(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आज नरकचतुर्थी असल्याने, पहाटेच तेजोमयीच्या घरी सगळे जण उठले. अलेक्झांडरसह सगळयांचं अभ्यंग स्नान झालं. या छान आनंदी वातावरणात बाबांनी, यू-ट्युबर हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन लावलं. घरातलं वातावरण आणखी प्रसन्न झालं. हे सगळं काळजीपूर्वक बघणाऱ्या अलेक्सा गोर्जीला फार भारी वाटत होतं. आजच्या दिवसाचं महत्व तिने माहितीच्या महाजालातून शोधलं. ती थोडी गंभीर झाली.

सर्वांचा दिवाळीचा फराळ सुरु असताना, बाबांचं लक्षं तिच्याकडे गेलं. तिची गंभीर मुद्रा बघून ते म्हणाले,

“गोर्जे अशा आनंदाच्या दिवशी, तू कां बरं चेहरा पाडून बसलीस?” मग तेजोमयी आणि आईचं लक्षं गोर्जीकडे गेलं.

“तुला काही दुखतं, खुपतं का?” आईने काळजी व्यक्त केली.

“गोर्जीला दुखत तर काही नसणार, पण काहीतरी नक्कीच खुपलं असलं पाहिजे.” तेजोमयी म्हणाली.

“खरय तेजो.”

“काय खुपलं?”आईने विचारलं

“आज काय?” गोर्जीने विचारलं.

“गोर्जे, आज नरकचतुर्थी.” बाबा उत्तरले.

“आपण कां साजरी करतो?”

“आज, भगवान श्रीकृष्णाने नरकासूर दैत्याचा वध केला म्हणून हा दिवस साजरा करतो.” तेजोमयीनं सांगितलं.

“पण, मला तर सगळीकडे नरकासूर जिवंत दिसताहेत. तेच खूपतय.”

“आँ!” आईने आश्चर्य व्यक्त केलं. ते बघून अलेक्झांडरने मोठ्ठा ऑं फाकला.

“तुमच्या मनात ठाण मांडून बसलाय,तो.”

“आँ!” आता बाबांनी आश्चर्य व्यक्त केलं.

“तुला कसं कळलं किंवा दिसलं, आमच्या मनात नरकासूर दडलाय म्हणून.”

“तुमच्या म्हणजे अगदी तुमच्याच नाही. पण, बहुतेक मनुष्यप्राण्याच्या मनात नरकासुराने घर केलंय. त्यामुळे मनुष्यप्राणी एकमेकांचा व्देष करतो, राग करतो, वाईट चिंतितो. छोट्याछोट्या कारणांवरुन भांडण करतो. प्रसंगी जीवही घेऊन टाकतो.”

“अच्छा, असं आहे म्हणायचं.” तेजोमयी म्हणाली.

“त्यात काही चूक आहे का बाबा?” गोर्जीने बाबांना विचारलं.

“नाही.”

“आजच्या दिवशी, अशा नरकासुरांचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला पाहिजे.”

“बरोबर.”

“कळतं पण वळत नाही.”

“म्हणजे?”

“आता हेच बघा, तुमच्या इमारतीच्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारा नाला वाहतो. पण तुम्ही लोकांनी कचरा टाकून टाकून त्याला बुजवून टाकला. सांडपाणी वाहून जायला आता वाटच नाही उरली. गटारं तुंबू लागली. कुठेही पचापचा थुंकता. घरातल्या कुंड्यांमधलं साचलेलं पाणी फेकत नाही.  या सगळयांमुळे मच्छरांची पैदास होते. ते चावतात. मग तुम्हाला डेंग्यू होतो. हे सगळे त्या नरकासुराचेच प्रताप!”

“खरं की खोट?”

“खरं.”

“पण, मनुष्यप्राण्याचं येरे माझ्या मागल्या. असे कितीतरी नरकासूर अवतीभवती दडून बसले आहेत. तुम्ही झाडांची कत्तल करता. जंगलावर अतिक्रमण करता. वेगवेगळ्या प्रकारचं प्रदुषण वाढवता. पर्यावरणाचा नाश करता. त्यामुळे पृथ्वीचं तपमान वाढत चाललय. त्याचा फटका तुम्हाला तर बसतोच, पण वन्यप्राणी, पक्षी, जलचर या बिचाऱ्यांचा काहीही दोष नसताना त्यांनांही बसतो.”

“बापरे बाप! नरकासुराचा मोठाच म्हणायचा ताप!”

“पण, मनुष्यप्राण्यास येत नाहीना संताप! म्हणून सुरुच आहेत नरकासुराचे प्रताप! त्याला लावला पाहिजे चाप!”

“तो कसा?”

“त्याचसाठी दरवर्षी नरकचतुर्थी येतेना. या दिवसाच्या निमित्त भगवान कृष्ण तुम्हाला स्मरण करुन देतो की, बाबांनो, माझ्याकाळात मी नरकासुराचा वध केला, आताच्या काळात तुम्हीच कृष्ण व्हा नि तुमच्या अवतीभवतीच्या नरकासुराला दाखवा की चांगला इंगा. प्रत्येकानं जर ठरवलं, तर वेगवेगळया नरसुकारांना ठेचून काढणं अजिबात अशक्य नाही.”

गोर्जी पोटतिडकीने म्हणाली. बाबांनी तिला आपल्या जवळ बोलावलं. तिचं आभार मानत म्हणाले,

“गोर्जे, तू खरंच आमचे डोळे उघडलेस. आपले सण हे केवळ साजरे करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी, नवनवीन कपडे घालून मिरवण्यासाठी नसतात, तर त्यातून आपल्या हिताचा धडा आपल्याला शिकता येतो.”

“बरोबर आहे बाबा, किमान आपण आपल्यापुरतं तरी कृष्ण होऊन, छोट्याछोट्या नरकासुरांचा नायनाट केला पाहिजे.” तेजोमयी म्हणाली.

आई चटदिशी बाहेर गेली. लिफ्टजवळच्या पॅसेजमध्ये काल रात्री ठेवलेले कचऱ्याचे भांडे आत आणले. त्यातला ओला कचरा नि सुका कचरा तिने काळजीपूर्वक बाजूला केला. दोन वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये तो भरला. दोन्ही कचरा एकत्र करुन, आजपर्यंत करत असलेली चूक दुरुस्त केली. बाबांनीं सिगारेटचे पाकीट सुक्या कचऱ्यात टाकले. तेजोमयीने टॅबमधील सगळे गेम डिलिट करुन टाकले.

“अलेक्झू, आज खऱ्या अर्थानं नरकचतुर्थी साजरी झाली बघ.”गोर्जी त्याच्याकडे बघून टाळ्या वाजवत म्हणाली. अलेक्झांडरने आनंदाने आईला मिठी मारली.

सुरेश वांदिले