ओबामा जिंकण्याचे कारण की..
अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याची आठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळी झाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या काळात लक्षात येतात.त्याकडे बघायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.ओबामा यांच्या विजयाशी निगडित बातमीचा नवा कंगोरा हा भारताकडे अंगुलीनिर्देश करणारा असल्याने व तो आमच्याशिवाय कुणाच्याच लक्षात न आल्याने व आमच्या लक्षात आल्याचे हे आयएसआय,एफबीआय,केजीबी आणि सीबीआयच्याही लक्षात न आल्याने,या शिळया बातमीकडे लक्ष वेधने आम्हाला अत्यंत गरजेचे वाटले.
ओबामा विजयाच्या शिळ्या बातमीतला हा कंगोरा कंबोडिया देशाशी निगडित असता तर आम्ही ओबामांच्या वाटेला न जाता सन ऑफ सरदार बघण्यासाठी वाट वाकडी केली असती.अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा झाले काय किंवा एखादे रॉबर्ट पिटरसन झाले काय,त्यामुळे मुंबईतील लोकलमधील माणसांची गर्दी,पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहनांची गर्दी,रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांची गर्दी कमी झाली नसती.आपल्यासाठी रामराव गेले नि शामराव आले,एवढ्यापुरताच हा मामला.
000
ओबामा निवडणूक जिंकले.काही विश्लेषकांच्या मते ते जिंकणारच होते.तर काही तज्ज्ञांच्या मते यावेळी ते काठावरच होते.पास होण्यासाठी 35 टक्के गुण हवे असतात.त्यांचा काटा 34 ते 34.5 टक्के असा लोंबकळायला लागला होता.पण शेवटच्या क्षणी हुषार मुलगा जसा नेमका प्रश्न पाठ करतो नि तोच प्रश्न नेमका पेप्रात येतो.35 टक्केही गुण मिळेल की नाही अशी धाकधूक असलेला हा हुषार मुलगा 37.5 टक्के गुण घेऊन फ्लाइंग कलरने पास होतो.तसे ओबामा यांचे झाले.शेवटच्या दिवशीच्या प्रश्नाची तुक्की बरोबर जमली नि तेही फ्लाइंग कलरने पास झाले.
000
ओबामा हे यामुळे किंवा त्यामुळे किंवा अशामुळे किंवा तशामुळे पास झाले असे ब्रम्हदेशातील अभ्यासक–रावांपासून ते होंडुरसमधील अभ्यासक–रावापर्यंत सारचे आकडेवारीनिशी सिध्द करण्यासाठी सरसावले.ओबामा जिंकण्यासाठी अभ्यासक–रावांनी सांगितलेली आकडेवारी व विश्लेषण सत्याच्या असापास जाणारी किंवा सत्याच्या अवतीभवती घुटमळणारी नक्कीच असली पाहिजेत. पण ओबामांच्या विजयासाठी त्याहीपेक्षा एक मोठ्ठे लिक्विड कारण घडले.याकडे एकाही अभ्यासक–रावांचे लक्ष गेले नाही.या साध्या विचाराचा कावळा त्यांच्या डोक्यावर बसून काव–कावला नाही.पण आम्ही मात्र ते बरोबर ओळखले.कारण विचयाच्या होकायंत्राची दिशा भारताकडे होती.
000
याचा अर्थ ओबामांच्या विजयाचे वारे हे भारताकडून वाहत गेले,असा होतो,असं एखाद्याला वाटू शकतं.ते अगदी खरं आहे.मात्र ही बाब कुणाच्या लक्षात आलेली नाही.ओबामांच्याच काय पण मिशेल वहिनींच्याही ते लक्षात आलेले नाही.तुम्हला वाटेल की मग,आमच्या कसे बरे लक्षातआले.दोन ओळींमध्ये दडलेलं विधान ज्याला वाचता येतं त्याला बरच काही कळू शकतं.जसे कुलदीप नायरांना गेल्या 50 वर्षापासून बिटवीन द लाइन लिहून दिल्लीतल्या राजकारणातील नवरंग कळले आहेत.अगदी तस्सच.
000
झाले असे की ओबामा निवडणूक जिंकले आणि त्यांच्या विजयावर चिवचिवाट्या प्रतिक्रिया लगेच पडल्या.सगळयात आधी चिवचिवल्या त्या श्रीमती मल्लिका शेरावत.त्यांनी ओबामा यांचं औपचारिक अभिनंदन केलं.पण लगेच त्या कशा म्हणतात,मी ओबामांना व्हाईट हाऊसमध्ये भेटले .तिथे त्यांच्या सोबत चहा–बिस्किटही झाले.तो क्षण मी अद्याप विसरलेले नाही.
लक्षात आलं ना तुमच्या,की व्हाईट हाऊसमधील श्रीमती शेरावत यांचा सोबतचा चहा,हा ओबामांच्या विजयामध्ये डिसायडिंग फॅक्टर ठरला,हाच या चिवचिवाटाचा दोन ओळींमध्ये दडलेला अन्वयार्थ.म्हणूनच श्रीमती शेरावतांना ओबामांचे अभिनंदन करताना नेमके हेच बरोबर चिवचिवटावे वाटले.ओबामांनी श्रीमती शेरावत यांच्यासोबत चहा घेतला नसता तर त्यांचे व्हाईटवॉश होऊन त्यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आवडत्या कुत्रेरावांसोबत फेरफटका मारायला मिळाला नसता.हे त्यांनी दोन ओळींमधून जगाला सांगून टाकले.ते कुणाच्याही ध्यानीमनी आले नाही.पण आमच्या चाणाक्ष नजरेने ते बरोबर टिपले.
00
आता केवळ आमची एकच उत्सुकता उरलीय की ,ओबामांसोबत श्रीमती शेरावत यांनी शेअर केलेला चहा हा भामरागडात होणारा गवती चहा होता की,आसामात होणारा ग्रीन टी होता की टपरीवर मिळतो तसा पुन्हा पुन्हा उकळलेला अद्रक चहा होता.त्याचा शोध आम्ही नक्कीच घेऊ.कारण ही रेसिपी घेऊन आम्हाला जगात जिथे जिथे राष्ट्रपतींच्या आणि पंतप्रधानांच्या निवडणुका होतील तिथे तिथे जाता येईल.यशाच्या या मल्लिका–लिक्विड हमखास फार्म्युल्याचं रिटेल मार्केटही विस्तारता येईल.कसे?
000