एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल)
संधी कधी आणि कशी चालून येईल हे सांगत येत नाही, त्यामुळे संधीकडे लक्ष ठेवा ,असं अर्जुनास श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलं. हे ज्यास नेमक्या क्षणी आठवतं तो खरा स-ज्ञानी पुरुष, असं मुकरु एडका कोवायांचं ट्रम्प काकांना, त्यांची व्हाईट हाउुसमधून एक्झिट कम गच्छंती होईपर्यंतच्या कालावधीत सतत सांगणंहोतं. पण त्यांना ते कितपत कळलं कुणास ठाऊक ? कारण जगातल्या यच्चयावत सर्व समस्यांवर कारण असताना आणि नसतानाही (वचावचा) बोलणारे किंवा टिवटिवणारे, ट्रम्प काका, मुकरुच्या या कथनावर कधीचकाही प्रतिक्रिया व्यक्त करत नसत.
गेल्या वर्षिच्या मार्च महिन्यात करोना इकडेतिकडे हात-पाय पसरु लागला, तेव्हा मुकरुस सर्वात आधीश्रीकृष्णाच्या या वचनाची आठवण झाली. त्याने त्वरीत या विषयावर काकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा करोना माय फूट, असं म्हणत काकांनी मुकरुलाच हाट-हूट करत फटकारलं. तेव्हा बारिक तोंड करुन, अट्टीकट्टी गारगट्टी निंबाचा पाला हलू नको..पुन्हा कधी बोलू नको, असं म्हणून मुकरुने आपल्या आयुष्यातून ट्रम्प काकांना बाजूला सारलं.
०००
मग आता, संधी कधीही चालून येऊ शकते, श्रीकृष्णाच्या या वचनाबद्दल सांगायचं कुणाला? मुकरुच्याबाहेरच्या आवाजानं आतल्याला विचारलं.
तेव्हा आतला आवाज म्हणाला, गड्या तू स्वत:लाच कां सांगत नाहीस..गांधीजी सुध्दा आधी स्वत:लासांगत, मग जगाला.. गांधी हा मुकरुचा विक पॉईंट असल्यानं, मुकरुला आतल्या आवाजाचं सांगणं पटलं.आरशासमोर जाऊन त्याने पोजिशन घेतली. आरशाच्या आत दिसणारा मुकरु हा अर्जून आणि आरशाच्या बाहेरअसणारा मुकरु हा श्रीकृष्ण, असा स्व-संवाद करत त्याने या पोजिशनचा काटकोन ठेवला.
हे जेव्हा ठीक-ठाक झालं तेव्हा मुकरुतला श्रीकृष्ण, मुकरुतल्या अर्जुनास उपदेश करु लागला…
हे विरा, संधी कधी आणि कशी चालून येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संधीकडे लक्ष ठेवा. असं आमचं सत्यवचन तुला वारंवार आठवतं, हे आमचं मोठचं भाग्य समजतो.
पण भगवन, करोनाच्या काळात कशी आणि कोणती संधी मिळेल आम्हास, असं वाटतं तुम्हास..
विरा, सांगण्याचं काम आमचं, नदित उडी घेण्याचं काम तुमचं..
नदीत बुडालो तर भगवन..
अरेरे, कुरुक्षेत्रावरचाही अर्जून घाबरुच होता, सांप्रतकालीन या आरशाच्या आत असलेला अर्जूनही घाबरुचआहे. साडेसहा हजार वर्षात अर्जुनाच्या घाबरण्यात कोणताच फरक पडलेला दिसत नाही.
फुकटचे सल्ले देण्याच्या श्रीकृष्णाच्या कुटीर–उद्योगातही या साडेसहा हजार वर्षात तरी कुठे फरक पडलाय, भगवन…
वा s वा s बा, अर्जुना बरोबर ओळखलस आम्हासी तुम्ही. तेव्हा, आतासुध्दा आमचा फुकाचा सल्लाऐका नि संधीचा फायदा घ्या..गेल्या साडेसहा हजार वर्षात करोनाने अशी संधी आणली नव्हती. पुढच्या साडे सहाहजार वर्षात अशी संधी येणार नाही…असं बोलून मुकरुतले श्रीकृष्ण अंतर्धान पावले. मुकरुतला अर्जून भानावरआला.
०००
श्रीकृष्ण म्हणताहेत म्हणजे, करोनात नक्कीच संधी दडलेली असली पाहिजे. असं मुकरु स्वत:शी संवादूझाला.
पण, ही संधी शोधायची कशी ? मुकरुच्या बाहेरच्या आवाजाने आतल्या आवाजास विचारलं.
असा प्रश्न जेव्हा जेव्हा मुकरुला पडत असे, तेव्हा तेव्हा तो विचारमंथन पर्वात जाई. त्याआधी जंग्यो देवीचंदर्शन..मग मोहाचीचे चार पाच पेग. त्यानंतर सुखाबाई म्हणजे त्याच्या बायकोनं बनवलेल्या झिंग्याचे भजे यावरताव मारला की त्याच्या विचारमंथन पर्वास वेगळी उंची मिळत असे. या उंच उंच झोपाळयावर तो झुलू लागलाकी बरेचदा त्याचा कपाळमोक्ष सुध्दा व्हायचा. त्यानंतर सुखाबाई आणि एडका म्हणजे त्याचा बाप, यांच्याशिव्यापर्वाच्या लाभक्षेत्रात तो आपसुकच यायचा. कुछ पाने के लिए बहुत कुछ कडवा सुनना पडता है यारो, हीमुकरुने यावरची टॅगलाइन शोधून काढली होती.
शिव्यापर्व घडणारच हे गृहित ठेऊनच मुकरुने मोहाची प्लसचा आस्वाद घेत विचारमंथन पर्वात जाण्याचंमात्र इतक्या वर्षात कधीही थांबवलं नाही. आताही त्याने वाड्याच्या आड्याकडे नजर रोखून धरली. मनात, त्याचीप्रेरणास्थान असलेल्या राणी मुखर्जीचं चिंतन करुन तो विचारमंथन पर्वात गढून गेला..
या चिंतनातून त्याच्या असं लक्षात आलं की करोना हे एक महा-महायुध्द आहे. ते मनुष्यरुपी कुरुक्षेत्रावरलढलं जात आहे. साडेसहा हजार वर्षापूर्वीच्या कुरुक्षेत्रावरील महायुध्दाचा सूत्रधार श्रीकृष्ण होता. करोनामहायुध्दाचा सूत्रधार बनण्याची संधी आपणाकडे चालून आली आहे.
वाsव, वंडरफूल! असं स्वत:ला संबोधून सुखाबाईला त्याची पाठ थोपटण्याची विनंती मुकरुने केली. याविनंतीला अव्हेरुन मुकरुला शिव्यांची लाखोळी वाहत सुखाबाई माजघरात दनदन पाय आपटत निघून गेली.
०००
आड्याकडे बघत राणी मुखर्जीकडे, मुकरुने सुखाबाईचं गाऱ्हाणं गायलं. मोठ्या मोठ्या विचारमंथनातछोट्या छोट्या किरकोळ गोट्या घरंगळत (च) असतात, तेव्हा डोण्ट वरी, असं मुकरुच्या आतल्या आवाजानेमुकरुस धिर दिला. त्यामुळे तो नव्या उत्साहानं पुन्हा विचामंथन प्रकियेत गुंग झाला.
मुकरुला आता एक एक कल्पना सुचू लागल्या..
करोना काळात नव्या नव्या रेसिपिंचा महापूर त्याने व्हॉट्सॲप विद्यापीठावर अनुभवला होता. याअनुभवाच्या तरल स्मृतीवर तो अद्यापही तरंगत असल्यानं, करोना रेसेपींवर आधारित करोना कुकबूकची कल्पनाविजेसारखी त्याच्या मनी चमकून गेली.
हे असं करोना–कूक–बूक काढण्याची कल्पना पेंग्विन इंडिया आणि पेंग्विन इंटरनॅशनल या प्रकाशन कंपनीस
दे, असं मुकरुच्या आतल्या आवाजानं बाहेरच्याला सांगितलं.
गधड्या, या सगळया रेसिपी इंटरनेटवर इकडून तिकडे मटकत-मिटकत आणि भटकत असतात ना..पेंग्विनकशाला मरायला काढेल असे पुस्तक.
मित्रा, आपण आपली स्पेशॅलिटी देऊना
म्हणजे…
अरे, एटापल्लीच्या रेसिपी (करोना स्पेशल) आल्या का कुठे छापून, आल्या का यू ट्यूबर, इंस्टाग्रामवर..नाहीना..एटापल्लीज रेसिपी..
गधड्या, जमाना ब्रँडेडचा आहे. रामदेव बाबांच्या पतंजलींचा आहे. एटापल्लीच्या रेसिपी आलापल्लीतचकाय आपल्या गल्लीतही खपणार नाहीत..
मित्रा, त्याची काळजी तू कां करतोस, अरे एटापल्लीच्या रेसिपी (करोना स्पेशल) ट्रम्प काकू व्हाईट हाऊसमध्ये असताना करायच्या. इव्हानाताई तर, नवऱ्यापेक्षाही एटापल्लीच्या रेसिपीच्या प्रेमात पडली होती. असंजेव्हा जगाला कळेल तेव्हा साऱ्या साऱ्या ब्रँडचा बँडबाजा वाजेल.
अहो, अंतर्ज्ञानेश्वर आपणास, कुणी सांगितलं ट्रम्प काकू एटापल्लीच्या रेसिपीजवर जीव ओतत होत्याम्हणून..
हा हा हा, अरे इंग्लडच्या महाराणी हर मॅजेस्टी एलिजाबेथ मॅडम.. आहेस कुठे…आपल्या एटापल्लीतत्यांच्या माहेरकडूनची तेराव्या पिढीतील भाची राहते ना..
तुला कसं माहीत?
मला सारं काही ठाऊक असतं..
मग कोण बरे, महाराणींच्या तेराव्या पिढीतील भाची, सांग बघू..
सुखाबाई, अरे वेड्या, सुखाबाई तुझी बायको.. हर मॅजेस्टी एलिजाबेथ यांच्या १३ व्या पिढितील भाची. महाराणींच्या भावकितला पुरुष १८५७ साली आला होता इकडे आलापल्लीतल्या सागाचा अभ्यासकरण्यासाठी..इकडच्या सागात इतका रमला की इकडचाच झाला. सागातून त्याला इकडची संगीता इरतापेमिळाली..मग या साग्रसंगीतातून संसार फुलला..इकडे तिकडे पसरत पसरत तुझ्या बायकोपर्यंतपोहचला..राजकुमार चार्ल्ससाठी राणी सरकारांचा एक डोळा सुखाबाईवर होता. पण तोपर्यंत चार्ल्सदादाच्यादोन्ही डोळयात डायनाताई जाऊन बसल्या ना. राणी सरकारांचा दुसरा डोळा त्यामुळे उघडलाच नाही. तसं झालंअसतं तर सुखाबाई आज प्रिसेंस ऑफ वेल्स राहिली असती..
आँ.
गड्या, अरे सुखाबाईशी तेव्हापासून महाराणी , कनेक्टेड असते. एटापल्लीच्या रेसिपीमुळेच ती ९०व्या वर्षी ठ्याँ आहे. त्यांनीच ट्रम्प काकूस एटापल्ली रेसिपी (कोरोना स्पेशल)ची महती सांगितली. यारेसिपीचा वापर त्या करायच्या म्हणून तर ट्रॅम काका मास्क न घालता नि सोशल डिस्टंसिंग न पाळताबिनधास्त हिंडू – फिरु शकायचे ना…
महाराणींना आपण आता सांगायचं की एटापल्ली रेसिपीचा एक कारखाना, वाशिंग्टनला एक,एटापल्लीत आणि एक राणीच्या राजवाड्यातील मोकळया जागेत उभारु..सर्वांना ५० टक्के शेअर देऊ.
वा वा क्या बात है..
गड्या आहेस कुठे तू.. एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल) च्या ब्रँड ॲम्बेसडर सौ.ट्रम्प काकुंना अर्ध्याजगासाठी आणि अर्ध्या जगासाठी इव्हाना ताईंना करु… सध्या त्या फर्स्ट वुमेन ऑफ द वर्ल्ड आणि फर्स्ट डाटरऑफ द वर्ल्ड, नसल्या म्हणून काय झाले. पण बोथ आर स्टिल हॉट ॲण्ड दिसायला स्वीट (हॉॲदिस्वी) आहेतच की. ब्रँड ॲम्बेसरडरसाठी अशाच हॉॲदिस्वी चेहऱ्यांची गरज असते. या दोघी एटापल्ली रेसिपीच्या ब्रँड ॲम्बेसेडरआहेत असे दिसल्याबरोबर ..फर्स्ट डॉटर इन लॉ ऑफ इंडिया सौ. नीता अंबाणी वहिनी भारतासाठी होलसेलविक्रीची एजन्सी घेतील .मुकेश भाऊ अंबाणीला सांगून, जे ग्राहक एटापल्ली रेसिपिची पुस्तकं आणि प्रॉडक्टविकत घेतील त्यांना तीन जीबी डेटा सात दिवस मोफत देतील. एकावर एक असा फायदा. सध्या आर्थिकचणचणित सापडलेल्या कनिष्ट भ्राता अनिल भाऊंना श्रीलंकेसाठी एटापल्ली रेसिपिजची होलसेल एजन्सी देऊनसंकटसमयी जो धावून जातो तोच खरा ज्येष्ठ भ्राता, असं धर्मराज युधिष्ठिराचं साडेसहा हजार वर्षापूर्वीचं वचनसांप्रतकाली मुकेशभाऊ सिध्द करतील. जगातल्या यच्चयावत सर्व ज्येष्ठ भ्रातांपुढे कनिष्ठ भ्राता–प्रेमाचा आदर्शनिर्माण करतील..बघितलस आपल्या एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल) ची शक्ती..
ऑं.
अरे, आँ आँ काय करतोस गड्या..ही शक्ती कशातून आली तर करोनातून..मग कोरोना शाप की संधी..
संधी..
संधीच…श्रीकृष्ण तेच म्हणाले ना..आता ही संधी साधायची की गमवायची हे तुला ठरवायचय.. मित्रा, बाहेरचा आवाज आतल्याला म्हणाला..
मी संधी गमवायला विनोद कांबळी थोडाच आहे..
वा रे मेरे शेर..आतल्या आवाजाने बाहेरच्या आवाजाला हवा दिली..
०००
मुकरुने आणखी दोन पेग मोहाचीचे प्राशन केले.. सोबतीस झिंग्याचे भजे होतेच..मुकरुच्या विमानाने टेकऑफ घेतले..त्याने सुखाबाईस आवाज दिला..
सुखाबाईस मुकरुचे विमान हळूहळू टेक ऑफ घेत असल्याचं लक्षात आल्याने ती आजूबाजूलाच वावरतहोती. त्यामुळे मुकरुसमोर तत्काळ उभी राहून, ती फणकारली…
आता काय, डुकराचे बोंडं पाहिजे का सांगा..
अहो, हर हायनेस सुखाबाई असं काहीतरी तुम्ही बोलू नका..करोनाने जगावर संकट ओढवलय. पण तुमच्याडोक्यावर राणी सरकारांच्या नातेवाईकाचा मुकूट चढवला..
जळली मेली राणी मुखर्जी, तिला या जन्मातच काय पुढच्या सात जन्मातही सवतीचं नातं जोडू देणारनाही..तेव्हा तेव्हाच्या माझ्या दादल्यांना..
हर हायनेस सुखाबाई असं काहीबाही बोलू नका…राणी सरकार म्हणजे राणी मुखर्जी नव्हे, त्या आमच्यादिलासाठी अधून मधून कधीतरी सरकार..तुमच्यासाठी राणी सरकार म्हणजे साक्षात हर मॅजेस्टीएलिजाबेथ..मुक्काम पोस्ट थेम्स नदीजवळील बंकिंगहम राजवाडा..तालुका–जिल्हा लंडन…तर आपण लंडननिवासीनी राणीसरकारांच्या नातेवाईक आहात.
अरे, वा क्या बात है… राणीचे शे पाचशे नातेवाईक कमी होते की काय, तिला माझी आठवण झालीहोय…सुखाबाई उपरोधानं म्हणाली.
हर हायनेस, त्यांना नाही आठवण झाली.. आम्हास साक्षात्कार घडला.
पण हा साक्षात्कार मोहाची सोबत झिंगोबा गेल्यावरच कसा बर झाला..
करोनाने घडवून आणला हर हायनेस..करोना इज ग्रेट….करोनाचा जयजकार असो…
तो कसा बाँ…सुखाबाईनं विचारलं.
मुकरुने तिला आपल्याजवळ आसनस्थ होण्यास सांगितलं. तिच्या ओठांकडे त्याचं अवचितपणे लक्ष गेलं. पण लंडननिवासी हर मॅजेस्टींना काय वाटेल बरं, इकडचा ओठ, आलापल्ली निवासी हर हायनेसच्या ओठांकडेनेल्यावर, असं त्याच्या जेहेनमध्ये आल्यानं त्याने ओठ-संगमावर फुली मारली.
गांधीजींच्या संयमाचे आपणच एकमेव पात्र उमेदवार असल्याची शुध्द भावना मुकरुच्या मनात निर्माणझाली. तो या कल्पनेनं मोहरुन गेला..ओठ संगम आणि गाधींजींच्या संयम प्रमेयात अडकलेल्या मुकरुला,सुखाबाईनं हलवलं, तेव्हा तो भानावर आला…आपल्याच संयमावर खुष झालेल्या मुकरुने, सुखाबाईसमोरएटापल्ली रेसिपिज (करोना स्पेशल) ची कूळ आणि मूळ कथा कथन केली. या कथनाने सुखाबाई भारावूनगेली…इतकी की तिने आपल्या हर हायनेसचा बुरखा अलगद बाजूला सारुन ओठ-संगम घडवूनच आणला.
वाSव या संगमापुढे मोहाचीची झक मारेल.. असं मुकरु उर्त्स्फुतपणे बोलून गेला..
पुढं काय?
कशाचं पुढे काय?
अहो, आता एटापल्ली रेसिपिजचं पुढे काय..कसं पोहचायचं राणी सरकारांकडे आणि ट्रम काकूंकडे…
सोप्प आहे..
हर मॅजेस्टीचे पिताश्री हीज मॅजेस्टी जार्ज सर,जेव्हा हिंदुस्थानात आले होते, तेव्हा मुंबईतील एकाडबेवाल्याने त्यांच्या पहाटे पावने पाच वाजताच्या नाश्त्याची सेवा–सुविधा पुरवली होती. इतक्या अचुकटायमिंगच्या उपकाराला ते राजघराणे अद्यापही विसरले नाहीत..त्यामुळे बंकिंगघम राजवाड्यात कोणताहीसमारंभ असतो तेव्हा पहिली पत्रिका राणी सरकारांच्या कुलदैवतेपुढे ठेवली जाते. मग दुसरी मुंबईच्या डबेवाल्यांनादिली जाते..त्यांच्यापर्यंत ही पत्रिका पोहचल्याची खात्री झाल्यावरच तिसऱ्या निमंत्रण पत्रिकेपासून सार्वत्रिकवाटप सुरु होतं. इतकं या डबेवाल्याचं महत्व..
ते आपल्याला काय मदत करतील..
हर हायनेस..या डबेवाल्यांच्या मदतीने आपण हर मॅजेस्टी राणी सरकारांपर्यंत पोहचू. मग बघा एटापल्लीरेसिपी (करोना स्पेशल)ची धम्माल…पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्या, एटापल्ली रेसिपज (करोना स्पेशल) वरआधारित रेस्टॉरेंटची मालिका. या रेसिपिज साठी लागणा–या साहित्य निर्मितीची महा–मालिका..
मुकरुने सुखाबाईस समजावून सांगितलं..सुखाबाई नवऱ्याच्या कल्पना विस्तारानं जाम खुष झाली. ती पुन्हाओठसंगमासाठी मुकरुकडे झेपावणार तोच संमयाचा आदर्श बनू इच्छिणाऱ्या मुकरुने, तिला थांबवत करोनाकाळातील अशा ओठ संगमाचा धोका सांगितला..या धोक्याला दूर सारण्याची शक्ती एटापल्ली रेसिपीमध्येहीराहणार नाही.त्यामुळे सारं काही ओम फस्स होईल..याकडे लक्ष वेधलं. सुखाबाई हिरमुसून फुरुंगटल्या..तरातरामाजघरात निघून गेल्या..
हा नवाच इश्यू तयार झाला होता.
करोनामुळे किती समस्या निर्माण झाल्या गड्या..बाहेरच्या आवाजाने आतल्या आवाजाला विचारलं.
गड्या, त्यावर नंतर मंथन करु, आधी सुखाबाईस मनव..नाही तर सारच काही फुस्स व्हायचं..
आतल्याने सावधगिरीचा इषारा दिल्याने, मुकरुने तडक माजघर गाठलं. सुखाबाई, संतापाच्या १८०डिग्रीतून ३६० डिग्रीपर्यंत पोहचल्याचं मुकरुला जाणवलं. आदळआटप करत त्या कपडेलत्यांची बांधाबांधीकरायला लागल्या होत्या..
हर हायनेस, हे काय, तुम्ही कुठे निघालात..असं रागावणं बरं नाही. करोना आज आहे, उद्या नाही. तुमचेआणि आमचे ओठ आज–उद्या परवाही जैसेथेच राहतील….एटापल्ली रेसिपिने (करोना) साम्राज्य उभारण्याचीसंधी या ओठ–संगमामुळे आपण गमावून बसू..असं जरासं भावनिक, जरासं तात्विक मुकरु बोलला..
पण सुखाबाई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या…त्या मुकरुकडे ढुंकूनही बघत नव्हत्या.
हर हायनेस तुम्ही चाललात तरी कुठे..रडवलेल्या स्वरात मुकरु म्हणाला..
अहो मुकरु साहेब, आता कशाला भोकांड पसरता,आँ. काय हवं होतं मला, एक जस्टओठसंगम..करोनाच्या बुरख्याआड तुम्ही हा जस्ट आनंद ही घेऊ दिला नाही. तेव्हा मी ठरवलय..नागिनीसारख्यासुखाबाई फुत्कारल्या.
काय ठरवलय.. हर हायनेस..
सोडचिठ्ठी..
आँ..
अँs क्याय.. आधी तुमच्यासोबत सोडचिठ्ठी ..नंतर मुंबईतल्या डबेवाल्याशी निकाह आणि मग डायरेक्टराणी सरकारांपुढे हजर एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल) घेऊन..कशाला हवा तुमच्या सारखा मिडलमॅन मध्येमध्ये.डायरेक्टच व्यवहार करते ना…
नाही..नाही.. नाही..असं होणं शक्य नाही…अगं तू प्रेमात पडली होतीस माझ्या..प्रेमासाठी अनारकलीनंस्वत:चा बळी दिला..मजनूच्या प्रेमासाठी लैला वेडीपिशी झाली.. तू मात्र अशी कशी निर्दयी..
अहो महाशय ते सारं घडलं चौदाव्या शतकात… तेव्हा करोना थोडाच होता..दिव्याखालचा अंधारदाखवायला…सुखाबाई म्हणाली. ताडकन बाहेर पडली…
थांब सुखे थांब, मला सोडून जाऊ नकोस…सोडून जाऊ नकोस, थांब थांब थांब थांब, असं मुकरुजोरजोराने ओरडू लागला. ते बघून त्याचा कुत्राही भुंकू लागला.. कुत्रा भुंकू लागल्यानं त्याच्या वाड्याजवळत्यावेळी गोळा झालेले चार गाढवंही ओरडू लागले. आजूबाजूचे कुत्रेही भुंकू लागले.या सगळया गदारोळामुळेगल्ली जागी झाली. मुकरुच्या वाड्याच्या दरवाज्याजवळ गोळा होऊन कोवा कुटुंबालाच शिव्या-शाप देऊलागली..
एव्हाना सुखाबाई आणि एडका जागे झालेच होते..मुकरु उशीला धरुनच थांब थांब, जाऊ नको असं जोरजोरात ओरडत होता..एडकाच्या लक्षात आलं. बाप्याची, रात्रीची झिंग उतरली नसल्याचं त्याने ओळखलं. त्यानेमुकरुच्या पेटकाडात एक हाणली. मुकरु खाटेवरुन धाडदिशी खाली पडला..
त्याची गुंगी आणि गुंगीतलं स्वप्न भाम्रागडाच्या जंगलात पळून गेलं …
बुढ्याची लाथ इतकी सणसणित होती की त्यामुळे मुकरुचं कंबरडचं मोडलं…एटापल्ली रेसिपी (करोनास्पेशल) ला लंडनला घेऊन जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुकरुला उपचारासाठी गडचिरोलीच्या हॉस्पिटलमध्येभरती व्हावं लागलं…
सुरेश वांदिले