“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन ऐकणारा अलेक्झांडर, डोळे मोठ्ठे करुन गोर्जी काय सांगणार, अशा आशयाचे भाव आणत तिच्याकडे बघू लागला. गोर्जीने लगेच स्वत:ला सावरुन तेजोमयीस विचारलं,
“तेजो, तुझ्या प्रश्नाचा रोख काही मला कळला नाही. कोणताही प्रश्न विचारताना तो सुसंगत असावा नि त्याला संदर्भही असावा. अन्यथा त्यातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही.”
“गोर्जे, तू तर अगदी सरांसारखीच बोलायला लागलीस. बरं ते जाऊ दे. माझा प्रश्न सुसंगत करते नि संदर्भासह सांगते.” तेजोमयीच्या या उत्तरावर अलेक्झांडरने सहमतीदर्शक मान हलवली. तेजोमयीने लाडाने त्याची पाठ थोपटली. गोर्जीने त्याच्याकडे कौतुकाने बघितलं.
“गोर्जे, शिवाजी महाराज आग्य्राच्या किल्ल्यात नजरकैदेत होते, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी औरंगजेबाने मोठी फौज ठेवली होती. महाराजांवर चोवीस तास पहारा होता. तरीसुध्दा महाराज तिथून शिताफिने बाहेर पडले. या कानाचा त्या कानाला पत्ता त्या कानाला लागू दिला नाही. मग, मला सांग हे एखाद्या श्रेष्ठ जादुगरालाच शक्य नाही का?”
“या अर्थाने तुला महाराज जादूगार वाटतात म्हणायचे.” गोर्जीचं हे वाक्य कानावर पडताच अलेक्झांडरने मान आणि शेपूट हलवून, आपल्यालाही तसच वाटतं असं सांगण्याचा प्रयत्न केला.
“आहेना माझा प्रश्न सुसंगत आणि संदर्भासहित. आता तुला काय वाटतं ते सांग?” तेजोयमी म्हणाली. गोर्जीने तत्काळ उत्तर दिलं नाही. तिने डोळे मिटले. आपल्या मेंदुतल्या डीप लर्निंग प्रणालीला माहितीच्या महाजालातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेविषयी जी जी माहिती असेल त्याचा सखोल अभ्यास करण्याची नि त्यावरुन निष्कर्ष काढण्याची सूचना केली. डीप लर्निंग कामाला लागला. काही क्षणात त्याने गोर्जीकडे त्याचे निष्कर्ष पाठवले. अलेक्झांडर मोठ्या उत्सुकतेने गोर्जीच्या चेहऱ्याकडे बघू लागला. गोर्जीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
“माझं म्हणणं बरोबर वाटतय ना.”
“खरं म्हणजे तेजो, कितीही श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ जादुगार असता तरी जे शिवाजी महाराजांना शक्य झालं ते त्याला कदापिही शक्य झालं नसतं.”
“अरे वा, तुला काहीतरी वेगळंच कारण मिळालेलं दिसतय. सांग बघू. माझी उत्सुकता फार वाढलीय.”
“तेजो, महाराजांचा स्वत:वर प्रचंड आत्मविश्वास होता. त्यामुळे त्यांना खात्री होती की आपण न डगमगता हुषारीने नि वेगळ्यापध्दतीने किंवा आजच्या स्मार्ट भाषेत, ‘आऊट ऑफ बॉक्स’ पध्दतीने, औरंगजेबाच्या सैन्याच्या डोळयात धूळ फेकू शकतो.”
“वाव, गोर्जे तू ‘आऊट ऑफ बॉक्स’ म्हणालीसना. महाराजांनी, बॉक्स म्हणजे पेटाऱ्याचाच उपयोग केला होता, त्या नजरकैदेतून बाहेर पडण्यासाठी.”
“खरंच की, पेटाऱ्याचा असा उपयोग करण्याची कल्पना म्हणजेच महाराज कसे ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करत, हे स्पष्ट होतं. पण हा एक भाग झाला. या कल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी महाराजांनी खूप विचार केला. सगळया शक्यता पडताळून पाहिल्या.”
“म्हणजे काय केलं?”
“खूप शक्यता म्हणजे, असं झालं तर काय होईल? तसं झालं तर काय होईल? मग त्यावर आपली प्रतिक्रिया कशी राहील? त्यासाठी किती वेळ मिळेल? साधनं कोणती राहतील? मार्ग कोणता राहील? धोके, संकट कोणते राहतील?असं…”
“म्हणजे जसं आजचं “एआय(आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)” करतं, तसं का?”
“अगं, एआय म्हणजे कृत्रिम बुध्दिमत्ता. पण महाराजांची बुध्दिमत्ता तल्लख, नैसर्गिक आणि अनुभवसंपन्न होती. ‘एआय’कडे असं कोणतच वैशिष्ट नसतं.”
“ग्रेट!”
“हं तर, महाराजांनी असंख्य शक्यतांचा विचार केला. त्याप्रमाणे नियोजन केलं. ते बिनचूक तडीस नेलं. यात कुठे आली जादूगिरी?”
“म्हणजे याचा अर्थ, असा की स्वत:वरचा आत्मविश्वास, कोणत्याही संकटात डगमगून न जाणं, त्या संकटाशी सामना करण्यासाठी वेगळा विचार करणं, तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी बारकाईनं सर्वबाजुंनी विचार करणं नि त्या नियोजनानुसार कामगिरी तडीस नेणं. यामुळे महाराजांची आग्र्याच्या नजरकैदेतून सुटका झाली असचना.”
“बरोब्बर, तुम्ही सर्वांनी यातूनच हाच धडा घ्यायला हवा. कोणत्याही कठीण प्रसंगात, महाराजांचे हे गुण अंगिकारले तर संकटरुपी कितीही औरंगजेब आपल्यावर चालून आले तर त्यांचा पराभव निश्चित समजायचा.”
“वाव!”
“टाव!”
सुरेश वांदिले