“हॅलो हॅलो, मी श्री हॅलोमोनास, मी मिस्टर सायर्कोबॅक्टर स्नेनोट्रोफोमोनास, मी श्रीयुत स्यूडोमोनास, तर मी श्रीमंत गॅमाप्रोटीओबॅक्टेरिया, तर मी श्रीमान केमोऑटोट्रोफ… तर…”
“अहो थांबा थांबा, तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही परग्रहावरील एलियन्स आहात की कॉमिक्समधील पात्र?”
“दचकलात ना तुम्ही? आमची नावं अंमळ कठीणच म्हणा तशी. पण एक मात्र नक्की, आम्ही परग्रहावरील एलियन्स नाही आणि कॉमिक्सचा आमचा काही संबंध नाही.”
“मग तुम्ही आहात तरी कोण?”
“आम्ही कोण म्हणुनी काय पुसता? आम्ही असू लाडके!”
“पण दोडक्यांनो, तुम्ही कुणाचे लाडके आहात?”
“आम्ही लाडके पृथ्वीवरील महासागरांचे!”
“आँ, म्हणजे तुम्ही पृथ्वीवर राहता. आम्हाला कधी दिसलाच नाहीत तुम्ही. ही बनवाबनवी तर नाही ना?”
“अशी ‘ही’ किंवा ‘ती’ बनवाबनवी करण्याचा मक्ता मनुष्यप्राण्याकडे, म्हणजे तुमच्याकडे. हा हा हा!”
“ही ही ही! उगाच थापा मारू नका. पृथ्वीवर राहता म्हणजे कुठे राहता?”
“आम्ही राहतो खोल खोल महासागरात.”
“पुन्हा बनवाबनवी.”
“नाही रे बाबा, तसं करून आम्हाला काय मिळणार?”
“बरं, तुम्ही किती खोल राहता?”
“तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल नि तोंडात बोटं घालाल. कारण आम्ही राहतो समुद्रात १० हजार मीटरपेक्षाही खाली.”
“खरंच?”
“पृथ्वीवरील हिमालयापेक्षा उंच पर्वत आणि पृथ्वीवरील सगळ्यात खोल दरीपेक्षा खोल दऱ्या समुद्रात आहेत. आमची अद्भुत सृष्टी आहे. शेकडो प्रकारचे मासे, इतर जलचर प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीवाणू आम्ही सगळे सुखाने आणि आनंदाने राहतो तिथे.”
“मी असं ऐकलं होतं की समुद्राची जितकी खोली जास्त तितका तिथे अंधार. म्हणजे तिथे प्रकाश काही जाऊ शकत नाही. प्रकाश नाही म्हणजे मग तापमानही कमीच की. जीवन जगायला हे दोन्ही घटक आवश्यक. मग तुम्ही कसे काय जिवंत राहता? की ही नवी बनवाबनवी?”
“अहो राजे, निसर्गाने आम्हाला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची शक्ती दिली आहे. आमचे भाऊ मिस्टर केमोऑटोट्रोफ तर समुद्राच्या तळाशी असलेल्या हायड्रोथर्मल व्हेंटमध्ये राहतात.”
“हायड्रोथर्मल व्हेंट म्हणजे काय रे?”
“समुद्राच्या तळाशी भेगांमधून उकळत बाहेर येणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांना हायड्रोथर्मल व्हेंट म्हणतात. या पाण्यातील गंधकयुक्त क्षारांचा वापर करून हे आमचे नातेवाईक खोल समुद्रातील गडद अंधारात राहतात.”
“वाव!”
“ही मंडळी वेगवेगळ्या रसायनांतील ऊर्जा वापरतात. काही नातेवाईक गंधक, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइडचा वापर करून आपले अन्न तयार करतात आणि आनंदाने जगतात.”
“प्रकाशसंश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया फोटोसिंथेसिस ना?”
“अगदी बरोबर. पण समुद्रात खूप खोलवर प्रकाश जात नाही म्हणून तिथे प्रकाश संश्लेषणाऐवजी केमोसंशलेषण होतं.”
“ही काय नवी भानगड?”
“अरे बाबा, भानगड नाही. सूक्ष्म जीवाणू गंधकयुक्त रसायनांमधील ऊर्जा वापरून अन्न तयार करतात, त्याची ही प्रकिया. असे एक नव्हे, दोन नव्हे, हजारो प्रकारचे सागरी जीवाणू आहेत. यातले बरेच जीवाणू आद्यजीवाणू आहेत.”
“म्हणजे?”
“या पृथ्वीवर कुणी चिटपाखरूही नव्हतं, तेव्हा समुद्राच्या खोल गाभाऱ्यात हे जीवाणू होते. या अर्थाने ते पृथ्वीचे पहिले रहिवासी. तुम्हा मनुष्यप्राण्यांचे आद्य नातवाईकच…”
“अरे वा!”
“वा काय? आम्ही तुमचे आद्य नातवाईक असूनही तुम्हा मनुष्यप्राण्यांना आमच्याशी काही घेणंदेणं नाही. तुम्हाला वाटतं, ही पृथ्वी फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणूनच तुम्ही अनेक प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंत. आता तुम्ही आम्हा जलचरांच्याही पाठीमागे लागलात.”
“काहीतरी काय आरोप करता?”
“तुम्ही समुद्रात प्लास्टिकचा कचरा टाकता, रसायने टाकता, संशोधनासाठी यंत्रसामग्री पाठवता, खोदकाम करता, स्फोट करता. हे सगळं आमच्या इटुकल्या पिटुकल्यांच्या जीवांसाठी किती हानीकारक! हजारो सागरी जीव मृत्युमुखी पडले. शेकडो दररोज पडत आहेत. एक दिवस असा येईल की समुद्रातील जीवसृष्टीच नष्ट होईल. ही जीवसृष्टी म्हणजे समुद्राचा प्राण. तो प्राणच निघून गेल्यावर समुद्राचं काय होईल? याचा कधी विचार केलात का?”
“बापरे!”
“भरले ना कापरे? आतातरी व्हा सावध. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या आनंदाने.”
“हो हो, नक्कीच. मी करेन तसा प्रयत्न आणि सांगत राहीन माझ्या सगळ्या सवंगड्यांना…”
मी समुद्राकडे बघितलं. समुद्राच्या शांत लाटांमधून मला आवाज ऐकायला आला. “पृथ्वी फक्त तुमची नाही.
ती आमचीही आहे. आम्ही वाचलो तर तरच तुम्ही सुरक्षित राहाल..”
मी अथांग अशा समुद्राकडे बघितलं. समुद्राचं पाणी हातात घेऊन मावळत्या सूर्यासमोर शपथ घेतली, “मी यापुढे कधीच या पाण्यात प्लॅस्टिक टाकणार नाही आणि कचराही टाकणार नाही.”
सुरेश वांदिले