
एनडीए-उत्कृष्ट करिअरचा राजमार्ग!
२०२१ मध्ये सवोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)मध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. अवघ्या काही वर्षात मुलींनी, एनडीएत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. यंदा नुकत्याच जाहीर झालेल्या एनडीए परीक्षा निकालात पुण्याच्या ऋतुजा व्हऱ्हाडे या मराठी मुलीने सर्व उमेदवारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवून, इतिहास रचला. या वर्षी १.५ लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली होती. त्यामधून ऋतुजाचा पहिला क्रमांक आला. ऋतुजा नववीत असताना सर्वोच्च न्यायालायाचा निर्णय आला. तेव्हापासून तिने एनडीएत जाण्याची खुणगाठ बांधली. ११ वीत गेल्यानंतर तिने एनडीए परीक्षेच्या तयारीसाठी झोकून दिले. चिकाटी, अथक परिश्रम, सातत्य, शारीरिक क्षमता वाढीकडे दिलेले लक्ष, या बळावर तिने हे यश मिळवले. ऋतुजाचे हे यश मुलींसाठी प्रेरणादायी आहे. १२ वीनंतर एनडीएतील प्रवेश, हा करिअर उत्कृष्ट राजमार्ग ठरतो.
नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी आणि नॅवॅल ॲकॅडेमी (एनडीए) (खडकवासला), येथील प्रवेशासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार दोन वेळा चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेव्दारे साधारणत: ३०० ते ४०० उमेदवारांची निवड केली जाते.
नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमीसाठीची प्रवेश परीक्षा आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेतून तावूनसुखावून निघालेल्या उमेदवारांची थलसेना, वायुसेना आणि नौदलासाठी निवड केली जाते. या उमेदवारांचे प्रारंभिक शिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण हे तीन वर्षाचे असून ते एनडीए (खडकवासला) येथे दिले जाते. पहिल्या अडीच वर्षाचे शिक्षण/प्रशिक्षण हे तिनही दलातील उमेदवारांसाठी समान असते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची पदवी प्रदान केली जाते. थलसेना, वायुसेना आणि नौदलासाठी ज्या उमेदवारांची, बी.एस्सी/ बी.एस्सी (कॉम्प्युटर) /बी.ए या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली असेल त्यांना ही पदवी, संबंधित अभ्यासक्रम, शारीरिक आणि सेवा प्रशिक्षण, एनडीए येथे पूर्ण केल्यावर प्रदान केली जाते. नौदल आणि वायुदलातील ज्या उमदेवारांची बी.टेक अभ्यासक्रमासाठी निवड झाली असेल, त्यांना ही पदवी नियुक्तीपूर्वीच्या प्रशिक्षणा (विमान/जहाज/संस्था) नंतर दिले जाते.
एनडीए मधून उत्तीर्ण झाल्यावर थल सेनेतील उमेदवारांना इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी देहरादून येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते. नौदलातील कार्यकारी शाखेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नॅव्हॅल ॲकॅडेमी एजिमाला येथे पाठवले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.
वायु दलातील उड्डाण शाखा (एअरफोर्स कॅडेट्स) आणि जमिनीवरील (ग्राउंड ड्युटी) विविध कार्यासाठी आवश्यक अतांत्रिक (नॉन टेक्निकल) शाखेतील उमेदवारांना एअर फोर्स ॲकॅडेमी हैदराबाद येथे पाठविले जाते. उड्डाण शाखेतील उमदेवारांचा प्रशिक्षण कालावधी दीड वर्षाचा असून एका वर्षानंतर त्यांना फ्लाईंग ऑफिसरचा तात्पुरता दर्जा दिला जातो. पुढील सहा महिन्याचे प्रशिक्षण आणि एक वर्षाचे प्रोबेशन संपल्यावर कायमस्वरुपी नियुक्ती दिली जाते.
तांत्रिक शाखेतील ग्राउंड ड्युटी उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी एअर फोर्स टेक्निकल कॉलेज बेंगळुरु येथे पाठवले जाते. ग्राऊंड ड्युटी (तांत्रिक/अतांत्रिक) या प्रशिक्षणाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर उमेदवारांना फ्लाईंग ऑफिसरचा तात्पुरता दर्जा दिला जातो. एक वर्षाच्या प्रोबेशननंतर कायस्वरुपी नियुक्ती दिली जाते. या प्रशिक्षणकाळात निवास/भोजन, पुस्तके, पोषाख, वैद्यकीय उपचार आणि सर्व खर्च शासनामार्फत केला जातो.
अशी असते परीक्षा
एनडीएच्या लेखी चाळणी परीक्षेत, गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (जनरल ॲबिलिटी टेस्ट) या दोन पेपरचा समावेश असतो. गणिताचा पेपर ३०० गुणांचा आणि सामान्य क्षमता चाचणी पेपर ६०० गुणांचा असतो. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तासांचा असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) पध्दतीचे असतात. सामान्य क्षमता चाचणी पेपरमधील, पार्ट-ए, इंग्रजीचा असतो, त्याचे गुण २०० असतात. पार्ट- बीमध्ये सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारले जातात. त्याचे गुण ४०० असतात. पार्ट-बी मधील प्रश्न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य विज्ञान, सामाजिक अभ्यास, इतिहास/स्वातंत्र्याचा लढा, भुगोल आणि चालू घडामोडी या विषयांवर विचारले जातात.
या पेपरमधील चार उत्तरांपैकी एका अचुक उत्तराचे वर्तुळ काळ्याशाईनेच पूर्ण भरावे लागते. एकापेक्षा अधिक अचूक उत्तर असल्यास, त्यापैकी जे उत्तर सर्वाधिक अचूक आहे, त्याचेच वर्तुळ पूर्ण भरावे लागेल. दोन्ही अचूक उत्तराची नोंद केल्यास, गुण दिले जाणार नाहीत.
दोन्ही पेपरचा विस्तृत अभ्यासक्रम माहितीपत्रकात देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातील सर्व विषयघटकांचा समजून उमजून अभ्यास केल्यास, लेखी परीक्षेत चांगली कामगिरी करता येऊ शकते.
एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड-सेवा निवड मंडळ) मुलाखत/ बुध्दिमत्ता चाचणी/ व्यक्तिमत्व विकास- गुण ९०० असतात.
निवड प्रकिया-
एनडीए परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत किमान पात्रता गुण ठरविण्यात येतात. हे गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची यादी एसएसबीकडे पाठवण्यात येते. या बोर्डामार्फत व्यक्तिमत्व आणि बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जाते. मानसशास्त्रीय आणि बुध्दीमता चाचणीवर आधारित निवड प्रकिया दोन टप्प्यात राबवली जाते. यासाठी, निवड केंद्र/ हवाई दल निवड मंडळ/ नौदल निवड मंडळासमोर उमेदवारांना हजर व्हावे लागते.
या, अधिकारी क्षमता चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान पात्रता गुण, एसएसबीमार्फत ठरवले जातात. हवाईदल आणि या दलातील उड्डाण शाखेसाठी संबंधित उमेदवारांनी नमूद केलेले प्राधान्य, दिलेला पर्याय आणि अर्हतेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कॉम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिस्टिम टेस्ट (वैमानिक कल चाचणी) द्यावी लागते. ही चाचणी एकदाच देता येते. त्यामुळे या चाळणीत मिळालेले चांगले गुण/श्रेणी, हे या उमेदवारासाठी, पुन्हा हवाई दलातील निवड मंडळातील मुलाखतीसाठी ग्राह्य धरले जातात. मात्र ही टेस्ट/चाळणी अनुत्तीर्ण झाल्यास अशा उमेदवारांना एनडीएच्या हवाई दलातील उड्डाण शाखेसाठी किंवा हवाई वाहतूक शाखा किंवा सामान्य सेवा (पायलट/वैमानिक) किंवा नौदलातील हवाई शाखेतील प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही. यानंतर, लेखी परीक्षेतील गुण आणि एसएसबीच्या परीक्षेत गुणांवर आधारित सर्व उमेदवारांची एकत्रित यादी तयार केली. त्यानंतर अर्हता, वैद्यकीय पात्रता, गुणवत्ता, उमदेवाराने दिलेला पर्याय आणि उपलब्ध जागा लक्षात घेउुन अंतिम निवड यादी तयार केली जाते.
शैक्षणिक अर्हता- थल सेना – १२ वी उत्तीर्ण, नौदल, हवाई दल – गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह १२ वी उत्तीर्ण. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डा (सेवा निवड मंडळ) ने – (एसएसबी) ठरविलेल्या मानकांनुसार उमेदवार वैद्कीय आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम (मेडिकली फिट) असणे आवश्यक ठरते.
(लष्करातील कोणत्याही दर्जाच्या अधिकारी/ कर्मचारी यास कोणत्याही क्षणी युध्दभूमिवर जावे लागू शकते. त्यामुळे तो शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असल्याचे, स्पष्ट करण्यात आले आहे. शारीरिक व वैद्यकीय फिटनेसची काही माणके निर्धारित करण्यात आली आहेत. त्यात आपण बसतो किंवा नाही, याचा विचार उमेदवारांनी करायला हवा. त्यानुसार तशी तयारी करायला हवी. ऋजुता कऱ्हाडे हिनेसुध्दा एनडीए परीक्षेच्या तयारीसोबत शारीरिक क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्याचे, तिच्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.)
संपर्क (१) थल सेना पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – आर्मी हेडक्वार्टर्स, एजी ब्रँच, आरटीजी (एनडीए एन्ट्री) , वेस्ट ब्लॉक – ३, विंग-१, आर. के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६, दूरध्वनी – ०११- २६१७५४७३ किंवा joinindianarmy.nic.in, (२) नौदल /नॅव्हॅल ॲकॅडेमी पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी- नॅव्हॅल हेडक्वार्टर्स, डायरेक्टोरेट ऑफ मॅनपॉवर ॲण्ड रिक्र्युटमेंट, ओ.आय ॲण्ड आर सेक्शन, रुम नंबर – २०४, सी विंग, सेना भवन, नवी दिल्ली – ११००११, दूरध्वनी-२३०१००९७ ,ईमेल – officer-navy@nic.in किंवा joinindiannavy.gov.in, (३) वायुदलाचा पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – एअर हेडक्वार्टर्स, डायरोक्टोरेट ऑफ पर्सोनेल (ऑफिसर), पीओ ३ (ए), रुम नंबर १७, जे, ब्लॉक, वायूभवनच्या विरुध्द दिशेला, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली – ११०१०६, दूरध्वनी -०११-२३०१०२३१, किंवा संकेतस्थळ- www.careerindianairforce.cdac.in
संघ लोकसेवा आयोगाचे दूरध्वनी क्रमांक-०११-२३३८५२७१,२३३८११२५
सुरेश वांदिले