दिवाळी आठ दिवसावर आल्याने तेजोमयीच्या घरी वेगवेगळ्या कामांची लगबग सुरु झाली. आधी घर स्वच्छ करायचं ठरलं. त्यानुसार , आईने स्वयंपाकाची खोली स्वच्छ करायला घेतली. मात्र, तेजोमयी आणि बाबांना काही उत्साह वाटेना. काम करायचं सोडून त्यांची टंगळमंगळच सुरु होती.
आई काम करतेय आणि हे दोघे काहीच करत नाही, हे अलेक्झांडरच्या कसं बरं पचनी पडणार? त्यामुळे “तुमचं काय?” असं काहीसं त्याच्या पध्दतीने विचारण्यासाठी, हे महाशय जिभ लांब करत बाबांसमोर उभे ठाकले. बाबांनी तेजोमयीकडे बोट दाखवलं. अलेक्झांडर तिच्याकडे जाऊन, शेपूट हलवत नि मान उंच करत “तुझं काय?” असं विचारण्याचा प्रयत्न करु लागला. ही सगळी गंमत बघून अलेक्सा गोर्जीला मजा येत होती.
आपण कामाला लागलोय, पण या दोघांचा आळस काही जात नाही, हे आईच्या लक्षात आलं. तिने तिच्या पध्दतीने दोघांनांही खडसावलं. बळेबळे का होईना, बाबा आणि तेजोमयी कामाला लागले.
“आपण सुरुवात कशी करायची गं?”बाबांनी तेजोमयीस विचारलं.
“मी सुचवू का?” त्या दोघांचं भांबवणं बघून गोर्जी म्हणाली.
“सांग की.” तेजोमयी आनंदानं म्हणाली.
“आपल्या घरभर बराच पसारा झालाय. कपाटांमध्ये अनावश्यक कपडे, कागदपत्रं, मासिकं यांचा ढिग लागलाय.”
“हे तू कां सांगतेस? आम्हाला दिसतय की ते.” बाबा नाराजी व्यक्त करत म्हणाले.
“अहो बाबा, रागावू नका. असा जेव्हा पसारा असतो, तेव्हा तो कमी करण्यासाठी एक विशिष्ट पध्दत अवलंबली की काम, सोप होतं.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं की आधी तुम्ही दोघांनी एक एक खोली वाटून घ्या. मग त्या खोलीतील एक दिशा पकडा. त्या दिशेने जे पहिलं कपाट असेल, त्यातील अनावश्यक गोष्टी बाहेर काढायला सुरुवात करा. आधी वरचा कप्पा, मग मधला कप्पा, मग शेवटचा कप्पा असा क्रम ठेवा. पहिला कप्पा झाल्याशिवाय दुसऱ्यास हात लावू नका, तसंच एक कपाट पूर्ण झाल्याशिवाय दुसरीकडे वळू नका. याला म्हणतात स्वच्छतेची कायझेन पध्दत. जपानी माणसांनी शोधलेली.”
“बापरे!”तेजोमयी उदगारली
“खरंच की!”बाबा म्हणाले.
“अहो बाबा हे खरंच कठीण नाही. असं कराल तर, सगळं घर पध्दतशीरपणे निटनेटकं, स्वच्छ नि चकाचक होईल. तुम्हाला कंटाळाही येणार नाही. हे राहिलं ते राहिलं असं होणार नाही.”
“अगं पण, हे करायचं कसं?” तेजोमयी जांभई देत म्हणाली.
“अगं, सोप्पं आहे. पहिलं कपाट उघडायचं. बाप्पांचं नाव घ्यायचं, काम सुरु करायचं. एकदा कामाला लागलो की मग हळूहळू उत्साही येऊ लागतो.”
“तुला गं कसं ठाऊक?”
“आपली आई आहेना. तिच्या कामाच्या पध्दतीचं दररोज मी निरिक्षण करते. स्वयंपाकाच्या खोलीत तिने असच एका एका कप्प्यापासून सुरुवात केलीसुध्दा.”
“बापरे!”
“खरंच की!”
“काय बापरे नि काय खरंच की?”
“नाही म्हणजे, आई कशी सगळी कामं सोपं करतेना म्हणून, खरंच की.”
“आम्हाला ते जमत नाही म्हणून बापरे!”बाबा मिश्किलपणे म्हणाले.
“मग आईचा आदर्श घ्या की.” गोर्जी डोळे मिचकावत म्हणाली. तिच्या सल्ल्याप्रमाणे तेजोमयी आणि बाबा घर स्वच्छतेच्या कामाला लागले. हे बघून आई आनंदली. तिचा चिडचिडपणा कमी झाला.
०००
रात्री जेवण झाल्यावर सगळी मंडळी गप्पा मारत बसली असताना गोर्जीने विचारलं,
“अहो बाबा, तुम्ही मंडळी घर स्वच्छ करण्यासाठी दिवाळी येण्याचीच कां बरं वाट बघता?”
“तसं काही कारण नाही.”
“अहो बाबा, तुम्ही अशी दिवाळीची वाट बघता नि त्यात वर्षं निघून जातं. मग या वर्षभरात वेगवेगळा कचरा साचत जातो. तेच जर तुम्ही महिन्या दोन-महिन्यांनी एखाद्या सुटिच्या दिवसाला, ‘स्वच्छतेचा दिवस’ केला तर वेळच्यावेळी कचऱ्याचा निचरा नाही का होणार? त्यामुळे घर सदैव स्वच्छ नि चकचकित राहील. असं मग दिवाळीच्या काळात सगळी कामं अंगावर पडणार नाहीत. कंटाळा करावा लागणार नाही. आईचा रागही तुमच्या वाटेला येणार नाही.” गोर्जी म्हणाली.
गोर्जी काहीतरी छान सांगतेय ते अलेक्झांडरच्या लक्षात आल्याने तो एकटक तिच्याकडे बघत होता. तिचं बोलणं संपताच त्याने उडी मारुन आपला आनंद व्यक्त केला. शिका गोर्जीकडून, काहीतरी असं म्हणत आईने गोर्जीचं कौतुक केलं नि अलेक्झांडरला कवेत घेतलं.