(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आई नापास..

 

   कल्याणी सातवीतून आठवी जाताच, तिच्या आईने तिला आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकण्याची इच्छा बोलून दाखवली. खरंतर कल्याणीला आयआयटी म्हणजे काय? हे त्याक्षणी फारसं माहीत नव्हतं. कसलं तरी इंजिनीअरिंगचं शिक्षण एव्हढच तिच्या कानावरुन गेलं होतं. तिचा मोठा भाऊ १२ वी नंतर इंजिनीअरिंग शिकायला गेला होता. मग आई आपल्याला आठवितच कां बरं इंजिनीअरिंगला पाठवतेय, असा तिला प्रश्न पडला. आईचं नेहमीच आपलं काहीतरी वेगळंच असतं, असं स्वत:शीच बोलून कल्याणी खेळायला गेली.

   खेळून परतली तेव्हा घरी तिचाच विषय चालला होता. कल्याणीला आत्ताच आयआयटी शिकवणी वर्गात टाकायला हवं असं आई,बाबांना सांगत होती. हे बोल कल्याणीच्या कानावर पडताच ती कान टवकारुन आईबाबांजवळ जाऊन उभी राहिली.

   “अगं पण, तू जरा घाई करतेस असं वाटत नाही का? बाबा म्हणाले.

   “यात कसली आलीय हो घाई. हीच योग्य वेळ आहे. पोराच्या वेळेस आपणास आठवीपासूनचे आयआयटी प्रवेश परीक्षा कोचिंग क्लास असतात हे माहीत नव्हतं. आता कळलय. आपल्या ओळखीच्या सगळ्यांनीच टाकलय त्यांच्या मुला-मुलींना या शिकवणी वर्गात.” आई म्हणाली.

   “अगं, इतरांसारखच आपण वागलं पाहिजे असं नाहीना.”

   “अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही. आज स्पर्धा किती तीव्र आहे. आपण शिकवणी लावली नाही तर कल्याणी मागे राहील सर्वांच्या.”

   “अगं पण, तिला आयआयटीचा अभ्यास झेपायला हवा , मुळात आवड हवी. आपण तिला विचारायला हवं. तुला ठाऊकच आहे की तिला जरी विशेष कष्ट न करता शाळेच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत असले आणि समजायला जरी कठी जात नसला तरी तिला कधीच गणितात फार रस दिसला नाही. तिला खरी आवड इंग्रजी विषयात आहे. इंग्रजीतलं काहीही वाचून काढते, ती न कंटाळता. सगळा हॅरी पॉटर तिने वाचलाय.’शिवा ट्रायलॉजी’ही तिने पंधरा दिवसात वाचून काढली. तेव्हा आपण दोघेही थक्क झालो होतो. आपल्याला तरी शक्य आहे ते. इंग्रजीत नेहमी टॉपर असते. भाषण स्पर्धेत धाडधाड इंग्रजी बोलते. निबंध स्पर्धेतही ती इंग्रजीत लिहते. मुख्याध्यापकांपर्यंत तिच्या इंग्रजी कौशल्याची ख्याती पोहचलीय. इतकं आपल्याला ठाऊक असताना आपण तिला असं इंजिनीअरिंग करायला पाठवणं, मला तर पटत नाही बुवा.”

   “अहो, हे सारं काही मलासुध्दा ठाऊकाय. पण आपण तिचे शत्रू नाहीत. राहिला प्रश्न आयआयटी प्रवेशपरीक्षेचा अभ्यास न झेपण्याचा. इतरांच्या मुला-मुलींना झेपतो की नाही ?  त्यांच्यापेक्षा कल्याणी हुषार आहे”, आईने आपला मुद्दा रेटला.

   बाजूलाच उभ्या असलेल्या कल्याणीकडे बघत तिने विचारलं, “काय गं, तुला झेपेल ना?”

   याचं काय उत्तर द्यावं हे कल्याणीला कळलं नाही. त्यामुळे ती गप्पच बसली. खाली मान घालून टाइल्सला अंगठा घासू लागली. ती अस्वस्थ झाली की असच करते, हे बाबांना ठाऊक होतं. तिची अस्वस्थता दूर करण्यासाठी बाबांनी तिला विचारलं…

   “काय ग बाळं, तू जाशील का, आयआयटीच्या शिकवणी वर्गात?”

   “पण तिथे जाऊन काय करायचं बाबा?”कल्याणी सहज बोलून गेली.

   “अगं गधडे, शिकवणी वर्गात काय फुगडी खेळायला जातात का?काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस”, आई रागावून म्हणाली.

   “तिला रागावतेस कां, समजावून सांग की आयआयटी शिकवणी वर्गात जाऊन काय करायचं ते?”बाबा कल्याणीची बाजू घेत म्हणाले.

   “तुम्हीच सांगा ना. म्हणे काय करायचं ते?” आई चढ्या आवाजात म्हणाली.

   मग बाबांनी आयआयटी म्हणजे काय? तिथे कसा प्रवेश मिळवायचा असतो? तिथं जाऊन काय करायचं असतं? काय शिकायचं असतं? हे सारं कल्याणीला समजावून सांगितलं.

   “म्हणजे मला दादासारखं इंजिनीअर करणार आहात का, तुम्ही?”कल्याणीने विचारलं.

   “होय, तेसुध्दा आयआयटीमधूनच. आयआयटीत प्रवेश मिळाला की भाग्यच उजळेल हो माझ्या सोन्यासारख्या लेकीचं.” आई तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाली.

०००

   आईच्या हट्टापुढे बाबांचं काही चाललं नाही. कल्याणीचं नाव तिने आयआयटी प्रवेश परीक्षा शिकवणी वर्गात टाकलच शेवटी.

   कल्याणी अनिच्छेनेच वर्गाला जाऊ लागली. तिला तो वर्ग अजिबातच आवडला नाही. शिकवणी वर्गात गणित , रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये काहीच रस वाटेना. वर्गाला जाण्याची वेळ आली की तिच्या अंगावर काटाच येई. हळूहळू तिला वर्गातलं काहीही कळेनासं झालं. त्याचा परिणाम तिच्या चाचणी परीक्षांवर होऊ लागला. पाचव्या चाचणी परीक्षेत तिला शून्य गुण मिळाले. तेव्हा शिकवणीच्या संचालक सरांनी तिच्या बाबांना बोलावून घेतलं. कल्याणीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तिला जर असेच गुण मिळत राहिले तर तिच्या मनावर खूप परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलं.

“एकतर  तिला मनापासून अभ्यास करायला सांगा किंवा तिला वर्गातून काढून घ्या. उगाच जबरदस्ती करु नका. तुम्ही तिला वर्गात ठेवली तर आमचा फायदाच आहे. पण मुलांच्या इच्छेविरुध्द त्यांना काहीही करायला लावू नये, असंही आम्हास वाटतं. आता निर्णय तुम्हीच घ्या.”संचालक म्हणाले.

   “योग्य तो निर्णय लवकरच घेऊ,” असं बाबांनी त्यांना सांगितलं.

   ०००

   शून्य गुण मिळाले त्यादिवशी कल्याणी खूप रडली. आपल्याला काहीच येऊ शकत नाही. असं तिला वाटू लागलं. घरी तिने पेपर दाखवला तेव्हा आईनं घर डोक्यावर घेतलं. ती वाट्टेल तशी कल्याणीला बोलली. बाबांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडाची टकळी सुरुच राहिली. बाबांच्या कुशी शिरुन कल्याणी हमसून हमसून रडू लागली. बाबांनी कसबसं तिला शांत केलं.

   या दिवसानंतर कल्याणीचा आत्मविश्वास खूप कमी झाला. आपल्याला काहीच येत नाही, असं तिला सारखं वाटू लागलं. शाळेच्या वर्गातही तिचं लक्ष लागेना. सदैव हसतमुख राहणारी कल्याणी एकदम शांतच झाली. तिने यंदा भाषण स्पर्धेत भाग घेतला नाही. आंतरशालीय महत्वाच्या स्पर्धेसाठीही तिने नाव नोंदवलं नाही. मुख्याध्यापकांनाही हे कळलं. खात्रीच्या खेळाडूनेच माघार घ्यावी आणि संघ                                    पाण्यात बुडावा, असंच हे होतं. कल्याणी संघात नाही म्हंटल्यावर या स्पर्धेतून शाळेनेच माघार घेतली. तिने यावेळी स्नेहसंमेलनातही भाग घेतला नाही.

कल्याणीने स्वत:ला आक्रसून घेतलं. मित्र मैत्रिणींमध्येही ती फारशी मिसळत नसे. तिच्यामधला हा बदल, वर्गशिक्षिका श्रीमती अष्टपुत्रे यांना काहीतरी धोक्याची सूचना वाटली.

   ०००

   एके दिवशी श्रीमती अष्टपुत्रे शाळा सुटल्यावर कल्याणीच्या घरी आल्या. कल्याणी आयआयटीच्या शिकवणीवर्गाला गेली होती. बाबा नुकतेच ऑफिसमधून घरी परतले होते. वर्गशिक्षिका घरी बघून आईबाबांना आश्चर्य वाटलं. आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गेल्या सहा महिन्यात कल्याणीत झालेल्या बदलाने नाही म्हणायला तीसुध्दा चिंतित झाली होती. पण नेमकं काय झालं? हे काही  तिच्या लक्षात येत नव्हतं. आयआयटी शिकवणी वर्गाचाच हा परिणाम असल्याचं बाबांच्या लक्षात आलं होतं. पण आईपुढे त्यांचं काही चालेना.

   ठेच लागल्याशिवाय काही आईच्या लक्षात येणार नाही,काही काळ गेल्यावरच तिच्या लक्षात येईल. मग सारं काही सुरळीत होईल. अशी त्यांना आशा होती. तोपर्यंत कल्याणीची सुटका नव्हती. पण त्यांनाही कल्याणीत झालेल्या बदलाने काळजी वाटायला लागली होतीच. आयआयटी शिकवणी लावल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीने घरातल्या वातावरणावर दु:खाचं सावट निर्माण झालं होतं.

  श्रीमती अष्टपुत्रेंचा आदरसत्कार झाल्यावर आईने त्यांना घरी येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यांनी, कल्याणीमध्ये गेल्या सहामहिन्यात जे बदल झाले त्याबद्दल सांगितलं.

    “तिचं काहीतरी बिनसलंय.पण काय बिनसलय, हे मात्र कळलेलं नाही. तेच विचारायला आपण आलोय. कल्याणीसारखी लाघवी आणि हुषार मुलगी अशी हातातून जाणं योग्य नाही. तिच्या मनातलं जाणून घेतलं पाहिजे.” श्रीमती  अष्टपुत्रे म्हणाल्या.

   “यावर काय बोलायचं?असा प्रश्न आईला पडला. पण आता सारं स्पष्टपणे बोलण्याची गरज असल्याचं बाबांच्या लक्षात आलं. सोनारानं कान टोचलं की बरं असतं, असं बाबांना वाटलं. आयआयटी शिकवणी प्रकरण त्यांनी श्रीमती अष्टपुत्रेंना सांगून टाकलं. कल्याणीला पाचव्या चाळणी परीक्षेत मिळालेले शून्य गुण, त्यानंतर शिकवणी वर्गाच्या सरांनी त्यांच्याशी केलेली चर्चा याविषयीही सविस्तर सांगितलं.श्रीमती अष्टपुत्रेंच्या सारं काही लक्षात आलं .

   “मुलीच्या इच्छेविरुध्द असं वागून काय मिळवलत तुम्ही?”आईकडे बघत त्या म्हणाल्या. यावर आई गप्प राहिली. तिच्या मते कल्याणीच्या हितासाठीच तिला आयआयटी शिकवणी वर्गात टाकलं. पण भलतच झालं.

   “प मॅडम, कल्याणी काही बोलली नाही हो? आता आई रडकुंडीला येऊन म्हणाली…

   “अहो, ती कशी सांगणार नि काय सांगणार? किती लहान आहे ती अजून. खेळण्या- बागडण्याच्या दिवसात असं आयआयटी सारख्या वरच्या श्रेणीच्या शिकवणीचं लोढणं तिच्या गळयात टाकल्यावर पोरगी फार कोमेजून गेलेली दिसते. तिला इंग्रजीमध्ये रस असल्याचं तुमच्या लक्षात आलच असेल. त्यातही उत्तम करिअ करता येतं. कोणत्याही इंजिनीअरपेक्षा कितीतरी अधिकपट. पण अद्याप त्यालाही वेळ आहे. आठवीत मुलं अबोधच असतात. त्यांना स्पर्धा, करिअ यांची तशी फार कल्पना नसते. पण त्यामुळे लगेच त्यांच्या गळयात ते लोढणं लटकवण्याचीही गरज नाही. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना फुलू द्या,उमलू द्या ,खेळू द्या, बागडू द्या. त्यांनाही त्यांचं हित कळतं. पण आपणच असं त्यांच्या मनाविरुध्द वागून त्यांचं अहितच करतो.” वर्गशिक्षिका म्हणाल्या.

     “खरय हो ते.” रडवलेली आई म्हणाली. बाबा काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळयात अश्रू आले. कल्याणीचं अहित करण्यात त्यांचा नाकर्तेपणाही कारणीभूत होता. आईच्या हट्टाला त्यांनी मान्य केलं नसतं तर आज कल्याणी आत्मविश्वास गमावून बसली नसती. याची जाणीव त्यांना झाली.

      ०००

   आईबाबांचा निरोप घेऊन श्रीमती अष्टपुत्रे निघून गेल्या. कल्याणी वर्गातून परतली. तिला आईने आपल्या कुशी घेतलं. उद्यापासून आयआयटी शिकवणी वर्गाला जाण्याची गरज नाही, असं तिनं कल्याणीला सांगितलं. बाबाही तसं म्हणाले. पण कल्याणीचा चेहरा काही उजळला नाही. चेहऱ्यावर हास्य उमललं नाही.

      कल्याणीने आयआयटीच्या शिकवणी वर्गास जाणं थांबवलं. आपणास काहीच येत नाही हे मात्र ती विसरु शकली नाही. तिचा गेलेला आत्मविश्वास पुढच्या सहा महिन्यातही परत आला नाही. आणि वार्षिक परीक्षेत कल्याणी नापास झाली.

   ०००

    “ती नव्हे मीच नापास झाले हो”, आई बाबांना म्हणाली. हा निकाल ऐकल्यावर आईच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू बराच वेळ थांबले नाहीत…

०००