(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

अहंकार

एकदा गरुड महाराज आपल्या लहानग्या राजपुत्रास त्यांच्या पणजोबांची गोष्ट सांगत होते.

एकदा पणजोबांनी सशाची पिल्लं पळवली. त्यांच्या आईने विनवणी करुनही ते त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मग सशाने उंदिर, घुशी अशा मित्रांना बोलावलं. त्यांना पणजोबा राहत होते ते झाड पोखरायला सांगितलं. ते तसं त्यांनी पोखरलं. त्यामुळे ते एके दिवशी ते वाऱ्यानं पडलं. पणजोबा त्या झाडाच्या फांद्याखाली दबून मरुन गेले..

पण बाबा, ही गोष्ट तुम्ही आता आम्हाला कां बरं सांगता आहात…एका राजपुत्रानं विचारलं.

बाळांनो, आपणापेक्षा कमी बलवान असणाऱ्याला कधी त्रास द्यायचा नसतो..ते आपल्यापेक्षा कमी शक्तीशाली असतील किंवा त्यांना उडता येत नसेल तर त्याचा अंहकार बाळगायचा नाही. तसा अहंकार पणजोबांनी बाळगला म्हणून ते प्राण गमावून बसले, असं तुम्ही कधी वागू नका म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली.

मग तुम्ही कधीही पणजोंबासारखं दुष्टपणे वागणार नाहीना, गरुड महाराजांनी आपल्या राजपुत्रांना विचारलं.सर्वजण हो म्हणाले.

मात्र त्यावेळी सर्वात छोट्या राजपुत्राच्या मनात काहीतरी वेगळचं चाललं होतं.त्याला त्या सशाचा भंयकर राग आला होता.त्याला धडा शिकवायलाच हवा असं त्याने मनोमन ठरवलं.

आपल्या मनातील गोष्ट त्याने आपल्या भावंडांना सांगितली. तेव्हा त्यांच्यातील सर्वात मोठा भाउु म्हणाला, अरे मुर्खा,आपल्या बाबा महाराजांनी जे सांगितल, ते तुला ऐकायचं नाही का?आपले बाबा जेव्हा सांगतात तेव्हा ते आपल्या भल्यासाठीच ना..

त्याच्यापेक्षा लहान भाऊ म्हणाला,अरे गधड्या बाबांनी समजावलं तेव्हा तू सुध्दा हो म्हणालास ना..मग आता त्यांच्या सांगण्याविरुध्द वागणार म्हणतोस,हे बाबांना फसवणं झालं..

आपल्या बाबांना जो फसवतो तो नेहमीच संकटात सापडतो,तिसरा भाऊ म्हणाला..

छोट्या गरुड राजपुत्राला तिनही भावांनी वेगवेगळया पध्दतीने समजावण्याचा प्रयत्न केला.पण छोट्याला काही ते पटलं नाही.

तुम्हाला आपल्या बाबांच्या पणजोबांच्या अपमानाचा बदला घ्यायचा नसेल तर घेऊ नका.पण मी तुमच्या सारखा भित्रा नाही,डरपोक नाही.मी बदला घेणार आणि त्या सशाला धडा शिकवणारच..

त्याचा तो अंहकार बघून तिघेही मोठे भाउु अवाक झाले.हा स्वत:ला संकटात टाकेल आणि त्या गरीब बिचाऱ्या सशावर संकट कोसळवेल, याची खात्री तिघांनाही पटली. त्यामुळे ते तिघेही या छोट्याच्या मनातलं सांगण्यासाठी गरुड महाराजांकडे पळाले.ही संधी साधून छोट्याने आकाशात भरारी घेतली. तो सशाच्या बिळाकडे वेगाने निघाला.

सशाच्या बिळाजवळ पोहचल्यावर त्याने सशाला जोराने हाक मारली.

तू कां दडून बसलास भित्र्या,माझ्या बाबांचे पणजोबा तुझ्यामुळे मृत्यूमुखी पडले,त्याचा बदला मी घ्यायला आलो आहे..

असं तो काहीबाही जोरजोर बडबडत राहिला. त्याचं हे बडबडणं ऐकून  ससा घाबरला.आता काय करावं बरं,  याचा तो विचार करु लागला.

त्याला काही सुचेना..

मात्र छोट्याच्या जोरजोराच्या बडबडीमुळे ससा राहत असलेल्या झाडावरचा घुबड सावध झाला.कावळे सावध झाले.सुतार पक्षी सावध झाला.ते सर्वजण त्या झाडाच्या एका फांदीवर गोळा झाले.त्यांनी ठरवलं की,या अहंकारी गरुडावर आपण सर्वांनी वेगाने त्याच्यावर हल्ला करायचा.सुतार पक्षाने त्याच्या डोळ्यात चोच घालायची.घुबडाने त्याचे पिसं उपटायचे.कावळयाने पंख टोचायचे..ठरल्याप्रमाणे ते सर्व वेगाने खाली आले.सुतारपक्षाने बरोबर नेम साधला आणि छोट्या गरुडाच्या डोळ्यात चोच खुपसली आणि वेगाने वर पळाला.

गरुड वेदेनेने विव्हळू लागला.एका डोळ्याने त्याला नीट दिसेना.कावळा आणि घुबडही त्याला टोचू लागले.त्यामुळे त्याला उडताही येईना..

मात्र त्याचवेळी गरुड महाराज आपल्या इतर तीन मुलांसह तिथे आले आणि त्यांनी छोट्या भोवती पंख पसरले आणि सर्वांची क्षमा मागितली. छोट्याला अभय द्या पुन्हा पुन्हा म्हणू लागले..

आपले राजे इतके नम्रपणे विनंती करताहेत बघून कावळे,घुबड आणि सुतार पक्षी खाली आले. त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. आपण कां असं वागलो हे सांगितलं.

महाराज म्हणाले,तुमचं काही चुकलं नाही हो, या आमच्या गधड्याला मी समजावलं होतं असं काही वागू नका..आपण संकटात पडू..पण त्याने ऐकलं नाही..

या सर्व घडामोडी बिळातला ससा घाबरुन बघत होता.आपल्यासाठी आपले मित्र वेळेवर धावून आले याचा त्याला आनंदह झाला आणि धिरही आला.महाराजांनी सर्वांची क्षमा मागितल्यावर तर त्याची भीड चेपली.सुतार पक्षाने छोट्याच्या डोळयावर चोच मारल्याने त्याला जखम झाल्याचे त्याने बघितले होते. याचे त्याला वाईट वाटलं.तो हळूच बिळाच्या बाहेर पडला. त्याला माहीत असलेली वनऔषधी घेऊन तो महाराजांच्या समोर आला..

त्याने महाराजांना ही वनौषधी दिली. छो्याच्या जखमेवर लावायची विनंती केली.

महाराजांनी छोट्यास पंखाखालून बाहेर काढले. छोटा वेदनेने तळमळत होता. भीतिने थरथर कापत होता. महाराजांनी त्याच्या जखमांवर सशाने आणलेली वनौषधी लावली. तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. अवतीभवती बाबा आणि भावंड बघून त्याच्या जीवात जीव आला.

महाराज त्याला म्हणाले, मुर्खा अरे ज्या सशाला तू धडा शिकवायला निघाला होतास त्यानेच बघ तुझ्यासाठी ही वनौषधी आणली.

त्याचे प्रेमळ मन कुठे आणि तुझे दुष्ट मन कुठे..दुष्टपणे वागून कुणाचही भलं होत नाही. पण हा ससोबा सर्वांशी प्रेमाने वागतो.मदतीला धावून जातो म्हणून त्याला इतके जीवला जीव देणारे मित्र मिळाले..

छोट्याला आपली चूक उमगली होती.मात्र त्याला वर बघण्याची हिंम्मत होत नव्हती. महाराजांनी त्याला सशाची क्षमा मागायला सांगितलं.त्याने क्षमा मागितली. तेव्हाच मनोमन ठरवलं की आपण यापुढे अहंकाराने कुणाशीही वागायचं नाही…

सरेश वांदिले