(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 आतिथ्यसेवेची उंच भरारी

कोरोनोत्तर काळात आतिथ्य सेवा क्षेत्राने (हॉस्पिटॅलिटी) उंचच उडी घेतली आहे. आता कसलाही धोका अथवा संकट नाही, याची जवळपास खात्री पटल्याने जगभरातील पर्यटक भ्रंमतीला निघाले आहे. या सर्वांना उत्तम दर्जाच्या आतिथ्य सेवेची गरज भासते. ही गरज याक्षेत्रात असणारी पंचतारांकित हॉटेल्स, निवासगृहे, रिसॉर्टस, अतिथीगृह आदी  भागवत असतात.उत्तम निवासासोबतच उत्कृष्ट खानपानालाही प्राथमिकता दिली जाते. याबाबींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज भागवण्याचे काम, नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट ही वर्षानुवर्षे भागवीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका,पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन, हा महत्वाचा अभ्यासक्रम आहे.तो जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. आतापावेतो या संस्थेने १ लाख हजार उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर हॉटेल आणि तत्सम व्यवसायामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात होते.

उमेदवाराची आवड आणि तज्ज्ञता लक्षात घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये फ्रंट ऑफिस, फूड प्रॉडक्शन, फूड ॲण्ड बिव्हरेजेस सर्व्हिस याक्षेत्रातही संधी मिळू शकते. याशिवाय ही पदवी प्राप्त उमेदवारांना टूर मॅनेजर, रिटेल मॅनेजर, ह्युमन रिसोर्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर अशा संधीसुध्दा मिळू शकतात.

या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे.नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षात प्रगत शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.अशा विद्यार्थ्यांना ऑनर्स ही पदवी दिली जाते.

 निवड प्रकिया

 या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ७५ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यामध्ये २१ संस्था या केंद्रीय अर्थसहाय्यित आहेत. २८ राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत, १ सार्वजनिक क्षेत्रातील आहे आणि २५ खाजगी संस्था आहेत. देशातील विविध भागात असणाऱ्या ९ फूड क्रॉफ्ट संस्था, हॉटेल उद्योगातील वेगवेगळया कार्यासाठी आवश्यक असणारे स्पेशलाइज्ड डिप्लोमा अभ्यासक्रम चालवतात. तिथेसुध्दा या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. ११ हजारपेक्षा अधिक जागा या परीक्षेद्वारे भरल्या जातात. (महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या मुंबई स्थित इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेत ४५६ आणि सेंट फ्रँसिस इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या खाजगी संस्थेत ६० जागा आहेत.)

अभ्यासक्रमाची संरचना

   उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

अन्नपदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ व पेये सेवा, हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध करुन दिले जाते. हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), अन्नसुरक्षा व गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्यूहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य या बाबीही शिकवल्या जातात.

अशी  असते परीक्षा

 या परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ट व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात – इंग्रजी भाषा (६०गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (३० गुण), कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता (३० गुण), एकूण गुण २००. याचा अर्थ एका प्रश्नाला एक गुण. पेपरचा कालावधी- तीन तास. प्रश्न पत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असते. त्यामुळे प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल तर हिंदीत वाचून अर्थ काढता येतो. त्याचा फायदा  सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल, याविषयाचे प्रश्न सोडवताना होऊ शकतो.

 असे मिळतात गुण

   इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल, कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता या विषयातील अचुक उत्तरांसाठी १ गुण दिला जातो. उत्तर चुकल्यास ०.२५ टक्के गुण कापले जातात. सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल  या विषयाचे गुण देताना संपूर्ण अचुक उत्तरासाठी एक गुण, त्यापेक्षा कमी अचुक उत्तरासाठी ०.७५ गुण, त्यापेक्षा कमी अचुक उत्तरासाठी ०.५० गुण अशा श्रेणिने गुण दिले जातात. चूक उत्तरासाठी ०.२५ गुण कपात केले जातात.

 अभ्यास कसा कराल?

   या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा सर्वसाधारण स्वरुपाचा आहे. शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा किंवा नॅशनल टॅलेन्ट सर्च एक्झामिनेशसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम जवळपास असाच असतो. (सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल हा विषय सोडून) १० वी  आणि १२ वीचे इंग्रजी व गणिताचा पाया मजबूत किंवा बऱ्यापैकी असेल तर इंग्रजी भाषा,संख्यात्मक क्षमता, विश्लेषणात्मक कल, कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता या विषयांशी संबंधित प्रश्न सोडवणे सोपे जाऊ शकते. या तीन विषयांचे एकूण गुण होतात १२०. या तीनही विषयात अधिक गुण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या दृष्टिने थोडे कठीण असणारे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल, या विषयात थोडे इकडे तिकडे झाले तरी चालू शकते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास दैनंदिन वृत्तपत्रे किंवा भारत वार्षिकी यासारखे नियतकालिक यांच्या नियमित वाचनाने होऊ शकतो. काही खाजगी प्रकाशकांनी या परीक्षेसाठी माहिती पुस्तके तयार केली आहेत. ती अजिबात परिपूर्ण नाहीत. मात्र अभ्यास कशा पध्दतीने करावा, प्रश्नांचे स्वरुप याचे आकलन होण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो. अशी पुस्तके संदर्भ म्हणून वापरावी.सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील भागात,अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती किंवा कादंबरी या ग्रंथाचा लेखक कोण, अशा सारखे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या दोन्ही भागांची भीती बाळगण्याची गरज नाही.

यंदा ही परीक्षा १४ मे २०२३ रोजी  परीक्षा देशातील १०९ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे,कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई/नवी मुंबई शहरांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ ही आहे. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित केला जातो.

  अर्हता- या अभ्यासक्रमास कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मात्र या उमेदवाराने १२ वीला इंग्रजी विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणतीही वयोमर्यादा नाही. या अभ्यासक्रमास जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने मान्यता प्रदान केली आहे.याच विद्यापीठामार्फत पदवी प्रदान केली जाते.

अर्थसाहाय्य

 केंद्रीय संस्थांमध्ये मेरिट कम मिन्स ही योजना लागू असून त्याअंतर्गत प्रत्येक सत्रातील शुल्काची ५० टक्के  रक्कम परत दिली जाते. प्रत्येक वर्षातील दोन्ही सत्र समाप्तीनंतर होणाऱ्या अखिल भारतीय वार्षिक परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाच्या उमेदवारांना हॉटेल उद्योजकांच्या सहकार्याने गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या राज्यातील शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती मिळू शकते.

शिष्यवृत्तीया संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मेरिटवर आधारित शिष्यवृत्ती  दिली जाते. अखिल भारतीय स्तरावरची ही शिष्यवृत्ती असून प्रत्येक सत्राच्या गुणांवर आधारित पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते. संस्थेत प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

संपर्क 

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, ३४, सेक्टर ६२, नॉयडा-२०१३०९, दूरध्वनी-०१२०-२५९०६०३, फॅक्स-२५९६०८, ईमेल-jeenchm@gmail.com, संकेतस्थळ-www.nchm.nic.in आणि ईमेल-nchm@nta.ac.in, संकेतस्थळ- www.nchmjee.nta.nic.in

सुरेश वांदिले