एरोस्पेस इंजिनीअरिंग – करिअर संधी
या विद्यार्थ्यांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारच्या महत्वाच्या आणि प्रगत प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटर –त्रिवेंद्रम, इस्त्रो सॅटेलाइट सेंटर-बेंगळुरु, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर-अहमदाबाद, सतिश धवन स्पेस सेंटर-शार, लिक्विड प्रॉप्युलशन सिस्टिम्स सेंटर- बेंगळुरू, त्रिवेंद्रम आणि महेंद्रगिरी, इस्त्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर – बेंगळुरु, नॅशनल एरोस्पेस लेबॉरेटरीज, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एरोस्पेस सिस्टिम्सची निर्मिती करणारे उद्योग, मेकॅनिकल सिस्टिम्सचे डिझाइन आणि विकास करणारे उद्योग यामध्ये वेगवेगळ्या संधी मिळू शकतात.
ॲव्हिऑनिक्स-
एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्सचा दर्जा आणि विश्वासहार्यता उच्च दर्जाची असणे आवश्यक असते. एरोस्पेसशी संबधित यंत्रसामग्रीशी संबंधित सर्व आव्हाने स्वीकारण्याची क्षमता या अभ्यासक्रमाद्वारे तंत्रज्ञांमध्ये निर्माण केली जाते. या अभ्यासक्रमात कंट्रोल सिस्टिम्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सिस्टिम्स यांचा ठळकरीत्या समावेश करण्यात येतो.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील महत्वाच्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते. विक्रम साराभाई स्पेस सेंटर-त्रिवेंद्रम, इस्त्रो सॅटेलाइट सेंटर- बेंगळुरु, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर-अहमदाबाद, मास्टर कंट्रोल फॅसिलिटी – हसन, नॅशनल रिमोट सेसिंग सेंटर – हैदराबाद, इस्त्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर – हैदराबाद, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्सचे विकास आणि डिझाइन करणारे विविध उद्योग, कॉम्प्युटर नेटवर्क आणि सॉफ्टवेअर सिस्टिम्सचा विकास करणारे उद्योग.
डयुएल डिग्री अभ्यासक्रम
पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मुलभूत अभ्यासक्रम शिकवले जातात. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे पायाभूत विषय शिकवले जातात. चौथ्या वर्षी स्पेशलायझेशनचे विषय शिकवले जातात. पाचव्या वर्षी प्रकल्प संशोधनावर भर देण्यात येतो.
ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये ग्रह, तारे, अंतराळ, विश्व आणि आकाशगंगा यांच्या अनुषंगाने भौतिकशास्त्राचे महत्व यावर लक्ष केंद्रित केले जाते.
अर्थ सिस्टिम सायन्समध्ये पृथ्वीच्या भौतिक,रासायनिक,जैविक प्रक्रियेची व्यामिश्र संकल्पना समजावून सांगितली जाते. पर्यावरण,जलावरण,भूगर्भ आणि जैवपर्यावरण यांच्या परस्परसंबंधाविषयी अभ्यास करावा लागतो. सॉलिडस्टेट फिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये सेमी-कंडक्टर उपकरणांच्या संशोधनात्मक अभ्यासावर भर देण्यात येतो. भौतिकशास्त्रातील उच्च दर्जाच्या संशोधनास प्रोत्साहन आाणि चालना देणारा हा अभ्यासक्रम आहे. ऑप्टिकल इंजिनीअरिंग या स्पेशलायझेशनमध्ये ऑप्टिक्स उद्योगातील भविष्यातीत तंत्रज्ञान विकासावर भर दिला जातो. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, लेन्स डिझाइन, ऑप्टिक्ल फॅब्रिकेशन अशा सारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.
अशी मिळते संधी
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स, इस्त्रो आणि केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स मार्फत विद्यार्थ्यांना बी.टेक मधील कामगिरीवर आधारित अर्थसाहाय्य करण्यात येत असल्याने इस्त्रो व डिपार्टमेंट ऑफ सायन्स या संस्थांना जागांच्या उपलब्धतेनुसार या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा पहिला अधिकार राहील. सरासरी ग्रेड पॉईंट ॲव्हरेज ७.५ असल्यास विद्यार्थ्यांचा या संस्थेतील नोकरीसाठी विचार केला जाऊ शकतो. जागांची उपलब्धता लक्षात घेऊन मेरिट क्रमांकानुसार अशी नोकरी दिली जाते.
संपर्क– डिन(अॅकेडमिक्स), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नालॉजी, वालियामाला,थिरुवनंतपूरम– ६९५५४७, केरळ. दूरध्वनी–०४७१-२५६८४७७, फॅक्स–२५६८४५५६, संकेतस्थळ -www.iist.ac.in,ईमेल– admin@iist.ac.in
०००
इतर संस्था
(१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर- (१) बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग. प्रवेशासाठी JEE – MAIN आणि JEE – ADVANCED या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतात. (२) एम.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग (प्रवेश- जॉईंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स-JAM) (३) पीएचडी इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (प्रवेश – ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग- GATE).
संपर्क- डिन ऑफ अॅकेडमिक अफेअर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, दूरध्वनी- ०५१२-२५९०१५१, संकेतस्थळ – www.iitk.ac.in, ई-मेल – doaa@iitk.ac.in
(२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास – (१) बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, (२) बी.टेक-एम.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (ड्युएल डिग्री इंटिग्रेटेड), प्रवेश- JEE – MAIN आणि JEE – ADVANCED या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे लागतील. (३) एम.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग (प्रवेश- जॉईंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स), (४) एम.एस्सी इन एरोस्पेस इंजिनिअरिंग.
संपर्क – डिपार्टमेन्ट ऑफ एरोस्पेस इंजिनीअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, चेन्नई – ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४०००, फॅक्स-२२५७८२०४, संकेतस्थळ – www.ae.iitm.ac.in, ई-मेल – office@ae.iitm.ac.in,
(३) एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी- या संस्थेने बी.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
संपर्क – डायरेक्टर ॲडमिशन, एसआरएम, एसआरएम नगर, कट्टनकुलाथूर, जिल्हा कांचिपुरम – तमीळनाडू- ६०३२०३, दूरध्वनी- ०४४-२७४१७०००, संकेतस्थळ-srmuniv.ac.in, ई-मेल- admissions.india@srmuniv.ac.in
सुरेश वांदिले