ती, तेव्हा तिसऱ्या वर्गाची विद्यार्थीनी होती. किंचित लाजाळू ,बुजरी. याचा गैरफायदा घेऊन तिच्या वर्गातले काही मुलं आणि मुली घेऊन तिला त्रास देऊ लागले. कुणी तिला त्यांचे प्लेट्स स्वच्छ करायला लावत, तर कुणी बुटाचे लेस बांधायला सांगत. थोडक्यात ती एक प्रकारची रॅगिंगच होती म्हणाना. याचा तिला फार त्रास होऊ लागला. ती अबोल आणि एकलकोंडी झाली. हे तिच्या आईबाबांच्या लक्षात आलं. खरी समस्या त्यांच्या लक्षात आली. ते तिच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे वर्गातल्या मुलांकडून होणारी तिची छळवणूक थांबली.
या दुष्टचक्रातून आपली तर सुटका झाली, पण इतरांचं काय? आपल्या पालकांमुळे हा त्रास थांबला. पण ज्या मुलांचे पालक असं मदतीला धावून येत नाहीत किंवा ज्या मुला/मुलींना कुणाचच साहाय्य मिळत नाही, त्यांनी काय करायचं? त्यांच्या या त्रासातून सुटका कशी होणार? ती विचार करु लागली. त्यातूनच तिला सुचलं की, आपणच अशा पीडित किंवा संकटग्रस्त मुला/मुलींच्या सुटकेसाठी धावून जायला हवं.
ते सालं होतं २०१८. ती तेव्हा नववीत होती. तिने, ‘ॲण्टी बुलीयिंग स्क्वाड (छळवणूक विरोधी पथक)’ हा ब्लॉग सुरु केला. या ब्लॉगवर, शाळा- महाविद्यालयातील ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंवर अत्याचार होत आहेत किंवा झाले आहेत, ते आपल्या व्यथा अनामिकपणे मांडू शकत. पण, ही समस्या सोडवण्यासाठी यापेक्षा आणखी काहीतरी भरीव करायला हवं, हे तिच्या लवकरच लक्षात आलं. तिने मग २०२१ साली “कवच” नावाचं एक ॲप विकसित केलं. पीडित विद्यार्थी/विद्यार्थीनी भीतिने तक्रार करायला समोर येत नाही. अशी तक्रार केल्यास, आपला आणखी छळ होऊ शकतो. या दडपणाखाली ते असतात. त्यामुळे या ॲपवर कुणीही नाव न देता आपली व्यथा नोंदवू शकतात. ही नोंद केल्याबरोबरच त्या व्यक्तीला, त्याक्षणी म्हणजेच रियल टाइममध्ये साहाय्य मिळण्याची सुविधा आहे. या ॲपव्दारे शैक्षणिक साहाय्यही ती मुलांना मिळूवन देऊ लागली.
हळूहळू या ॲपची महती सर्वदूर पसरु लागली. छळवणून झालेल्याची माहिती गुप्त ठेवल्याने “कवच” यशस्वी झाल्याचं, ती सांगते.
सोनी टीव्हीवर, नावीन्यपूर्ण स्टार्टअपच्या साहाय्यासाठी असणाऱ्या ‘शार्क टँक’ मालिकेत तिला ‘कवच’ ॲपसाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक मिळाली. या कामगिरीची दखल घेऊन तिला २०२३ साली प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
शैक्षणिक संस्थांमधील छळवणूक कमी होण्यासाठी ती जाणिवजागृतीही करते. ‘कवच’ ॲप हे एकप्रकारचा डिजिटल समुदाय असून या ठिकाणी छळवणूक विरोधातल्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन आणि समुपदेशन उपलब्ध करुन दिलं जातं. या ॲपच्या माध्यमातून शाळा, अशासकीय संस्था आणि व्यावसायिकांच्या साहाय्यानं शंभरहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील २००० विद्यार्थ्यांना फायदा मिळाला आहे.
ती गुरगावच्या पाथवे स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिचे बाबा चार्टर्ड अकाउंट आणि उद्योजक आहेत. बाबांसारखच उद्योजक होण्याचं तिचं स्वप्न आहे. ‘कवच’ ॲपच्या माध्यमातून तिने त्यादृष्टिने एक पाऊल समोर टाकलं आहे.
तर, अशी ही अनुष्का जॉली, वय वर्षे १५ हल्ली मुक्काम दिल्ली.
सुरेश वांदिले