उजव्या सोंडेचा गणपती
उजव्या सोंडेचा गणपती आपल्या घरी कां नाही, असा प्रश्न रमाने आईला विचारला. आईनं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं. आजी म्हणाली की, अशा उजव्या सोंडेच्या गणपतीचा पूजा-अर्चा करणं जरा कठीण असतं. जरा इकडे तिकडे झालेलं त्याला चालत नाही.
इकडे-तिकडे म्हणजे गं काय, रमाने आजिला विचारलं.
म्हणजे कमी जास्त गं, त्याची पूजाअर्चा काटेकोर झाली नाही तर त्याला राग येतो म्हणे.
त्याला राग आला की तो शाप देतो म्हणे..असच ना आजी…रमा उत्तरली.
अगं, तू नको ते प्रश्न नकोस विचारु बुवा..आजी त्राग्याने म्हणाली आणि ती स्त्रोत म्हणण्यात गढून गेली.
आता रमाने आजोबांकडे मोर्चा वळवला. रमाच्या प्रश्नावर ते हसले. गूड क्वेश्चन म्हणून तिचं कौतुक केलं. चांगला प्रश्न विचारला म्हणून कॅडबरी चॉकलेट घेण्यासाठी दहा रुपये देऊन ते फिरायला निघून गेले.
रमाचा प्रश्न जिथल्या तिथेच राहिला.
आता राहिले बाबा. ऑफिसमधून आल्यावर बाबा चहा घेत. त्यावेळेस हा प्रश्न विचारायचा असं रमानं ठरवलं. त्याप्रमाणे बाबांना हा प्रश्न विचारला.
अगं, ते थकून आलेत,आता कशाला विचारतेस प्रश्न. उद्या विचारना, आई म्हणाली.
प्रत्येक प्रश्न विचारायलाच पाहिजे कां गं, देवाच्या बाबतीत तर प्रश्नच पडायला नको, आजी म्हणाली.
पण, रमाचे प्रश्न चांगले असतात हं, सूनबाई, आजोबा म्हणाले.
रमाने, आज विचारलेल्या प्रश्नानं सर्वांची दांडी उडवल्याचं बाबांच्या लक्षात आलं. आता आपली पाळी दिसतेय. उत्तर तर द्यायला हवं, असं स्वत:शीच बोलून त्यांनी रमाला प्रश्न विचारायला सांगितलं.
आई-आजोबा-आईला विचारलेला उजव्या सोंडेच्या गणपतीचा प्रश्न रमाने बाबांना विचारला.
बाबांनी तिला जवळ बोलावून घेतलं, तिच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवत म्हणाले,
काही अडचणिंच्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही तर फारसं बिघडत नाही बाळ.
पण बाबा, अडचण कुणाची? आईची, आजीची, आजोबाची की तुमची की उजव्या सोंडेच्या गणपतीची..त्याला जर इतकी अडचण वाटत असेल तर त्याने केलीच कशाला उजवीकडे सोंड, राहू द्यायची होती की डाविकडेच..रमा म्हणाली..
रमाच्या या बोलण्यानं घरात, टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली..
अच्छा, तर उजव्या सोंडेच्या गणपतीच्या प्रश्नात शांतता दडली आहे म्हणायची, असं स्वत:शीच बोलून रमा खुदकन हसली. घरातल्या इतरेजणांच्या चेहऱ्यावर स्मित आलं.
०००
.jpg)