एकत्र राहण्याचा आनंद
एके दिवशी आजीने तिच्या कपाटातून एक छायाचित्रं काढलं.तसं खूप खूप जुनं होतं.पण चकचिकत कागदावरचं ते चित्र जसच्या तसं वाटतं होतं.काढताना आणि ठेवताना इकडे तिकडे जरा फाटल्याच्या खुना होत्या.उत्सुकतेनं तेजोमयीनं ते चित्र बघितलं.अलेक्झांडर(द डॉगी)त्यावेळी तिथेच घुटमळत होता,त्यामुळे त्यानेही त्या चित्रात मान खुपसली.तुला काय कळतय असं त्याला म्हणायची सोय नव्हती.लगेच त्याचं रुसुबुवा झालं असतं.हे ठाऊक असल्याने तेजोमयीनं आधी त्यालाच ते डोळा भरुन पाहू दिलं.त्याचं समाधान झालं की तोच आपला हॅ हॅ करुन बाजूला व्हायचा.आताही तेच झालं.
समाधानी अलेक्झांडरने त्या चित्रावरुन नजर बाजूला केली आणि तो कपाटातील वस्तुंकडे बघू लागला, आणि तेजोयमी चित्र बघू लागली.चित्र होतं,महादेव पार्वतीमातेचं.कैलास पर्वतावर बसले होते दोघेही एका शिळेवर. त्यांच्या एका बाजूला कार्तिकेय स्वामी होते तर दुस-या बाजूला गणपती बाप्पा होते. तसं ते नेहमीचंच चित्र होतं.तेजोमयी ते चित्र आजीला परत देणार तोच पुन्हा तिला वाटलं की परत एकदा बघावं.तिला स्वत:चच हसू आलं.मग तिने ते चित्र पुन्हा बघितलं.तेव्हा तिच्या लक्षात आलं की महादेवांच्या गळ्याभोवती असलेले नागराज,उमुषक स्वामींकडे प्रेमाने बघताहेत.पार्वतीमातेचे वाहन असलेले वाघोबा,महादेवांच्या समोर बसलेल्या नंदीकडे बघून हसताहेत.कार्तिकेयांचं वाहन असलेले मोराचं लक्ष गणपत्ती बाप्पांच्या कमरेला करदोडी सारख्या लटकलेल्या नागराजांकडे अजिबातच नव्हतं.
असं पण घडू शकतं..उर्त्सुफर्तपणे तेजोमयी बोलून गेली..
काय घडू शकतं म्हणालीस तू बाळ..आजीनं विचारलं..तेव्हा तेजोमीयने आजिला महादेव,पार्वतीमातेच्या आसपास असणाऱ्या आंनदी प्राणी दाखवले.
आजीने ते निरखून बघितलं.
खरचं की गं, इतकं काही बारकाईन बघितलं नव्हतं गड्या इतक्या वर्षात..भारीच हुषार गं तू…तेजोमयीचं कौतुक करत आजी म्हणाली.कौतुकाचे बोल अलेक्झांडरला बरोबर कळत असल्याने त्यानेही मान हलवून आजीच्या म्हणण्यास होकार दिला.
आजी,नातीन आणि अलेक्झांडर कशात इतके दंग झालेत हे बघण्यासाठी आई आणि बाबा थोड्यावेळाने आजीच्या खोलित डोकावले.तेव्हा तेजोमयीने आईबाबांना ते चित्र दाखवून,खरचं असं घडू शकतं असं बाबांना विचारलं..
तुला काहीही प्रश्न पडतात हं तेजो.अगं ते देवाचे प्राणी आहेत.ते एकमेकांकडे आनंदानेच बघणार..आई हसत म्हणाली.
तसं नाही गं आई..देवाचे प्राणी असले तरी हे प्रत्यक्षात एकमेकांचे वैरी असलेले प्राणी आनंदात सोबत राहतात हे तुला महत्वाचं वाटत नाही का?
मला कशाला वाटेल बरं तसं.अगं, महादेव,पार्वतीमाता, कार्तिकेय स्वामी आणि बाप्पांनी आपले वाहन असलेल्या व जवळ असणाऱ्या प्राण्यांना प्रेमानं,आनंदानं राहण्याचं,एकमेकांवर कुरघोडी न करण्यास सांगितलं असणार ना.तसं केलं तर हाकलून लावू अशी धमकीही दिली असणार कदाचित..आई म्हणाली.
अगं सुनबाई,असं धमकीने कुणी आनंदांन एकत्र राहत कां?आजी चर्चेत हस्तक्षेप करत म्हणाली..
हे प्राणी एकत्र गुण्यागोविंदाने राहतात हे महत्वाचं.तसं आपलं कां घडू नये बाबा..तेजोमयीनं बाबांना विचारलं.
आपलं म्हणजे?बाबांनी चमकून विचारलं.
म्हणजे आपण आनंदानं एकत्र राहत नाही असं म्हणायचय का तुला.आई म्हणाली.यावर आजीच्या चेह-यावर स्मित आलं.अलेक्झांडरने मान वर करुन आईकडे बघितलं.
ठोंब्या आगावूपणा करु नकोस.आई त्याला रागावून म्हणाली.
अगं,त्याने काय आगावूपणा केला.बाबांनी विचारलं.हाच प्रश्न अलेक्झांडरच्या मनी आला होता.आई कधीकधी फार विचित्र वागते बाँ.असं स्वत:शीच बोलून त्यांने डोळे मिटून घेतले.
अलेक्झांडरने काय आगावूपणा केला हे आईला सांगता आलं नाही.ती चूप राहिली.तेव्हा आईच्या गळयात पडत तेजोमयी म्हणाली,अगं या चित्रातून महादेव आणि पार्वती एकत्र राहण्याचा नव्हे तर आनंदाने एकत्र राहण्याचा संदेश देतातहेत असं मला वाटू लागलंय..बरोबर ना बाबा..
अगदी बरोबर..
तसच राहण्याची सदबुध्दी सर्वांना दे महादेवा.आजीने फोटोला हात जोडत प्रार्थना केली.
सुरेश वांदिले
