ते वर्षं होतं २०१८. ग्रीस देशातील थेसालोनिकी येथे झालेली, ‘लिटिल मिस ॲण्ड मिस्टर युनायटेड वर्ल्ड’ ही स्पर्धा तिने जिंकली. अशी स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय कन्या ठरली. जोहन्सबर्ग येथे पार पडलेल्या ‘लिटिल मॉडेल अर्थ’ या स्पर्धेतही तिला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला.
ही तर केवळ झलक. तिचा जन्मच जणूकाही एकापाठोपाठएक असा पराक्रम गाजवण्यासाठी झाला असावा, अशी तिची डोळे दिपवून टाकणारी आणि थक्क करणारी कामगिरी.
तिला काय नाही येत? ती कनार्टकी कंठ संगीतात देशात आणि जगात ख्यातकीर्त झालीय. तिला यासाठी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाटकी कंठसंगीतातील तिच्या कामिगिरीसाठी तिला ‘जीसीपी (ग्लोबल चाइल्ड प्रोडिगी) २०२२ कला आणि संस्कृती’ या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. हजारो उमेदवारांमधून पहिल्या १०० साठी तिची निवड झाली.
ती सात वर्षाची असताना तिच्या गळयातील सूरांची ओळख तिच्या आईबाबांना झाली. त्यांनी तिला त्यासाठी प्रोत्साहन दिले. ज्या वयातील मुलं कॉमिक्समध्ये रमतात, त्या वयात ही संगीताच्या रियाजात रंगली.
मुलीच्या करिअरसाठी एमबीए असलेल्या तिच्या आईने स्वत:च्या चांगल्या करिअरवर पाणी सोडलं. याचं या मुलीनं सोनं केलं. २०२० साली भारतीय कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी, तिला ‘प्रधानमंत्री बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ती होती बारा वर्षाची. अठरा वर्षाखालील व्यक्तिंसाठी हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात तिने उपस्थितांसमोर आपली गायनकला सादर केली. या कलेने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.
२०१६ आणि २०१७ साली इंग्लिश ऑलंपियाडमध्ये तिने सुवर्णपदक तर २०१५ ते २०२२ पर्यंत चांदिचं पदक हस्तगत केलं. तिला धावण्याची आत्यंतिक आवड असल्यानं ती अनेक मरॉथॉन स्पर्धेत भाग घेते. ती उत्तम कराटेपटू आहे. तिला कराटेतील ब्राऊन बेल्ट मिळालाय. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण आणि चांदिचं पदक पटकावलय. ती चांगली पेंटर आहे. उत्कृष्टरित्या गिटार वाजवते. याशिवाय सामाजिक कार्यातही ती अग्रेसर आहे. मॅरॉथॉन स्पर्धांमध्ये जिंकलेली रक्कम ती मुलींचे शिक्षण, कर्करोग प्रतिबंध, पर्यावरण रक्षण या कार्यासाठी खर्च करते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ती सदिच्छादूत म्हणून कार्य करते.
२०२१ साली लंडनस्थित युथ कनेक्ट ऑर्गनायझेशन या संस्थेनं ‘युथ ऑयकॉन’ या पदविने तिला सन्मानित केलं. तिच्या या विविधांगी पुरस्कारांमुळे तिला इंडिया आणि इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्मध्ये स्थान दिलं गेलं.
तिच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन प्रधानमंत्री नरेंद मोदिंनी तिला त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी त्यांनी तिला स्वाक्षरी केलेलं एक पुस्तक आणि तिचं नाव कोरलेलं घड्याळ दिलं. हा आपल्या सर्वोच्च ठेवा असल्याची तिची भावना आहे. अशी चतुरस्त्र कामगिरी करताना तिचं अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष असतं. तिचे आईबाबा वेळेच्या व्यवस्थापनासाठी तिला संपूर्ण मदत करतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण इतकं यश मिळवू शकलो, असं ती कृतज्ञापूर्वक नमूद करते.
तर अशी ही शरण्या मुडुंडी. वय वर्षे १८. हल्ली मुक्काम विशाखापट्टणम.
सुरेश वांदिले