(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आईबाबा ऑफिसमध्ये गेल्यावर, घरी नव्याने आणलेल्या सेन्सर्स, कॅमेरे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स  तंत्रज्ञानाने जोडलेल्या स्मार्ट रेफ्रिजरेटरची परीक्षा घेण्याचं तेजोमयीनं ठरवलं. अशी काही परीक्षा आपण घेणार असल्याचं तिने आईबाबांना सांगितलं नाही.

“तुला काय वाटतं?” तिने आधी अलेक्झांडरला विचारलं. त्याने शेपूट आणि मान हलवून आपला होकार असल्याचं स्पष्ट केलं. मग तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारलं. तिने लगेच उत्तर दिलं नाही. काही क्षण असेच गेले. तेव्हा तेजोमयी म्हणाली,

“गोर्जे, तुला नाही वाटत का, या रेफ्रिजरेटरची परीक्षा घ्यावी म्हणून?”

“पण, तो मुळातच स्मार्ट आहे ना. मग परीक्षा कशासाठी?” गोर्जीने विचारलं.

“तो खरोखरच स्मार्ट आहे, हे कसं कळणार बरं?”

“त्याची कंपनी सांगते ना.”

“त्यावर लगेच विश्वास कसा ठेवायचा?”

“अगं, शेकडो वेळा कंपनीनेच त्याची परीक्षा घेतली असणार. या प्रत्येक वेळी तो उत्तीर्ण झाला असणार. त्यातील सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली  व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची चाचणी घेतल्यावरच त्याला स्मार्ट ठरवून दुकानात पाठवलं असणार.” गोर्जीने समजावलं.

गोर्जी आपल्या बाजूची नाही, हे तेजोमयीच्या लक्षात आलं.

“गोर्जी, जे सांगते ते खरंसुद्धा असू शकतं. पण म्हणून आपण परीक्षा घ्यायचीच नाही का?” तेजोमयी अलेक्झांडरकडे वळून पुटपुटली.

“तुझं तू बघ बाई,” अशा आशयाचे भाव आणत त्याने दुसरीकडे मान वळवली. हे बघून गोर्जीला हसू आलं.

“गोर्जे, तुला हसायला काय झालंय? हा रेफ्रिजरेटर स्मार्ट निघाला नाही तर, आईबाबांनी त्यावर केलेला खर्च पाण्यात नाही का जाणार?” तेजोमयीने नाराजी व्यक्त केली.

हिच्यासोबत वाद करण्यात अर्थ नसल्याचं गोर्जीच्या लक्षात आलं. त्यामुळे ती तिच्याकडे सोपवलेल्या दुसऱ्या टास्ककडे वळली.

आईबाबा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी गोर्जीच्या स्क्रीनवर हे टास्क लिहून काढत किंवा तिच्या मेंदुला जोडलेल्या स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचवरून ते तिला सांगत असत. पहिला टास्क संपल्याशिवाय दुसऱ्या टास्ककडे वळायचं नाही, असं तिचं प्रोग्रॅमिंग होतं.

आजचा पहिला टास्क पूर्ण केल्यावर तिने दुसऱ्या टास्ककडे लक्ष दिलं.

हा टास्क वाचल्यावर गोर्जीला हसू आलं.

तिच्याकडे तेजोमयी आणि अलेक्झांडरने चमकून बघितलं.

“अगं, गंमतच म्हणायची.”

“आता काय?”

“आईबाबांनी मला या स्मार्ट रेफ्रिजरेटरला ट्रेनिंग द्यायला सांगितलंय.”

“काय सांगतेस? याचा अर्थ मी म्हणत होते तसंच नाही का?”

“छे छे! तू भलताच काहीतरी अर्थ घेऊ नकोस. तू आणि तुझे आईबाबा कसे एकसारखे विचार करता म्हणून मला हसू आलं. आज त्यांच्याही डोक्यात रेफ्रिजरेटर होतं आणि तुझ्याही डोक्यात तेच होतं.”

“मग आता तू काय करणार?”

“त्याला प्रशिक्षण देणार.”

“कोणतं प्रशिक्षण?”

“हेच — तुमच्या आवडीनिवडी, जेवणाच्या वेळा, वेगवेगळ्या पदार्थांसाठी आवश्यक तापमान, वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या स्वयंपाक यंत्रांशी कनेक्ट करून घेणं, इंटरनेट ऑफ थिंग्स नेटवर्कद्वारे स्मार्ट दुकानांशी संपर्क साधून किराणा बोलावणं.

फळं, भाजीपाला यांच्यातील पोषणमूल्य ओळखणं — यासाठी त्यातील कॅमेरा आणि इमेज-रेकग्निशन एआय प्रणाली वापरणं.

सेंद्रिय खतापासून की रासायनिक खतापासून फळं-भाजीपाला तयार झाला का, हे ओळखण्याचा प्रयत्न करणं.

किती दिवसांनी ते खराब होऊ शकतं, याचा अंदाज तापमान, आर्द्रता आणि पूर्वी साठवलेल्या डेटावर आधारित प्रेडिक्टिव्ह अल्गोरिदम वापरून काढणं.

वेगवेगळी फळं, भाजीपाला, कडधान्य, बेदाणे घरी येतात की एकाच प्रकारचे येतात, यावर लक्ष ठेवणं.

वेगवेगळे प्रकार बोलावणं.

तुमच्या शरीरात सर्व अन्नघटक समप्रमाणात जातील याकडे लक्ष ठेवणं — यासाठी जागतिक न्यूट्रिशन डेटाबेसमधील माहितीचा वापर करणं.

वस्तू संपल्या की लगेच त्या ऑनलाइन ऑर्डर करणं.

आइसक्रीम, कोल्डड्रिंक, पेस्ट्रीज, जंकफूडाचा साठा जास्त होणार नाही याची काळजी घेणं.”

“इतकं सगळं तू त्याला शिकवणार?”

“शिकवणार की.”

“बरं बाई, फक्त आइसक्रीम, कोल्डड्रिंक, पेस्ट्रीज, पिझ्झा, जंकफूडचं प्रशिक्षण सोडून बाकी सगळं शिकव.”

“असं केल्याने त्याचं प्रशिक्षण अपूर्ण नाही का राहणार? मग तो पूर्ण स्मार्ट कसा बनणार?” गोर्जीने विचारलं.

तेजोमयी विचारात पडली.

तिने अलेक्झांडरकडे बघितलं.

गोर्जीचं बरोबर असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.

गोर्जीने मग ब्लूटूथ आणि वायफायद्वारे सुरक्षित डेटा-प्रोटोकॉल वापरून रेफ्रिजरेटरला जोडून घेतलं.

रेफ्रिजरेटरचा आवाज सुरू झाला.

“हाय,” रेफ्रिजरेटर म्हणाला.

“ओ हाय, तू बरा आहेस ना?” गोर्जीने विचारलं.

“हो, एकदम बरा.”

“मग प्रशिक्षणासाठी तयार आहेस ना?” तेजोमयीने विचारलं.

“त्याची गरजच नाही.”

“कां बुवा?”

“अगं, मी स्मार्ट आहे. गोर्जी जेव्हा तुझ्याशी बोलत होती, तेव्हाच मी तिला वायफायने जोडून घेतलं. ती सांगत होती तेव्हा प्रत्येक माहिती मी माझ्या मशीन-लर्निंग अल्गोरिदम आणि न्यूरल-नेटवर्क मॉडेलमध्ये प्रक्रिया करून लगेच शिकत गेलो.”

“आँ!”

“फक्त एकच गडबड झाली.”

“काय?”

“आइसक्रीम आणि जंकफूडबद्दल तू तिला टोकलंस ना, तेव्हा माझ्या डेटामधली एक फाइल करप्ट झाली.”

“अरे, यामुळे तू अर्धवटच स्मार्ट राहशील ना,” तेजोमयी म्हणाली.

“म्हणजे मी अर्धवट का होईना स्मार्ट आहे, असं तुला वाटतंय? म्हणजे माझी परीक्षा घेण्याची गरज संपली ना?”

गोर्जी हसली.

“खरंच की! ५० टक्के गुण मिळाले तरी पासच म्हणतात ना.”

दोन स्मार्ट यंत्रांनी आपला मामा बनवल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं.

अलेक्झांडर आळीपाळीने तिघांकडे बघू लागला.

तेवढ्यात रेफ्रिजरेटरच्या स्क्रीनवर एक नवीन सूचना उमटली —

घरातील सदस्यांच्या आहार-डेटाचे विश्लेषण सुरू.”

हे बघून गोर्जी चकित झाली.
“अरे, हे तू कधी सुरू केलंस?”

रेफ्रिजरेटर शांतपणे म्हणाला —

“मी या घरातील सर्वांच्या खाण्याच्या सवयींचा डेटा जमा केलाय. त्यावरून मी तुमच्या आरोग्याचा अंदाज काढता येणं शक्य झालय.”काही क्षण शांततेत गेले.पुन्हा रेफ्रिजेटरवरील स्क्रीनवर  ओळ उमटली —

तेजोमयी — उद्यापासून हिरव्या भाज्यांची मात्रा वाढवणं आवश्यक.” तेजोमयीला आता लक्षात आलं स्मार्ट फ्रिज केवळ अन्न सुरक्षित ठेवणारा नाहीय तर तो एआय न्यूट्रिशन डॉक्टर”ही आहे.

“वा छान”तेजोमयी उर्त्स्फुतपणे म्हणाली.गोर्जीनेही त्याचं कौतुक केलं.सगळं छान चाललय हे बघून अलेक्झांडरने उडी मारुन आपला आनंद व्यक्त केला.