रेश्माच्या आवडीनिवडी वेगळया होत्या. कोणत्याही भाषेतील गाणं ऐकणं, हा तिचा छंद होता. तमीळ , मल्याळम इतकच नव्हे तर तेलगू गाणीही ती ऐकायची. टीव्हीवरील सर्व भाषेतील गाण्याची चॅनेल्स तिने शोधून काढली. त्यांचा गुच्छ तिने केला. वेळ मिळाला की या चॅनेल्सवरील गाणं ती तास दोनतास ऐकत बसायची. न कळणारी गाणी ऐकून तिला अजिबातच कंटाळा येत नसे. ही गाणी सुरु असताना ती इतकी तन्मय होऊ जाई की जणू सारं काही तिला कळलय. ती त्यातली फार दर्दी रसिक जणू.
इतर मुलं टीव्हीवरच्या मालिका, सिनेमा, कार्टून्स बघत असताना ही मात्र फक्त गाणच ऐकत बसते, याचं तिच्या आईला कसंतरीच वाटायचं. रेश्मा वेडी तर नाहीना, असंही तिने एकदा तिच्या बाबांना बोलून दाखवलं होतं. बाबांनी ते हसण्यावरी नेलं.
“बघा, एक दिवस लेक हातची जाईल,” असं सांगायला आई विसरली नव्हती.
०००
रेश्माचं कोणत्याही भाषेतील गाणी ऐकण्याचा छंद बाबांना फार आवडल्याने त्यांनी तिला एक पोर्टेबल रेडियो घेऊन दिला. यावर केवळ गाण्यांची चॅनेल्स होती. सगळ्या भारतीय भाषा आणि जगातील इतर अनेक भाषातील गाण्यांची चॅनेल्स असलेला हा रेडियो बघून रेश्मा हरखून गेली. बाबांना आपल्या मनातलं नेमकं कळतं. आईला कां बरं कळत नसावं? असं ती मनात म्हणाली. याप्रश्नाचं उत्तर सध्या मिळणार नसल्याचं तिला ठाऊक असल्यानं ती खुदकन हसली. हा प्रश्न अलगद तिने मनाच्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवला.
नव्या नवलाईनं ती रेडियोच्या चॅनेल्साचा शोध घेऊ लागली. कोणत्या चॅनेलवर कोणत्या भाषेची गाणी लागतात. याची तिने यादी तयार केली. गाण्यांच्या कार्यक्रमाची नोटबुकात नोंद केली. तिच्या लक्षात आलं की या चॅनेल्सवर केवळ कशीही गाणी लावली जात नाहीत. विषय, प्रसंग, घटना यानुरुप गाणी लावली जातात. त्याला कधी एखाद्या कथेचं, कधी एखद्या रुपकाचं स्वरुप दिलं जातं तर कधी संभाषण समृध्द होण्यासाठीही गाण्यांची गुंफन केली जाते. गाण्यांची निर्मिती प्रक्रिया कशी असते, संगीत कसं सुचतं, सुरावटी कशा मिळवल्या जातात, वाद्यमेळांचा उपयोग कसा केला जातो, संगीतासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो, विविध राग, आलाप, त्यांचा संगीतातला वापर, संगीताचं फ्युजन रुप, शुध्द रुप, शास्त्रोक्त रुप काय असतं, लोकसंगीताचा आधुनिक संगीतावर कसा परिणाम होतो, अनेक भाषातील लोकसंगीत बरेचदा कसं समसमान असतं, अशा कितीतरी बाबींवर आधारीत कार्यक्रम या चॅनेल्सवर होत. काही चॅनेल्सवर संगीताची शिकवणीही चाले.
विविध भाषा आणि त्यातील गाण्यात गुंफलेले विषय, संगीत साधना, रेडियोवरील अशा कार्यक्रमांमुळे फुलण्याचं, आनंदाचं आणि बहरण्याचं आकाशच रेश्माला गवसलं .
मराठी – हिंदी गाण्यांपेक्षा ती हळूहळू इतर भाषांतील गाणीच अधिक ऐकायला लागली. याची फार चिड आईला यायची. हिला नक्कीच वेड लागलय अशी तिची पक्की समजूत झाली.
०००
एके रविवारी कितीतरी वेळ रेश्मा इंग्रजीच गाणी ऐकत असल्याचं आईच्या लक्षात आलं. आईला हे अजिबातच आवडलं नाही. तिने चार-पाच वेळेला रेश्माला टोकलं. पण इंग्रजी गाण्यांची रेश्माची समाधी काही भंग होईना. त्यामुळे आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
ती ताडताड रेश्माच्या खोलीत गेली. तिने रेश्माच्या हातातील रेडिओ हिसकावून घेतला. रेडिओला ती दाणकन आदळणार तोच तिने स्वत:ला सावरलं. रेडियो फुटता फुटता वाचला. आईच्या त्या रौद्ररुपाने थरथर कापणाऱ्या रेश्माला त्या परिस्थितीतही हायसं वाटलं. तिने मनात देवाचे आभार माणले.
“अग, बघत काय बसलीस निर्लज्जासारखी. अभ्यास करायचा सोडून हे, इईवुईआवटॉचॉव काय ऐकतेस आँ! याने तुझं पोट भरणार का? आली मोठी मॅडोना-फॅडोना बनायला.” असं ती रागारागाने बोलून गेली. रेश्माने आईचे ते रुप बघून खाली मान घातली. कोणत्याही क्षणी तिला रडू कोसळलं असतं. पण आणखी दोनचार वाक्य बोलून आणि तिच्या गाणं ऐकण्याचा छंदाचा उध्दार करुन आई दुसऱ्या खोलीत निघून गेली. रेश्माने दीर्घ श्वास घेतला. कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली.
०००
तिला आता रेडिओला हात लावण्याची हिंमत होईना. मात्र दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा इंग्रजी गाण्यांचं चॅनेल लावलं. आईच्या कानावर ते ‘इंवाचुव्याआऊ’, अशा ढंगातले इंग्रजी स्वर कानी पडताच ती तडक रेश्माच्या खोलीत आली. तिने तिचा हात पकडून ओढतच बाबांकडे नेलं.
“बघा बघा, लेकीचे प्रताप. काल मी इतकं जीव तोडून सांगितलं. रागावले. पण बाईसाहेबांना मॅडोना-फॅडोनाच व्हायचंय. वाया गेली हो, वाया गेली . तरी मी तुम्हाला सावध केलं होतं. पण नाही. उलट तिला वेड लागणारं हे नवं यंत्र आणून दिलत. आई रागारागाने रेडियोकडे बोट दाखवीत म्हणाली.
“अगं, तू जरा शांत हो आधी. इंग्रजी गाणी ऐकल्यानं मॅडोना फॅडोनाच नव्हे तर ब्रिटनी – फ्रिटनी, मिली-फिली सायरस, सेलेना – फेलेना, कॅटी-पॅटी पॅरी पण होता येईल. एकीचच काय उदाहरण देतेस.”
“बरं बरं, तुमचं ज्ञानामृत तुमच्याजवळच ठेवा. मला देऊ नका. मुलगी कशी वाया गेली आधी ते बघा.” आई फणकाऱ्याने म्हणाली. तिचा राग काही शांत होईना.
“हे बघ, असं गाणी ऐकल्यानं कुणी वाया जात नाही. हे पक्क लक्षात ठेव. आपली मुलगी तर नक्कीच नाही. आपण तिच्यावर विश्वास ठेवणार नाही तर ते बायडेन ठेवतील का?” बाबा वातावरणातील गंभीरपणा कमी करण्यासाठी किंचितसा विनोद करीत म्हणाले.
“हँ S “असं फक्त फणकऱ्यानं आई म्हणाली. आपला विनोद तिला कळला नाही हे बाबांच्या लक्षात आलं .तिला समजावत ते म्हणाले,
“अगं, ऐकू दे ना तिला वेगवेगळया भाषेतील गाणी. याचा कां त्रास करुन घेतेस तू. भाषा कळली नाही तरी संगीत वेगळं असतं. चाली वेगळया असतात. त्यात नावीन्य असतं. इंग्रजी गाणी तर भन्नाटच असतात . ती गाणी थोडीफार कळतातही . आपल्या आनंदाच्या कक्षा विस्तारायच्या की तशाच डबक्यात ठेवायच्या? आतापासूनच रेश्माला वेगवेगळया संगीताचा आनंद घ्यायचा असेल तर घेऊ दे ना. तू कशाला मध्येमध्ये करतेस. तुही ते संगीत ऐक. तुलाही डान्सबिन्स करावा वाटेल.” बाबा हसत हसत म्हणाले.
०००
बाबांचं बोलणं काही आईला पटलं नाही. तिची सारखी भुणभुण सुरुच असायची. मात्र रेश्मानं गाणं ऐकणं काही सोडलं नाही. या छंदातून तिला नंतर नंतर काही गाणी आणि चालीही सुचू लागल्या. शाळेच्या गॅदरिंगमध्ये तिने असंच एक स्वलिखित आणि स्वरचित इंग्रजी गाणं गाऊन दाखवलं. मुख्यपाहुण्यांनी तिचं खूप कौतुक केलं. शिक्षकांनी कौतुक केलं. रेश्माला गाण्यातलं फार कळतय असं सर्व शाळेत झालं.
एकदा तिच्या शाळेच्या हेडमास्तर श्रीमती पाटोदकर घरी आल्या. त्यांनी रेश्माच्या या कलेचं मुक्तपणे आईबाबांसमोर कौतुक केलं.
हिला गाण्यातलच करिअर करु द्या. हिचा कल आताच स्पष्ट दिसतोय. सचिन तेंडुलकरच्या बाबांना लहानपणीच क्रिकेटमधला त्याचा कल कळला होता. त्यांनी त्याला त्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं. रेश्मालाही प्रोत्साहन द्या. संगीत किंवा गाणी शिकवणाऱ्या चांगल्या शाळेत , संस्थेत तिचं नाव दाखल करा. या शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं असेल तर आमची शैक्षणिक संस्था संपूर्ण खर्च करेल.”
श्रीमती पाटोदकर यांनी रेश्माचं केलेलं कौतुक ऐकून बाबांचा उर भरुन आला. आईला काय बोलावं नि काय बोलू नये, असं झालं.
“मॅडोना-फिडोना होण्यातही गंमतजंमत असते, हे आता तरी आईला कळू दे रे बाप्पा,” असं रेश्मा मनोमन म्हणाली.