(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

१० वीनंतर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आटीआय)(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये तंत्रकौशल्य वाढीसाठीचे असंख्य अभ्यासक्रम चालवले जातात. दहावीनंतर करिअरची वाट चोखाळू बघणाऱ्यांसाठी आयटीआय उत्तम संधी उपलब्ध करुन देते. ही बाब गेली अनेक वर्षे सिध्द झाली आहे. जी मुलं अगदी मनापासून आयआयटीचे अभ्यासक्रम करतात आणि प्रशिक्षणाच्या कालावधीत कौशल्य हस्तगत करतात, ते स्वत:च्या पायावर लवकर उभे राहतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. काही वर्षांच्या अनुभवनांतर ही मुले स्वयंरोजगारही सुरु करतात. काही मुलं, ज्या कारखान्यात, उद्योगात प्रशिणार्थी म्हणून लागली असतात, ती त्या ठिकाणी आपलं स्थान आणखी बळकट करतात. काही मुलं वरच्या श्रेणीतही जातात. आयटीआयचं हे महत्व आता बऱ्याच पालक आणि मुलांना पटू लागल्याचं सुचिन्ह आहे. त्यामुळे किंतु-परंतु मनात न ठेवता आणि दहावीतील भरमसाठ गुणांच्या कौतुकात वाहून न जाता बरीच मुलं आता आयटीआयला प्राधान्य देऊ लागली आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात आयटीआय प्रवेशामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचंही दिसतं. ९० टक्के  किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही आयआयटीचा रस्ता आनंदाने पकडतात.

महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक तालुक्यात किमान एक  (शासकीय अथवा खाजगी) आयटीआय आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी शासकीय आयटीआय आहे. या सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआयमधून दरवर्षी किमान दीड लाख मुला – मलिंना शिल्प कारागिर योजनेतंर्गत तंत्रकुशल बनवलं जातं. केवळ तरुणींसाठी १५ ठिकाणी आयटीआय आहे. (याशिवाय प्रत्येक आयटीआयमध्ये ३० टक्के जागा विद्यार्थीनींसाठी राखीव असतात.) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २ स्वतंत्र आयटीआय तर या सवंर्गातील उमेदवारांसाठी ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या  आहेत. आदिवासी उमेदवारांसाठी ६१,  शासकीय आदिवासी आश्रमशाळा आयटीआय – २८ , अनुसूचित जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी उच्च स्तर आयटीआय – ४ आहेत. याशिवाय वर्धा येथे केवळ दिव्यांगासाठी आयटीआय आहे. द चिल्ड्रेन एड सोसायटी खाजगी औद्योगिक संस्था, मानखुर्द, कुर्ला मुंबई येथे केवळ अनाथ संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. द लेप्रसी मिशन, खाजगी शिक्षण संस्था पंचवटी, नाशिक येथील खाजगी आयटीआय मध्ये केवळ कुष्टरोगग्रस्त उमेदवारांना प्रवेश दिला जातो. क्विन्स मेरी खाजगी आयटीआय पुणे येथे संरक्षण सेवेतील व्यक्तिंच्या मुलांना प्रवेश दिला जातो.

शासकीय आणि खाजगी आयटीआय मधील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येतात. अशी पध्दत राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होतात. त्यावर सर्वांनाच लक्ष ठेवणं शक्य होतं.

२०१९ सालापासून खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आयटीआयमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात येतात. अशा उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

(अपूर्ण)

सुरेश वांदिले

०००