(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“उद्यमी”चा फायदा

लघुउद्‌योग क्षेत्रात,  सर्वाधिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असल्याने, भारत सरकारने यावर ठळकरीत्या लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: आपले प्रधानमंत्री याबाबत फार आग्रही असतात. सर्व प्रकारच्या लघुउद्योग व्यवसायाला, सतत प्रोत्साहन देतात.

आपल्या दैनंदिन जीवनात, लघुउद्योग व्यावसायिकांना मोठे स्थान मिळू लागले आहे. लघुउद्योगातून उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे जीवनाचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास साहाय्य होते. या उद्योगाच्या उभारणीसाठी फारसे भांडवल लागत नाही. स्थानिक गरजा व आवश्यकता लक्षात घेऊन उद्योग /व्यवसाय सुरु केल्यास व त्यासाठी स्थानिक उपलब्ध कच्चा माल व संसाधने वापरल्यास नफ्याचे प्रमाण मोठे राहते. लघुउद्योग व व्यवसायांना प्रोत्साहन दिल्याने देशातील उद्योजकतेचा मोठा विकास होऊ शकतो, ही बाब अनेक शासकीय समित्यांनीसुध्दा लक्षात आणून दिली आहे.

काही छोट्या उद्योग/ व्यवासायातून रोजगार  व स्वयंरोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अशा काही व्यवसायांचे प्रारुप (मॉडेल), भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालयाने (एमएसएमइ- मायक्रो, स्माल ॲण्ड मिडियम एन्टरप्राइज) तयार केले आहे. ही मॉडेल्स, “उद्यमी” पोर्टलवर ठेवण्यात आली आहेत.

उद्यमी (UDYAMI-अल्टिमेट ड्रिम ऑफ यंग ॲण्ड मॉर्डन इंडिया) या वेबपोर्टलची निर्मिती, एमएसएमइ मार्फत करण्यात आली आहे. उद्योजकतेला चालना देण्यासाठी, या पोर्टलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. या वेबपोर्टलवर उद्योग/ व्यवसायासाठी उपयुक्त ठरु शकणारी माहिती- (१) इंडस्ट्रिअल सोल्युशन्स, (२) इडिपी (आंत्रप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) ट्रेनिंग, (३) प्रोजेक्ट रिपोर्ट्स , (४) स्किम, (५) वर्कशॉप, (६) रजिस्ट्रशेन, (७) हेल्पलाइन, या शीर्षकांखाली ठेवण्यात आली आहेत.

वेगवेगळया व्यवसायाचे मॉडेल https://www.udyami.org.in/industrial-solution/small-business-models संपर्कसाखळीवर बघायला मिळते. या या साखळीवरील “हाऊ टू स्टार्ट यूवर ‍बिझीनेस?” या लिंकवरील,  “रजिस्टर नाऊ” या बटन‍वर क्लिक केले की, थेट https://www.udyami.org.in/login या पोर्टलवर पोहचतो. या पोर्टलवर, “उद्योजकता विकास कार्यक्रम (आंत्रप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम)” ही लिंक दिसते. या ‍ लिंकवर जाऊन, लॉगईन करु शकतो किंवा प्रशिक्षणासाठी नाव नोंदवू शकतो.

कृषीमालावर आधारित व्यवसाय

कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकांनांमध्ये, प्रकिया केलेले काजू, सोप, मिरची पावडर, विविध प्रकारची पापडे, टोमॅटो सॉस, चटण्या, मसाले लोणची, अशी विविध उत्पादने असतात. या सर्व उत्पादनांची निर्मिती, कृषीआधारित प्रकिया व्यवसाय किंवा उद्योगांव्दारे केली जाते. या सर्व उत्पादनांना मोठी ग्राहकी लाभते. कृषी आधारित, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायासातून रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या उत्तमोत्तम संधी निर्माण होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन, “उद्यमी,” मार्फत प्रोत्साहन दिले जाते. त्याअनुषगांने विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. या योजनेचा लाभ, प्रधानमंत्री रोजगार र्निमिती कार्यक्रम योजनेंतर्गत, अर्थसाहाय्य करुन दिले जाते.

देशाच्या औद्योगिक विकासामध्ये, कृषी आधारित प्रकिया उद्योगाचा मोठा हातभार लागतो. या उद्योगामध्ये शेतीतील कच्च्या मालावर प्रकिया केली जाते. याप्रकिया उद्योगांमध्ये कृषी, वने आणि मासोळीपासून निर्मित वस्तुंच्या समावेश होतो.

प्रशिक्षण संधी

“उद्यमी’ प्रशिक्षण योजनेंतर्गत पुढील, अन्नप्रक्रिया उद्योगांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे- (१) मसाले तयार करण्याचा उद्योग, (२) टोमॅटो केचअप निर्मिती उद्योग, (३) टोमॅटो पुरी निर्मिती उद्योग, (४) बहुधान्य (मल्टीग्रेन) प्रकिया उद्योग आणि पॅकेजिंग, (५) काजू                            प्रकिया व्यवसाय, (६) किशमीश प्रकिया व्यवसाय, (७) पेठा निर्मिती व्यवसाय, (९) जिरा निर्मिती व्यवसाय, (१०) धने पावडर निर्मिती व्यवसाय, (११) गुळपावडर निर्मिती उद्योग, (१२) काळा तांदूळ  प्रकिया व्यवसाय, (१३) मिरी पावडर निर्मिती व्यवसाय, (१४) बाजरी स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (१५) मसाला चहा निर्मिती प्रकिया, (१६) चिकोरी प्रकिया व्यवसाय, (१७) ग्रीन टी प्रकिया व्यवसाय, (१८) रोस्टेड मखाना प्रकिया व्यवसाय, (१९) तिखट निर्मिती व्यवसाय, (२०) सोप स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२१) उदीड दाळ पापड निर्मिती व्यवसाय, (२२) जिरे स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२३) फळ लगदा (पल्प) प्रक्रिया व्यवसाय, (२४) सत्तू पावडर प्रक्रिया व्यवसाय. (२४) बटन मशरुम व्यवसाय, (२४) दही प्रकिया उद्योग, (२४) तूप प्रकिया उद्योग.

हे उद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना, संबंधित उद्योग/व्यवसायाची माहिती ‘उद्यमी,’ प्रशिक्षण पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते. या पोर्टलवरच या उद्योग आणि व्यवसायाचे, प्रशिक्षण मॉड्यूल ठेवण्यात आले आहेत.खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या मार्गदर्शक सूचीनुसार प्रशिक्षण मॉड्युल तयार करण्यात आले आहेत.

त्याव्दारे पुढील व्यवस्थापकीय आणि कार्यान्वयन कौशल्याचे ज्ञान प्रदान केले जाते- (१) व्यवसाय नियोजन, (२) विपणन, (३) वित्त, (४) कार्यान्वयन, (५) निर्मिती, (६) विपणन, (७) ब्रँडिंग, (८) उद्योजकता व्यवस्थापन, (९) बँकिंग, (१०) माहिती तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवसाय, (११) बूककीपिंग, (१२) व्यवसायातील जोखिम आणि शास्वतता, (१३) शासकीय योजनांसाठी वैधानिक पूर्तता.

प्रशिक्षणाचे व्हिडियो इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगु, तमिळ, मल्‍याळम, कन्नड या भाषेत उपलब्ध आहेत. अभ्यासाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात उपरोक्त नमूद भाषेत उपलब्ध करुन दिले जातात. मूल्यांकनसुध्दा मराठी व उपरोक्त नमूद भाषांमध्ये उपलब्ध आहे. मूल्यांकनासाठी बहुपर्यायी प्रश्नसंच असतात.

अर्थसाहाय्य

प्रकिया उद्योगाला अर्थसाहाय्य देण्याची योजना, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकता मंत्रालयाच्या वतिने, केंद्रिय खादी आणि ग्रामोद्योग विभागामार्फत राबवली जाते. राज्यपातळीवर, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकामार्फत, ही योजना राबवली जाते. खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत वित्तीय साहाय्य, नोडल बँकांव्दारे केले जाते. या योजनेव्दारे, ग्रामीण आणि नागरी विभागात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याची क्षमता असणारे छोटे औद्योगिक घटक आणि प्रकल्पांची स्थापना व्हावी, असे अपेक्षित आहे. या योजनेव्दारे, ग्रामीण भागातील कुशल कारागिर आणि बेरोजगार युवकांसाठी त्यांच्याच परिसरात शास्वत स्वरुपाच्या, रोजगार संधींची निर्मिती, १८ वर्षावरील कोणत्याही इच्‍छुक व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पनाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

संपर्क- (१) हेल्पलाइन- ९११८१३३५१३५, संकेतस्थळ- https://www.udyami.org.in/industrial-solution/agro-based-food-processing#

हेल्पलाइनच्या माध्यमातून पुढील सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात- (१) नोंदणी                               संदर्भातील विविध समस्यांचे निराकरण, (२) प्रशिक्षणासंदर्भातील तांत्रिक समस्यांचे निराकरण, (३) मूल्यांकनासंदर्भातील समस्यांचे निराकरण, (४) प्रमाणपत्राची निर्मिती आणि तपासणी, (५) व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन, (६) औद्योगिक कागदपत्रे, (७) तज्ज्ञांच्या मार्गदर्शन मालिका, (८) प्रकल्प अहवाल. हेल्पलाइनच्या, कॉलसेंटरची सेवा दररोज सकाळी व ते रात्रौ ९ वाजेपर्यंत सुरु राहते.

ऑनलाइन प्रशिक्षण

उपरोक्त नमूद व्यवसाय प्रारुपाच्या अनुषंगाने ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय. यामध्ये- (१)‍ विषयाची  तोंडओळख, (२) नव्या व्यवसाय घटकाची सुरुवात, (३) विविध वैधानिक व व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्रे, (४) उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्यसंचाची निर्मिती, (५) उद्योग/व्यवसायाची उभारणी, (६) उद्योग/व्यवसायाला प्रत्यक्ष कार्यान्वीत करणे, (७) मार्केटिंग (विपणन), ब्रँडिंग (नाममुद्रा) ठसवणे, सेल्स (विक्री), (८) बँक व वित्तपुरवठा समजून घेणे, (९) करआकारणी व इतर वैधानिक बाबी, (१०) व्यवसायाची शास्वतता व  विकास, (१०) सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योजकतेला उपयुक्त ठरणाऱ्या शासकीय योजना, या विषयांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाचा आराखडा तयार करणे, स्वयंरोजगाराचे फायदे समजून घेणे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची महत्वाची वैशिष्ट्ये जाणून घेणे, यशस्वी उद्योजकांकडे असणाऱ्या कौशल्यसंचाची माहिती करुन घेणे, उद्योग किंवा व्यवसायास उभारणीसाठी आवश्यक असलेले टप्पे माहीत करुन घेणे, निवडलेल्या प्रकल्पाची व्यवहार्यता जाणून घेणे, निर्मिती व्यवस्थापनातील घटक, उद्योग/व्यवसायासाठी लागणाऱ्या वित्तीय बाबींचे विश्लेषण, विपणन  व्यवस्थापातील महत्वाच्या घटकांची ओळख करुन घेणे, व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक विविध वैधानिक बाबीची माहिती करुन घेणे, व्‍यवसाय वाढीचे टप्पे समजून घेणे, या महत्वाच्या, घटकांच्या संकल्पना स्पष्ट होतात. या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी लागते. वेबपोर्टलवर तशी सुविधा आहे.

संपर्क- टोल मुक्त क्रमांक-१८००१०३८९११, व्यवसाय नोंदणीसाठी क्रमांक- ७५२६०००३३३, ईमेल- helpdesk@udyami.org.in

सुरेश   वांदिले