आनंद घेऊ या की…
रेश्माच्या आवडीनिवडी वेगळया होत्या. छंद वेगळे होते. कोणत्याही भाषेतील गाणं ऐकणं, हा तिचा छंद होता. तामीळ , मल्याळम इतकच नव्हे तर तेलगु गाणीही ती ऐकायची. टीव्हीवरील सर्व भाषेतील गाण्याची चॅनेल्स तिने शोधून काढली आणि त्यांचा गुच्छ तिने केला. वेळ मिळाला की या चॅनेल्सवरील गाणं ती तास दोनतास ऐकत बसायची. न कळणारी गाणं ऐकून तिला अजिबातच कंटाळा येत नसे. ही गाणी सुरु असताना ती इतकी तन्मय होऊ जाई की जणू सारं काही तिला कळलय. ती त्यातली फार दर्दी रसिक आहे.
इतर मुलं टीव्हीवरच्या मालिका, सिनेमा, कार्टून्स बघत असताना ही मात्र फक्त गाणच ऐकत बसते, याचं तिचा आईला कसंतरीच वाटायचं. रेश्मा वेडी तर नाहीना असंही तिने एकदा रेश्माच्या बाबांना बोलून दाखवलं होतं. बाबांनी ते हसण्यावरी नेलं. बघा एक दिवस लेक हातची जाईल, असं सांगायला आई विसरली नव्हती.
000
बाबांना रेश्माचं कोणत्याही भाषेतील गाणी ऐकण्याचा छंद फार आवडला होता. त्यामुळे त्यांनी तिला एक पोर्टेबल रेडियो घेऊन दिला. यावर केवळ गाण्यांची चॅनेल्स होती. सगळ्या भारतीय भाषा आणि जगातील इतर अनेक भाषातील गाण्यांची चॅनेल्स असलेला हा रेडियो बघून रेश्मा हरखून गेली. आनंदून गेली. बाबांना आपल्या मनातलं नेमकं कळतं. आईला कां बरं कळत नसावं ,असं ती मनातल्या मनात म्हणाली सुध्दा. याप्रश्नाचं उत्तर सध्या मिळणार नसल्याचं तिला ठाऊक असल्यानं ती खुदकन हसली. हा प्रश्न अलगद तिने मनाच्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवला.
नव्या नवलाईनं ती रेडियोच्या चॅनेल्साचा शोध घेऊ लागली. कोणत्या चॅनेलवर कोणत्या भाषेची गाणी लागतात. याची तिने एक यादी तयार केली. गाण्यांच्या कार्यक्रमाची नोटबूकवर नोंद केली. तिच्या लक्षात आलं की या चॅनेल्सवर केवळ कशीही गाणी लावली जात नाहीत. विषय, प्रसंग, घटना यानुरुप अनेक गाणी लावली जातात. त्याला कधी एखाद्या कथेचे, कधी एखद्या रुपकाचे स्वरुप दिले जाते तर कधी संभाषण समृध्द होण्यासाठीही गाण्यांची गुंफन केली जाते.
गाण्यांची निर्मिती प्रक्रिया कशी असते, संगीत कसं सुचतं, सुरावटी कशा मिळवल्या जातात, वाद्येमळांचा उपयोग कसा केला जातो, संगीतासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो, विविध राग, आलाप, त्यांचा संगीतातला वापर, संगीताचं फ्युजन रुप, शुध्द रुप, शास्त्रोक्त रुप काय असतं, लोकसंगीताचा आधुनिक संगीतावर कसा परिणाम होतो, अनेक भाषातील लोकसंगीत बरेचदा कसं समसमान असतं, अशा कितीतरी बाबींवर आधारित कार्यक्रम या चॅनेल्सवर होत. काही चॅनेल्सवर संगीताची शिकवणीही चाले.
विविध भाषा आणि त्यातील गाणी,गाण्यात गुंफलेले विषय,संगीत साधना.रेडियोवरील अशा कार्यक्रमांमुळे फुलण्याचं,आनंदाचं आणि बहरण्याचं आकाशच रेश्माला गवसलं होतं.
मराठी – हिंदीगाण्यांपेक्षा ती हळू–हळू इतर भाषांतील गाणीच अधिक ऐकायला लागली. याची फार चिड आईला यायची. हिला नक्कीच वेड लागलय अशी तिची पक्की समजूत झाली होती.
एके रविवारी कितीतरी वेळ रेश्मा इंग्रजीच गाणी ऐकत असल्याचं आईनं बघितलं. आईला हे अजिबातच आवडलं नाही. तिने चार–पाच वेळेला रेश्माला टोकलही. पण इंग्रजी गाण्यांची रेश्माची समाधी काही भंग होईना. त्यामुळे आईच्या तळपायाची आग मस्तकातच गेली.
ती ताडताड रेश्माच्या खोलीत गेली. तिने रेश्माच्या हातातील रेडिओ हिसकावून घेतला.रेडिओला ती दाणकन आदळणार तोच तिने स्वत:ला सावरले. रेडियो फुटता फुटता वाचला. आईच्या त्या रौद्ररुपाने थरथर कापणाऱ्या रेश्माला त्या परिस्थितीतही हायसे वाटले. तिने मनातल्या मनात देवाचे आभार माणले.
अग, बघत काय बसलीस निर्लज्जासारखी. अभ्यास करायचं सोडून हे इईवुईआवटॉचॉव काय ऐकतेस आँ. याने तुझे पोट भरणार आहे का..आली मोठी आली मोठी मॅडोना–फॅडोना बनायला. असं ती रागारागाने बोलून गेली. रेश्माने आईचे ते रुप बघून खाली मान घातली. कोणत्याही क्षणी तिला रडू कोसळले असते. पण आणखी दोनचार वाक्य बोलून आणि तिच्या गाणं ऐकण्याचा छंदाचा उद्धार करुन आई दुसऱ्या खोलित निघून गेली. रेश्माने दीर्घ श्वास घेतला. किती तरी वेळ ती तशीच बसून राहिली.
तिला आता रेडिओला हात लावण्याची हिंमत होईना. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा इंग्रजी गाण्याचे चॅनेल लावले. आईच्या कानावर ते इंवाचुव्याआऊ अशा ढंगातले इंग्रजी स्वर कानी पडताच ती तडक रेश्माच्या खोलीत आली. तिने तिचा हात पकडला .ओढतच बाबांकडे नेलं.
बघा बघा लेकिचे प्रताप. काल मी इतकं जीव तोडून सांगितलं. रागावले. पण बाईसाहेबांना मॅडोना–फॅडोनाच व्हायचं आहे ना. वाया गेली हो, वाया गेली . तरी मी तुम्हाला सावध केलं होतं. पण नाही. उलट तिला वेड लागणार हे नवं यंत्र आणून दिलतं. आई रागारागाने रेडियोकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाली.
अगं, तू जरा शांत हो आधी. इंग्रजी गाणी ऐकल्यानं मॅडोना फॅडोनाच नव्हे तर ब्रिटनी – फ्रिटनी, मिली–फिली सायरस, सेलेना – फेलेना, कॅटीपॅटी पॅरी पण होता येईल. एकिचच काय उदाहरण देतेस.
बरं बरं तुमचं ज्ञानामृत तुमच्याजवळच ठेवा. मला देऊ नका ते. मुलगी कशी वाया गेली आधी ते बघा. आई फणकाऱ्याने म्हणाली.तिचा राग काही शांत होईना.
हे बघ, असं गाणी ऐकल्यानं कुणी वाया जात नाही. हे पक्क लक्षात ठेव. आपली मुलगी तर नक्कीच नाही.आपण तिच्यावर विश्वास ठेवणार नाही तर ते ओबामा ठेवतील का? बाबा वातावरणातील गंभीरपणा कमी करण्यासाठी किंचितसा विनोद करीत म्हणाले.
हँ S असं फक्त फणकऱ्यांन आई म्हणाली. आपला विनोद तिला कळला नाही हे बाबांच्या लक्षात आलं .तिला समजावत ते म्हणाले
अगं ऐकू दे ना तिला वेगवेगळया भाषेतील गाणी . याचा कां त्रास करुन घेतेस तू. भाषा कळली नाही तरी संगीत वेगळं असतं. चाली वेगळया असतात. त्यात नावीण्य असतं. इंग्रजी गाणी तर भन्नाटच असतात . ती गाणी थोडीफार कळतातही . आपल्या आंनदाच्या कक्षा विस्तारायच्या की तशाच डबक्यात ठेवायच्या? आतापासूनच रेश्माला वेगवेगळया संगीताचा आनंद घ्यायचा असेल तर घेऊ दे ना. तू कशाला मध्ये मध्ये करतेस. तुही ते संगीत ऐक. तुलाही डान्स बिन्स करावा वाटेल. बाबा हसत हसत म्हणाले.
000
बाबांचं बोलणं काही आईला पटलं नाही. तिची सारखी भूनभून सुरुच असायची. मात्र रेश्मानं आपलं गाणं ऐकणं काही सोडलं नाही. या छंदातून तिला नंतर नंतर काही गाणी आणि चालीही सुचू लागल्या. शाळेच्या गॅदरिंगमध्ये तिने असंच एक स्व लिखित आणि स्वरचित इंग्रजी गाणं गाऊन दाखवलं. मुख्यपाहुण्यांनी तिचं खूप कौतुक केलं. शिक्षकांनी कौतुक केलं. रेश्माला गाण्यातलं फार कळतय असं सर्व शाळेत झालं.
एकदा तिच्या शाळेच्या हेडमास्तर घरी आल्या. त्यांनी रेश्माच्या या कलेचं मुक्तपणे आईबाबांसमोर कौतुक केलं.
हिला गाण्यातलच करियर करु द्या. हिचा कल आताच स्वयंस्पष्टपणे दिसतोय. सचिन तेंडुलकरच्या बाबांना लहानपणीच त्याचा क्रिकेटमधला कल कळला होता. त्यांनी त्याला त्यासाठीच सतत प्रोत्साहन दिलं. रेश्मालाही प्रोत्साहन द्या. संगीत किंवा गाणी शिकवणाऱ्या चांगल्या शाळेत , संस्थेत तिचं नाव दाखल करा. या शिक्षासाठी परदेशात पाठवायचं असेल आमची शैक्षणिक संस्था संपूर्ण खर्च करेल.
हेडमास्तरांनी रेश्माचं केलेलं कौतुक ऐकून बाबांचा उर भरुन आला. आईला काय बोलावं नि काय बोलू नये असं झालं.
मॅडोना–फिडोना होण्यातही गंमत–जंमत असते हे आता तरी आईला कळू दे रे बाप्पा, असं रेश्माला मनोमन म्हणाली.
000
सुरेश वांदिले,
वाय एक/पंधरा,शासकीय वसाहत ,वांद्रे पूर्व मुंबई– 51
9324973947
