आयआयटीतलं डिझाईन-सर्व ज्ञानशाखांना संधी
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या अंतर्गत इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर कार्यरत असून, या विभागामार्फत बॅचलर ऑफ डिझाइन (अभिकल्प) आणि मास्टर ऑफ डिझाइन हे अभ्यासक्रम चालवले जातात.
या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही ज्ञानशाखेतील (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) १२वी उत्तीर्ण विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरतात. १२ वीमध्ये केवळ उत्तीर्ण श्रेणी असली तरी पुरे. १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (ॲडव्हान्स्ड) व्दारे आयआयटी मुंबईमध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. मात्र कला आणि वाणिज्य शाखेतील मुले इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरच्या मार्फत आयआयटी- मुंबईमध्ये अप्रत्यक्षपणे प्रवेश मिळवू शकतात.
चाळणी परीक्षा
बॅचलर ऑफ डिझाइन (अभिकल्प) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजेच यूसीड (UCEED), ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेला विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही बसता येते.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया ही दरवर्षी साधारणत: सप्टेबर/ ऑक्टोबर महिन्यात सुरु होते आणि जानेवारीमध्ये चाळणी परीक्षा घेतली जाते. (२०२३ मधील शैक्षणिक सत्राच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत घेतली जाईल.) महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- नागपूर, पुणे आणि मुंबई.
२०२३ च्या शैक्षणिक सत्राची प्रवेश अर्ज भरण्याची प्रकिया २९ ऑक्टोबर २०२२ ला संपेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज भरणे गरजेचं आहे.
२०२३ सालच्या शैक्षणिक सत्रासाठी वयोमर्यादा – खुला, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ संवर्ग, नॉन क्रिमीलेअर ओबीसी संवर्गातील उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. अनुसुचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्गातील उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
अशी असते परीक्षा –
तीन तास कालावधीचा ३०० गुणांचा एक पेपर असतो. यामध्ये पार्ट ए आणि आणि पार्ट बी असे दोन भाग असतात. दोन्ही भागातील प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. पेपरची भाषा इंग्रजी.
पार्ट ए- एकूण गुण- २४०. कालावधी – अडीच तास. हा कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच संगणकाधारित पेपर असतो. यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असे तीन भाग असतात. सेक्शन ए मध्ये न्युमरिकल ॲन्सर टाईप (संख्यात्मक उत्तर प्रकार) आणि सेक्शन बी मध्ये मल्टिपल सिलेक्ट टाईप (बहू निवड उत्तर प्रकार पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये दिलेल्या चार पर्यायांपैकी एक किंवा अधिक अचुक उत्तर राहू शकतात.) सेक्शन सी मध्ये मल्टिपल चॉईस टाईप (बहुपर्याय निवड उत्तर प्रकार) प्रकारातील प्रश्न विचारले जातात. यामध्ये दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच अचुक उत्तर राहू शकतो.)
पार्ट बी- एकूण गुण ६०. यामध्ये उमेदवाराच्या चित्रकलेचे कौशल्य, ज्ञान आणि आकलन तपासाण्यासाठी एक प्रश्न विचारला जातो. याचा कालावधी – तीस मिनिटे.
इतर आयआयटी
अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड(UCEED) या परीक्षेत चांगली कामगिरी करुन इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर (आयआयटी), मुंबई सोबतच आयआयटी गौहाटी (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) ,आयआयटी-दिल्ली (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन), आयआयटी – हैदराबाद (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आणि आयआयटीडीएम (इंडियन इंस्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
गुणवत्ता यादी
यूसीड परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते. ही एकच यादी असेल. या यादीवरुन विद्यार्थी त्याच्या संवर्गातील (खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट आणि दिव्यांग) स्वत:चा क्रमांक जाणून घेऊ शकतो.
दोन विद्यार्थ्यांना यूसीड परीक्षेत समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीत त्याचा क्रमांक ठरवण्यासाठी पुढीलप्रमाणे सूत्रे निश्चित करण्यात आली आहेत. (१) सेक्शन बी मध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वरचा क्रमांक दिला जातो. (२) याही स्थितीत निर्णय घेता आला नाही तर ज्या विद्यार्थ्यास पार्ट ए मधील सेक्शन दोन मध्ये अधिक गुण मिळेल त्याला वरचा क्रमांक दिला जातो. (३) याही स्थितीत निर्णय घेता आला नाही तर ज्या विद्यार्थ्यास पार्ट ए मधील सेक्शन एक मध्ये अधिक गुण मिळेल त्याला वरचा क्रमांक दिला जातो. (४) याही स्थितीत निर्णय घेता आला नाही तर दोन्ही विद्यार्थ्यांना समान क्रमांक दिला जातो.
एकूण जागा
(१) इंडस्ट्रिएल डिझाइन सेंटर-आयआयटी मुंबई- एकूण जागा ३७, खुला संवर्ग- १५, ओबीसी-एनसीएल संवर्ग- १०, अनुसूचित जाती संवर्ग-५, अनुसूचित जमाती संवर्ग – ३, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक संवर्ग- ४
(२) डिपार्टमेंट ऑफ डिझाइन- आयआयटी गौहाटी – एकूण जागा- ५६, खुला संवर्ग- २३ , ओबीसी – एनसीएल संवर्ग – १५, अनुसूचित जाती संवर्ग- ८, अनुसूचित जमाती संवर्ग – ४, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक संवर्ग-६, (३) डिपार्टमेंट ऑफ डिझाइन- आयआयटी हैदराबाद– एकूण जागा- २०, खुला संवर्ग- ९ , ओबीसी – एनसीएल संवर्ग-५, अनुसूचित जाती संवर्ग- ३, अनुसूचित जमाती संवर्ग – १, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक संवर्ग – २, आयआयआयटीडीएम जबलपूर – एकूण जागा- ६६, खुला संवर्ग-२६ , ओबीसी – एनसीएल संवर्ग- १८, अनुसूचित जाती संवर्ग-१०, अनुसूचित जमाती संवर्ग-५, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक संवर्ग-७
महत्वाचे मुद्दे-
(१) यूसीड परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जातो.
(२) आयआयटीमधील डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन किंवा ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जात नाहीत. यूसीड परीक्षेतील गुणांवर आधारितच प्रवेश दिला जातो. सर्व विषयात उत्तीर्ण झालेले १२ वीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. २०२३ मध्ये १२ वीची परीक्षा देणारे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात.
(३) बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी शासनमान्य असून ही पदवीप्राप्त विद्यार्थी यूपीएसस्सी(संघ लोकसेवा आयोग)च्या परीक्षांना बसू शकतात.
(४) प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा फक्त सलग दोनदाच देता येते. या परीक्षेतील गुण हे त्यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशापुरतेच ग्राह्य धरले जातात.
(५) इंडस्ट्रीअल डिझाइन सेंटरने पाच वर्षे कालावधीचा बी.डिझाइन- एम.डिझाइन हा ड्युएल डिग्री हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला बी.डिझाइन या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच तिसऱ्या वर्षी प्रवेश मिळू शकतो.
(६) आयआयटी मुंबई/ दिल्ली/ हैदराबाद आणि गौहाटी येथील बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो. मात्र आयआयआयटीडीएम जबलपूर येथील अभ्यासक्रमास १२वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाचा प्रवेश दिला जातो.
(७) इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (मुंबई) मधील एम.डिझाइन या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते- (१) इंडस्ट्रिअल डिझाइन, (२) कम्युनिकेशन डिझाइन, (३) इंटरॲक्शन डिझाइन, (४) मोबिलिटी ॲण्ड व्हेईकल डिझाइन. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागतो. ( संपर्क –http://www.iitb.ac.in/newacadhome/mdes.jsp)
(८) युसीड परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन पुढील विद्यापीठे डिझाईन अभ्यासक्रमांना प्रवेश देतात-
(१) दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, (२) निर्मा युनिर्व्हसिटी, (३) डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, (४) सिम्बॉयसीस युनिर्व्हसिटी, (५) यूपीईएस युनिव्हर्सिटी,(६) सीइपीटी युनिव्हर्सिटी, (७) जैन युनिर्व्हसिटी, (८) अनंत युनिर्व्हसिटी, (९) वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (१०) एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, (११) जे.के.लक्ष्मीपती युनिव्हर्सिटी, (१२) लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी
संपर्क – इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, आयआयटी मुंबई – ४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६४०६३, ईमेल-uceed@iitb.ac.in, संकेतस्थळ- www.uceed.iitb.ac.in
सुरेश वांदिले
०००