अस्मिता की अर्थकारण?
इतिहास हा कधीच सरळ रेषेत घडत नाही. त्यात असंख्य वाटा – वळणे असतात. ती अनपेक्षित आणि धक्कादायक सुध्दा असतात. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असं घडत असल्याचं दिसून येतं. जेते आपल्याच तोऱ्यात, ताठ्यात वागतात आणि वावरतात. त्यांना अपेक्षित असलेल्याच नोंदी करुन ठेवतात. त्या नोंदी मग इतिहासाचे दाखले बनतात. पुरावे म्हणून सादर केले जातात.
संवदेशनशील औरंगजेब?
असेच एक उदाहरण येथे उद्धधृत करतो. औरंगजेबाच्या काळात, निकोलाव मनुची, ही इटालयीन व्यक्ती हिंदुस्थानात आली होती. हा मनुची नंतर मुघलांच्या सैन्यात काम करु लागला. काही काळ त्याने वैद्यकीय व्यवसायही केला. या प्रांतातून त्या प्रांतात त्याचं सतत जाणं येणं होतं. त्याने त्याच्या वास्तव्यात, हिंदुस्थानातील मुघलां बाबत नोंदीवजा, स्टोरिआ डू मोगॉर किंवा मोगल इंडिया, हा दोन हजार पृष्ठांचा ग्रंथ लिहिला. त्याचा कालावधी १६५३ ते १७०८ असा आहे.
या पुस्तकाचा, असे होते मोगल, या शीर्षकाचा संक्षिप्त अनुवाद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी, ज.स.चौबळ यांनी केला. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी मूळ २००० पृष्ठांपैकी ५०० पृष्ठांचा अनुवाद केल्याचं नमूद केलं आहे.
या अनुवादित ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक ३७० वर चौबळांनी अनुवादित केलेले वाक्य असे-औरंगजेब एके रात्री प्रार्थनेसाठी उठला. त्याने हातपाय धुण्याकरिता पाणी आणण्यासाठी एका सेवकाला जागे केले. झोपेतून पुरता जागा न झालेला तो सेवक घाईने जात असता, अडखळून बादशहाच्या अंगावर कोलमडला. बादशहा आणि नोकर दोघेही खाली कोसळले. भीतिने गांगरुन गेलेला तो नोकर बादशहाच्या बाजूस पडला. बादशहाने ते पाहिले. तो नोकराजवळ जाऊन म्हणाला “अरे, मी तर तुझ्याच सारखा माणूस. मग मला का भितोस. भीती बाळगावी परमेश्वराची. त्याचा अपराध करु नये. उठ, भिऊ नकोस“. ही विलक्षण गोष्ट लोकांना समजली तेव्हा त्या सर्वांना बादशहाच्या साधेपणाची खात्री पटली.
औरंगजेबाच्या तोंडी असलेले हे वाक्य ऐकायला, मनुची तिथे होता का? इ.स.१६८५ नंतर मनुची मोगल छावणी सोडून मद्रास आणि पाँडिचेरी येथे जाऊन राहिला. उपरोक्त घटना इ.स.१७०० च्या आसपास असावी. त्यामुळे मनुची त्याठिकाणी नव्हता, हे स्पष्ट आहे. मग त्याला औरंगजेबाचं हे कथन कसं कळलं? दोन हजार पृष्ठांमधून हेच कथन मराठी ग्रंथात कसं घेण्यात आलं? १६८५ नंतरच्या काळासंबंधी मनुचीची माहिती ऐकिवच असली पाहिजे, असे, श्री. चौबळ आपल्या दोन शब्दात नमूद करतात. शिवाय ती इतर साधनावरुन तपासून घेण्यात आली आहे आणि जी खोटी किंवा आतिशयोक्तीची दिसून आली ती गाळण्यात आली आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र उपरोक्त नमूद, औरंगजेबाचं वक्तव्य त्यांनी कोणती इतर साधनं/कागदपत्रं यावरुन तपासून घेतली याचा उल्लेख नाही.
चौबळांच्या, अभ्यासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा इथे प्रयत्न नाही. मात्र, औरंगजेब हा कसा संवेदनशील, निर्मळ आणि साधा व्यक्ती होता, यासाठी अशा विधानांचा आधार घेतला जातो, हे लक्षात घ्यायला हवं.
अशी उदाहरणं अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्या बाबत सर्वत्र आढळतात. पुढे, फक्त त्याचाच उपयोग आपल्या सोईनुसार इतिहास कथनासाठी केला जातो. असं दिसून येतं. औरंगजेबाबातचं, मनुचीचं हे विधान प्रतिकात्मक ठरावं.
खरा इतिहास कुणाचा?
त्यामुळे खरा इतिहास कुणाचा समजायचा हा प्रश्न पडतो. आपल्यासमोर जे ग्रंथ येतात, आणि त्या ग्रंथांचे लेखक जे सांगतात तो वस्तुनिष्ठ इतिहास समजायचा का? अशा ग्रंथांमध्ये संबंधित संशोधक असंख्य तळटीपा आणि संदर्भ देतात. ते सगळं तपासून पाहणं शक्य नाही. कुणी तपासत असेल असही सर्वसाधरणत: वाटत नाही. समजा तपासले तर, त्या संदर्भाची वस्तुनिष्ठता काय?
आपल्यासमोर जो काही लिखित स्वरुपात इतिहास येतो, त्यावर संबंधित इतिहास तज्ज्ञांच्या विचारधारेचे प्रतिबिंब पडण्याची दाट शक्यता असते. प. बंगालमध्ये कम्युनिष्ट पक्षाचे सरकार दीर्घकाळ होते. त्यांच्या विचारधारेला माणनाऱ्या लेखक/संशोधकांनी तसा इतिहास पाठ्यपुस्तकांसाठीही लिहिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते देशातील अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना तीन-चार वाक्यांमध्ये गुंडाळून टाकल्याचे विविध दाखले मिळतात.
इतिहासाच्या भाष्यकारांपुढे जे ग्रंथ येतात वा कागदपत्रे येतात, त्यावरुन त्यांची मते बनत जातात. पं.नेहरु लिखित, भारताचा शोध या ग्रंथातील, छत्रपती शिवाजी महारांजाबद्दलचं एक विधान त्याचच द्योतक असावं. पुढच्या आवृत्यांमधून ते विधान काढून टाकण्यात आलं.
विविध भागातील इतिहास
देशाच्या विविध प्रांतात कशापध्दतीने इतिहास लिहिला गेला असेल, हे समजणं कठीण आहे. केंद्रिय माध्यमिक बोर्डाची पुस्तकं (सेट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन), त्यांच्या शाळांसाठी सर्व देशात एकसारखी असतात. मात्र राज्य शैक्षणिक मंडळांची पुस्तकं सर्वत्र सारखीच नाहीत. कर्नाटकात टिपू सुलतान यालाही स्वातंत्र्यवीर मानणाऱ्यांची बरीच संख्या आहे. इकडे महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्तृत्वाबाबत पक्षीय दृष्टिकोन आढळतो. तो इतका गडद आहे की अनेकांना, सावरकरांचा साधा उल्लेख करणही अवघड होऊन जातं. प्रांताप्रांतात अशीच स्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरा इतिहास हा आधी सांगितला गेलेला समजायचा की यापुढे लिहिला जाणारा समजायचा, हा फार गहन प्रश्न आहे.
इतिहासाचे पुनर्लेखन, सत्तेत असणाऱ्या त्या-त्या काळातील सत्ताधीशांच्या वैचारिक बैठकीनुसार होणार असेल तर, ते वस्तुनिष्ठ कसे होणार? सत्ता बदलली की इतिहासही बदलत राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. समजा शंभर वर्षानंतर इतिहासाच्या पुनर्लेखनाचा जोर आणखी वाढला, तर तमिळनाडू सारख्या राज्यात काय घडेल? तेव्हा, द्रमुक पक्ष सत्तेवर असल्यास जयललितांच्या कार्यकर्तृत्वाला वस्तुनिष्ठ स्थान मिळेल असं ठामपणे सांगता येत नाही. कारण द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षांमध्ये पक्षीय मतभेदापेक्षा शत्रुत्वाचीच भावना प्रकर्षानं सध्या दिसून येते. त्यावेळी समजा, अण्णा द्रमुक सत्तेवर असेल तर, करुणानिधींच्या बाबतही असचं घडू शकतं. प्रत्येक प्रांतातच यापेक्षा वेगळी स्थिती राहणार नाही.
दोन टोक
हिंदुस्थानचा म्हणून जो इतिहास समजला जातो, त्याबाबत उत्तर भारताला जसं वाटेल तसंच दक्षिण भारताला वाटेल का? असे प्रश्न इतिहासाच्या पुनर्लेखातून निर्माण होऊ शकतात.
इतिहासाच्या पुनर्लेखनासंदर्भाती असे वेगवेगळे पैलू, घटक यांचा साकल्यानं विचार व्हावा, या अनुषंगानेच, हेमांगी दिवाळी अंकात यंदा, “भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीचा अट्टाहास कितपत योग्य आहे,” हा परिसंवाद आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी त्यासाठी आपले अभ्यासपूर्ण लेख पाठवले.
प्रत्येकाने आपल्या कथनाच्या पृष्ठर्थ अनेक उदाहरणं, आणि पुरावेवजा संदर्भ दिले आहेत. ते नजरेखालून घातल्यावर इतिसाच्या पुनर्लेखनातून भारताच्या अस्मितेचा खरोखरच गौरव होईल का? आसेतु हिमाचल ते मान्य होईल का? सध्याची १३० कोटी जनता त्याने मोहरुन जाईल का? असे प्रश्न पडतात. त्यांची ठोस आणि ठाम उत्तरं काही मिळत नाही. एकूणच इतिहास हा अडचणींचा अधिक असल्याच म्हणावं लागतं.
प्रमादांचे दाखले
एैतिहासिक व्यक्तिमत्वे या काही दैवी नव्हत्या. त्या तुमच्या- आमच्यासारख्याच सर्व प्रकारच्या मानवी गुणदोषांना धारण करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हातून विविध प्रमादसुध्दा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतिहासाचं वस्तुनिष्ठ लेखन किंवा पुनर्लेखन करताना अशा प्रमांदावर भाष्य केलं गेलं तर, समोर येणाऱ्या प्रवाहात झापडबंद पध्दतीनं क्षणात स्खलनशील होणाऱ्या आपल्या देशात पुन्हा अस्मितेचा प्रश्न तीव्र होणारच नाही याची शास्वती कोण घेणार? पज्ञ्मावती सारख्या ऐतिहासिक पात्राच्या चित्रिकरणावरुन जो धुराळा उडाला, तो कशाचा निदर्शक? एका कविराजानं लिहून ठेवलेलं राणी पज्ञ्मावतीवरील काव्यं आणि वेगवेगळया दंतकथा यापलिकडे त्यांच्या संदर्भातील साधनं उपलब्ध नाहीत. मेवाड प्रांतातच वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया कथा प्रचलित आहेत. त्यामुळे इतिहासाची तोडमोड करु नका, असा इशारा देऊन गोंधळ माजवणाऱ्या कोणत्यातरी सेनेचं म्हणणं, म्हणजे मग इतिहास समजायचा का? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला, मराठी सत्तेचा उदय, हा ग्रंथ सांप्रतकाली अनेकांच्या पचनी पडणार नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रावर महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आक्षेप आहे. मग त्यांचं काय करायचं?
जेत्यांच्या शब्दांना मान
जेत्यांव्दारे पराजितांच्या धार्मिक स्थळास नष्टं करणं , विद्रुप करणं किंवा त्याला आपल्या प्रार्थना स्थळाचं स्वरुप देणं, हे जगातील इतर देशांसोबतच हिंदुस्थानातही सर्रास होत आलं आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता यात कुणा एका धर्माच्या शासनकर्त्याकडे बोट दाखवता येत नाही. संस्कृत पंडित कल्हणाच्या, राजतरंगिणी या ग्रंथातील उल्लेखानुसार काश्मिरचा ११ व्या शतकातील हर्ष किंवा अशाच नावाच्या हिंदू राजाने मंदिरे तोडण्यासाठी एका खास अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. शैवांनी, वैष्णवांची आणि त्यांनी यांची मंदिरं पाडल्याचे उल्लेख इकडे-तिकडे आढळतातच. या परिसंवादात सहभागी झालेले, बौध्द धम्माचे गाढे अभ्यासक भी.म.कौसल यांनी अनेक बौध्द मंदिरे/स्तूप/लेण्या विद्रुप करुन मंदिरात रुपांतरीत करण्यात आल्याचं सोदाहरण स्पष्ट केलं आहे. त्या ठिकाणी, पुन्हा स्तूप बांधण्याची मागणी पुढे आली आणि त्याचा रेटा वाढला, तर किती अनावस्था ओढेल.
अशारितिने आपल्या देशातच विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा विध्वंस केल्याचे दाखले, वेगवगळे संशोधक देत असतात. जे घडून गेलं ते अत्यंत वाईट होतं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण या साऱ्या घटना-घडामोडिंना शेकडो वर्षे होऊन गेली. संबंधित सारेच इतिहास जमा झाले.
स्मशानातील मढी उकरण्यामुळे गुन्ह्याचा शोध लागतही असेल, पण इतिहासातील कथित गुन्हेगार हे कधीचेच कुणी अल्लाला प्यारे तर कुणी कैलासवासी/वैकुंठवासी झाले आहेत. मग शिक्षा करणार कुणाला?शिवाय प्रार्थनास्थळं पाडणारे किंवा विद्रुप करणारे नेमके होते तरी कोण? ज्ञानव्यापी मंदिर काही प्रत्यक्ष औरंगजेबानं पाडली नसेल? ते कार्य कदाचित त्याच्या सेवेत असणाऱ्या हिंदू सेनाधिकाऱ्यांनी सिध्दीस नेल्याची शक्यता राहू शकते. राजा जयसिंग कितीही मोठा पराक्रमी असला तरी तो औरंगजेबाच्या आदेशावरुन छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करायला मराठी मुलखात आला होता. एक हिंदू (छत्रपती महाराज) हिंदवी संस्कृतीच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत होता तर दुसऱ्या हिंदू (मानसिंग) ला अशा काही संस्कृती रक्षणाची गरजही भासत नव्हती. किंबहुना अशी काही संस्कृती किंवा अस्मिता राहू शकते या बाबत राजा मानसिंग अडाणीच होता, असं म्हंटल्यास वावगं ठरु नये. महाराणा प्रताप आणि एक-दोन रजपूत राजे सोडले तर इतर राजपूत राजांची हिंदू अस्मिता मुघल किंवा इतर मुसलमानी राजांच्या चरणाची दासी झाल्याचं, दुर्देव्यानं इतिहासाच सांगतो.
भारत स्वतंत्र झाल्यावर इतिहासातील ही खपली निघू शकतात आणि बुजलेल्या जखमा नव्याने ठसठसू शकतात, ही बाब स्वतंत्र भारताच्या शिल्पकारांनी ओळखली होती. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशातील सर्व प्रार्थनास्थळांची जी स्थिती होती, ती तशीच राहू द्यायची, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यातच सर्वांचं आणि देशाचं हित सामावलं असल्याची त्यांची धारणा होती.
मात्र स्वतंत्र भारतातल्या नागरिकांमधील काही घटकांना कालांतरानं इतिहास काळात आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तीव्र संवेदना होऊ लागली. त्याला अस्मितेचा मुलामा चढवण्यात आला. त्यातून भलतच विपरीत घडू लागलं. “त्यांनी” तेव्हा पाडलं म्हणून “आम्ही” आता पाडून आत्म्याची शांती करणार, असा कर्कश आवाज उठू लागला. बाबरी मशिदीच्या अनुषंगाने करा किंवा मरा, अशा धाटणीतली कृती झाली. ज्ञानव्यापी मशिदीच्या रुपानं हा आवाज आणखी कर्णकर्कश झाला. मथुरेचा विषय कायम धगधगत असतो. राष्ट्रीय आणि जागतिक वारसा आणि अभिमानाचा विषय असलेली ताजमहाल ही वास्तू या वादात कायम पाडली जाते. यातून नेमकं काय साध्य होतं? हा प्रश्नच आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी, प्रत्येक मशिदीखाली, शिवलिंग शोधू नये, अशा प्रकारची घेतलेली भूमिका अत्यंत प्रागतिक अशी ठरते.
सर्वांच्या अस्मितेला हा कर्णककर्शपणा सुखावतो, असं म्हणणं हे स्वत:ला फसवण्यासारखं आहे. उत्तरेत काय घडतं, याच्याशी दक्षिणेला काही घेणदेणं असावं असं वाटत नाही. कारण या वादगांच्या फार ठिणग्या तिकडे फार उडताना दिसत नाहीत. बंगाल पासूनच्या पश्चिम भूभागातही फार उत्साह दिसतो, असं आढळून आलेलं नाही.
अर्थगतिला खिळ
अशा वादांमुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण होत नाही का? शिवाय समाजकारण – राजकारण आणि अर्थकारणावर मोठा परिमाण होतो. अर्थगतिला खिळ बसते, हे कधी लक्षात घेणार आपण?
पहिले ते अर्थकारण, अशी भूमिका किमान गेल्या शतकभरात तरी युरोपियन राष्ट्रांमध्ये राहिली आहे. अस्मिता की अर्थकारण, या दोन बाबींपैकी एकाची निवड करायची झाल्यास, या राष्ट्रातील नागरिक अर्थकारणासच पहिली पंसती देतात.
एकिकडे जीवन जगण्यासाठी करावा लागणारा पराकोटीचा संघर्ष आाणि दुसरीकडे अस्मितेचा अहंकार फुलवणारी कृत्ये आणि व्यक्तव्ये यामध्ये भारतीय समाज दुभंगत तर चालला नाहीना, अशी साधार भीती वाटते.
गेली अनेक दशके आपला देश, सुपर पॉवर बनण्याची इच्छा बाळगून आहे. अशी शक्ती प्राप्त करणं, अर्थकारण सक्षम आणि भक्कम झाल्याशिवाय शक्य नाही. चीनमध्ये एककल्ली कारभार असला तरी, गेल्या काही दशकांमध्ये अर्थकारणावरची दृष्टी त्या देशानं तसुभरही हटू दिली नाही. त्यामुळे आज अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवण्याची धमक ते राष्ट्र प्राप्त करु शकले. दुसरीकडे तेल समृध्दीचा वरदान लाभलेली आखाती प्रदेशातील अनेक राष्ट्रं प्राचीन वारसा आणि इतिहासाला आपलं खरं वैभव माणून पुन:स्थापित करण्याच्या पाठीमागं लागल्यानं, या राष्ट्रांच्या वाताहतीचा प्रारंभ झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
क्लिष्ट आणि किचकट
हिंदुस्थानातील इतिहास हा अतिशय क्लिष्ट – किचकट आणि एकमेकांच्या तंगड्या एकमेकात घातलेला आहे. त्यामुळेसुध्दा सध्या अस्मितेच्या नावाखाली मंदिर/मस्जिद वही बनायेंगेचे दिले जाणारे नारे फिजूल ठरतात. अशा बाबी राष्ट्रीयतेशी तर अजिबात निगडित नाहीत. कारण सर्वत्रच याचे पडसाद सारख्याच पध्दतीने पडत नाहीत. तेव्हा, हा विषय तापवून ठेवण्यानं देशाची मागास, निर्बुध्द, अवैज्ञानिक आणि आधुनिक काळाला मारक अशी मानसिकता सिध्द होत नाही का?
अशी मानसिकता कायम राहिली तर आपण सूपर पॉवर राष्ट्र, बनण्याऐवजी, दुय्यम श्रेणीचे राष्ट्र, बणून राहण्याचीच शक्यता अधिक वाटते.
सुरेश वांदिले