(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“ मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा  गुगल प्ले, स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित केला. वेळोवेळी मला खाऊ आणि बक्षीसांसाठी मिळालेले ११ हजार रुपये, खर्च न करता साठवून ठेवले होते. त्याचा उपयोग हा ॲप तयार करण्यासाठी झाला.

हा ॲप, मी प्ले स्टोअरवर ठेवला. पहिल्या तीन तासातच त्याचे १५ हजार डाऊनलोड झाले. हा ॲप पाच दिवस धडधाकटपणे चालला. पाचव्या दिवशी डाऊनलोडची संख्या ३० हजारावर पोहचली. मला मिळालेल्या सर्व्हरला हे ओझं म्हणा की दाब म्हणा सहन करणं शक्य झालं नाही. मला सर्व्हरवर अधिक जागा हवी होती. ती घेण्यासाठी निधी म्हणजेच पैशांची गरज होती. माझी सगळी बचत संपलेली. मी कोरडा ठणठणीत! आता काय करायचं? मला प्रश्न पडला. इकडेतिकडे धावाधाव सुरु केली. अनेक मोठमोठ्या कंपन्याच्या बॉसेसना इमेल पाठवले. अशा नव्या आणि नावीण्यपूर्ण उद्योगांना मदत करणाऱ्या गुंतवणुकदारांना ईमेल केले. पण कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षण वाईट वाटलं. कारण आता माझं ॲप कुचकामी ठरणार होतं.

मी स्वत:ला समजावलं.

मनाशी हसलो.

त्या रात्री म्हणावी तशी झोप आली नाही. पण कधीतरी पहाटे डोळा लागला असावा. डोळा लागता क्षणी मला स्वप्न पडलं. एका व्यक्तिने माझ्याशी शेकहँड केला.

मी त्याला विचारलं, “तू कोण?”

तो उत्तरला,”मी अपयश!”

“गड्या, आता कशाला आलास भेटायला मला तू. माझ्या ॲपला अपयशी करुन तुझं समाधान झालं नाही का? मला वाकुल्या दाखवल्या आलास ना तू.” मी अपयशाचा हात झिडकारित म्हणालो.

“अरे नाही नाही, मी तुला वाकुल्या दाखवायला आलो नाही. तर एक गुपित सांगायला आलोय.” माझा हात हातात घेत अपयश म्हणाला.

“कसलं गुपित?”मी निरुत्साहानं विचारलं.

“माझा सगळयात जवळचा किंवा जानी दोस्त कोण, हे सांगायच मला?”

“मला कशाला?”मी दुसरीकडे बघत थंड प्रतिसाद दिला.

“गड्या, असा नाराज होऊ नकोस,ऐकून तर घे.”माझा थंड प्रतिसाद बघून अपयश म्हणाला.

“हं सांग.”मी आणखी कोरडपणाने म्हणालो

“माझा जवळचा मित्र यश आहे.”

         “क का काय?”मी जोरात ओरडलो…

“अरे,  असा ओरडू नकोस. आधी मी भेटतो नंतर तो येतो.”

“म्हणजे काय?असं कां?”

“कारण,जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. एवढ्यातेव्हढ्याने हवालदील होत नाही, उगाच याला त्याला दोष देत नाही. नशिब फिशिबाचा विचारही ज्याच्या डोक्यात येत नाही अशांकडेच आम्ही दोघांनी जायचं ठरवलय. आधी मी आणि मग  यश!”

“म्हणजे?”

“तथास्तू…” म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता, अपयश निघून गेला. मी स्वप्नातून जागा झालो. हे स्वप्न पुन्हा आठवून बघितलं. आधी अपयश आणि नंतर यश! हे अपयशाचं वाक्य माझ्या चांगलचं स्मरणात राहीलं. मला एकदम भारी वाटलं. माझ्यासाठी हा शुभसंकेत म्हणायचा…

०००

तर, मी पुन्हा विचार करु लागलो.तेव्हा माझ्या लक्षात आलं की, कोणत्याही स्टार्टअपला उभे राहण्यासाठी त्वरित अर्थसाहाय्याची गरज भासते. त्यांना तातडीने अशी मदत मिळत नाही. बरेच गुंतवणुकदार त्यांना होही म्हणत नाही आणि नकारही देत नाही. बिच्च्याऱ्यांना एकतर ताटकळत बसावं लागतं किंवा सारखं इकडून तिकडे पळावं लागतं. हे सगळं टाळण्यासाठी मी “स्कोप” ॲपची निर्मिती केली.

अपयशाचं म्हणणं इतक्या लवकर खरं होईल असं मला वाटलं नाही. कारण मी नुकताच १७ वर्षाचा झालोय. डाटा सायंसमध्ये बीटेक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय. माझी धडपड खटपट सुरुच होती. त्यातूनच मग “स्कोप” ॲपचा मी श्रीगणेशा केला. हा ॲप खास स्टार्टअप म्हणजेच नव्या नव्या कल्पनांवर आधारित उद्योग /व्यवसाय करु इच्छिणाऱ्या साहाय्यासाठी आहे.

या ॲपवर गुंतवणुकदार आणि स्टार्टअप एकमेकांना भेटू शकतात. या दोन्ही घटकांना जोडणाऱ्या सेतूचं काम “स्कोप” करतं. इथे थेट “हो” किंवा “नाही” हे उत्तर तत्काळ मिळतं. नकार मिळाला तर स्टार्टअपला दुसरीकडे लगेच जाणं शक्य होतं. त्याचा वेळ आणि मनस्ताप वाचतो. सध्या अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी १८ हून अधिक बैठका आणि सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असते. माझ्या ॲपमुळे हा कालावधी ३ ते चार महिन्यांवर आलाय.

हा ॲप, आता ग्लोबल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म (जागतिक संपर्कसाखळी व्यासपीठ) ठरलाय. याव्दारे नवे उद्योजक आणि स्टार्टअप हे गुंतवणूकदार, उद्योजकांशी जोडल्या जाताहेत. जागतिक स्तरावर याचं कौतुक होत आहे.वेगवेगळे मानसन्मानही मिळताहेत

अपयश म्हणाला होता त्याप्रमाणे खरोखरच यशाचे आगमन झाले.

“स्कोप”ची निर्मिती करताना माझं भांडवलं होतं १० लाख रुपयांचं. ते मी मित्र, नातेवाईक आणि कुटुंबांकडून उभे केले. “स्कोप” ॲपचे महत्व आणि उपयुक्तता लक्षात घेऊन अमेरिकेतील एक मोठ्ठे गुंतवणुकदार श्रीयुत टिम ड्रॅपर यांनी १.२ मिलियन(दशलक्ष) डॉलर्स आणि मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स या कंपनीने ३ लाख मिलियन डॉलर्सची गुंतवणूक या ॲपमध्ये केली. अशाप्रकारे “स्कोप” ॲपसाठी मला भांडवलाची कमतरता भासली नाही. या ॲपला चांगलंच यश मिळतय. सध्या मी शिकत असलो तरी या “स्कोप” ॲप कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारीसुध्दा बनलोय. माझ्याकडे ६० कर्मचारी कामाला आहेत. जवळपास २००० गुंतवणुकदारांची साखळी “स्कोप”मुळे तयार झालीय. शिवाय अशा स्टार्टअपना भांडवल पुरवणाऱ्या ७ हजार भांडवली कंपन्यासुध्दा “स्कोप”शी जोडल्या गेल्यात.हे भांडवलदार भारत, अमेरिका, दुबई, सिंगापूर, युरोप येथील आहेत. गुगल कंपनीचे सहसंस्थापक सर्जेई ब्रिन सर हेसुध्दा या संपर्कसाखळीत आहेत. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब!

काउंसिल फॉर इंक्लुजीव कॅपिटॅलिझम, या जागतिक महत्वाच्या संस्थेचे लक्ष माझ्याकडे वळलेय. मी काहीतरी भारी करतोय याची या संस्थेला कल्पना आलीय. या संस्थेत जगातील अनेक नामवंत उद्योजक आहेत. यामध्ये आपल्या देशातील मोठ्ठे उद्योजक मुकेश अंबाणी सरांचासुध्दा समावेश आहे.

मला ॲलॉन मस्क सर, फार प्रेरणादायी वाटतात. नव्यानव्या संकल्पना मनात आल्यावर त्या साकारण्यासाठी ते स्वत:ला झोकून देतात. अथक परिश्रम करतात नि ती संकल्पना प्रत्यक्ष साकारतातही. तोच आदर्श मी ठेवलाय. नव्या संकल्पना,अथक परिश्रमाने प्रत्यक्ष साकारु शकतात,हे मी सिध्दच केलय. या पुढेही करत राहणार.

पहिल्या अपयशाने मी न डगमगता, प्रयत्नांची धार जराही कमी केली नाही की माझा उत्साहही कमी झाला नाही. त्याचंच हे फळ!

तर मी,

अप्पाला साईकिरण!

मुळचा हैदराबादचा. तिथेच माझं प्राथमिक शिक्षण झालं. पुढे बिटस पिलाणी येथील बिर्ला स्कूल येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सध्या मी बिट्स पिलाणी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय. शिकता शिकता उद्योजकतेचेही धडे गिरवतोय.

सुरेश वांदिले