“झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, मी दहाबारा वर्षाचा. त्या मोठ्या झाडावरुन खाली पडल्यावर, डोक्याला चांगलाच मार लागला. पायाला जखम झाली. त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना.
झाडावर चढण्याचा, आगावूपणा कां केला? या प्रश्नाचं उत्तर तर द्यायलाच हवना.
मला शिकायचं होतं. पण बाबांचा कडवा विरोध. ते शेतीच्या कामासाठी घेऊन जात. त्यात मन रमेना. मनात सारखा शाळेचाच विचार. या विचारातच एके दिवशी शेतातल्या, मोठ्या झाडावर चढलो नि पुढचं रामायण घडलं. पण कधीकधी वाईटातून चांगलं घडतं. त्याचा प्रत्यय मला आला.
जायबंदी झाल्याने मला शेतीची कामं करता येईना. मग, बाबांनी माझी खरडपट्टी काढून रागारागात शाळेत टाकलं. शाळेत जाण्याची संधी मिळाल्याने पाय मुरगळल्याचं दु:ख भुर्रSS उडालं. अभ्यासातली माझी गती शिक्षकांच्या लक्षात आली. ते मला नव्यानव्या गोष्टी शिकवू लागले. शिकताशिकता माझी तब्येत बरी झाली. पायही बरा झाला.
शिक्षणामुळे चांगल्या संधी माझ्यापर्यंत चालून आल्या. ते साल होतं १८२५! अभ्यासातील प्रगती बघून शिक्षकांनी माझ्या नावाची शिफारस, अमेरिकच्या नौदलाला केली. नौदलाच्या परीक्षेत, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मला, शिकावू उमेदवार म्हणून नोकरी मिळाली.
मी, अधिकाधिक परिश्रम करु लागलो. त्याचं फळ मिळालं. नौदलाच्या जहाजातून १८२६ ते १८३० या चार वर्षात पृथ्वीची प्रदक्षिणा केली. आता, समुद्राच्या सखोल अभ्यास करु लागलो. माझं खाणं, पिणं, झोपणं सारंकाही समुद्रमय होऊन गेलं.
दरम्यान एकदा, मी एका घोडागाडीच्या अपघातात पंगू झालो. त्यामुळे नौदलाच्या लष्करी कामासाठी अपात्र ठरलो. नौदलातून माझी कधीही हकालपट्टी झाली असती. पण माझ्या साहाय्याला, मी केलेला समुद्राचा अभ्यास आला. हा अभ्यास नौदलासाठी खूप उपयुक्त ठरेल, असं वरिष्ठांना वाटलं. त्यांनी समुद्राचा आणखी अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
आता, समुद्राचं मापन, चित्रण आणि आलेखन, समुद्राच्या विविध नोंदीचे तक्ते-आराखडे, वर्णन अशा गोष्टीत प्रावीण्य मिळवलं. जलशास्त्रमापनाची साधनं आणि उपकरणं, मी उपलब्ध करुन दिली.
शेकडो बोटींच्या कप्तानांकडून त्यांच्या जलप्रवासाचे तपशील मिळवले. त्याच्या सखोल अभ्यासातून, समुद्रातील नद्या म्हणजेच विविध प्रवाह मला कळले. त्याच्या शास्त्रोक्त नोंदी मी करु लागलो. समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांच्या करामती कळल्या. समुद्रावरील हवामानाचा मी तज्ज्ञ झालो.
या सर्व अभ्यासामुळे, मला समुद्रातले नवे आणि कमी अंतराचे मार्ग शोधणं सोपं गेलं. त्यामुळे युरोप आणि अमेरिका प्रवासातील ४५ दिवसांचा वेळ, इंधन आणि पैसे वाचू लागले. समुद्रप्रवास अधिकाधिक सुरक्षित होईल, याचं मार्गदर्शन करणं मला शक्य झालं.
पुढे, मला अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलाने १८५४ पासून केलेल्या समुद्राच्या खोलीबद्दलच्या नोंदीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तेव्हा, उत्तर अटलांटिक महासारगारच्या तळाशी, १६ हजार किलोमीटर लांबीची पर्वतरांग असल्याचं माझ्या लक्षात आलं. जगातील सगळया महासागराच्या तळावर पर्वतरांगा असून त्यांची लांबी ४० ते ४५ हजार किलोमीटर असल्याचा मी निष्कर्ष काढला. तो खरा निघाला. “
माझ्या या अभ्यासातून, ” फिजिकल जिओग्रॅफी ऑफ द सी,” या ग्रंथाची निर्मिती झाली. सागरविज्ञान क्षेत्रातील हे पुस्तक सर्वोत्कृष्ठ ठरलं.
माझ्या गोष्टीचं तात्पर्य काय?
“कोणत्याही संकटाने खचून जायचं नाही. निराश व्हायचं नाही. प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहायचं. कष्ट उपसायचं. मग, जे काही आपलं स्वप्न असेल ते नक्कीच खरं ठरत. याचा पुरावा म्हणजे, मी! लेफ्टनंट मॅथ्यू फॉन्टेन मॉरी! काहीजण माझं वर्णन, “आधुनिक समुद्रशास्त्राचा जनक”, म्हणून करतात.
माझ्या जीवनातील दोन जीवघेण्या अपघातांनी मी खचून गेलो असतो तर, हे शक्य झालं नसतं. पण मी खचलो नाही आणि डगमगलोही नाही. त्याचचं हे फळ.
सुरेश वांदिले