काकू शांत झाल्या
लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती.चढणं आणि उतरणं दोन्हीसाठी कसरत करावी लागत होती.त्यातच बाहेर धो धो पाऊस.त्यामुळे हातात छत्री घेऊन स्टेशनमध्ये चढण्याची धडपड आणि तशीच ओली छत्री घेऊन डब्यात चढण्याची चढोओढ.त्यामुळे सगळेजण तसे कावलेले होते.
तेजोमयी आणि आईस कसल्यातरी कामासाठी दादरला जायचं होतं. ट्रेन त्यांच्या जवळच्या स्टेशनमधूनच सुटणार असल्यानं त्यांना व्यवस्थित चढायला मिळाल आणि बसायला जागाही मिळाली.
कोणत्यातरी एका स्टेशनवर एक काकू कशाबशा चढू शकल्या. प्रवाशांनी दाराजवळ नेहमीप्रमाणे गर्दी केल्याने त्यांना चढायला फार त्रास सहन करावा लागला. त्यामुळे दाराजवळ गर्दी केलेल्या प्रवाशांना उद्देशून काकू काहीबाही बडबडू लागल्या. धो धो पावसात ट्रेनचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांची चिडचीड होत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. एकदोन प्रवाशांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.एकानं सॉरी म्हंटलं, पण त्या काही ऐकायला तयारच नव्हत्या.
लोकांना काहीच कशी शिस्त नाही? इतकी गर्दी होतेच कशी? दार कां अडवून बसायला यांच्या घरची ट्रेन समजतात का? इतर प्रवाशांनी उतरायच,चढायचं कसं? यांना काहीच कशी अक्कल नाही? पोलीस काय डोळे लावून बसले की काय? रेल्वेला गर्दी दिसत नाही का? कशाला देतात एवढी तिकिटं? असं त्या बोलत राहिल्या. एखाद्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला की त्या त्याच्यावर धावून जायचा.
काही केल्या काकूंचा संताप कमी होईना. या संतापामुळे त्यांची थरथर होऊ लागली. हातापायाला कंप येऊ लागला. पण त्यांची बडबड थांबली नाही. पुढच्या स्टेशनवर गर्दी आणखी वाढली. त्यामुळे त्यांच्या बडबडीत वाढच झाली. त्यामुळे वैतागलेल्या काही प्रवाशांनी त्यांच्याशी भांडायला सुरुवात केली.
तेजोमयी हे सगळं आ वासून बघत होती.त्यांना काकूंचा वैताग बघवेना.ती आईच्या कानाला लागली. तिच्या कानात काहीतरी सांगितलं. स्वत: जागेवरुन उठली. तिच्यासोबत आईही उठली. तेजोमयी काकूंचा हात पकडत म्हणाली,काकू बसा येथे. काकू घाम पुसत बसल्या. जोरजारने बोलून त्यांना दम लागला होता. तेजोमीयने आपल्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढून त्यांना पाणी दिलं. काकूंनी घटा घटा पाणी दिलं.
काही क्षणात काकू शांत झाल्या. काकूंचा कर्कश आवाज थांबल्याने इतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. एक छोटीसी कृती करुन तेजोमयीने समस्येचे समाधान शोधून काढलं. जे इतर प्रवाशांना सुचलं नाही. ते तिला सुचलं. एका आजोबांना तिचं फार कौतुक वाटलं. त्यांनी तिला आपल्या जवळ असलेली कॅडबरी दिली. आपणास जे सुचलं नाही ते तेजोयमीस सुचलं,या विचाराने आईचा उर अभिमानाने भरुन आला.
सुरेश वांदिले
