उसे छोडो, बढो आगे
समीरला सर्वत्र नसली तर बऱ्याच ठिकाणी नाक खुपसण्याची सवय आहे. ही सवय वाईट असते, असं त्याचा एक्झ-वाय-झेड काका आणि अ-ब-क मामा कधीतरी म्हणाला होता. पण नाक खुपसलं की काहीतरी मौल्यवान हाती गवसतं, मेंदुला खुराक मिळतो अशा आशयाचं, एडिसन काका आणि आईनस्टाईन आजोबांचं एक वाक्य त्याच्या आवडत्या विज्ञान सरांमुळे कानावरुन गेलं होतं. एक्स-वाय-झेड काका आणि अ-ब-क मामांपेक्षा एडिसन काका आणि आईनस्टाईन आजोबा भारदस्त आणि वजनदार असल्याने आणि त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याआधी पन्नास वेळा विचार करावा लागत असल्यानं, समीरने एडिसन काका आणि आइनस्टाइन आजोबांच्या मार्गावरुन जाण्याचं ठरवलं. त्यामुळे त्याच्या मते या नाक खुपसण्यासाला वजन आणि वळण प्राप्त झालं होतं.
मात्र, इतरांना त्याचं अवचित नाक खुपसणं हे काट्यासारख टोचणारं आणि सलणारं असल्याचं वाटायचं. अशी मंडळी जेव्हा नाक खुपसण्यावर कुरकूर -कटकट-वटवट करत तेव्हा, त्याचं एडिसन आणि आईनस्टाईन (ट्रम्प) कार्ड तयारच असायचं.
०००
या नाक खुपसण्यामुळे समीरची सकाळ प्रश्न पडण्यापासूनच व्हायची. रात्री झोपताना सुध्दा एखादा प्रश्न पाडून तो दिवसाचा शेवट करायचा.
या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात दिवसभर त्याची भटकंती आई-बाबा-भाऊ-ताई-काका-आजी-सर-मॅडम-किंवा घरी येणारा कुणीही यांच्यापर्यंत चालायची. त्याला कधीकधी काही प्रश्नांची उत्तर मिळायची. मात्र बरेचदा काही प्रश्नांमुळे त्याच्यावरच प्रश्न निर्माण केले जात. उदा-इतका अतिशहाणा कधीपासून झालास रे तू? किंवा मग स्वत:ला प्रति न्यूटन समजतोस की एपिजे अब्दूल कलाम, असे तिखट प्रश्न त्याच्यावर सोडून संबंधित मंडळी हळूच समीरच्या प्रश्नमाऱ्यातून सुटका करुन घेत. मात्र अशावेळी तो अजिबात निराश होत नसे आणि हताश सुध्दा होत नसे. कारण त्याच्या मदतीला एडिसन काका आणि आईनस्टाईन आजोबा येत. उसे छोडो, बढो आगे, असा या दोघांचा सल्ला त्याला बरोबर त्यावेळी आठवायचा. त्यामुळे नाक खुपसण्याची समीरची क्रिया पुढे पुढे आणखीणच टोकदार होत गेली.
०००
आता ही परवाची गोष्ट. अमेरिकेनं पाठवलेलं पर्सिव्हरंस रोव्हर यान फेब्रुवारी महिन्यात मंगळावर उतरलं. बग्गीसारखं असणारं हे यान मंगळावर उंडारणार. माती खणणार. या मातीत काही जीव जंतू दिसतात का ते बघणार. कुठे पाण्याचा थेंब दिसतो का ते शोधणार. धुळ चाखणार नि धुळ तपासणार. मंगळावर रात्रीच्या समयी आकाशात बघून मंगळ ग्रहाच्या पुढे आणखी ग्रह-तारे-आकाशगंगा दिसते का ते बघणार.. थोडक्यात काय तर त्यांची नुसती धम्माल चालणार. म्हणजे नवे नवे शोध घेण्यात मजा आणि धम्माल नसते का तशी. भविष्यात पृथ्वीवरच्या माणसांना फिरण्यासाठी किंवा कायमस्वरुपी राहण्यासाठी मंगळावर जाता येणं शक्य होईल का, हे सुध्दा हे यान बघणार. मॅन ऑन मिशन म्हणतात ना तसं हे मशीन ऑन मिशन होतं.
समीरच्या नाक खुपसणाऱ्या सवयीमुळे तो या दोन्ही यानावर नजर रोखून बसला होता आणि बाबांवर प्रश्नांचा मारा करत होता. बाबांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्नही केला. मात्र काही काळानंतर, बाबा के बस के बात नही, हे समीरच्या लक्षात आल्यावर, समीरने गुगलायला सुरुवात केली.
त्याच्या नाकाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर गुगल गुरुजी पटापट देत राहिले.
मंगळावर पर्सिव्हरंस रोव्हर यान ज्या दिवशी पोहचलं, त्याच दिवशी दुपारी समीरच्या घरी मंगळ ग्रहाने बरीच खळबळ माजवली आणि चिंतेचं वातावरण निर्माण केलं…
त्या दिवशी दुपारी गुरुजी घरी आले होते. बाबांनी समीरच्या मोठ्या बहिणीला लग्नासाठी सांगून आलेल्या मुलाची पत्रिका बघायला गुरुजिंना बोलावलं होतं. मुलगा चांगला शिकला होता. अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्रात चांगल्या पदावर होता, कुटंबीय चांगले होते. मात्र त्याच्या पत्रिकेतला मंगळ नावाचा ग्रह, समीरच्या मते मांजर, आडवी जात होती. गुरुजींनी सल्ला दिला, मुलाच्या पत्रिकेत मंगळ असल्यानं, लग्न न झालेलं बरं..हे त्यांचं वाक्य समीरच्या कानानं बरोबर टिपलं. त्याने प्रत्यक्षातल्या मंगळावरची दृष्टी काढली. गुरुजींच्या समोर तो दत्त म्हणून उभा ठाकला. त्याने त्यांच्या पुढ्यातील पत्रिकेतल्या मंगळावर नाक खुपसलं.
गुरुजी, मंगळ चांगला नाही म्हणजे हो काय.
म्हणजे चांगला नाही. गुरुजी म्हणाले.
तुम्ही बघितलाय का त्याला.
हा काय…गुरुजींनी पत्रिकेतील एका घरात बोट ठेऊन दाखवलं.
हा तर चौकन झाला..
तो तिथेच असतो.
मी दाखवू का तुम्हास खरा मंगळ,
आँ..
मग मंगळावर पोहचलेल्या दोन्ही यानांनी पृथ्वीवर पाठवलेल्या छायाचित्रांची क्लिप समीरने दाखवली.
प्रत्यक्षातला मंगळ आणि चौकोनातला मंगळ यात कोणताच ताळमेळ बसत नाही गुरुजी.
ऑ..गुरुजींची पुन्हा ऑ फाकला…
मग कोणता मंगळ खरा माणायचा. आकाशात असणारा खरा खुरा मंगळ खरा की पत्रिकेतला आभासी मंगळ…
आँ…
अरे, नको तिथे नाक खुपसतोस कशाला..आई रागावली.
अगं आई, नाक खुपसतो म्हणून मला हा खरा मंगळ दिसला की नाही. तुम्ही नाक खुपसत नाही म्हणून तुम्हाला कागदावर चौकोनातलाच मंगळ दिसतो. चौकोनातला कागदी मंगळ डेंजरस असेलही, पण प्रत्यक्षातला मंगळ मानवाला आपल्याकडे आकर्षित करणारा. अजिबात डेंजरस नसलेला आहे. आता तुम्हाला, खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजायचं असेल तर मग, नसिब अपना अपना..समीर असं बोलून गेला..
आई- बाबा आणि गुरुजींचे चेहरे एकाच वेळी चौकोनी झाले.
सुरेश वांदिले
.jpg)