(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आभासी आशावाद

  करिअर घडवणारे विविध अभ्यासक्रम उपलब्ध
असताना व गेल्या चार-पाच वर्षात त्यामध्ये बरीच भर पडली असली तरी अद्यापही
पालकांचा ओढा मुख्यत्वे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडेच आहे. त्यात वावगे काय
? हा प्रश्न एखादा पालक विचारु शकतो.
वावगे तर काहीच राहू शकत नाही
, हे
खरेच. पण वस्तुस्थिती सुध्दा लक्षात घ्यायला हवी की नाही
? उदाहरणार्थ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजी या संस्थेच्या जुन्या आणि नव्या अशा
२३ कॅम्पसमध्ये २०२२ मध्ये १६०५८ जागा भरल्या गेल्या. या जागा जॉईंट
एन्ट्रन्स एक्झामिनेशन (ॲडव्हास्न्ड) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर भरण्यात
येतात. यातील निम्म्या जागा म्हणजेच साधारणत: साडे आठ हजार जागा या खुल्या
संवर्गासाठी आणि उर्वरित जागा या अनुसूचित जाती
, जमाती, नॉन-क्रिमिलेअर इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग, दिव्यांगांसाठी राखीव आहेत.
ॲडव्हास्न्ड परिक्षेसाठी साधारणत: अडीच लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाते. याचाच
अर्थ या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या चार ते पाच टक्केच विद्यार्थी
आयआयटीसाठी निवडले जातात.

  हे
अडीच लाख विद्यार्थी हे जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन-जेईई (मेन) या परीक्षेत
सर्वोच्च गुण मिळवणारे असतात. जेईई (मेन) च्या जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या
परीक्षेला ला देशभरातून  ८ लाख २२ हजार विद्यार्थी
बसले. या विद्यार्थ्यांमधून जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन – ॲडव्हान्स्डसाठी निवड अडीच
लाख आणि प्रत्यक्ष निवड
१६ हजार! अशी ही गरगरवून टाकणारी आकडेवारी आहे.
तेव्हा तीव्र नव्हे तर अती-अती तीव्र स्पर्धा असणाऱ्या या परीक्षेवर पालक व
विद्यार्थ्यांनी कितपत लक्ष केंद्रित करायला हवे
, याचा सारासर निर्णय पालकांनी घ्यायला हवा. अतीतीव्र स्पर्धा असलेल्या
या परीक्षेला तोंड देण्याची आपल्या मुलाची मानसिक, बौध्दिक आणि शारीरिक क्षमता आहे
की नाही याचा विचार करायला हवा की नको
?  तसा तो होत नाही आणि पालक व विद्यार्थी दोघेही तोंडघशी पडतात.

 
मोठी काठीण्यपातळी

 
आयआयटीमध्ये अत्युत्कृष्ट बुध्दीमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी
काठीण्यपातळी मोठी असलेलाच पेपर काढला जातो. गणित
, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याविषयांमध्ये चौफेर गती असलेल्या व
संकल्पनांच्या पातळीवर ज्या विद्यार्थ्यांच्या समजुतीचा वा आकलनाचा कोणताही घोटाळा
होत नाही वा त्याची अल्प शक्यता असते असेच प्रज्ञावंत विद्यार्थी आयआयटीसाठी
निवडले जातात.

 
प्रत्येक विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे काही
विषय त्याला चांगले जमू शकतात तर काहींमध्ये अजिबातच त्याला गती घेत येत नाही. तो
मनापासून प्रयत्न करीत असला तरी त्याला बऱ्याच संकल्पना स्पष्ट होत नाही. हे
त्याला कळत असते. मात्र पालकांपर्यंत ते नीट पोहचत नाही. वा पालक ते समजून घेत
नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणणं कितीही सत्य असले तरी
लाख विद्यार्थ्यांमधून अंतिम १६
हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड होण्यासाठी या प्रयत्नांसोबत सर्वोच्च प्रज्ञेचीही
गरज असते.

  आभासी
आशावाद

 
आपल्या मुलामधील कमकुवत बाजू प्रामाणिकपणे पालकांनी लक्षात घ्यायला हवी.
कोचिंग क्लासच्या चालकांना ते घेत असलेल्या विविध टेस्ट सिरीजमधून ही बाब लक्षात
येत राहते. पण एक आभासी आशावादाचे गुलाबी चित्र रंगवण्यातच त्यांना अधिक रस असतो.
कारण त्यात त्यांचे अर्थकारण गुंतलेले असते. आपल्या मुलाची गणित किंवा
भौतिकशास्त्रातील आकलन क्षमतेची उडी
70, 75 टक्केच्या आसपास पडत असेल तर पालकांनी आयआयटीच्या मृगजळाच्या पाठीमागे
धावण्याचा नाद सोडून द्यायला हवा. यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघांनाही नैराश्य
येणार नाही.

 
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशात एमबीबीएसच्या ९१ हजार ९२७ च्याआसपास जागा
आहेत. बीडीएसच्या २७६९८ जागा, बीएएमएसच्या आणि इतर
(बीयूएमएस इत्यादी) शाखांच्या मिळून ५० हजार जागा आहेत. यामध्ये
खाजगी आणि शासकीय शिक्षण संस्थांचा समावेश आहे. १८ लाखाच्या आसपास विद्यार्थी
एमबीबीएस प्रवेश परीक्षेला बसतात. यापैकी निम्म्या जागा खुल्या संवर्गातील व
उर्वरित जागा राखीव संवर्गातील असतात. एमबीबीएस प्रवेशासाठीसुध्दा अतिशय विषम अशी
स्पर्धा असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट व्हावे. बरेचदा मुलांना या शाखेकडे जाण्यात
रस नसतो. एखाद्याला जीवशास्त्र अजिबातच आवडत नाही. हे त्याच्या शिक्षकाला
, ट्यूटर किंवा पालकालाही ठाऊक असते तरी
त्याला या शाखेकडे जाण्यासाठी भरीस घातले जाते. त्यामुळे असे विद्यार्थी अर्धवट
मनाने प्रवेश परीक्षा देतात. त्यात त्यांना अपयश येते. आयआयटी आणि वैद्यकीय
शाखेतील प्रवेश संख्या  आणि त्यासाठी अणारी
अतितीव्र स्पर्धा लक्षात घेऊनच पालकांनी आपल्या मुलाचा करिअर मार्ग निवडायला हवा.

इतर पर्याय

 
अभियंताच व्हायचे असेल तर शासकीय वा काही नामवंत खाजगी महाविद्यालयांमध्ये
सीइटी परीक्षेद्वारे प्रवेश घेण्याचा पर्याय असतो. या पर्यायाचा विचार करायला हवा.
अभियांत्रिकीमध्ये विविध शाखा आहेत. तसेच एमबीबीएस सोडून इतर वैद्यकीय शाखा उदा-
बीएएमएस
, बीएचएमस, बीडीएस, आक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी किंवा मग वैद्यकशास्त्राशी
संबंधित सहा महिन्यापासून ते तीन वर्षे कालावधीपर्यंतचे काही अलाइड हेल्थ कोर्सेस
आहेत
, त्याचा विचार करायला हवा. हे
अभ्यासक्रम कौशल्य निर्मितीचे आहेत. अशा तंत्रज्ञाची वा कुशल मनुष्यबळाची सध्या
मोठी गरज आहे.

 
कौशल्य विकास

 
सध्याच्या काळात करीअर घडू शकेल अशी अनेक अभ्यासक्रमे सुरु झाली आहेत. या
अभ्यासक्रमांचा भर हा मुख्यत्वे कौशल्य विकसित करण्यावर असतो. हे अभ्याक्रम
केल्यावर डॉक्टर अथवा अभियंते झाल्यावर जसा मेहताना/पगार/ उत्पन्न किंवा पॅकेज
मिळते
, तितका प्रारंभी मिळत नसला तरी
विद्यार्थ्याने मिळवेले ज्ञान व या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची त्याची
क्षमता लक्षात बघून त्याला संधी मिळते. पुढे त्याची प्रगती झपाट्याने होऊ शकते.
अभुनव
, सराव या बळावर महत्वाकांक्षी
विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय सरु करतात.

 
आपल्या मुलाच्या बौध्दिक क्षमतेला उगाच फुगवून बघणे वा सांगणे टाळायला हवे.
जे आहे ते स्वीकारायला हवे. त्यामुळे झेप घेण्याचा त्याचा आवाका लक्षात येतो. त्या
आवाक्यानुसार त्याचा वकूब लक्षात येतो. हे लक्षात आले की अभ्यासाच्या तयारीपासून
ते परीक्षेपर्यंतच्या विविध बाबी सुलभ होतात. संदिग्धता राहत नाही. वास्तवातील
स्वप्न बघितली की ती पूर्ण होणे अशक्य राहत नाही. त्यामुळे नैराश्य येणे, घरातील
वातावरण खराब करुन घेणे, मुलांवर निष्कारणच ताण येणे
, या ताणातून त्याने काही वेडीवाकडी
पावले उचलणे
, घरातील अर्थकारण बिघडणे अशा कित्येक बाबी
टाळता येणे शक्य होऊ शकतात.

 
बौध्दिक पातळीनुसार अभ्यासक्रम

 
मुलाला त्याच्या बौध्दिक पातळीनुसार अभ्यासक्रम करु दिला वा शिकू दिले तर
तो नक्कीच त्याच्या आवडीच्या विषयात प्रगती करु शकतो. एखाद्या विषयात अशी प्रगती
आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरते. उदा-एखाद्या मुलाचे मराठी व्याक्रण
चांगले असेल. त्यात त्याला रस वाटत असेल आणि त्याला समजलेल्या किंवा आकलन झालेल्या
व्याक्रणाचा उपयोग करुन हा मुलगा उत्तम लिहू शकत असेल तर त्याला लेखन
, माध्यमे, कंटेट डेव्हलपमेंट,जनसंवाद/जनसंपर्क अशा क्षेत्रात उत्तम करीअर करता
येणे शक्य होते. सध्या चांगले मराठी मुद्रित शोधक मिळत नाही. त्यामुळे अशा
विद्यार्थ्यांकडे सेवा घेणाऱ्यांची रांग लागू शकते. आपल्याकडे सध्या चांगल्या
भूगोल तज्ज्ञांची फार वाणवा आहे.
10 वी
12 वीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरते
गुण मिळवले की झाले अशी या विषयाबाबत समजूत असल्याने अपवाद वगळता कुणीही या
विषयाचा मनापासून अभ्यास करत नाही. पण भूगोल विषयावर प्रभुत्व मिळवलेले विद्यार्थी
यशाच्या उंच शिखरावर जाऊ शकतात.

सुरेश वांदिले

0000