(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 कावळा आणि राजहंस

एकदा एका कावळ्याने उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ तसेच ते राहत, तर काही पक्षी खेळता खेळता पाण्यात डुबकी मारुन गायबच होतं. कितीतरी वेळ ते बाहेरच येत नसत. हे सगळं बघून कावळयास मजा वाटली.
तो उडता उडता सरोवराच्या जवळ असणाऱ्या एका झाडावर उतरला. पाण्यावर खेळणाऱ्या पक्षांच्या हालचाली जवळून न्याहळू लागल्या. सरोवरच्या पाण्यावर विहरणारे पक्षी हे राजहंस असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्यांचा पांढरा शुभ्र रंग बघून त्याला त्यांचा हेवा वाटला.
आपला रंग काळा कां असेल बरं..तो विचारात पडला..
राजहंस पक्षी सतत पाण्यात राहतात, पाण्यातच खेळतात म्हणून तर त्यांचा रंग पांढरा नसेल ना..त्याच्या मनात विचार आला..
समजा असं असेलही तर तुला त्याचं काय करायचय.. कावळयाचं दुसरं मन म्हणालं..
मला असं वाटतय की आपणही पाण्यातच राहिलो तर आपणही पांढरे शुभ्र होऊ की नाही..
त्याने काय होईल..
कावळयाच्या मनाने त्याला विचारलं..तो विचार करु लागला. मात्र या प्रश्नाचं उत्तर काही त्याला देता आलं नाही.आपण पांढरं शुभ्र झाल्याने काय होईल, हे आता कुणाला बरं विचारावं याचा कावळा विचार करु लागला. थोडावेळ रजहंसांचा खेळ बघून तो आपल्या घराकडे परतला.
आपल्या आजोबांना खूप अनुभव असल्याने आपण त्यांनाच विचारायला हवं, असं कावळ्यास घराकडे येताना सुचलं.
घरी आल्या आल्या त्याने आजोबांना गाठलं. त्याने आपल्या मनातला प्रश्न त्यांना विचारला.
यावर आजोबा गंभीर झाले.
ते काहीच बोलेना..आपलं काही चुकलं तर नाही ना असं कावळ्यास वाटलं.
आजोबा, तुम्हास ठाऊक नसेल तर सांगू नका..पण असं दु:खी होऊ नका हो..कावळा आजोबांच्या चोचिला चोच घासत म्हणाला.
तसं नाही रे बाळा…तुझ्या प्रश्नानं मला खूप वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्देव्यी घटनेची आठवण झाली..
म्हणजे काही विपरित झालं होतं का आजोबा..कावळयानं उत्सुकतेनं विचारलं..
आजोबांनी मेाठा श्वास घेतला. आभाळकडे एकटक बघत ते बोलू लागले..
अरे, आपल्या एका पूर्वजाला सुध्दा कधीकाळी असंच वाटलं होतं.
आँ..
हो रे राज्या…
मग तो झाला का पांढरा..
अरे राज्या..त्याने काही विचार केला नाही. तू जसं मला विचारलं तसं त्याने त्याच्या आजोबांना विचारलं नाही..
पुढे काय झालं..
अरे, तो सरळ पाण्यातच शिरला आणि राजहंसासारखा राहण्याचा प्रयत्न करु लागला.
राजहंसानेही त्याला समजावलं, की अरे तू झाडावरचा पक्षी, तू तिथेच राहू शकतो. मी पाण्यातला पक्षी म्हणून मी इथे राहू शकतो. असं एकमेकांची घरं बदलली तर दोघांना राहता यायचं नाही आणि आपण प्राण गमावून बसू..
मग काय झालं..
राजहंसाचं म्हणणं आपल्या पूर्वजास पटलं नाही…राजहंसाशिवाय कुणीही पांढरे शुभ्र होऊ नये असं त्याला वाटत असल्यानेच तो आपल्याला असं सांगतोय असं कावळयाला वाटलं. ते तसं त्याने बोलूनही दाखवलं..
राजहंसाने पुन्हा समजावलं पण आपला पूर्वज काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने राजहंसाकडे दुर्लक्ष केले. राजहंसानेही त्याचा पिच्छा सोडला. ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं, असं म्हणून राजहंस आपल्या सवंगड्यांसोबत खेळू लागला.
आपला पूर्वज पाण्यावर आणि पाण्याखालीच राहण्याचा प्रयत्न करु लागला..पण सतत पाण्यात राहिल्याने त्याला हुडहुडी भरली. त्यामुळे त्याला धड उडता येईना.तो कसाबसा उडाला नि लगेच खाली कोसळला. आता त्याच्यात त्राणच उरले नव्हते..त्याचवेळी तिथून एक कोल्हा जात होता. त्याला हा आपला खाली पडलेला पूर्वज दिसला. त्याला आयतीच मेजवाणी मिळाली होती. त्याने कावळयावर झडप मारली आणि त्याला मजेत खाऊ लागला..आजोबा दु:खी अंत:करणाने म्हणाले..
अरेरे, वाईट झालं..कावळयाच्या तोंडून बाहेर पडलं..
जे इतरांचं ऐकत नाहीत, सारासार विचार करत नाहीत, इतरांसारखं होण्याच्या प्रयत्न करतात, जे शक्य नाही ते व्हावं याचा अट्टाहास करतात त्यांचं असंच घडतं राज्या..
हं..कावळयाने दीर्घ श्वास घेतला..बरं झालं आपण आजोबांना विचारलं ते…असा विचार त्याचा मनात येऊन त्याला हायसे वाटलं.
आजोबांच्या चोचिला चोच लावून त्याने आजोबांना थँक्यू म्हंटले.
सुरेश वांदिले