नॅशनल टेस्टिंग एजंसी (राष्ट्रीय परीक्षा संस्था) – एनटीए, या संस्थेची स्थापना केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेमार्फत, आयटीआय (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), एनआयटी ( नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), एनआयएफटी( नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी), एआयआयएमएस (ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस) केंद्रिय विद्यापीठे, इतर शासकीय संस्थांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, चाळणी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमधील गुण बऱ्याच खाजगी संस्थाही, प्रवेशासाठी ग्राह्य धरतात. या परीक्षांना देशभरातील लाखो विद्यार्थी बसतात. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना, या परीक्षा देणे अधिक सोईचे आणि सुलभ जावे यासाठी संस्थेने, “अभ्यास ॲप” नावाचे ॲप विकसित केले आहे. हे ॲप, गुगल स्टोअरवरुन डाऊनलोड करता येते. सध्या या, ॲपवर वैद्यकीय (नीट- नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञान (जेइइ- जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) या परीक्षांची अभिरुप (मॉक टेस्ट) चाचणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कृत्रिमप्रज्ञेचा वापर
या ॲपमध्ये कृत्रिम प्रज्ञे (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) चा वापर करण्यात आला आहे. या ॲपव्दारे विद्यार्थी वेगवगळया परीक्षांचे मॉक टेस्ट देऊ शकतात. या चाचणीचा निकाल त्वरीत दिला जातो. या ॲपमधील कृत्रिम प्रज्ञेव्दारे विद्यार्थ्यांच्या, अभ्यासातील कमकुवत बाजूंना तत्काळ निदर्शनास आणले जाते. त्यामुळे पुढील चाळणी परीक्षेमध्ये सुधारणा करता येणे शक्य होऊ शकते. स्वयंअध्ययन आणि स्वंयसुधारणेसाठी हे ॲप उपयुक्त ठरु शकते.
नीट आणि जेइइ, या परीक्षांच्या तयारीसाठी हे ॲप चांगले उपयुक्त ठरु शकते. या ॲपमध्ये, या दोन्ही परीक्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमां(सिलॅबस)वर आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांनी तयार केल्या असतात. या प्रश्नपत्रिका, एआयच्या मदतीने तपासल्या जात असल्याने संबंधित विद्यार्थी, कोणत्या टॉपिकवरील प्रश्नांमध्ये अडखळतात किंवा अडचणित येतात, ही बाब लक्षात येते. त्यानुसार तज्ज्ञांमार्फत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
ॲपचे फायदे
या ॲपचा काळजीपूर्वक वापर केल्यास पुढील, चार प्रकारे फायदा होऊ शकतो. (१) निष्काळजीपणामुळे होणाऱ्या चुकांमध्ये लघणीय घट होते, (२) वेळेचे व्यवस्थापन सुधारते किंवा वेळेचा अधिक अचुकपणे वापर करता येतो, (३) प्रश्न सोडवण्याची गती आणि अचुकतेत वाढ होते, (४) परीक्षा देण्याच्या व्युहनीतीत प्रभावीपणे बदल करण्याची क्षमता प्राप्त होते.
“अभ्यास ॲप,” कसा डाऊनलोड करायचा? त्याचा वापर कसा करायचा? याविषयी एक व्हिडियो https://nta.ac.in/Abhyas या संपर्क साखळीवर ठेवण्यात आला आहे. तो स्वंयस्पष्ट असून त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास, या ॲपचा प्रभावीपणे वापर करता येणे शक्य आहे.
हे ॲप कोणत्याही अँड्रॉइन मोबाइल किंवा उपकरणांमध्ये डाऊनलोड करता येते.
https://nta.ac.in/abhyas/help आणि https://nta.ac.in/Abhyas/started-या संपर्कसाखळीवर, या ॲप विषयी, विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
००००
सराव केंद्रे
एनटीएच्या परीक्षा या कॉम्प्युटरबेस्ड म्हणजेच संगकाधारित असल्याने, त्या सर्वच विद्यार्थ्यांना सुलभतेने देणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने एनटीएला, देशात सर्वत्र आणि विशेषत: ग्रामीण भागात, टेस्ट केंद्रे उभारणे बंधनकारक केले आहे. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाधारित परीक्षांच्या सरावाची सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जाते. या सरावात, लॉग इन करणे, संगणकावरील विस्तृत माहिती नजरेखालून घालणे, प्रत्यक्ष पेपरची स्क्रीनवर हाताळणी, माऊसचा वापर करुन एका प्रश्नावरुन दुसऱ्या प्रश्नावर जाणे, उत्तरे दुरुस्त करणे, पुनर्तपासणी करणे या बाबींचा समावेश आहे. या सरावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेपर सोडवण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो.
या केंद्रांच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्रे आपला सहभाग देऊ शकतात. यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेला www.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. या संकेतस्थळावरील, ट्रेनिंग प्रॅक्टिस सेंटर: रजिस्ट्रेशन (training practice center) या लिंकवर जाऊन अशी नोंदणी करता येते किंवा मग nta.ac.in/PC या लिंकवर जाऊन अर्ज भरावा व तो सबमिट किंवा सादर करावा.
टेस्ट प्रॅक्टिस सेंटरची सुविधा मिळवण्यासाठी संबंधित संस्थेकडे पुढील बाबींचा समावेश असावा- (१) आवश्यक सॉफ्टवेअरसह किमान ३० संगणक, (२) सर्व संगणकांना इंटरनेट जोडणी, (३) विजप्रवाह खंडीत झाल्यास किमान ३० मिनिटांसाठी अखंडीत उर्जा/वीज पुरवठ्याची सुविधा, (४) आवश्यक फर्निचर, (५) आवश्यक प्रयोगशाळा किंवा सरावाची खोली, (६) आवश्यक मनुष्यबळ
या केंद्रांनी, ही माहिती विद्यार्थ्यांना पुरवून, मॉक टेस्ट देण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. टेस्ट प्रॅक्टिस केंद्र घेऊ इच्छिणाऱ्या केंद्रांना, एनटीएसोबत सामंजस्य करार करावा लागेल.
इच्छुक विद्यार्थी nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन, अशा केंद्रासाठी नोंदणी करु शकतो किंवा गुगल प्लेस्टाअरवर जाऊन, एनटीए स्टुडंट ॲप डाऊनलोड करु शकतो. या ॲपवर सराव केंद्रासाठी नोंदणी करण्याच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. सरावाची सुविधा मोफत असल्याने कोणत्याही सराव केंद्राला विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारता येणार नाही. या सराव केंद्रावर जाऊन कितीही वेळा सराव परीक्षा देता येते. विद्यार्थी त्याच्या सोइनुसार वेळ निर्धारित करु शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या नजिक असलेल्या केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शक्यतो प्रयत्न केला जातो. प्रत्येक सराव केंद्र, एनटीए संकेतस्थळ- nta.ac.in/Central/Login शी लॉगइन करुन सराव परीक्षेचे साहित्य मिळवू शकतात.
या केंद्रामधून सराव परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एसएएमस किंवा इमेलव्दारे त्याचा टाइम स्लॉट (पेपरचा वेळ) २४ किंवा ४८ तास आधी कळवला जातो. या अनुषंगाने काही अडचणी आल्यास पुढील ईमेल आणि भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येतो. ईमेल-tpcntaexams@gmail.in आणि भ्रमणध्वनी-tpc@nta.ac.in, ९३५४९४६४२२, दूरध्वनी-०११-४०७५९०००
०००
पेपर सराव सुविधा
nta.ac.in/download या संपर्कसाखळीवर २०२० सालापासूनचे प्रत्यक्ष पेपर ठेवण्यात आले आहेत. हे पेपर वेगवेगळया भाषा व वेगवेगळया सत्रांमधील आहेत. हे पेपर डाऊनलोड करुन विद्यार्थी याचा उपयोग सरावासाठी करु शकतात. यामुळे पेपरपध्दती, प्रश्नांचे प्रकार, प्रश्नांची काठिण्यता यांचा परिचय होतो. दिलेल्या वेळेत किती प्रश्न अचुकतेने सोडवता येतात, हे कळते. हे पेपर महाविद्यालयातील किंवा कोचिंग क्लासच्या अध्यापकांकडून तपासून घेतल्यास विषयघटकातील नेमक्या चुका कळतात. त्या घटकांवर अधिक भर देता येणे शक्य होते. संकल्पना अधिक स्पष्ट करुन घेता येतात.
या प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी असून, यातील कोणतेही प्रश्न पुन्हा, जसेशा तसे विचारले जात नाही नाहीत, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक टॉपिक, महत्वाचा असल्याचे, हे पेपर सोडवल्यावर लक्षात येऊ शकते. त्यामुळे, एखाद्या वर्षी एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारले नसतील, तर त्याच टॉपिकवर दुसऱ्यावर्षी प्रश्न विचारले जातीलच असे ठामपणे सांगता येत नाही. त्याचबरोबर, याच टॉपिकवरचे प्रश्न येऊही शकतात, ही बाब सुध्दा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. या पेपरची उत्तरतालिका मिळाली तरी, त्याचा उपयोग करु नये. त्यामुळे सरावाचा मूळ उद्देश साध्य होणार नाही.
हा सराव पेपर घरीच सोडवायचा असल्याने, तो दिलेल्या वेळेत अगदी प्रत्यक्ष परीक्षेसारखाच द्यायला हवा. घरी असलेले कोणतेही अभ्यास साहित्य, मोबाइल आणि शिक्षकांची मदत अजिबात घेतली जाऊ नये.
याच संपर्कसाखळीवर, मॉक टेस्टही देण्यात आली आहे. याचा उद्देश प्रत्यक्ष परीक्षेची तोंडओळख होण्यासाठी आहे. यातील एकही प्रश्न, मूळ परीक्षेत विचारला जाईल याची शक्यता नसते. त्यामुळे पाठांतराच्या भानगडीत न पडलेले बरे. ही मॉक टेस्टसुध्दा प्रत्यक्ष परीक्षेच्या गांभीर्यानेच देणे आवश्यक आहे. तरच सरावाचा मूळ उद्देश साध्य होईल.
सुरेश वांदिले