
आयआयटीत बीएस्सी बीएड
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयआयटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि केंद्रिय साहाय्यता मिळणाऱ्या इतर संस्थांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या निर्मितीसाठी, इंटिग्रेटेड टिचर एज्युकेशन प्रोग्रॅम (आयटीइपी) इन बीएस्सी बीएड, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला, नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एनसीइटी) मार्फत प्रवेश दिला जातो. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीमार्फत घेतली जाते. यंदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी २०३० मध्ये शिक्षण बनण्यासाठी पात्र ठरतील. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तीन वर्षांनंतर हा अभ्यासक्रम सोडता येतो. त्यांना बीएस्सी ही पदवी दिली जाते. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना, शिक्षण (एज्युकेशन किंवा संबंधित मुख्य विषय (भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी करण्याचीही सुविधा उपलब्ध होते.
प्रमुख संस्था
(१) आयआयटी रोपर येथे इंटिग्रेटेड बीएस्सी- बीएड अभ्यासक्रम करता येतो. भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या तीन विषयांपैकी एक विषय अभ्यासक्रमाचा मुख्य विषय म्हणून निवडता येतो.
संपर्क –https://www.iitrpr.ac.in/bsc-bed
(२) आयआयटी जोधपूर
या संस्थेने भावी शिक्षकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्वत:चे प्रारुप (मॉडेल) तयार केले आहे. यामध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान दिले जाईल. त्यांचे तांत्रिक ज्ञान उन्नत केले जाईल. स्वंयसुधारणेसाठी प्रेरित केले जाईल. प्रभावी संवादकौशल्य शिकवले जाईल. शैक्षणिक कार्य करताना नावीन्यतेला अधिकाधिक प्राधान्य देण्यासाठी प्रेरित केले जाईल. नैतिक मूल्ये, जीवनशैलीचा भाग बनावी यासाठी प्रेरित केले जाईल. आयुष्यभर सखोल अध्ययनाचा अंगिकार करण्याची मनोवृत्ती निर्माण केली जाईल. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा दिली जाईल.
संपर्क-https://www.iitj.ac.in/itep/
(३) आयआयटी खरगपूर या संस्थेत, इंटिग्रेटेड बीएस्सी बीएड हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात करता येतो. १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.
संपर्क- https://www.iitkgp.ac.in/studyprogrammes/view/29
(४) आयआयटी भुवनेश्वर-
या संस्थेत इंटिग्रेटेड बीएस्सी बीएड हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात करता येतो. या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र हा विषय घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. रसायनशास्त्र हा विषय घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. गणित हा विषय घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. अर्थशास्त्र हा विषय घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने १२वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा.
१२ वीमध्ये खुला संवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्ग विद्यार्थ्यास ६० टक्के, इतर मागास संवर्ग विद्यार्थ्यास ५५ टक्के, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग संवर्ग विद्यार्थ्यास ५० टक्के, गुण मिळायला हवेत.
संपर्क- https://itep.iitbbs.ac.in/
(५) एनआयटी तिरुचिरापल्ली
या संस्थेत, बीएस्ससी बीएड (गणित) हा चार वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क- एनआयटी, तिरुचिरापल्ली – ६२००१५, टेलेफॅक्स- ०४३१-२५००१३३, संकेतस्थळ-https://www.nitt.edu
(६) एनआयटी अगरताळा
या संस्थेत इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री बीएस्सी- बीएड हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- विद्यार्थ्यांने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
संपर्क- एनआयटी अगतराळा, बरजाला, जिरानिया, त्रिपुरा- ७९९०४६, संकेतस्थळ- https://www.nita.ac.in. दूरध्वनी-०३८१-२५४८५३७
(७) एनआयटी पुड्डीचेरी, एनआयटी कालिकत, एनआयटी वरंगल येथेही इंटिग्रेटेड बीएस्सी बीएड हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
आयआयटी,एनआयटी या संस्थांमध्ये तंत्रज्ञान व अभियांत्रिकीसाठी असलेल्या पायाभूत सुविधा, प्राध्यापक, उत्कृष्ट ग्रंथालये, शिष्यवृत्ती, प्लेसमेंट, वसतिगृह, आर्थिक साहाय्य, अत्याधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांसह सुसज्ज अशा प्रयोगशाळा आणि आआयटी/एनआयटी ब्रँडचा लाभ, हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो.
०००
एनआयटीमधील इतर अभ्यासक्रम
एनआयटी तिरुचिरापल्ली– (१) या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्स, मार्फत एम.ए. इन इंग्लिश लँग्वेज ॲण्ड लिटरीचर हा अभ्यासक्रम चालवला जातो. भाषा आणि साहित्य यांचा समन्वय साधणारा हा एक महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळया सर्जनशील कौशल्य निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. अर्हता – इंग्रजी विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाकाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीयुइटी – पीजी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
(२) या संस्थेने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये प्रत्येकी दोन वर्षे कालावधीच्या, एम.एस्सी अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अर्हता- संबंधित विषयातील पदवी प्राप्त उमेदवारास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
एनआयटी रुरकेला– (१) या संस्थेतील मानव्यशास्त्र विभागाने, एम.ए इन डेव्हलपमेंट स्टडीज, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी दोन वर्षे. इंग्रजी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये पीएचडी करण्याची सुविधासुध्दा या संस्थेत आहे.
(२) या संस्थेत १२ वी विज्ञानशाखेतील विद्यार्थी पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन लाइफ सायन्स हा अभ्यासक्रम करु शकतात. लाइफ सायन्स किंवा जैविक विज्ञानशाखेत सूक्ष्मजीवजंतू, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात येते. याच अनुषंगाने जैव-वैद्यकीय तंत्रज्ञान, जैव-माहितीशास्त्र, जैव-भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, प्रतिकारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रेणीव जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र, जैव-रसायनशास्त्र, अनुवंषशास्त्र आदी विषयघटकांतील प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमाला जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन)- मेनमधील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
(३) या संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन फिजिक्स हा अभ्यासक्रमही करता येतो. जेईई मेन परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
(४) दोन वर्षे कालावधीचे एम.एस्सी अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतात. (१) फिजिक्स, (२) केमिस्ट्रिी, (३) जिऑलॉजी, (४) ॲटमोस्फेरिक सायन्स. अर्हता- संबंधित विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांना जाँईट ॲडमिशन फॉर मास्टर्स, या परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.
एनआयटी सुरत– या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स मार्फत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन फिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री मार्फत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन केमिस्ट्री हे अभ्यासक्रम चालवले जातात. कालावधी- प्रत्येकी पाच वर्षे. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयासह १२वी विज्ञानशाखेची परीक्षा उत्तीर्ण
संपर्क- सरदार वल्लभभाई इंजिनीअरिंग कॉलेज रोड, अथवालाईन्स, अथवा, सुरत, गुजरात-३९५००७, संकेतस्थळ- https://www.svnit.ac.in
एनआयटीत एमबीए– एनआयटी मेंगलोर, एनआयटी रुरकेला, एनआयटी अलाहाबाद, एनआयटी अगरताळा, एनआयटी तिरुचिरापल्ली, एनआयटी वरंगल, एनआयटी दुर्गापूर, एनआयटी सिलचर, एनआयटी जयपूर, एनआयटी जालंदर यांच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट किंवा स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. सध्याच्या काळात औद्योगिक जगतासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापकीय तंत्र, कौशल्य आणि सुयोग्य अशा ॲटिट्यूडच्या व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने एमबीए अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे.
अर्हता- या अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारकांना प्रवेश मिळू शकतो. तथापि त्याने व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट/ मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट/ सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट/ जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट यापैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेत चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक एनआयटी, एमबीए प्रवेशाची प्रकिया स्वतंत्रपणे राबवत असते. प्रारंभिक निवडयादी साठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागांनुसार विशिष्ट प्रमाणात/संख्येत मुलाखत आणि समूहचर्चेसाठी उमेदवारांना बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. या संस्थांमधील प्लेसमेंट सेलमार्फत करिअर संधी मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. एनआयटी ब्रँडचा प्लेसमेंटच्या वेळी उपयोग होऊ शकतो. सर्व संस्थांमध्ये भारत सरकारच्या राखीव जागांचे निकष पाळले जातात.
सुरेश वांदिले