आनंदाचे डोही शेरलीन..
आनंदी आनंद गडे,इकडे तिकडे चोहिकडे, असं बालकविंनी लिहून ठेवलं आहे.बघाल तिकडे आनंदी आनंद,असं त्यांना सांगावयाचं असलं पाहिजे.कदाचित त्यामुळेच जो तो त्याला हव्या त्या पध्दतीनं आनंद मनवित असला पाहिजे.
असं असलं तरी,आनंद म्हणजे नेमकं काय हे मात्र अद्याप कुणालाही स्वयंस्पष्ट करता आलेलं नाही.आनंदाची व्याख्या करण्यात जगातील अनंत धर्मगुरु,संत महात्मे,बाबा,बापू,अमुकाचार्य किंवा तमुकाचार्य यांचा अनंत वर्षांचा कालावधी लोटूनही शास्वत व्याखा काही कुणाला गवसली नाही.या अनंतकाळाच्या अभ्यास,चिंतन आणि मननातून मात्र आनंदाचे दु:ख किंवा दु:खातील आनंद असं काहीस अनाकलनीय मंथन मात्र या मंडळींनी करुन ठेवलय.थोडक्यात काय तर,ज्यानं त्यानं स्वत:चा आनंद स्वत:च ठरवायचा ही सोय मात्र यामुळे मिळाली.
या सोयीचा पुरेपूर फायदा जगातील सगळयाच देशातील बोल्ड रंगमाधवी घेत असतात.या रंगमाधवींचा कॉमन फंडा हा मिनिमम टू मिनिमम वस्त्रप्रावरांना आपल्या देहावर स्थानापन्न करणं,असा असतो.असं करताना आपण या वस्त्रपावरांवर उपकार करतोय असं त्यांना वाटत राहतं.त्यामुळे त्या मिनिममच्या पलिकडे जाण्यासाठी विरहणीसारख्या व्याकूळ झाल्या असतात.ही व्याकुळतेची प्यास बुझाने के लिए त्या संधीच शोधत असतात.किंवा अशा रंगमाधवींकडे संधी स्व:ता धावत येतात.अशीच एक संधी सांप्रतकाळी भारतदेशी मुंबईनगरी वास्तव्य करुन असणाऱ्या रंगमाधवी शेरलीन चोप्रांकडे आली.
मिनिमम टू मिनिमम वस्त्रप्रावरणांमध्ये शेरलीन या कायम दुसऱ्या रंगमाधवी मल्लीका शेरावत आणि तिसऱ्या रंगमाधवी पूनम पांडे यांच्याशी दावा ठोकून असतात.म्हणजे असं की ,मिनिममची हिम्मत केवळ आपल्यातच असल्याचं शेरलीन सांगून थांबत नाही तर ते सिध्द करण्यासाठी सर्व सोशल मिडियाचा उपयोगही करतात.शेरलीन यांचं मिनिमम वस्त्रातलं दर्शन झाल्याबरोबर त्या दोन्ही रंगमाधवी फिदीफिदी हसून पुढची स्टेप गाठणारी आपली छबी झळकवतात नि आनंदी आनंद गडे करतात.
पण,मिनीमम म्हणजे किती मिनिमम करणार ना.शेरलीन यांनी बराच विचार केला आणि प्लेबॉय या पुरुषांच्या खरे तर बायकांच्याच लाडक्या मासिकाचे मालक,संपादक, प्रकाशक श्रीयुत ह्यूज हेफनर यांच्याकडे आपली कैफियत नोंदवली.
श्रीयूत हेफनर हे सध्या वय वर्षं 80चा उंबरठा ओलांडलेले खापरपणजोबा असले तरी त्यांना स्व:ताला 16व्या वर्षातच असल्यासारखं वाटतं.त्यामुळे शेरलीन सारख्या रंगमाधवींच्या मिनिममपेक्षा पुढे जाण्याची इच्छा त्यांच्याकडे जेव्हा प्रकट होते,तेव्हा श्रीयुत हेफनर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात.त्या आनंदातच ते शेरलीन सारख्या रंगमाधवींना आपल्या प्ले बॉय मॅन्सन म्हणजे महालसदृष्य बंगल्यात बोलवतात.आणि कर बाई तुझी मिनिममपेक्षा पुढची स्टेप गाठण्याची इच्छापूर्ती,असं जॉयफुली सांगतात.
शेरलीन यांनासुध्दा श्रीयूत हेफनर यांनी नुकतीच अशी संधी दिल्यानं त्यांना आनंदाचा ओव्हर डोज मिळाला. प्ले बॉय मॅन्शन मध्ये त्यांनी आपल्या देहावरील श्रीशिल्लक वस्त्रांना तिलांजली दिली.तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वर गगनात आणि खाली सागरात मावेना.हा आनंद दोन पदरी होता,एक तर मल्लीका आणि पूनम यादोघींची कशी जिरवली याचा आणि दुसरा प्ले बॉयच्या कव्हर आणि सेंटरस्प्रेडवर मुक्तपणे विराजमान होण्याची संधी मिळवलेली पहिली इंडियन रंगमाधवी होण्याचा.
फर्स्ट इंडियन होण्याचा मान म्हणजे किती मोठा सन्मान नाही का?एव्हरेस्टवर चढणारा पहिला इंडियन,10हजार धावा काढणारा पहिला इंडियन,बूकर प्राईज मिळवणारा पहिला इंडियन,अवकाशयानात जाणारा पहिला इंडियन,ऑक्सर मिळवणारा पहिला इंडियन.तसं प्लेबॉय मासिकाच्याच्या कव्हरवर विवस्त्र झळकणारी पहिली इंडियन.काय ग्रेट पराक्रम नाही का..देशातील ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्वाचं बिरुद मिरवण्याऱ्या काही मासिकांनी सुध्दा शेरलीनचं याबद्दल फर्स्ट इंडियन टू ऍ़चिव्ह धिस फिट,म्हणजे असा गौरव प्राप्त करणारी पहिली भारतीय असा आनंददायक उल्लेख करणं सुरु केलय.यामुळे शेरलीन या अत्यानंदाने फुलून गेल्या आहेत.
मित्रहो, आपण सुध्दा हा एैतिहासिक पराक्रम गाजवल्याबद्दल शेरलीन यांना भारतरत्न देण्याची मागणी आनंदाने करु या की..