आकड्यांमधील गुपित ओळखण्याची कला
सध्या वेगवेगळया साधनांमध्ये आणि माध्यमांद्वारे माहितीच्या साठा प्रचंड मोठ्या संख्येने गोळा होत असतो. या साठ्यात अनेक बाबी दडलेल्या असतात. त्याचा शोध अंकगणीतीय आणि सांख्यिकी आकडेमोडीचे तंत्र वापरुन घेता येतो. हे कार्य अचुकपणे करण्याचं काम सांख्यिकीशास्त्रातील तज्ज्ञ करतात.
सध्या वेगवेगळया कंपन्या, संस्था, कार्पोरेट हाऊसेस आणि उद्योगांकडे विविध प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा गोळा होत आहे. समाजमाध्यमांचा वापर करुन फेसबुक, गुगल, व्हॉटस ॲप या कंपन्या आपली व्यक्तिगत माहिती गोळा करताहेत. यासर्व माहितीच्या साठयाचा उपयोग त्याच्या विश्लेषणानंतरच होऊ शकतो. असं विश्लेषण करण्याचं कौशल्य सांख्यिकी तज्ज्ञांना प्राप्त करता येते.
सांख्यिकीशास्त्र हे उपलब्ध माहितीवरुन निष्कर्ष काढणारं शास्त्र आहे. यामध्ये शास्त्रोक्तरीत्या माहिती गोळा करणं, अर्थ लावणं, वस्तुनिष्ठ पध्दतीनं ही माहिती सादर करणं या बाबिंचा यात समावेश होतो.
अचुक निष्कर्षाचं तंत्र
विविध प्रयोगातून मिळालेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकी तंत्राचा वापर केला जातो. आपल्या जीवनाशी निगडित विविध क्षेत्रातील माहिती गोळा करण्यासाठी या कौशल्याचा वापर केला जातो. बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, लोकसंख्येची वाढ, गृहनिर्माण, वैद्यकीय सोईसुविधा याविषयीचे ठोकताळे बांधण्यासाठी सांख्यिकी माहितीचा महत्वाचा वापर होतो. धोरणकर्त्यांना उपयुक्त ठरेल असं विश्लेषण करण्याचं तंत्र या तज्ज्ञांना अवगत करावं लागते. वेतन, किमती ,वेळ निर्धारण, पुरवठा व मागणी, या बाबिंच्या विश्लेषणात महत्वाची भूमिका बजावत असल्याने सांख्यिकी तज्ज्ञ हे उत्पादन वृध्दीत प्रमुख भूमिका बजावतात.
आवश्यक असणारी कौशल्ये- १) माहिती तत्रंज्ञान कौशल्य, विश्लेषण कौशल्य आणि आकडेमाडीचं कौशल्य हस्तगत केलेलं असावं. २) त्यांना विविध प्रवाहांचं आकलन होणं आवश्यक आहे. २)किचकट किंवा व्यामिश्र माहितीचा अभ्यास करण्यासाठी सुयोग्य कार्यप्रणाली वापरता यायला हवी. ३) समस्या निर्धारण व नाविण्यपूर्णरीत्या विचार करण्याचं कौशल्य. ४) प्रश्नांची नेमकी जाण समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींची सुसंवाद साधण्याचे कौशल्य हवे.
सांख्यिकीशास्त्र
जबाबदाऱ्या
१) सांख्यिकीतज्ज्ञाला माहिती गोळा करावी लागते. २) ही माहिती गोळा करण्यासाठी नवे आधुनिक तंत्र, कौशल्य आाणि पध्दतीचा वापर करावा लागतो. ३) मिळवलेल्या किंवा मिळालेल्या माहितीचे सुयोग्य वर्गिकरण करावे लागते. ४) या माहितीच्या विश्लेषणासाठी नव्या अत्याधुनिक व समकालीन नव्या तंत्रांचा वापर करावा लागतो. ५)गुणवत्ता व दर्जा याकडे लक्ष द्यावे लागते. ६) सॉफ्टवेअर ,औषधी निर्माण, ऑटोमोबाइल क्षेत्रातील चाळणी परीक्षण आणि वस्तू/सेवेच्या मूल्यमापनाचे काम या तज्ज्ञाला करावे लागते. ७)कंपनी /उद्योगांमधील निर्मिती, मत्ता व दायित्वे, जोखीम व्यवस्थापन, विपणन विभाग यामध्येही कार्य करावे लागते.
लेखा आणि लेखापरीक्षण- लेखांकन आणि लेखापरीक्षणासाठी सॅम्पल साइज म्हणजे विशिष्ट कालावधीची माहिती निर्धारित केली जाते. सांख्यिकी तंत्राच्या मदतीने निष्कर्ष काढले जातात. ते अचुकतेच्या आसपास पोहचणारे असतात.
शासनाचे विविध निर्णय आणि धोरणांचा आधार सांख्यिकी माहिती असते. त्याद्वारे प्रशासकीय निर्णय घेतले जातात. विविध साशकीय संस्था, सांख्यिकी तज्ज्ञांना लोकसंख्या, आर्थिक उपाययोजना, बेरोजगारी, साक्षरतेचा दर, कुपोषण, अपघात-आत्महत्या अशा विविध कारणांनी होणारे मृत्यू, इतर सामाजिक समस्यांचे याबाबतीतल्या उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्यासाठी बोलावत असते.
नैसर्गिक आणि समाजशास्त्र– नैसर्गिक आणि समाजशास्त्राच्या सर्व शाखांमध्ये सांख्यिकी माहिती महत्वाची भूमिका बजावत असते. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, हवामानशास्त्र या शास्त्रांमधील विविध प्रयोगांचे निष्कर्ष हे सांख्यिकीय माहितीद्वारे तपासले जातात व त्याचे विश्लेषण केले जाते.
खगोलशास्त्र- खगालेशास्त्राच्या अभ्यासात अतिप्राचिन काळापासून सांख्यिकीय माहितीचा वापर केला जात आहे. ग्रहताऱ्यांचे अंतर, आकार, घनता यांचा अभ्यास निरिक्षणाने केला जातो. त्यात येणाऱ्या त्रुटी या सांख्यिकीय साधनांचा वापर करुन दूर केल्या जातात.
वैद्कीय क्षेत्र- उपलब्ध माहितीच्या साठ्याच्या आधारे विविध आजारांचा प्रभाव, देखभाल यांचे विश्लेषण करतात. संनियंत्रणासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. औषधी, नवी उपकरणं आणि साधनं, एखादा आजारावर मात करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरु शकतात, याचे सांख्यिकीय विश्लेषण औषध निर्माण कंपन्या, वैदयकीय संशोधन केंद्रे, अन्न व औषध प्रशासन यांना देण्याचे काम असे तज्ज्ञ करतात.
कृषी आणि पर्यावरण- कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी शेती आणि शेतीआधारित व्यवसाय/उद्योगातील माहितीचा वापर वेगवेगळे निष्कर्ष काढणे, भाकित वर्तवणे यासाठी करतात. हवा, पाणी, मृदा प्रदुषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांच्या सांख्यिकीय अहवालाचे संशोधन आणि विश्लेषण यासाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते.
सांख्यिकीशास्त्र
करिअर संधी- सांख्यिकी शास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना पुढील पदांवर काम करण्यासची संधी मिळू शकते- १) इकॉनॉमेट्रिशिअन, २) स्टॅटिशिअन, ३)रिसर्च ॲनलिस्ट, ३)बायोस्टॅटिस्टिअन, ४)बायोमेट्रिशिअन्स, ५)इपिडेमिनॉलॉजिस्ट, ६)डाटा सायंटिस्ट, ७)स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशिअन ,८)मेडिकल स्टॅटिस्टिशिअन, ९)अनेक खाजगी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये लोकसंख्या व इतर अशाच प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करणे ,निष्कर्ष काढणे यासाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १०) राष्ट्रीय सुरक्षा संस्था, शस्त्रास्त्रांचे सांख्यिकीय विश्लेषण आणि त्याअनुंषगाने व्युहनीतीच्या निर्धारणासाठी अशा तज्ज्ञांची मदत घेतात. ११) संघ लोकसेवा आयोग, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस या परीक्षेद्वारे अशा मनुष्यबळाची वरिष्ठ पदांसाठी नियुक्ती करते.१२)स्टॉफ सिलेक्शन कमिशनद्वारे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अशा कनिष्ठ पदावर नियुक्ती देत असते.१३) खाजगी क्षेत्रात विमा, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, गुणवत्ता नियंत्रण, या विषयांसाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १४) वित्तीय कंपन्या आणि समभाग विक्री कंपन्यांमध्ये संधी मिळते. १५)अक्चुरिअल सांयन्स या विषयात पुढील शिक्षण घेऊन विमा क्षेत्रा चांगले करिअर करता येते.
सांख्यिकीशास्त्र
१२ वी नंतर पदवीस्तरीय अभ्यासक्रम
स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी) या विषयात १२ वी नंतर पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये असा अभ्सासक्रम चालवला जातो. या विषयातील शिक्षण देणारी महत्वाची व दर्जेदार संस्था म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट होय. या संस्थेत बीएस्सी इन स्टॅटिस्टिक्स आणि बीएस्सी इन मॅथेमॅटिक्स हे प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणीपरीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा तीन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संकेतस्थळ-www.isical.ac.in