(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महाराष्ट्रातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास उद्योग/कारखाने यामध्ये एक लाखाच्या आसपास अशी संधी उपलब्ध करुन दिली जाते. या काळात विद्यावेतन दिलं जातं. या काळात संबंधित उमेदवार कुशल कारागीर बनतो.

प्रशिक्षण

आयटीआयमधे एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये अभियांत्रिकी गटातील एक वर्षं कालावधीच्या २३ आणि दोन वर्षे कालावधीच्या ३२ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षे कालावधीच्या २४ व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ११ अभ्यासक्रमांसाठी १० उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर ६८ अभ्यासक्रमांना केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेच, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दिले जाते). या अभ्यासक्रमांमध्ये ७० टक्के भर प्रात्यक्षिकांवर व ३० टक्के भर सैध्दांतिक (थिअरी) वर दिला जातो.

इतर लाभ

१० वी उत्तीर्ण जे विद्यार्थी, आयटीआयचा २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करुन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण करतात, त्यांना १२ वीच्या समकक्ष समजलं जातं. १० वी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांनी २ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण  करुन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १० वीच्या समकक्ष समजलं जातं. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं, असेल त्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला थेट प्रवेश दिला जातो.

इतर वैशिष्ट्ये

शासकीय आयटीआयकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले असल्याने, या सर्वच आयटीआयमध्ये उत्कृष्ट प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत. सर्वच शासकीय आयटीआयच्या स्वतंत्र आणि उत्तम अशा इमारती आहे. स्थानिक औद्योगिक गरजा लक्षात घेऊन या आयटीआयमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. विविध विषयांमध्ये तंत्रकुशलता प्राप्त व्हावी म्हणून आयटीआय मध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमात काळानुरुप आणि गरजेनुसार बदल केले जातात. दहावीची परीक्षा ज्या जिल्ह्यातून दिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ९० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

वाढीव गुण

आयटीआय प्रवेशासाठी पुढील बाबींसाठी वाढीव गुण दिले जातात. (१) इंटरिजिएट चित्रकला परीक्षा (ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र.), (२) क्रीडा (सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र.), (३) तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी (माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) प्रमाणपत्रावर तांत्रिक विषयाचा उल्लेख असणं आवश्यक.), (४) माजी सैनिक (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आईवडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाल) असल्याचं प्रमाणपत्र), (४) संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आईवडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र.)

संपर्क- संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुख्य कार्यालय, महापालिका मार्गटपालपेटी क्रमांक- १००३६मुंबईदूरध्वनी- ०२२ – २२६२०६०३फॅक्स-२२६५९२३५, संकेतस्थळ- www.admission.dvet.gov.inईमेल –itiadmission@ dvet.gov.in

०००