एलआयसीतील करिअर संधी
मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबूक, मेटा, ॲमेझान, अशासारख्या जागतिक स्तरावरील अवाढव्य कंपन्या मंदिचे कारण समोर करुन, एकापाठोपाठ एक नोकर कपातीचा निर्णय घोषित करत आहेत. गेल्या आठवड्यात गुगलचे प्रमुख सुंदर पिचई यांनी, नोकर कपातीचा निर्णय घेताना अतिव दु:ख होत असल्याचे (शहाजोगपणे)कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या आपल्या ईमेलमध्ये नमूद केले आहे. अशा या सकृतदर्शनी अंधकारमय परिस्थितीत भारतात मात्र वेगवेगळ्या शासकीय संस्था, उपक्रमे, कंपन्या, विभाग मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करत असल्याचे दिसून येते. केंद्रासोबत आता महाराष्ट्र सरकारही वेगवेगळया स्तरावरील हजाराने पद भरण्याची तयारी करत आहे. काहींची भरतही सुरु झाली आहे.
सरकारी उपक्रम किंवा आस्थापना किंवा विभागामधील नोकरी ही जवळपास कायम स्वरुपी, सुरक्षित, विविध लाभ देणारी आणि आता कार्पोरेटच्या बरोबरीने किंवा तोडीस तोड वेतन देणारी असते.
एलआयसीचा महिमा
आपल्या देशातील लाइफ इंश्युरंस ऑफ इंडिया(जीवन विमा निगम) ही कंपनी सर्वाधिक नफा कमवणारी शासकीय कंपनी आहे. तिचा विस्तार जवळपास भारतातील प्रत्येक जिल्ह्यात झाला आहे. ८०-९० टक्के तालुकेही या विस्तारात आले आहेत. विमा क्षेत्रात अनेक कंपन्या येउुनही, एलआयसीचा या क्षेत्रातील हिस्सा फारसा कमी झालेला नाही.
एलआयसी पूर्वीपासून आक्रमकपणे आपल्या व्यवसाय विस्तारासाठी प्रसिध्द आहे. शासकीय कंपनी असूनही आपले मार्केटिंग, विक्री, प्रसिध्दी, जनसंपर्क कॉर्पोरेट कंपन्यांच्या तोडीसतोड किंवा त्यापेक्षाही अधिक प्रभावीरीत्या ही कंपनी करत असते.
एलआयसीच्या संपूर्ण भारतातील विस्तार व व्यवसायाचे गमक हे त्यांच्या एंजटांच्या संपर्क साखळीत दडले आहे. काही लाखांनी हे एजंट शहर- जिल्हा- तालुका आणि ग्रामपातळीपर्यंत कार्यरत असतात.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती
या एजंटांना कार्यरत ठेवणारा आणि व्यवसायाशी जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी किंवा असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. या पदासाठी दरवर्षीच बहुदा भरती केली जाते. यंदा मंदिसदृष्य स्थिती असताना व उपरोक्त नमूद मोठमोठ्या कंपन्यांची नोकर कपात सुरु असताना एलआयसी, सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांची ३०० पदे भरणार आहे. यामध्ये खुल्या संवर्गातील ११२, अनुसूचित जाती संवर्ग ४८, अनुसूचित जमाती संवर्ग २२, ईतर मागास वर्ग संवर्ग-७०, आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग २७ अशा पदांचा समावेश आहे. ७ पदे विशिष्ट स्वरुपाच्या दिव्यांगासाठी राखीव आहेत.
या पदांचे महत्व मोठे असल्याने देशभरातील लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या पदाच्या निवडीसाठी अखिल भारतीय स्तरावरील चाळणी परीक्षा एलआयसी घेत असते. उमेदवारांची वाढती संख्या लक्षात आता प्राथमिक आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. प्राथमिक परीक्षेत विशिष्ट प्रमाणात गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण जागांच्या २० उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडले जाते. मुख्य परीक्षेनंतर मुलाखती घेतल्या जातात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांवर आधारित अंतिम निवड, संवर्गनिहाय केली जाते. प्रत्येक संवर्गासाठी कटऑफ(किमान गुण) गुण वेगवेगळे असतात.
या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ ही आहे. प्राथमिक परीक्षा १७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधित देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल. मुख्य परीक्षा १८ मार्च २०२३ रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइनच भरावा लागतो.
अर्हता – या परीक्षेला कोणत्याही विषयातील पदवीधर बसू शकतो. त्याने १ जानेवारी २०२३ पर्यंतच्या कालमर्यादेत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याची कागदपत्रे मुखलाखतीच्या वेळेस सादर करावी लागतील. १ जानेवारी २०२३ रोजी उमेदवाराने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावे. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे. अनुसूचित जाती/जमाती संवर्गासाठी वयोमर्यादेत ५ वर्षाची आणि इतर मागास संवर्गासाठी ३ वर्षाची सूट देण्यात आली आहे. खुला संवर्ग दिव्यांग- १० वर्षे सूट, अनुसूचित जाती/जमाती दिव्यांग संवर्गासाठी वयोमर्यादेत १५ वर्षाची आणि इतर मागास दिव्यांग संवर्गासाठी १३ वर्षाची सूट. अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी परीक्षा शुल्क ८५ रुपये. इतरांसाठी ७५० रुपये.
वेतन व इतर लाभ
या पदासाठी निवड झाल्यावर प्रारंभीचे एकत्रित वेतन, अ श्रेणीच्या शहरांसाठी अंदाजे ९८ हजार रुपये आहे. या शिवाय मोबाइल हँड सेट, दैनिक वृत्तपत्रे/मासिके यांचा पुरवठा, चहा/कॉफी खर्च, मोबाइल चार्जिंग खर्च, बॅग, समूह आरोग्य विमा, कांट्रिब्युटरी /सहभागी निवृत्ती वेतन, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन-रजा प्रवास सवलत, रोख वैद्यकीय सुविधा, ग्रॅज्युएटी-उपदान(सेवा निवृत्तीच्या वेळेला मिळणारे पैसे), समूह विमा, चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी नियमानुसार कर्ज, समूह व्यक्तिगत अपघात विमा आणि इतर लाभ.
अशी असते परीक्षा
(१) प्राथमिक परीक्षा
या वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षेचा कालावधी एक तासाचा आहे. या पेपरमध्ये तार्किक क्षमता (रिझनिंग ॲबिलिटी,प्रश्न आणि गुण- ३५/ कालावधी-२० मिनिटे), गणितीय किंवा सांख्यिकी क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, प्रश्न आणि गुण- ३५ प्रश्न आणि गुण- ३५/ कालावधी- २० मिनिटे) आणि इंग्रजी (प्रश्न आणि गुण- ३०/ कालावधी- २० मिनिटे), या तीन विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात. इंग्रजीच्या प्रश्नांमध्ये व्याक्रण, शब्दसंग्रह आणि आकलन (काँप्रिहेंशन) यावर विशेष भर दिला जाईल. इंग्रजीमध्ये किमान पात्रते (क्वालिफाईंग) पुरते गुण मिळायला हवे. हे गुण क्रमवारीसाठी धरले जात नाहीत.
प्रत्येक विभागासाठी संवर्गनिहाय पात्रता गुण (क्वालिफाईंग) पुढीलप्रमाणे आहेत- (१) तार्किक क्षमता– अनुसूचित जाती/ जमाती/ दिव्यांग संवर्ग–१६, खुला संवर्ग– १८, (२) गणितीय क्षमता – अनुसूचित जाती/ जमाती/ दिव्यांग संवर्ग–१६, खुला संवर्ग–१८ , (३) इंग्रजी– अनुसूचित जाती/ जमाती/ दिव्यांग संवर्ग– ९, खुला संवर्ग–१०
(२) मुख्य परीक्षा
प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येते. या परीक्षेचा पेपर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरुपाचा असतो. शिवाय इंग्रजी पत्रलेखन आणि निंबध हा वर्णनात्मतक पेपरही असतो.
या दोन तास कालावधीच्या या पेपरमध्ये ३०० गुणांचे एकूण १२० प्रश्न विचारले जातात. यात (१) तार्किक क्षमता (रिझनिंग ॲबिलिटी,एकूण प्रश्न-३० आणि गुण ९०,कालावधी-४० मिनिटे), (२) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स, एकूण प्रश्न- ३० आणि गुण ६०, कालावधी- २० मिनिटे), (३) विदा विश्लेषण आणि अन्वयार्थ लावणे (डेटा ॲनॅलिसीस आणि इंटरप्रिटेशन,एकूण प्रश्न-३० आणि गुण ९०, कालावधी- ४० मिनिटे), (४) विमा आणि वित्तीय बाजारासंबंधी ज्ञान (इंश्युरन्स आणि फायनांशिअल मार्केट,एकूण प्रश्न-३० आणि गुण ६०,कालावधी-२० मिनिटे), (५) इंग्रजी भाषा- निबंध आणि पत्रलेखन, (एकूण गुण २५, कालावधी- ३० मिनिटे). या पेपरमध्ये किमान पात्रतेपुरते गुण मिळणे आवश्यक आहे. हे गुण क्रमवारीसाठी धरले जात नाहीत. मात्र हे गुण मिळाले नाही तर क्रमवारीमध्ये नाव येत नाही, ही बाब लक्षात ठेवावी.
प्रत्येक विभागासाठी संवर्गनिहाय पात्रता गुण (क्वालिफाईंग) पुढीलप्रमाणे आहेत-
(१) तार्किक क्षमता- अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्ग-४०, खुला संवर्ग-४५, (२) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी- अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्ग-२७, खुला संवर्ग-३०, (३) विदा विश्लेषण आणि अन्वयार्थ लावणे, अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्ग-४०,खुला संवर्ग-४५ (४) विमा आणि वित्तीय बाजारासंबंधी ज्ञान, अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्ग-२७,खुला संवर्ग-३० (५)इंग्रजी भाषा-निबंध आणि पत्रलेखन, अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्ग-९,खुला संवर्ग-१०.
इतर चारही विभागात किमान पात्रता गुण मिळालेल्या उमेदवारांचाच इंग्रजी वर्णनात्मक पेपर तपासला जातो. प्रत्येक विभागासाठी दिलेल्या वेळेतच प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. तो कालावधी संपला की दुसरा विभाग संगणक पडद्यावर येतो.
चारही विभागाचा वेळ संपल्याबरोबर इंग्रजीचा वर्णनात्मक पेपर पडद्यावर दिसू लागतो. उमेदवारांना संगणकावरच हा पेपर लिहावा लागतो.प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील प्रश्न हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतात. पेपर ऑनलाइनच सोडवावा लागतो.
संपर्क – इच्छूक उमेदवारांनी www.licindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावरील करिअर (carrers)या बटन किंवा लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर रिक्र्युटमेंट ऑफ एएओ(जनरालिस्ट)२०२३ ही लिंक खुली होईल. त्यावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल.
सुरेश वांदिले