बघताबघता दिवाळी आली आणि गेलीसुध्दा. दिवाळीच्या पाच दिवसात तेजोमयीच्या घरी निव्वळ धमाल होती. आईने बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थ्यांची मेजवाणी, गप्पा, पत्ते, टीव्हीवरचे कार्यक्रम, नव्या कपड्यात सजणं, असा सगळाच आनंदीआनंद!
भाऊबिजेच्या दिवशी, आईबाबांसोबत तेजोमयी एका अनाथालयात जाऊन आली. आईने सगळ्या मुलामुलींना फराळ दिला. बाबांनी कपडे दिले. मुलं-मुली आनंदून गेली. त्यांनी आईबाबा आणि तेजोमयी भोवती फेर धरला. तेजोमयी सुखावून गेली.
अशी दिवाळी संपूच नये, असं तेजोमयीला दरवर्षीप्रमाणे यंदाही वाटलं. पण, ते तिच्या हातात थोडचं होतं? ती उदास झाली. पुढील एक-दोन दिवस तिचं कशातच लक्ष लागेना. अलेक्सा गोर्जीच्या हे लक्षात न येतं तर नवल? आई-बाबा आसपास नसताना हळूच तिने तेजोमयीला याबद्दल विचारलं. तेजोमयीनं तिच्या मनातलं, गोर्जीला सांगून टाकलं.
“हे असं आहे म्हणायचं.” गोर्जी उत्तरली.
“हो ना? काय करावं ते कळत नाही.” तेजोमयी म्हणाली.
आता काय करावं बरं? गोर्जी विचार करु लागली. विचार करताकरता तिला एक कल्पना सुचली. तिने आनंदून टाळीसाठी आपला हात तेजोमयीकडे नेला.
“काय गं, हे कशासाठी?”
“दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी मला एक कल्पना सुचलीय.”
“अरे वा, दिवाळीचे दिवस वाढणार की काय? तेजोमयीनं उत्सुकतेनं विचारलं.
“तसं नाही.”
“मग?”
गोर्जीने तेजोमयीला तिची कल्पना सांगितली. तेजोमयीला खूप आनंद झाला.
००००
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आल्यावर तेजोमयीने गोर्जीची कल्पना बाबांना सांगितली. त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. आईला ही कल्पना फारसी रुचली नाही.
“चारच दिवसांपूर्वी फराळ नि नवे कपडे त्यांना दिले होते. तेव्हढं खूप झालं. आता, हे नवं खुळ नको.” तिने स्पष्टपणे सांगितलं. “गोर्जीला काही कळत नाही. तिच्या नादी लागू नकोस,” हे तेजोमयीस सांगायलाही आई विसरली नाही. तेजोमयी आणखी उदास झाली. आता बाबांना कसं समजवायचं हा प्रश्न तिला पडला.
“डोण्ट वरी. मीच समजावण्याचा प्रयत्न करते.” गोर्जीने तेजोमयीस दिलासा दिला.
रात्री जेवणासाठी सगळे एकत्र आले असताना, गोर्जीने बाबांना विचारलं,
“बाबा, आनंद किती प्रकारचे असतात?”
“ए बाई, आता नवं ज्ञानामृत पाजू नकोस.”आई गरजली.
“असे काही प्रकार असतात का हो बाबा?”तेजोमयीनं विचारलं.
“असू शकतात.” बाबा पुटपुटले.
“असू शकतात नाही, असतातच.” गोर्जीने मुद्दा पुढे रेटला.
बाबा काही बोलण्याच्या आधीच आईने विचारलं,
“शहाणे, मग तूच सांगना.”
“आई, एक आनंद असतो तात्पुरता तर दुसरा आनंद असतो खूप काळ टिकणारा.”
“तुला काय म्हणायचय?”बाबांनी विचारलं.
“बाबा, दिवाळीतील फराळ, नवे कपडे, आकाश कंदिल हे तात्पुरते आनंद देतात.”
“मग, बराच काळ टिकणारा आनंद कोणता?”
“बाबा, तुम्हाला माझं सांगणं आगावूपणाचं वाटेल. पण मी काय म्हणते, ते आधी जरा ऐकून घ्या नि मग काय ते ठरवा.”
“बोला बोला.”
“चार दिवसांपूर्वी आपण अनाथालयात गेलो होतो. तिथे मुला-मुलींना नवे कपडे नि फराळ दिला. त्यांना झालेला आनंद तुम्ही बघितलात. पण, हा आनंद तेवढ्यापुरताच नव्हता का?”
“मग, आता काय करायला हवं?”
“त्याचीच कल्पना गोर्जीला सुचलीय.”
“म्हणजे, पुन्हा एक आगावूपणा का?”
“आई, तिचं म्हणणं ऐकून तर घे,”तेजोमयीने आईला विनंती केली.
गोर्जी सांगू लागली,
“त्या अनाथालयातल्या मुलांना तुम्ही जर वेगवेवगळे कुमार/बाल दिवाळी अंक सम्रेप भेट दिले तर, या अकांच्या वाचनाचा आनंद त्यांना पुढील कित्येक दिवस घेता येईल. छान छान गोष्टी, कविता, लेख, विनोद, शब्दकोडे यामुळे ते खूप खूष होतील.” गोर्जीने एका दमात सांगून टाकलं.
“खरंच, कित्ती छान कल्पना. गोर्जे, उगाच मी तुला नाही नाही ते बोलले, सॉरी हं.” आईने प्रतिक्रिया दिली.
बाबांना हेच हवं होतं. त्यांनी गोर्जीची पाठ थोपटली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आईबाबा, तेजोमयीला घेऊन बूक स्टॉलवर गेले. बाल/कुमार दिवाळी अंकाचे पाच-सहा संच त्यांनी विकत घेतले नि तडक अनाथालायात पोहचले. तेजोमयीने प्रत्येकाला एकएक अंक दिला. तो देताना तिला खूप आनंद मिळत होता. ती मुलं हरखूनच गेली. दिवाळी अंक हातात पडताच, त्यांच्या चेहरा खुलून जात होता. ते बघून आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने मनोमन गोर्जीला धन्यवाद दिले.
सुरेश वांदिले