एका भूताची प्रेमकथा
महाराणी महाराणी हे चाललय तरी काय, महाराज अतिव रागाने महाराणींना म्हणाले.
काय चाललय म्हणजे महाराज . मला तर इथे तुमच्याशिवाय कुणीही चालताना दिसत नाही.महाराणी म्हणाल्या.
अहो महाराणी, आम्ही आमच्या चालण्याबद्दल विचारायला काही रॅम्पवर चालणाऱ्या ,ऐश्वर्या रॉय किंवा कतरिना कैफ सारख्या सुंदऱ्या नाही आहोत म्हंटलं.
दॅट इज ओके महाराज, रॅम्पवर सुंदऱ्या चालत नाहीत तर त्या कॅटवॉक करतात. तुम्ही जे चालता ते डॉगवॉकच्या सुध्दा श्रेणीत येत नाही.
महाराणी, विषयास बगल देऊ नका आणि हे आजचे वर्तमानपत्र बघा.
कशासाठी आम्ही आमच्या डोळयांना शिण द्यावा महाराज.
अहो महाराणी, डोळयाला शिण द्या अन्यथा आम्हाला आमच्या डोक्याच्या झिंज्या ओढाव्या लागतील.
नको नको महाराज, असं काही आततायी कृत्य करु नका. आताच तुमच्या डोक्यावर अल्पस्वल्प केस शिल्लक राहिले आहेत, ते महाभृगूंराज की नवरत्न की शिकेकाईने हे जरी सांगता येत नसलं तरी, ही केसांची श्री-(चिल्लर)–शिल्लक गेली तर तुमच्या डोक्यावरील वाळवंट बघण्याचं पाप आमच्या माथी लागेल. म्हणून तुम्ही जे काही सांगता आहात, ते डोळयांना शिण आणि डोळयांना इजा होण्याची शक्यता असताना सुध्दा आम्ही वाचणार आहोत.
देवा किती तुझे आभार माणू रे, असे म्हणून महाराजांनी महाराणींच्या हाती आजचं वृत्रपत्र डकवलं.
००००
एका आटपाट नगरातील टिनपाट महाराज आणि महाराणींच्या महालात ही घटना घडत असल्याचं एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. महाराज टिनपॉट असोत की बिनबुडाचे असोत. महाराज हे महाराजच असतात. त्यांच्या सौभाग्यवती या महाराणीच असतात. तर अशा महाराजांचं आपल्या महाराणीवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं. म्हणजे किती होतं, असं जर समजा त्यांना विचारलं तर, ते सागर मे जितना जल, तितके लिटर माझं प्रेम, असं कधी सांगत नसत. किंवा वाळवंटात जितकी टन वाळू तितके टन माझे प्रेम, असही सांगत नसत.
याविषयी एकदा त्यांची प्रधानजींसोबत गहन चर्चा झाली. चर्चेच्या दरम्यान ते प्रधानजींना म्हणाले,
प्रधानजी, महाराणींवरील आमचं प्रेम हे भूतासारखं आहे.
आँ, प्रधानजी दचकलेच. ते ताडदिशी आसनावरुन उभे राहिले. थरथर कापायला लागले.
अहो, प्रधानजी असं भूत पाहिल्यासारखं कां दचकलात.
महाराज, आम्ही भूत तर कधी बघितलेलं नाही. भविष्यात बघण्याची शक्यताही नाही. पण तुम्ही तुमच्या प्रेमाला भूताच्या रांगेत बसलवल्याचं कानी पडताच, ही आमची अशी अवस्था झाली.
प्रधानजी, प्रधानजी अहो, भूत कधी काय कुणाला दिसू शकतं का ? नाही ना, मग आमचं प्रेमसुध्दा कसं कुणाला दिसू शकणार ?
म्हणजे तुमचं प्रेम हे भूतप्रेम समजायचं का महाराज ? प्रधानजी चाचरत बोलले.
प्रधानजी, तुम्ही असं घाबरु नका हो. प्रधानानं कसं स्पष्ट बोललं पाहिजे. तुम्ही तर आम्हाला काय आवडेल किंवा नाही आवडेल असं बघून बोलण्याचा प्रयत्न करताहात. किती अवघड झालय बघा तुम्हाला. असा अवघडलेला प्रधान कसा काय आमच्या टिनपॉट असले तरी आटपाट नगराची काळजी घेणार ?
म्हणजे महाराज..
तुम्ही आजपासून सेवामुक्त प्रधानजी.
महाराजांची ही वाणी ऐकून, उभे राहिलेल्या प्रधानजींची वाचाच गेली. ही वाचा प्रेमाची भाषा समजू न शकल्यानं की प्रत्यक्ष भूतामुळे, याचं रहस्य काही अद्याप उलगडलेलं नाही.
०००
महाराणींपासून अशा गोष्टी लपून थोडेच राहणार. त्यांनी याचा जाब महाराजांना विचारायचा प्रयत्न केला तर, प्रधानजी आपके है कौन असा सवाल, महाराजांनी महाराणींच्या पुढ्यात टाकला.
महाराजांचं आपल्यावर खूप खूप प्रेम असतानाही मध्येच ते असं मानगुटीवर एखादा भूत बसल्यासारखं का वागतात, हा सवाल महाराणींना सतत त्यांच्या अशा वागणुकीमुळे पडत असे. महाराजांचे प्रेम जोपर्यंत मिठी नदीसारखे गढूळ आणि प्रदुषित होत नाही तोपर्यंत, प्रधानजी मसनात गेला काय नि सेनापती गटरात पडला काय, आपल्याला काय त्यांचं, असा सुज्ञ विचार करुन महाराणींनी या विषयाचे अनेक प्रकरणं होणार नाहीत, याची दक्षता घेतली.
महाराजांचे महाराणींवरील प्रेम हे न दिसणाऱ्या भूतासारखं आहे, असं कर्नोपकर्णी आटपाटनगरात पसरलं. महाराज पहले दिलसे गया आणि आता दिमागसेभी गया अशी चार ओळींची चर्चा बरेच दिवस आटपाट नगरी रंगली..
०००
काही उत्साही प्रजाजनांनी या कथित भूताचा शोध घेण्याचा संकल्प केला. काहींनी प्रत्यक्ष कामही सुरु केलं. काहींना असं वाटू लागलं की, आपला राजाच हा भूत असला पाहिजे. काहींनी गुपचूप दरबारात येऊन महाराज उलट्या पायानं चालतात का आणि ३६० अंशांच्या कोनातून मान वळवतात काय, याची चाचपणी करुन घेतली. पण महाराजांकडे हे दोन्ही अंग नव्हते. आपला महाराज हा फोकनाड झाडतो याची खात्री पटून भूताचा शोध घेण्याचा नाद सुज्ञ प्रजाजनांनी सोडून दिला. अज्ञ प्रजाजन मात्र अद्यापही भूताचा शोध लागेलच, या आशेवर आहेत. असल्या भूताखेताच्या चर्चेत प्रजा रंगली आणि गुंगली की त्यांना त्यांच्या दैनंदिन दु:खाचा विसर होतो. हे किती बरं पुण्याचं काम, असं एके दिवशी महाराजांनी स्वत:लाच सांगितलं आणि भूताची चर्चा आणि शोधकार्य कायमस्वरुपी सुरु राहील याकडे विशेष लक्ष पुरवलं.
०००
महाराणींवर, असं न दिसणाऱ्या भूतासारखं प्रेम करणाऱ्या महाराजांनी आज जेव्हा ताजे वर्तमानपत्र महाराणींना वाचण्याची गळ घातली, तेव्हा आधी फारशा उत्सुक नसलेल्या महाराणी यांनी बळेबळे पहिल्या पानावर नजर फिरवली.
पहिल्या पानावरचे शीर्षक होते,
महाराणी पडल्या एका भूताच्या प्रेमात.
वृत्त असे होते,
आटपाट नगरच्या सुविद्य महाराणी, या एका भूताच्या प्रेमात पडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. हे भूत आटपाट नगरचे आहे की बाजूच्या नगरचे आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. शिवाय हे भूत राजघराण्यातील आहे की सरदार घरण्यातील आहे की सामान्य नागरिकाचे आहे ही बाबसुध्दा हे वृत्त लिहिपर्यंत आणि आजचे वर्तमानपत्र मुद्रणाला जाईपर्यंत स्पष्ट झालेले नाही. महाराणींना, असे एका भूताच्या प्रेमात कां पडावे वाटले असावे, यावर आटपाट नगरातील थोर विव्दान विचारमंथन करायला लागले आहेत. काहींचे म्हणणे असे पडले की, भूताच्या आडोशाने महाराणींना विंचू मारावयाचा आहे. मात्र हा विंचू नेमका कोण, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भूताच्या प्रेमाच्या कथित घटनेकडे संशयाने बघायचे की संशोधनाच्या नजरेतून बघावयाचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
हे वृत्त वाचताना, महाराजांचे सूक्ष्म लक्ष महाराणींच्या चेहऱ्याकडे होते. महाराणींच्या चेहऱ्यावर होणारे बदल टिपण्यासाठी ते आतूर होते. पण महाराणींनी त्यांना निराश केलं. कारण हे वृत्त वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर बसलेल्या चार माशा आणि एक मच्छराकडे अधिक काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं लक्ष दिलं. इतकं गांभीर्य या वृत्ताबाबत मात्र महाराजांना दिसलं नाही. हे बघून महाराज थक्क झाले. महाराणींना या
वृत्तातील कथनातील गांभीर्यापेक्षा माशा आणि मच्छर अधिक महत्वाच्या वाटतात हे बघून खरतर त्यांना धक्का बसला. पण ते दररोज सकाळी साडेअठरा मिनिटं चालण्याचा व्यायाम करत असल्यानं ते या धक्कयातून सावरले आणि त्यांनी माशा आणि मच्छरांकडे लक्ष दिल्यानंतर तरी महाराणी या वृत्ताबाबत गंभीर होऊन आपणास म्हणतील की नाथा, हे जे काही लिहून आलं ते खोटं आहे. तुम्ही या मृत शब्दांपेक्षा जिंवत व्यक्तिवर विश्वास ठेवा. नाथा, माझं तुमच्यावरचं प्रेम हे उंटाचं जसं त्याच्या पोटातील पाण्यावर असतं, गाढवाचं जसं त्याच्या पाठिवरील ओझ्यावर असतं तसं आहे. तुम्ही माझ्या गळातील मंगळसूत्राचे केवळ धनीच नसून माझ्या गळातील ताईत, ह्रदयातील संतूर आहात. तुमच्याशिवाय माझ्या मनात दुसऱ्याचा विचार येणं म्हणजे पृथ्वीला, सूर्य सोडून नेप्युचनची आठवण येण्यासारखं आहे.
महाराजांची ही आत्ममग्नता फार काळ काही टिकली नाही. ही आत्ममग्नता नसून आत्मभग्नता असल्याचं त्यांच्या लवकरच लक्षात आलं नि ते महाराणीच्या प्रतिक्रयेची वाट बघू लागले. महाराणींनी वृत्त पूर्ण वाचलं नि त्या खो खो हसायलाच लागल्या.
महाराणी तुम्ही अशा हसून, या वृत्तातील तुमच्यावरील कथीत आरोप लपवू इच्छिताहात, असं आम्हास वाटलं तर तो आमच्या दोष ठरणार नाही, ही बाब आम्ही आधीच स्पष्ट करुन ठेवतो,महाराणींकडे एक तिरपा कटाक्ष टाकत महाराज म्हणाले.
महाराणींनींनी सुध्दा तसाच तिरका कटाक्ष त्यांच्याकडे टाकला आणि त्यांना म्हणाल्या, ज्याला कर नाही त्याला डर नाही.
म्हणजे तुमचं हसणं तसं नव्हतं तर, महाराज आता सरळ कटाक्ष टाकत म्हणाले.
तसं म्हणजं कसं महाराज…
अहो, तुमच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, त्याबद्दल आम्हास बोलावयाचं आहे.
महाराज आरोपांचं काय घेऊन बसलात. हे दिवस तुम्ही मला बागेत नेण्याचे आहेत. मंचकावर तांबूल खात खात बसण्याचे आहेत. झोपाळयावर बसून झुलण्याचे आहेत.
महाराणी तुम्ही जास्त रोमँटिक होऊ नका. आरोपाला भिडा आणि सरळ, स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर द्या.
महाराज, मी सरळ थेट आणि आरओच्या पाण्यापेक्षाही स्वच्छ उत्तर दिलं आहे.
याचा अर्थ तुम्ही भूतावर प्रेम करत नाही.
भूतावर प्रेम करण्यासाठी तो आधी असावा लागतो ना, महाराज.
समजा तो असता तर तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं असत का ?
महाराज, ते त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
महाराणींशी तात्विक संवाद साधण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपला अकरावा नेपोलियन व्हायचा, हे लक्षात आल्यावर महाराज काहीही न बोलता महाराणींना तसेच सोडून अंत:पुरातून निघून गेले.
०००
ज्या वृत्तपत्रात ही बातमी आली होती, त्याच वृत्तपत्राला आपण विचारणा करुन खरखोटं करायला हवं, असं त्यांना वाटलं. त्यांनी अमात्यांना फर्मान सोडलं. वर्तमानपत्राच्या संपादकांच्या कचेरित संपादकांसोबतच चर्चा घडवून आणण्यासाठी तारीख मिळवली.
संपादक महोदयांच्या डोक्यावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं ओझं असल्यानं ते महागंभीर मुनींपेक्षाही अधिक गंभीर झाल्याचं वाटत होते.,
महाराज जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये पोहचले तेव्हा संपादकमहोदय, पुतीन यांनी काय करायला हवं आणि नको यावर चिंतन करत होते. या चिंतनात महाराजांच्या येण्यामुळे व्यत्यय आल्यानं ते जरासे चिडले. पण महाराजांना हाकलून तरी कसं लावणार किंवा उशिरा या असं सुध्दा कसं म्हणणार. शिवाय महाराजांच्या अमात्यांनी रितसर वेळसुध्दा घेतली होतीच. त्यामुळे मोठ्या कष्टाने संपादकमहोदय ठिगळ लावलेल्या खूर्चीतून उठले आणि त्यांनी महाराजांचे बळेबळे स्वागत केले.
महाराजांनी वेळ न दवडता थेट विषयालाच हात घातला.
त्यांनी संपादकमहोदयांपुढे महाराणीच्या संदर्भातीलच वृत्त ठेवले.
वाचा संपादक साहेब वाचा आणि सांगा सत्य काय आणि असत्य काय ते. महाराज काकुळतीनं म्हणाले. आपला महाराज इतका घायकुतीला आल्याचं बघून संपादक महोदयांना भरुन आलं. त्यांनी त्यांच्या डोक्यात पिंगा घालत असणाऱ्या पुतीन यांना मास्कोव्हा नदिच्या किनारी पाठवून दिलं आणि मोठ्या द्रयार्द्र नजेरेनं आणि वात्सल्यानं महाराजांकडे कटाक्ष टाकत ते वृत्त वाचू लागले..
आटपाट नगरच्या सुविद्य महाराणी या एका भूताच्या प्रेमात पडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
व्हाट, मोठ्या जोरानं म्हणत बातमीतील पहिलं वाक्य वाचताक्षणी संपादक महोदय ताडकन उठले. त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून संपादकीय विभागात काम करणाऱ्यांना वाटलं की संपादकमहोदय महाराजांशी भांडत तर नाही ना. त्यामुळे काही उपसंपादक व सहाय्यक संपादक धावतच संपादकमहोदयांच्या केबिनकडे आले.
संपादक आ वासून उभे आणि महाराज त्यांच्यापुढे उभे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. संपादकमहोदयांच्या ते लक्षात आल्यावर ते जरासे खजिल होत, आणि कसबसं हसत उपसंपादकांना हातानेच, काही नाही काही नाही, इट इज जस्त ओके, असं दर्शवलं.
सर्व उपसंपादक व सहाय्यक संपादक त्यांच्या जागेवर बसल्यावर संपादकमहोदय खाली बसले. महाराजही खाली बसले. ओशाळत संपादकमहोदयांनी महाराजांची क्षमा मागितली. संपादक महोदय बातमी पुढे वाचू लागले,
हे भूत आटपाट नगरचे आहे की बाजूच्या नगरचे आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे.
व्हाट इज धिस नॉनसेन्स, दुसरं वाक्य वाचल्यावर जोरानं आपला हात टेबलवरील काचेवर आपटत संपादकमहोदय म्हणाले. त्यांच्या या जोराने काच फुटली आणि काही तुकडे महाराजाच्या नाकावर उडाले आणि काचेच्या धारेमुळे महाराजांच्या नाकाला जखम झाली. जखम किरकोळच होती, पण या जखमेमुळे रक्त वाहू लागलं. महाराजांना डायबेटिस असल्यानं ते रक्त काही थांबेना. ते बघून संपादकमहोदय घाबरले. ते पुन्हा ताडकन उभे राहिले. त्यांची केबिन काचेची असल्यानं बाहेरच्यांना सारं काही दिसत होतं. त्यामुळे संपादकमहोदय असे ताडकन उभे झाल्याचं दिसतात, उपसंपादक व सहाय्यक संपादक धावतच आले. संपादकमहोदय उभे राहिलेले, काच फुटलेली आणि महाराजांच्या नाकाच्या मध्यभागातून रक्ताचे थेंब पडत असलेले हे दृष्य बघून उपसंपादक घाबरले आणि संपादकाच्या केबिनमध्ये काहीतरी गंभीर घडत असल्याचं त्यांना वाटून ते लगबगीने माघारी वळणार तोच संपादक महोदयांनी, काही नाही, काही विशेष नाही अशा आशयाचे हातवारे केलं.
अहो, कसं काही नाही, आता महाराज ताडकन फुटलेल्या काचेवर हात आपटित म्हणाले. संपादक महोदयांच्या ८०० ग्रॅम हातापेक्षा महाराजांचा ढाई किलोच्या हाताच्या दणक्यानं काचेचे चार तुकडे होऊन त्यातला एक बऱ्यापैकी धारदार तुकडा संपादक महोदयांच्या नाकावर जाऊन आदळला. त्याच्या धारने संपादकांचे नाक कापलं गेलं. त्यांच्या नाकातून रक्ताची धार लागली . काचेच्या बाहेर उपसंपादकमंडळी व सहाय्यक संपादक हा सर्व घटनाक्रम बघत होते. संपादकांचं नाक कापल्या गेल्याचं लक्षात येताच ते धावतच केबिनमध्ये आले. संपादक रडवलेले, महाराज रागावलेले आणि रक्ताचे थेंब यामुळे केबिन मधील वातावरण गंभीर व अटितटीचं झाल्याचं उपसंपादकांच्या लक्षात आलं.
सर सर, काय झालं हे, एक उपसंपादक उसनं अवसान आणून म्हणाला.
काय होणार, जैशी करनी वैसी भरणी ,महाराज नाक फुगवून म्हणाले
म्हणजे महाराज, आम्ही समजलो नाही, सहाय्यक संपादक आपल्या ह्रदयातील हर्षवायू दाबित म्हणाले. संपादकांचं नाक कापण्याची ते कितीतरी दिवसापासून वाट बघतच होते. संपादकांचे रक्तबंबाळ नाक याची देही याची डोळी बघून त्यांना अत्यानंद लपवता येत नव्हता.
ही बातमी बघा, बातमी.
सहाय्यक संपादकाने ते वृत्त वाचायला घेतले.
संपादकमहोदयांनी ज्या दोन ओळी वाचया होत्या त्यावर लालशाईने मार्किंग केले होते. त्यामुळे साहाय्यक संपादकांनी तिसरी ओळ वाचायला घेतली
…. शिवाय हे भूत राजघराण्यातील आहे की सरदार घरण्यातील आहे की सामान्य नागरिकाचे आहे ही बाबसुध्दा हे वृत्त लिहिपर्यंत आणि आजचे वर्तमानपत्र मुद्रणाला जाईपर्यंत स्पष्ट झालेले नाही.
भ भ भूत भूत कुठे आहे भूत. सहाय्यक संपादक, हे वाक्य वाचताच त त प प करु लागले. त्यांना भोवळ आली. महाराजांनीच त्यांना सावरलं. ग्लासभर पाणी प्यायला दिलं, तेव्हा ते जरासे सावरले.
बघितलं तुम्ही, हे वाक्य वाचता वाचता तुमची पाचावर धारण बसली, आमची काय अवस्था झाली असेल.
अरे, असं काही लिहिताना काही तारतम्य तरी पाळण्याची काही रितबीत आहे की नाही.महाराज गरजले.
पुढे वाचरे , एका नव्या उपसंपादकाकडे बघत महाराज,गरजले..
त्याने पेपर घेतला आणि पुढची ओळ वाचू लागला..
महाराणींना असे एका भूताच्या प्रेमात कां पडावे वाटले असावे यावर आटपाट नगरातील थोर विव्दान विचारमंथन करायला लागले आहेत.
त्याला या ओळीनंतर थांबवत महाराज गरजले,
कोण आहेत हे लाल-पिवळे-डावे-उजवे थोर विचारवंत. एवढीच हिमंत असेल तर यांची नावं तरी छापायची ना किंवा आता सांगा आम्ही त्यांच्या दुकानातच जाउुन येतो.आणि त्यांचा समाचार घेतो.
महाराज या थोर विचारवंताचं दुकान नाही. एक उपसंपादक कसाबसा बोलला.
शहाणपणा शिकवू नका. गधड्यांनो, किराण्याचच दुकान लावायला पाहिजे असं नाही. बौध्दिकं विकण्याचीही दुकानदारी करता येतेकी नाही.
न ना नाही म्हणजे माहीत नाही महाराज, आम्ही विचारवंत नाही. विचारांशी आमचं काही घेणं नाही आणि देणही नाही..
एक उपसंपादक म्हणाला.
हो का…
मग हे तुम्ही कसं काय लिहिलय, स्वत:च पुढची ओळ वाचत महाराज गरजले, काहींचे असे म्हणणे असे पडले की भूताच्या आडोशाने महाराणींना विंचू मारावयाचा आहे. मात्र हा विंचू नेमका कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भूताच्या प्रेमाच्या कथित घटनेकडे संशयाने बघायचे की संशोधनाच्या नजरेतून बघावयाचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
आँ.. नाक कापलेल्या अवस्थेतही संपादक महोदयांनी प्रतिक्रिया दिली. उपसंपादकांचे डोळ विस्फारल्या गेले. सहाय्यक संपादकास तर काय बोलायचं हे न कळून त्याची मान खालीच गेली.
आता कां प्रत्येकाची बोलती बंद झाली.
भूताच्या आडोशानं कोणत्या विंचवाला मारायचं आहे, असे तुम्हास सुचवायचं आहे. संपादकमहादेय, सांगा आम्हास सांगा..तेच आम्ही तुमच्या श्रीमुखातून ऐकण्यासाठी आटपाट नगरातील जनतादरबार सोडून आलो आहोत. हे भूत कुठे दडलय , ते आम्हाला कळलच पाहिजे. आमच्या महाराणींना याचं किती दु:ख झालेय याची काही कल्पना तरी आहे का तुम्हास…
महाराज महाराज, आम्हास काही दु:खबिख्ख झालेलं नाही. असा एक वेगळा आवाज सर्वांच्या कानी गेला. महाराजांनी मागे वळून बघितलं. तो आवाज महाराणींचा होता.
महाराणी तुम्ही इथे.
अहो महाराज, तुम्ही जनतादरबारच नव्हे तर आज राणीवस्याकडे दृष्टिक्षेप टाकण्यास विसरुन गेलात हे सांगण्यासाठी आम्हास इकडे यावं लागलं. बातमीपेक्षा जनता आणि राणीवसा मोठा महाराज.. आणि कुठे या भूतांच्या पाठिमागे लागता महाराज.
म्हणजे महाराणी हा संपादक म्हणजेच तर भूत नाही ना..
काय?
ओह नो…
अरे देवा…
संपादक तुम्ही सुध्दा..
माझं नशिबच फुटकं…
असे विविध आवाज एकाचवेळी तिथे प्रगटले. महाराणींनी डोक्यावर हात मारुन घेतला. एव्हाना संपादकमहोदय बेशुध्द झाले होते. महाराज डोक्याला हात लावून बसले होते.
ज्या भूताच्या प्रेमात महाराणी पडल्या, ते दुसरे तिसरे कुणी नसून संपादक असल्याचं खमंग वृत्त आज देता येईल, या विचाराने सहाय्यक संपादक सुखावले.
होय रे दुष्टा, तुझ्या डोक्यात काय चाललय, हे माझ्या लक्षात आलय बर का. असं म्हणून महाराणींनी एक जळजळीत कटाक्ष सहाय्यक संपादकांवर टाकला. त्या कटाक्षानं तोल जावून साहाय्यक संपादक एका काचेच्या तुकड्यावर पडले. त्या धारेने त्यांचही नाक कापलं गेलं…
सुरेश वांदिले,