंतवणूक वाढली आहे. न्याहरीसाठी लागणारी विविध प्रकारीची खाद्यपदार्थे, विविध उर्जा पेये(एनर्जी ड्रिंक्स),स्नॅक्स, केक्स, आइसक्रीम आणि पाळीवप्राण्यांचे अन्नपदार्थ यांची निर्मिती वाढली आहे. या उद्योगवाढीसाठी डिजिटल क्रांतीही उपयुक्त ठरली आहे.

मोठ्या किराणा दुकानांच्या साखळी(रिटेल)मुळे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वाढीस हातभार लागला. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी नोंदणी झालेल्या या उद्योग-घटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. नोंदणी न झालेल्या उद्योग-घटकांमध्येही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.

या सर्व बाबी लक्षात घेऊनच नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीइएम), ही संस्था केंद्रीय अन्न प्रकिया  मंत्रालयाने स्थापन केली आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी जगातील सर्वोत्कृष्ट संस्था बनण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेने ठेवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला आहे.

अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन या संस्थेने अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचा अधिकाधिक वापर उमेदवारांना करता यावा यासाठी अभ्यासक्रमात भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहेत.

अभ्यासक्रम- (1) बी.टेक इन फूड टेक्नालॉजी ॲण्ड मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन – जेइइ(मेन) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. प्रवेश प्रक्रिया जॉईंट सिट ॲलोकेशन ॲथॉरिटी / सेंट्रल सिट ॲलोकशन बोर्डामार्फत राबविली जाते. या अभ्यासक्रमाला 199 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार राखीव संवर्गाच्या जागा भरल्या जातात. प्रवेश मिळालेल्या दहा टक्के विद्यार्थ्यांना मेरिट कम मिन्स शिष्यवृत्ती दिली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्कॉलर लोन योजना राबवली जाते.

काय शिकाल ?– बी.टेक अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या दोन घटकांचा समावेश आहे. (1) तंत्रज्ञान घटकात फूड केमिस्ट्री, इंजिनीअरिंग प्रॉपर्टिज ऑफ फूड मटेरिअल्स, ह्युमन न्युट्रिशन, फ्रुट्स ॲण्ड  व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, मिल्क प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, सिरिअल्स-पल्सेस-ऑइलसीड्स टेक्नॉलॉजी, फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फूड मायक्रोबॉयलॉजी आणि सेफ्टी, नॉव्हल फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड ॲडिटिव्हज आणि इंग्रेडियन्ट्स, मिट-पोलुट्री-फिश प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, बेकरी आणि कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीअरिंग, मेथड्स ऑफ फूड अॅनालिसीस, एनर्जी युटिलायझेशन इन फूड इंडस्ट्रीज, फूड लॉज – स्टँडर्डस- रेग्युलेशन्स, फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सेन्सरी इव्हॅाल्युशन. (2) व्यवस्थापन घटक- व्यवस्थापनाची मूलतत्वे, विपणन व्यवस्थापन, संस्थात्मक वर्तणूक, भारतातील व्यवसाय, सांख्यिकी आणि माहिती विश्लेषण , व्यवस्थापकीय लेखा, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, उद्योजकता विकास, अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, कर नियोजन आणि व्यवस्थापन, कॉर्पोरेट सुशासन, मानवी मूल्ये आणि नीतिमत्ता, वित्तीय व्यवस्थापन, व्यावसायिक कायदे, निर्णय प्रक्रिया, संवाद आणि वाटाघाटी कौशल्य. या दोन्ही घटकांतील विषयांच्या अभ्यासामुळे विद्यार्थी संबंधित उद्योगक्षेत्रात कोणतीही तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतो.

उपरोक्त दोन मुख्य विषयांसोबतच पुढीलपैकी काही विषय (इलेक्टिव्ह) संबंधित विद्यार्थी त्याच्या आवड आणि कल ओळखून निवडू शकतो – अन्न आणि कृषी धोरण, जैवरसायनिक अभियांत्रिकी, दुग्ध पदार्थ प्रकिया अभियांत्रिकी, अन्न जैवतंत्रज्ञान, भारतीय वित्तीय संस्था, नॅनो टेक्नॉलॉजी, पोषण, अन्न  पेये, अन्नपदा‍र्थ निर्मिती यंत्रसामग्री डिझाइन, ताजी फळे आणि भाजीपाला उत्पादन व्यवस्थापन प्रक्रिया, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा आणि उपवस्तुंचे व्यवस्थापन इत्यादी.

करिअर संधी–  हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी प्राप्त होऊ शकतात- (1) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायंटिस्ट, (2) सेन्सरी सायंटिस्ट, (3) फूड मायक्रोबायलॉजिस्ट,(4) फूड अॅनालिस्ट, (5) क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, (6) फूड प्रोसेसिंग इंजिनीअर, (7) फूड रेग्युलेटरी इंजिनीअर, (8) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशॅलिस्ट,(9)न्युट्रिशन  स्पेशॅलिस्ट, (10) सप्लाय चेन, कोल्ड चेन लॉजिस्टिक्स स्पेशॅलिस्ट, (11) फूड फरर्मेंटेशन स्पेशॅलिस्ट, (12) फूड प्रोसेसिंग सेक्टर – स्नॅक फूड, डेअरी फूड, वायनरी, शितपये, प्राण्यांचे मास, (13)फूड सर्विस सेक्टर – हेल्‍थ ॲण्ड वेलनेस सर्विस प्रोव्हायडर्स, फूड रेग्युलेशन, फूड रिटेलिंग, सप्लाय चेन, पोस्ट हार्वेस्ट, (14) व्यवस्थापक, (15) तंत्रोव्यवस्थापक, (16) सल्लागार,

(2) एम.टेक- या स्पेशलायझेशनला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.ई/ बी.टेक मध्ये 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.  हा अभ्यासक्रम पुढील स्पेशलायझेशनसह करता येतो.

() फूड सप्लाय चेन मॅनेजमेंट, अर्हता- बी.ई किंवा बी.टेक इन फूड सायन्स/ फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी/ फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट/ फूड टेक्नॉलॉजी / डेअरी आणि फूड टेक्नॉलॉजी / डेअरी आणि फूड इंजिनीअरिंग / ॲग्रिकल्चर आणि फूड इंजिनीअरिंग किंवा चार वर्षे कालावधीची कृषी किंवा उद्यानशास्त्र या विषयातील पदवी

 () फूड सेफ्टी आणि क्वालिटी मॅनेजमेंट. अर्हता– बी.ई / बी.टेक इन- फूड सायन्स/ फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी/ फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट/ फूड टेक्नॉलॉजी /डेअरी टेक्नॉलॉजी / डेअरी आणि फूड टेक्नॉलॉजी / ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनीअरिंग / ॲग्रिकल्चर आणि फूड इंजिनीअरिंग / बायोकेमिकल इंजिनीअरिंग / केमिकल इंजिनीअरिंग किंवा एम.एस्सी इन  फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी/ फूड मायक्रोबॉयलॉजी /

() फूड प्रोसेस इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट, अर्हता- फूड सायन्स/ फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेट/ फूड प्रोसेस इंजिनीअरिंग / डेअरी इंजिनीअरिंग / डेअरी टेक्नॉलॉजी / ॲग्रिकल्चर आणि फूड इंजिनीअरिंग /  ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनीअरिंग / ॲग्रिकल्चर इंजिनीअरिंग /  बायोकेमिकल इंजिनीअरिंग / केमिकल इंजिनीअरिंग /

() फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट. अर्हता– बी.ई / बी.टेक इन- फूड सायन्स / फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेट/ फूड प्रोसेस इंजिनीअरिंग / डेअरी आणि फूड  इंजिनीअरिंग किंवा एमएस्सी इन फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी / फूड सायन्स/ डेअरी टेक्नॉलॉजी/ फूड  आणि न्युट्रिशन

 () फूड प्लँट ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट- अर्हता– बी.ई किंवा बी.टेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग / ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग/ ॲग्रिकल्चरल प्रोसेस इंजिनीअरिंग/ ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग आणि फूड इंजिनीअरिंग / डेअरी टेक्नॉलॉजी / फूड इंजिनीअरिंग / फूड प्रोसेस इंजिनीअरिंग/ फूड टेक्नॉलॉजी/ फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट / फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी/ फूड सायन्स

प्रवेश प्रकिया

प्रत्येक स्पेशलयाझेशन अभ्यासक्रमाला 21 विद्यार्थ्यांना दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो. (1) ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग(गेट) परीक्षेत किमान गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (2) ज्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली नसेल, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते . 100 गुणांच्या या बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ परीक्षेच्या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात प्रत्येकी 30 गुणांचे बुध्दिमत्ता कौशल्य, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न विचारले जातात. भाग दोन मध्ये ज्या स्पेशलयाझेशन मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याच्याशी संबंधित पदवी स्तरावरील अभ्यासक्रमावर 70 गुणांचे आधारित प्रश्न विचारले जातात.

संपर्क– प्लॉट नंबर- 97 , सेक्टर-56, एचएसआयआयडीसी इंडस्ट्रिअल इस्टेट कुंडली, जिल्हा सोनपत, हरयाणा – 131028, दूरध्वनी – 0130-2281100,टेलेफॅक्स- 228111 आणि 2219759, ईमेल-info@niftm@niftem.ac.in registrar@niftem.ac.in आणि admission niftem२०२२gmail.com, संकेतस्थ्‍ाळ- www.niftem.ac.in