इचथॉयसॉरस!
देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय हे मला ठाऊक नाही.पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो,हे मला पक्क ठाऊक आहे.मूर्ख आणि निर्बुध्द लेकाचा. तुम्ही लगेच म्हणाल,देवमाशाला मूर्ख आणि निर्बुध्द म्हणणारा मी कोण?
बरोबरच आहे तुमचा प्रश्न.या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं!
त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती संपता संपता मी कोण?कुठला? अशा सगळया प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल.मग तय्यार आहात ना माझी गोष्ट एैकायला…
तर खूप खूप पूर्वीची गोष्ट! खूप पूर्वीची म्हणजे एक,दोन,तीन की हजार? असं तुम्ही विचाराल.हो ना!तुम्ही विचारण्याआधीच मी सांगतो ना ही गोष्ट आहे २४६ दशलक्ष वर्षापूर्वीची!
झाला की नाही थक्क हे एैकून? हं,तर इतक्या अतिप्रचंड वर्षापूर्वी तो पाण्यात राहायचा. त्याचे संपूर्ण महासागरावर राज्य होते. खरं तर तो सम्राटच होता. कारण त्याच्यापेक्षा कुणीही मोठा जलचर तेव्हा नव्हता आणि आता सुध्दा नाही.
आता तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय?याचा पुरावा मला देण्याची गरजच नाही कारण, तुम्हा मानवांनीच तो शोधला. इंग्लंड देशात २०२१ साली उत्खननात सहा फूट लांब आणि एक टन वजन असणाऱ्या डोक्याचे हाड मिळाले.अमेरिकेतल्या नेवाडा राज्यात आगास्टा नावाची पर्वतरांग आहे,त्याच्या कातळातून माझ्या डोक्याची कवटी,पाठीचा कणा,खांदे,पुढचा कल्ला मिळाला.आता तुमच्यातल्या कुणी एक विलार्ड लिबे या शास्त्रज्ञानं अति अति प्राचीन वस्तुंचं वय मोजण्याची पध्दती आणि तंत्र शोधलं.त्याला रेडियो डेटिंग म्हणतात.म्हणजे कार्बन,रेडियम,प्ल्युटोनियम,युरेनियम,थोरिअम या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग करुन अचूक वय काढलं जातं.माझी जी कवटी,हाडं,दातं मिळाली त्यावर या किरणोत्सार पदार्थांचा उपयोग करण्यात आला आणि माझं वय २४६ दशलक्ष वर्ष असल्याचं सिध्द झालं.वर्षामागून वर्ष गेली आणि हळूहळू आम्ही नष्ट होत गेलो.
ते कसं काय?हे आमचं आम्हाला कसं कळणार?पण तुम्ही मानव फारच हुषार बुवा!तुम्हीच मग आम्ही कां नष्ट झालो याचा कसून शोध घेतला.तेव्हा आढळलं की आम्ही फार फार खादाडे होतो.जे मिळेल ते खात सुटायचो.या अतिखाण्यात तर कधीकधी आमच्याच्या उंचीचे थॅलॅट्टोसॉर सारखे जलचर असायचे.तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की आमची उंची किती?सांगतो की.
आमची उंची होती ८५ फूट किंवा २६ मीटर.आहे ना गंमत,म्हणजे आमच्या जीवावरच बेतणारं असलं तरी, आमच्यापेक्षा किंचित कमी उंचीचा जलचर आम्ही घातला की आमच्या पोटात,मग फुटणार नाही का आमचं पोट?इतकं समजायला आम्हाला तेव्हा बुध्दी नव्हती. अखेर व्हायचं तेच झालं. आम्ही नष्ट झालो.
पण गोष्ट इथे संपत नाही बरं का?कारण देवमाशाचं गर्वहरण कसं झालं ते अजून सांगितलं नाही ना मी!
अहो, देवमाशाची उंची भरते ८२ फूट किंवा २५ मीटर.याचा अर्थ आम्ही त्याच्यापेक्षा २ फुटाने अधिक मोठे. म्हणजे सर्वात मोठे जलचर. पण हा मूर्ख समजतो तोच मोठा. समजू द्या.अज्ञानात सुख असतात असे म्हणतात. राहू द्या त्याला सुखी!
पण मी सारखा मी मी करतोय, पण मी कोण ते अजून सांगितलच नाही ना?सॉरी सॉरी.
अहो मी इचथॉयसॉरस!आमचं नाव ग्रीकभाषेतील शब्दावरुन पडलं.आमच्या नावातील इचथीस म्हणजे मासा आणि सौरॉस म्हणजे सरडा.म्हणजे पाण्यातला सरडा.(हा हा हा…झाडावरचा सरडा रंग बदलवतो म्हणे! आम्ही पण रंग बदलवू शकायचो का?तुमच्यापैकी कुणीतरी शोध घेईल तेव्हाच कळेल ते!)
शेवटची एक गंमत राहिलीच की, २४६ लाख वर्षापूर्वी जेव्हा पाण्यात म्हणा किंवा पाण्याखाली आमचं राज्य होतं तेव्हा जमिनीवर डायनोसॉरचं राज्य होतं.मात्र आम्हा दोघांनांही ते ठाऊक नव्हतं.ते असतं तर…यापृथ्वीवर आम्ही इतर कुणाचच राज्य येऊ दिलं नसतं! हा हा हा(कल्पना विलासात रमायला काय जातं?)
सुरेश वांदिले
