(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 एरोस्पेस तंत्रज्ञान 

    नॅसकॉम (द नॅशनल असोशिएशन ऑफ सॉफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीज) संस्थेच्या अंदाजानुसार पुढील काही वर्षात एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात अब्जावधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भारताकडून या क्षेत्रातील निर्यातसुध्दा मोठया प्रमाणावर वाढू शकते. भारताने अंतराळ संशोधनाचा बहुआयामी कार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन, उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवी अंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक प्रगत इंजिन आदींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना कालबध्दरीत्या आणि प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी मोठया प्रमाणावर तज्ज्ञमनुष्यबळाची गरज भासणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोस्पेस, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील बी.टेक पदवी प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात करिअरची संधी मिळू शकते.

इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह, ॲन्टेना/रडार, व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याविषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक, मेकॅनिकल शाखेतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, थर्मल, एरोनॉटिक्स या विषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक  केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या उमदेवारांना संधी मिळू शकते. अभियांत्रिकीतील प्रत्येक ज्ञानशाखेचा संबंध अंतराळाशी येतो. मेकॅनिकल अभियंते हे अवकाश यानांचे डिझाइन, बांधणी आणि निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. केमिकल अभियंते हे अवकाश यानांच्या इंधनप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. संगणक शास्त्रातील अभियंते माहिती विश्लेषणात सहभागी होतात. तथापी एरोस्पेस अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात प्राधान्याने संधी मिळू शकते.

     अभ्यासक्रम

    इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत कार्यरत असणारी महत्वाची संस्था आहे.‍ केरळ राज्यातीलथिरुवनंतपूरमपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वालियामाला येथे स्थित या संस्थेत अंतराळशास्त्र आणि तंत्रज्ञानातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनपर अभ्यासक्रम चालविले जातात.

या संस्थेत अंतराळ संशोधनाच्या संदर्भातील जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेला डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटीज स्पेस रिसर्च अशोसिएशन आणि कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत विद्यार्थी आणि अध्यापकांच्या शैक्षणिक आदानप्रदानासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत काही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प आणि इंटर्नशीप अमेरिकेत करण्याची संधी दिली जाते.

या संस्थेतील बी.टेक अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ९ महिने कालावधीच्या उच्चश्रेणीच्या प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले जाते.

संस्थेचे अभ्यासक्रम

  संस्थेत बी.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना, बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना आणि ड्यूएल डिग्री (बी.टेक ॲण्ड मास्टर ऑफ सायन्स /  मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) या शाखेत २२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.(हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा दहा सत्रात विभाजित करण्यात आला आहे.) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बीटेक इन इंजिनीअरिंग फिजिक्स आणि मास्टर ऑफ सायंस(ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स किंवा अर्थ सिस्टिम सायन्स,) /मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी(सॉलिड स्टेट फिजिक्स किंवा ऑप्टिकल इंजिनीअरिंग) ही पदवी प्रदान केली जाते. पदव्युत्तर पदवीचे विषय सहावे सत्र संपल्यावर विद्यार्थ्यांना दिले जातात.यासाठी विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम आणि सहा सत्रापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीचा विचार केला जातो.

निवड प्रक्रिया-

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE-ADVANCED मधील गुण ग्राह्य धरले जातात.(JEE-ADVANCED ही परीक्षा JEE-MAIN परीक्षेत उत्तीर्ण पहिल्या अडीच लाख विद्यार्थ्यांना देता येते. JEE-MAIN ही परीक्षा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्राथमिक परीक्षा आहे.)

    अर्हता उमेदवारांना १२ वी परीक्षेत भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्रात ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.अनुसूचित जाती, जमाती, आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी ६५ टक्के गुण हवेत. उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात त्तीर्ण होणे आवश्यक आहे.

या संस्थेत भारत सरकारच्या नियमानुसार २७ टक्के जागा नॉन- क्रिमिलेअर इतर मागास वर्ग, १३ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, ३ टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवल्या जातात. भारत सरकारच्या नव्या नियमानुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांसाठी दोन्ही बिटेक अभ्यासक्रमासाठी ६ जागा राखीव ठेवण्यात येतात. बीटेक-एमएस/एमटेक साठी २ जागा राखीव ठेवण्यात येतात. दोन्ही बीटेकमध्ये महिलांसाठी अतिरिक्त ५ आणि बीटेक-एमएस/एमटेक साठी अतिरिक्त ३ जागा राखीव ठेवण्यात येतात.

एरोस्पेस

या ज्ञानशाखेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अग्निबाणवाहक, अंतरिक्ष यान, विमाने यांचे डिझाइन आणि विकास यांचे मुलभूत ज्ञान दिले जाते. या ज्ञानशाखेचे विद्यार्थी हे एरोस्पेस इंजिनीअरिंग इंडस्ट्रीमधील प्रोप्युलशन सिस्टिम्स, एरोडायनामिक डिझाइन, स्ट्रक्चरल सिस्टिम्स, प्रिसिजन मॅन्युफॅक्चुरिंग या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास सक्षम होतात.