(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आई रागावते तेव्हा…

वाघीणकाकूस, आपल्या दोन्ही बाळांचा, फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा, हे जरा जास्त चपळ होते. त्यामानाने, वाघीण काकुंची मुलगी, ही जरा सुस्त होती.

वाघाीण काकू, दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं? कसं फिरायचं? शिकार कशी करायची? संकटाची चाहूल कशी ओळखायची? संकटं आलं तरी न घाबरता, स्वत:ची सुटका कशी करुन घ्यायची? इतर प्राण्यांवर कसा वचक ठेवायचा? अशा कित्येक गोष्टी समजावून सांगायची. कुमार वाघोबांना, या गोष्टी भराभर जमू लागल्या होत्या. पण काकुंची मुलगी मात्र, मागेच राहायची. कधी प्रेमाने तर कधी रागावून, वाघीणकाकू तिला धडे द्यायची. आई आणि दादा असताना, आपणास कुणाची भीती कां वाटावी? असं मुलीला वाटायचं.

कुमार वाघोबाची प्रगती होत असताना, काकुंच्या मुलीचं अडखळणं सुरुच होतं. काकुंना काळजी वाटू लागली. मात्र, हळूहळू तीही कुमार वाघोबासारखीच चपळ आणि हुषार, न भिणारी बनेल अशी, काकूंना खात्री होती.

एकदा, कुमार वाघोबा आणि काकूंची मुलगी निवांत झोपले होते. ते सुरक्षित असल्याचं, बघून काकू, शिकारीसाठी बाहेर पडल्या. त्याचवेळी, दुसऱ्या क्षेत्रातला वाघोबा, कसा कोण जाणे, तिकडे आला. कुमार वाघोबा आणि काकूंच्या झोपलेली मुलीकडे बघून, त्याने गुरगुरणं सुरु केलं. ते दोघेही जागे झाले. आपल्यासमोर अनोळखी वाघोबा बघून दोघेही घाबरले. मुलगी अधिकच घाबरली. ती कुमार वाघोबाच्या पाठिमागे दडू लागली.

वाघोबाने मोठी डरकाळी फोडली. त्यामुळे दोघेही थरथर कापू लागले. मात्र ही नवी डरकाळी ऐकून वाघीणकाकू सावध झाल्या. आपल्याच क्षेत्रातून ही डरकाळी आल्याचं, त्यांनी बरोबर हेरलं. त्या तडक माघारी वळल्या नि वेगाने कुमार वाघोबा आणि मुलगी असलेल्या क्षेत्राकडे सुसाट निघाल्या. काही क्षणात, त्या वाघोंबाच्या समोर उभ्या ठाकल्या. त्याच्याकडे बघून त्यांनी मोठी डरकाळी फोडली.

आईला बघून, कुमार वाघोबा सावरले. आईच्या बाजूला जाऊन त्यांनीही डरकाळी फोडली. मात्र, मुलगी गर्भगळीत झाली होती. त्यामुळे तिला डरकाळीच फोडता आली आहे. ती अधिकच थरथर कापू लागली.

इकडे, वाघीण काकू आणि त्यांचा कुमार हे दोघे एका बाजूला आणि वाघोबा एका बाजुला, असा डरकाळ्यांचा सामना चांगलाच रंगला. एकमेकांच्या शक्तीचा अदमास घेत,  दोघेही हल्ला करायचा की नाही करायचा, हे बघत होते. मात्र, आपण या दोघांपुढे कमी पडू, आपली डाळ शिजणार नाही, हे कदाचित लक्षात आल्याने वाघोबा काहीवेळाने निघून गेले.

ते जाताच, मुलीच्या जिवात जीव आला.ती धावतच आईकडे आली. तिने तिला मिठी मारली. पण आईने जिभ चाटून तिला अजिबात दिलासा दिला नाही. तिला बाजूला ढकलून, कुमार वाघोबास जवळ घेतले. त्याच्यावर ती प्रेमाचा वर्षाव करु लागली. आई रागावल्याचं, मुलीच्या लक्षात आलं. तिच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.

पण, वाघीण काकुंनी तिकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. “आपल्या जगात, भित्र्यांना स्थान नाही,” असं, कुमार वाघोबाकडे बघत काकू म्हणाली.

मुलीने खूप विनवणी केली. पण काकूंनी तिच अजिबातच ऐकलं नाही. कुमार वाघोबांनी तिला समजवायचा प्रयत्न केला तर, काकू त्यालाच रागावली.

“मी निघून जाईन, दोघांनांही सोडून”,काकू गरजल्या.

 “मला शिक्षा कर, पण रागावू नकोस,” असं पुन्हापुन्हा मुलगी सांगू लागली.

त्यावर काकू म्हणाली,

“या झाडावर चढ आणि खाली पाण्यात उडी मार. हीच तुझी शिक्षा.”

मुलगी, त त प करायला लागली. पण तिच्यापुढे नाईलाज होता. झाडावर कसं चढायचं, हे आईने शिकवलेलं, आठवून आठवून, ती वर चढली. पाण्यात उडी मारणार, तोच तिला भोवळ आल्याने ती पाण्यात पडली. पडत असताना तिला वाटलं, संपलं सारं. पण तसं काही, झालं नाही. ती अलगद पाण्यात पडली. ती लगेच सावरली.

आपण समजतो तितकं, शिकणं कठीण नाही, हे तिच्या लक्षात आलं. कंटाळा करण्यापेक्षा, मागे मागे राहण्यापेक्षा, आई जे सांगतं तसं केल्यास , आपण बहादूर बनू आणि आईच्या गळयातील ताईतही होऊ, हे तिला पटलं. धडपडत ती पाण्यात उभी राहिली. आणि डरकाळी फोडली. ते बघून काकूने आणि कुमार वाघोबाने तिच्याकडे चमकून बघितले. काकूला आनंद झाला. ती,मुलगीकडे आणि तिला मिठित घेतले. काकूचा राग कुठल्या कुठे पळून गेला.

सुरेश वांदिले