मच्छर साम्राज्याचे सम्राट मच्छरसिंह डंखेश्वर यांचा आनंद गगणात मावेना. या आनंदात त्यांनी हवेत किमान एक हजार वेळा नृत्य करुन घेतलं. ते नाचाताहेत बघून राणीसरकारही त्यात सामील झाल्या. ते बघून दीड-दोन लाख राजकुमार आणि राजकुमारी यांनी ‘के-पॉप’ नृत्यावर ताल धरला. राजमहालातील या नृत्यमैफिलीची बातमी सर्वत्र पसरली. नागरिकांनी ताडलं की काहीतरी भारी घडलय.
नागरिकांची फौज सम्राटांच्या महालाजवळ गोळा झाली. सम्राटांना याची खबर देण्यात आली. नाचतच नागरिकांसमोर येऊन, ‘तुम्ही पण नाचा’, असा सम्राटांनी आदेश दिला.
प्रजेतून कुणाचा तरी आवाज आला, “पण, महाराज इतक्या आनंदाचं काय कारण?”
“प्रजाजनहो, कारण सांगतोच. पण आधी आपण देवाकडे जायचं. त्याचे आभार माणण्यासाठी.”
“कशासाठी महाराज?” पुन्हा गर्दीतून आवाज आला.
“देवाकडे गेल्यावर कळेलच तुम्हाला. चला तर आता नाचत, देवाच्या महालात.” सम्राट म्हणाले नि ते देवाच्या महालाकडे कूच केली. सगळी प्रजा त्यांच्या पाठिमागे होती.
देवाच्या गुप्तहेराने देवाकडे निरोप पाठवला. “कोट्यवधी मच्छर फौज आपल्या महालाच्या दिशेने निघालीय देवा. काहीतरी भयंकर घडू शकतं. सावध व्हा.”
“अरे, मच्छरांना काय भ्यायचं. ते काही करणार नाहीत. काळजी करु नकोस.” देवाने गुप्तहेराला समजावलं. या फौजेने आपल्यावर आक्रमण केलं तर आपला निभाव लागणार नाही याची भीती वाटून त्याने तिथून पोबारा केला.
काही वेळात मच्छरसिंह देवाच्या महाली पोहचले. ते महालात शिरणार तोच देवच बाहेर आले. सम्राटांनी त्यांचा जयजयकार केला. प्रजेनेही त्यात सूर मिसळवला.
“सम्राटा, कशी काय आठवण झाली आज आमची? आम्हाला पळवून नेण्यासाठी इतकी फौज घेऊन आलात की काय?” देव हसून म्हणाले.
“अहो देवा, हे काय भलतच. माझी काय टाप, तुमच्यावर वक्रदृष्टी करण्याची.”
“मग, आज इथे असे अचानक?”
“देवा, तुमचे आभार माणायला आलो.”
“कशासाठी?”
“देवा, तो मनुष्यप्राणी …”
“त्याने तुमच्याशी मैत्री केली की तुम्ही त्याच्याशी.”
“तसे नाही देवा. या मनुष्यप्राण्याला आमच्यापेक्षा अधिकची बुध्दी तुम्ही दिली. त्याचा इतका चांगला उपयोग करतोय ना की ज्याचे नाव ते.”
“काय केलं या मनुष्यप्राण्याने?”
“देवा, त्याने सारखी जंगलतोड चालवलीय. वृक्ष जमीनदोस्त होताहेत. त्यामुळे वनातल्या प्राणी-पक्षांची संख्या घटलीय.”
“ही कशी काय आनंदाची गोष्ट? नि त्यासाठी तुम्ही माझे आभार माणता?”
“देवा, वनातील प्राण्यांची संख्या घटल्याने तिथे हा मनुष्यप्राणी राहायला लागलाय. म्हणजे आमची मज्जा! त्यासाठी आभार.”
“हे काय भलतच?”
“देवा, आमचं आवडतं पेय म्हणजे प्राण्यांचं रक्त. त्यातही मनुष्यप्राण्याचं रक्त सगळ्यात ‘द बेस्ट’. तुमच्या अमृतासारखं. पण वनात इतर प्राण्यांचं रक्त नाइलाजानच प्यावं लागायचं आम्हाला. आता मनुष्यप्राण्याला तुम्ही बुध्दी दिल्याने त्याने वनावरुन वरंवटा फिरवायला सुरुवात केलीय. तिथे स्वत: राहायला आला. त्यांची संख्या वाढली. आमच्यासाठी तर ही सुवर्णसंधीच. आता आम्ही मनुष्यप्राण्याचे ‘घोटभर नाही तर पोटभर’ रक्तपेय प्राशन करु शकतो.” मच्छरसिंह नाचत म्हणाले. सगळ्या प्रजेलाही त्यांच्या आनंदाचं कारण कळलं. ते मोठ्याने जल्लोश करु लागले. त्या गोंगाटाने देवाचे डोके भणानले. जोरात ओरडून सगळ्यांना शांत बसायला सांगितलं.
“सम्राटा, वेड्यासारखं बरळू नका. हे तुम्हाला सांगितलं कुणी?”
“देवा, आजच पहाटे ब्राझील देशातल्या माझ्या भावाने मला कळवलय, की तेथे युनिव्हर्सिटी ऑफ रिओ द जनेरो आणि ओस्वाल्डो क्रूझ इंस्टिट्यूट आहे.”
“त्यांनी काय केलं?”
“देवा, एका राखीव वनात मनुष्यप्राण्याने अतिक्रमण केल्यानं फक्त ३० टक्केच भाग शिल्लक राहिलाय. बरेच वन्यप्राणी नष्ट झाले. काही निघून गेले. या विद्यापीठाच्या संशोधकांनी या भागातल्या आमच्या मच्छर बांधवांच्या अन्नस्त्रोताचा शोध घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ८५ टक्के रक्त मनुष्यप्राण्याचं होतं. आहे की नाही मज्जा!”
“सम्राटा, तुमची मज्जा असली तरी मनुष्यप्राण्याला सजाच नाही का?”
“पण देवा, वनावर आक्रमण करा, प्राण्यांना हाकलून द्या, अशी विनंती मनुष्यप्राण्याला करायला आम्ही गेलो नाहीना. त्यांचीच बुध्दी अशी तेज चालते. ही तेज बुध्दी त्याला दिल्याबध्दल तुमचे किती आभार माणायचे? ही त्याची बुध्दी आणखी धारधार व्हावी नि या मनुष्यप्राण्याने आणखी जंगलाचा विनाश करुन तिथे राहायला जावे, अशी आमची इच्छा आहे.” मच्छरसिंग म्हणाले. त्यांची इच्छा ऐकून देवाने डोळे बंद केले. देवाची ही कृती म्हणजे, त्याचा आशीर्वाद असल्याचं समजून सम्राट आणि प्रजाजनांनी देवाचा जयजयकार केला.