(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अर्थशास्त्रीय शिक्षणासोबतच धोरण निर्धारणासाठी भविष्यात मदत व्हावी या हेतूने बेंगळुरु येथे, लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, डॉ.बी.आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्र विषयातील ज्ञान प्रदान करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्था विकसित केली जाणार आहे.

या संस्थेमार्फत पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक अभ्यास करताना विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, नैतिक मूल्ये आदी सामाजिक शास्त्रातील विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्थशास्त्रातील नव्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना शिकवले जाते व स्वतंत्र विचार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात.

बेंगळुरु हे शहर गेल्या काही वर्षात आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील एक महत्वाचे आर्थिक व्यवहाराचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विविध औद्योगिक घटकांना अर्थकारणाचे विश्लेषण आणि चिकित्सा करणाऱ्या मनुष्यबळाची गरज भासते आहे. अशा मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, त्याने धोरणात्मक आराखडे तयार करण्यात तज्ज्ञता मिळवावी, उद्योजक आणि शासकीय संस्थांना या मनुष्यबळाच्या तज्ज्ञतेचा लाभ व्हावा, अर्थकारणातील प्रवाह आणि पध्दतींचा सखोल अभ्यास करता यावा, ही काही उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत.अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे.

रोजगारक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आणि तंत्र शिकवले जातात. नावीन्यपूर्ण विषय घटक तसेच वेगळया शिकवण्याच्या पध्दती, संशोधनात्मक कार्याला प्राधान्य ही काही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

या अभ्यासक्रमामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या सत्रानुसार क्रेडिट (श्रेयांक)आणि  प्रमाणपत्र/पदविका देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .दुसऱ्या सत्रानंतर ५० क्रेडिट आणि सर्टिफिकेट इन इकॉनॉमिक्ससाठी पात्र ठरवले जाते. चौथ्या सत्रानंतर १०० क्रेडिट आणि डिप्लोमा इन इकॉनॉमिक्ससाठी पात्र ठरवले जाते. सहाव्या सत्रानंतर १४८ क्रेडिट आणि बीएस्सी इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते. आठव्या सत्रानंतर १८९ क्रेडिट आणि बीएस्सी(ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते. दहाव्या सत्रानंतर २२९ क्रेडिट आणि एमएस्सी इन इकॉनॉमिक्स या पदवीसाठी पात्र ठरवले जाते.

अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. तथापि या विद्यार्थ्यांनी 12 वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेत किमान 65 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 60 टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट,देणे आवश्यक आहे. संपर्क – www.cucetexam.in

०००

एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स

या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रमही सुरु केला आहे. बी.एस्सी किंवा बी.एस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स या विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. या विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर इकॉनॉमेट्रिक्स, मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान 55 टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांची किमान मर्यादा- 50 टक्के.

 

संपर्क – जनाभारती मेन रोड, नागरभावी पोस्ट, बेंगळुरु- ५६००७२, दूरध्वनी – ८० – २३९९८५००, ईमेल- info@base.ac.in, संकेतस्थळ-  base.ac.in

०००