(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तशी त्याची आवडनिवड जरा वेगळीच समजायला हवी. एखाद्या आजारामुळे किंवा शारीरिक दु:खामुळे कुणी त्रासलेलं दिसलं की याला वाटायचं की आपण यांचं दु:ख, त्रास दूर करण्यासाठी काहीतरी करायला हवं. एकदा रायपूरला तो त्याचा जवळच्या मित्राच्या घरी गेला असताना या मित्राचे बाबा, यकृताच्या आजाराने त्रस्त असल्याचं त्याला दिसलं. काही व्यक्तिंना दारु न पिता किंवा कोणतही अपेयपान न करतासुध्दा असा यकृताचा त्रास होतो.

आपल्या मित्राच्या वडिलांचा हा त्रास बघून त्याचं मन गलबलून गेलं. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा उपयोग करता येईल का? यावर तो विचार करु लागला. अशा वेगळ्या कल्पना सुचनं हे सुध्दा खूप महत्वाचं ठरतं. ही कल्पना मूर्त रुपात येण्यासाठी तो प्रयत्न करु लागला. त्यातून त्याने अशा प्रकारच्या यकृताच्या आजाराचं निदान करण्यासाठी एक पेपर स्ट्रिप (आम्लता किंवा क्षारता शोधण्यासाठी वापरली जाणारी रंगीत पट्टी) शोधली. यावर मूत्राचे नमूने घेऊन त्याचं रासायनिक पृथ्थकरण किंवा विश्लेषण एआयच्या साहाय्यानं केलं जातं. यामध्ये मशिन लर्निंग अल्गोरिदमचा वापर केला जातो. या विश्लेषणातून यकृताला झालेल्या आजाराविषयीची जोखीम लक्षात येऊ शकते.

त्याच्या घरी कुणालाही विज्ञान विषयाची पार्श्वभूमी नाही. त्याचे बाबा एका खाजगी कंपनीत काम करतात. तर आई गृहिणी. सध्या तो VIBGYOR हायस्कूल येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकतो. विज्ञानाचे सिध्दांत शिकता शिकताच त्याला अशा काहीतरी लोकांच्या हिताच्या भन्नाट आणि वेगळया गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते.

त्याने शोधून काढलेलं, ‘स्‍मार्ट लिव्हर डायग्नोस्टिक्स’ नावाचं यंत्र ग्रामीण भागात वापरण्यास स्वस्त, पोर्टेबल आणि सुलभ असं. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे यंत्र अतिशय फायदेशीर ठरतय. हे यंत्र फॅटी लिव्हर, हेपॅटायटीस, सिरोसिस यांसारख्या यकृताच्या आजारांचं निदान करतं. त्याच्या या शोधामध्ये वैज्ञानिक नवसंकल्पना आणि सामाजिक उपयोगिता यांचा उत्कृष्ट संगम साधला गेलाय. यामुळे आरोग्यसेवा सर्वांना सुलभतेनं उपलब्ध होऊ शकतात.

या अभिनव संशोधनासाठी त्याला २०२४ साली प्रेग येथे झालेल्या फ्युचर पोर्ट यूथ कॉन्फरंसमध्ये टॉप थ्री इम्पॅट ॲवार्डने सन्मानित करण्यात आलं. २०२५ सालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘अनस्टॉपेबल २१’ या उपक्रमामध्ये त्याची निवड झाली. सध्या तो अमेरिकेतील बोस्टन शहरात असणाऱ्या मास जनरल ब्रिगहॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेत, खोकल्याच्या आवाजवरुन क्षय रोगाचं निदान यावर संशोधन करतोय .

त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता  व संगणक विज्ञानात विशेष रस आहे. भविष्यात एआय आणि जैववैद्यकीय (बायोमेडिकल) क्षेत्रात संशोधन करायचय. आरोग्य सुविधांसाठी अधिकाधिक एआयचा वापर करुण्याचा त्याने निर्धार केलाय. त्याने स्वत:च्या लॅबची उभारणी केलीय. आहे. त्यात एआयच्या साहाय्याने कर्करोग निदान प्रणाली विकसित करतोय. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया समर इंटर्नशीप २०२४, बेंगळूरू येथील रिसर्च सायंस इंस्टिट्यूमध्ये मध्ये, यंदा म्हणजेच २०२५ साली वेगवेगळया आरोग्य विषयक प्रकल्पावर संशोधन करण्याची त्याला संधी मिळाली.

असा हा आदित्य कुमार झा. वय वर्षे १६. हल्ली मुक्काम मुंबई.